निसर्गसौंदर्याने नटलेली कोकणची भूमी ही तिथे असलेल्या विविध देवस्थानांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. इथल्या जवळजवळ सगळ्याच देवस्थानांशी काही ना काही गूढ रम्य अशा कथा निगडित असतात. अत्यंत शांत वातावरण असलेल्या या मंदिरांमध्ये खरोखर मन:शांती मिळते. काहीसे वेगळे, पण मोठी ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेले असेच एक मंदिर म्हणजे कोटकामते येथील श्रीभगवती मंदिर होय. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या देवगड तालुक्यात असलेले हे मंदिर देवगडपासून ३० कि.मी. आणि कुणकेश्वर या प्रसिद्ध ठिकाणाहून फक्त १५ कि.मी.वर आहे. या गावचे अगदी खास असे वैशिष्टय़ म्हणजे, देशभरातील इतर व्यक्तिगत इनामे आणि संस्थाने जरी रद्द झाली असली तरी देवगड तालुक्यातील कोटकामते गावचे इनाम मात्र अजूनही चालू आहे. या गावाच्या सर्व जमिनीवर प्रमुख कब्जेदार म्हणून इनामदार ‘श्रीदेवी भगवती संस्थान कोटकामते’ असा शिक्का प्रत्येक जमिनीच्या ७/१२ च्या उताऱ्यावर आहे. या गावाला पूर्वी एक प्राचीन कोट होता. त्याची साक्ष म्हणून रस्त्याच्या कडेला फक्त एक बुरूज आणि थोडीफार तटबंदी आजसुद्धा पाहायला मिळते. कोट असलेले गाव म्हणून कोटकामते असे याचे नाव पडले. मराठी आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी शके १६४७ म्हणजेच इ.स. १७२५ साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्याची नोंद म्हणून मंदिराच्या िभतीवर एक देवनागरी लिपीमधील ऐतिहासिक शिलालेख बसवला आहे. त्यामध्ये कान्होजी आंग्रे यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. सहा प्रचंड लाकडी कोरीव खांबांनी तोललेली तक्तपोशी, जुन्या घंटा, देवतांचे तरंग, लामणदिवे आणि भगवतीची सर्वागसुंदर मनोहारी मूर्ती असे सगळे साग्रसंगीत सजलेले हे देवालय आहे. अत्यंत जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी अशी हिची ख्याती पंचक्रोशीमध्ये पसरलेली आहे. मंदिराच्या परिसरात श्रीदेव रवळनाथ, हनुमान, पावणादेवी असून शिवाय लाकडी नक्षीकाम, दीपमाळ, सुंदर कलात्मक बांधणीची एक पाण्याची विहीर इत्यादी सर्व गोष्टी पाहायला मिळतात. देवीच्या या देवळाबाहेर मंदिराकडे तोंड करून सिंहाची प्रतिमा आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला दोन मोठय़ा तोफा जमिनीमध्ये पुरून ठेवलेल्या दिसतात. नवरात्रोत्सव हा इथला प्रमुख उत्सव असून तो मोठय़ा प्रमाणावर इथे साजरा केला जातो.
इथले अजून एक वैशिष्टय़ म्हणजे सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी या गावात गोसावी समाजाची मंडळी राहत होती. ही मंडळी जवळच असलेल्या मिरवाडीच्या वहाळातून आणलेल्या दगडांमधून उत्कृष्ट भांडी घडवत असत. त्यामध्ये दगडी भांडी, सट, बरण्या, दगडी ताटं, अंगचे कान असलेले कप अशा सुंदर वस्तू घडवीत असत. भूशास्त्रीयदृष्टय़ा हा दगड ‘टाल्क क्लोराइड शिस्ट’ या प्रकारामध्ये मोडतो. मंदिराच्या मागील बाजूस उंचावर डॉ. प्रभुदेसाई यांचे घर आहे. हे सारे प्रभुदेसाई घराणे आयुर्वेदिक वैद्य आहेत. ते इथले वतनदारदेखील आहेत. त्यांच्या खापरपणजोबांनी इथेच संजीवन समाधी घेतली होती. त्या पुण्यपुरुषाचं स्मारक इथे नीटसपणे राखलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या पर्यटनामध्ये या कोटकामत्याच्या श्रीभगवती देवीचे दर्शन अवश्य घ्यावे.