कौनेन शरीफ एम – response.lokprabha@expressindia.com

कोविड १९च्या रुग्णाला प्राणवायूचा पुरवठा करण्याची गरज केव्हा पडते?

कोविड १९ रुग्णाला श्वास घ्यायला जास्त त्रास व्हायला लागतो आणि त्याची स्थिती गंभीर होते अशा वेळी त्याला प्राणवायूचा पुरवठा करण्याची गरज पडते. कोविड १९चा संसर्ग झालेल्या बहुतांश रुग्णांना श्वसनमार्गात संसर्ग झालेला असतो. त्यापैकी बहुतेक गंभीर रुग्णांच्या लक्षणांमध्ये श्वास घ्यायला त्रास होणे हे लक्षण आढळते. अशापैकी काही रुग्णांमध्ये तर अ‍ॅक्युट रेस्पारेटरी डिस्ट्रेस सिण्ड्रोम (एआरडीएस) हा अतिशय गंभीर आजार होऊ शकतो.

कोविड १९ मुळे श्वास घ्यायला त्रास कसा होतो?

कोविड १९ हा विषाणू रुग्णाच्या श्वसनव्यवस्थेवर परिणाम करत असल्यामुळे संबंधित रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. आपले शरीर हवेतून ऑक्सिजन शोषून घेते आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकते. माणूस श्वास घेतो तेव्हा त्याच्या फुप्फुसात हवा भरली जाते. त्यातला ऑक्सिजन मिळवून अ‍ॅल्वाइल (फुप्फुसामध्ये असलेल्या हवेच्या लहान लहान आकाराच्या पिशव्या. त्यांच्यामार्फत रक्तातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचे आदानप्रदान केले जाते.) नंतर तो ऑक्सिजन रक्तवाहिन्यांना पुरवतं आणि त्यांच्यामार्फत त्याचा संपूर्ण शरीराला पुरवठा केला जातो.

आपल्या श्वसनमार्गात एपिथेलायल पेशी असतात. वेगवेगळे विषाणू तसंच संसर्गापासून श्वसनमार्गाचे संरक्षण आणि हवेचे आदानप्रदान हे त्यांचे प्रमुख काम असते. SARS-CoV-2 हा करोनाचा विषाणू या एपिथेलायल पेशींना बाधित करू शकतो.

अशा संसर्गाला सामोरे जाताना आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती काही पेशींना कामाला लावते. त्या पेशी अशा संसर्गापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी त्या विशिष्ट भागाची उष्णता वाढवणे, त्या विशिष्ट भागाला सूज आणणे, तिथली त्वचा लाल होणे अशा पद्धतीचा प्रतिसाद देतात. हे सुरू असताना फुप्फुसांना केला जाणारा ऑक्सिजनचा नेहमीचा पुरवठा थांबवला जातो. त्याचबरोबर शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे स्राव तयार होतात. या दोन्ही घटकांचा एकत्र परिणाम होऊन श्वास घ्यायला त्रास होतो. कोविड १९च्या संसर्गाच्या परिणामी ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे ताप, सूज, दाह ही लक्षणं दिसतात. न्यूट्रोफीलची तसंच पांढऱ्या पेशींची संख्या वाढणं यांचाही त्या लक्षणांमध्ये समावेश होतो.

आपल्या देशात श्वसनाला त्रास होणं या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत का?

होय, नॅशनल क्लिनिकल रजिस्ट्री फॉर कोविड १९च्या आकडेवारीनुसार दुसऱ्या लाटेमध्ये एक नवा ट्रेण्ड दिसतो आहे. पहिल्या लाटेदरम्यान ज्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं त्या रुग्णांमध्ये श्वसनाला त्रास होणं हे लक्षण ४१.७ टक्के रुग्णांमध्ये आढळलं होतं, तर दुसऱ्या लाटेदरम्यान हेच प्रमाण ४७.५ टक्के रुग्णांमध्ये आढळत आहे. त्याचबरोबर पहिल्या लाटेत आढळलेल्या इतर लक्षणांमध्ये मात्र तुलनात्मक घट झाली आहे. कोरडा खोकला (आधी ५.६ टक्के तर आता १.५ टक्के), वास न येणे (आधी ७.७ टक्के तर आता २.२ टक्के), थकवा (आधी २४.२ टक्के तर आता ११.५ टक्के), तोंडाला चव नसणे (आधी १६ टक्के तर आता ७.५ टकके) स्नायूदुखी (आधी १४.८ टक्के तर आता ६.३ टक्के) असं हे प्रमाण आहे.

कोविड १९चा संसर्ग झालेल्या किती लोकांना ऑक्सिजन द्यावा लागतो आहे?

मंगळवार, २० एप्रिल रोजीच्या आकडेवारीनुसार भारतात एकूण रुग्णांपैकी १.७५ टक्के  रुग्ण अतिदक्षता विभागात होते. ०.४० टक्के  रुग्ण कृत्रिम श्वसन यंत्रणेवर होते. आणि ४.०३ टक्के  रुग्ण ऑक्सिजन बेडवर होते. आता देशात एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २० लाख ३१ हजार ९७७ आहे. त्यात ऑक्सिजन बेड्सची गरज असलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.

राष्ट्रीय कोविड १९ कृती दलाच्या सदस्यांनी सोमवार, १९ एप्रिल रोजी दिलेल्या आकडेवारीनुसार दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णालयात भरती करावं लागलं आहे अशा कोविड १९च्या रुग्णांपैकी ५४.५ टक्के  रुग्णांना उपचारादरम्यान ऑक्सिजन द्यावा लागला आहे. ही आकडेवारी लक्षणीय आहे. देशातल्या वेगवेगळ्या केंद्रांकडून आकडेवारीनुसार सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये आलेल्या लाटेच्या तुलनेत ही वाढ १३.४ टक्के  आहे. असं असलं तरी कृत्रिम श्वसन यंत्रणेची गरज मात्र दुसऱ्या लाटेदरम्यान कमी झाली आहे. पहिल्या लाटेदरम्यान ३७.३ टक्के  रुग्णांना कृत्रिम श्वसन द्यावं लागलं होतं, तर दुसऱ्या लाटेत २७.८ टक्के  रुग्णांनाच या यंत्रणेची गरज लागली आहे.

कोविड १९च्या दुसऱ्या लाटेदरम्यान अधिक रुग्णांना ऑक्सिजनची गरज का लागते आहे याचा फारसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे त्याची मर्यादित माहिती उपलब्ध आहे. त्याचा अधिक अभ्यास होणं गरजेचं आहे असं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव सांगतात. अधिकाधिक रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागते आहे यामागचं कारण असं सांगता येईल की, करोनाबाधितांची संख्या अचानक वाढल्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्या भीतीपोटी लोकांना रुग्णालयात दाखल व्हायचं आहे आणि त्यामुळे ऑक्सिजनची मागणी अचानक वाढली आहे. पण रुग्णालयांकडे ऑक्सिजनची उपलब्धता मर्यादित असल्याचे आकडेवारीतून दिसते आहे. ऑक्सिजनची मागणी वाढली आहे आणि उपलब्धता कमी आहे यामुळे कोविड १९च्या व्यवस्थापनात ऑक्सिजन हा घटक महत्त्वाचा ठरला आहे, असं डॉक्टर भार्गव सांगतात.

कोविड १९च्या रुग्णावर उपचार करताना नेमक्या कोणत्या परिस्थितीत ऑक्सिजनचा वापर केला जातो?

क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलनुसार एखाद्या व्यक्तीला इतर कोणत्याही गंभीर आजाराची लक्षणं नसताना न्यूमोनिया झाला असेल, डायस्पेनियाची लक्षणं दिसत असतील (श्वास घ्यायला त्रास होत असेल),  हायपोक्सियाची (शरीराला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसेल) लक्षणं दिसत असतील, त्याचबरोबर तिला ताप, खोकला असेल, तिची SpO2 लेव्हल (ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल) ९४ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर ती आजारी आहे असं निश्चित केलं जातं.

काही प्रकरणांमध्ये SpO2 लेव्हल (ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल) ९२-९६ टक्क्यांपर्यंत आणण्याचे लक्ष्य असते. तसंच फुप्फुसाच्या काही आजारांमध्ये ती पातळी ८८ ते ९२ पर्यंत आणायचे असते. त्यासाठी उपचारांदरम्यान ऑक्सिजन थेरपी महत्त्वाची असते. ऑक्सिजन पातळीचं व्यवस्थापन करण्यासाठी नोजल प्राँग, मास्क विथ ब्रिदिंग- नॉन रीब्रिदिंग रिझव्हायर बॅग्ज यांची आवश्यकतेनुसार गरज लागते. रुग्णाने पोटावर झोपणं हादेखील त्याच्या शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठीच्या उपचारांमधला महत्त्वाचा भाग म्हणून सुचवण्यात आला आहे.

तीव्र स्वरूपाचा न्यूमोनिया, अ‍ॅक्युट रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिण्ड्रोम आणि सेप्सिस या तीन प्रकारांमध्ये संबंधित वेगवेगळ्या आजारांचं वर्गीकरण केलं जातं. क्लिनिकल मॅॅनेजमेंट प्रोटोकॉलने पाच लिटर ऑक्सिजन थेरपीची शिफारस केली आहे. संबंधित रुग्णाचा रेस्परेटरी डिस्ट्रेस किंवा हायपोक्सिमिया प्रमाणित ऑक्सिजन थेरपी दिल्यानंतरही दूर होत नसेल तर त्याला हाय फ्लो नेझल कॅन्युला ऑक्सिजन थेरपी किंवा नॉन इन्व्हासिव्ह व्हेंटिलेशन देण्याची या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शिफारस करण्यात आली आहे. प्रमाणित ऑक्सिजन थेरपीच्या तुलनेत हाय फ्लो नेझल कॅन्युला ऑक्सिजनेशन (एचएफएनओ) पेशंटच्या शरीरात नळ्या खुपसण्याची गरज कमी करतं. हायपरकॅप्निया (एक प्रकारचा फुप्फुसांचा आजार), हेमोडायनॅमिक इनस्टॅबिलिटी, मल्टी ऑर्गन फेल्युअर, असामान्य मानसिक स्थिती असलेल्या रुग्णांना सहसा हाय फ्लो नोझल कॅन्युला ऑक्सिजनरेशनचे उपचार दिले जाऊ नयेत, असं या शिफारशींमध्ये म्हटलं आहे.

ऑक्सिजनची पातळी कमी झाली की सहसा कोविडचीच लक्षणं दिसतात का?

नाही, एम्सच्या ई आयसीयूने कोविड १९ संदर्भात सतत विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या (फिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स) उत्तरांमध्ये म्हटलं आहे की, रुग्णालयं तसंच इमर्जन्सी विभागात दाखल होताना अचानक मृत्यू झाल्याचं नोंदलं गेलं आहे. अशा अचानक मृत्यूंमागे आधी लक्षात न आलेला सायलेंट हायपोक्सिया असू शकतो. पल्मनरी थ्रोम्बोइम्बोलिझममुळे (फुप्फुसात रक्ताची गाठ निर्माण होणे) गुंतागंत निर्माण झालेली असू शकते.

सायलेंट हायपोक्सियामध्ये रुग्णाच्या रक्तामधली ऑक्सिजनची पातळी अतिशय खाली गेलेली असते. पण तरीही त्याच्यामध्ये श्वास घ्यायला अडचण येत असल्याची, दम लागल्याची कोणतीही लक्षणं नसतात. आपल्या रक्तामध्ये असलेली ऑक्सिजनची पातळी सायलेंट हायपोक्सियाच्या रुग्णांमध्ये गरजेपेक्षा खूप कमी झालेली असते. त्यामुळे कोविड रुग्णांमध्ये सहसा सायलेंट हायपोक्सियाची लक्षणं आधी दिसत नाहीत. ते रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डला सहसा अंगदुखी, थकवा, ताप आणि खोकला ही लक्षणं घेऊनच वारंवार येत राहतात. पण त्यांच्यात सायलेंट हायपोक्सियाची लक्षणं दिसायला सुरुवात होते तेव्हा त्यांना कोविड १९चा संसर्ग आधीच झालेला असू शकतो. आणि कदाचित ती गंभीर स्वरूपाची असू शकतात, असं अमेरिकन लंग असोसिएशनचं म्हणणं आहे.

रुग्णाने फक्त पल्स ऑक्सिमीटरवर अवलंबून राहण्यापेक्षा त्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइलची लक्षणं, अंगदुखी, थकवा, चव जाणं, वास न येणं, ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं या गोष्टींवरही लक्ष ठेवलं पाहिजे, असं अमेरिकन लंग असोसिएशनने सुचवले आहे.

‘दि इंडियन एक्स्प्रेस’मधून साभार