वारीसाठी दरवर्षी आषाढी एकादशीला येणाऱ्या लाखोंच्या गर्दीमुळे पंढरपूरच्या नागरी सुविधांवर पडणारा प्रचंड ताण आणि होणारी अव्यवस्था या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे बरीच सुसह्य़ झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंढरपूरच्या आषाढी यात्रेत चंद्रभागा नदीच्या वाळवंटासह सर्वत्र होणारी कमालीची दरुगधी, मैला हाताने वाहून नेण्याची वर्षांनुवर्षांची कुप्रथा, त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने घातलेले र्निबध या पाश्र्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे यंदाची आषाढी वारी लाखो वारकऱ्यांना नेहमीपेक्षा नक्कीच सुसह्य़ ठरली. जिल्हाधिकाऱ्यासारख्या एखाद्या अधिकाऱ्याने मनावर घेतले तर काय घडू शकते, याचा आदर्श वस्तुपाठ जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी घालून दिला आहे. त्या अर्थाने पंढरपूर वारीचा ‘तुकाराम पॅटर्न’च तयार झाला आहे.
न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यामुळे शासनाची यंत्रणा चांगलीच कामाला लागली. उच्च न्यायालयाच्या र्निबधांवर सनातनी व परंपरावाद्यांनी, हा धर्मात केलेला अनावश्यक हस्तक्षेप म्हणून ओरड केली व आंदोलनाची भाषाही केली होती. मात्र शासनावर जबाबदारी अर्थातच वाढली होती. असह्य़ यात्रा सुसह्य़ होण्यासाठी कशा पद्धतीने कार्यवाही आखायची, याचे आव्हान होते.
प्रशासनाने चंद्रभागेच्या लगतच असलेल्या शासनाच्या मालकीची ६५ एकर जागा अतिक्रमणमुक्त करून ताब्यात घेण्यात आली. युद्धपातळीवर विकसित केलेल्या याच जागेवर वारकऱ्यांसाठी विविध पायाभूत सुविधांसह निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली. शौचालये, पाणी, वीज आदी स्वरूपांत झालेली ही व्यवस्था वारकऱ्यांसाठी नवलाईची गोष्ट होती. या ठिकाणी सुमारे सत्तर ते ऐंशी हजार वारकऱ्यांनी नरकमुक्त वातावरणात निवास केला.
अखेरच्या क्षणी उच्च न्यायालयाने चंद्रभागेच्या वाळवंटात धार्मिक कार्यक्रम अर्थात कीर्तन-प्रवचन करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात राहुटय़ा उभारण्यास मुभा दिल्याने वारकऱ्यांबरोबर प्रशासकीय यंत्रणेलाही काही प्रमाणात दिलासा मिळाला खरा; परंतु त्याच वेळी वाळवंटाचा संपूर्ण परिसर कोणत्याही परिस्थितीत अस्वच्छ होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनावर होती. त्यामुळे वाळवंट परिसर प्रथमच स्वच्छ दिसून आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रा यशस्वीपणे सुरळीत पार पाडण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची घटना प्रतिसाद प्रणाली (इन्सिडेन्ट रिस्पॉन्स सिस्टीम) अमलात आणली. त्यामुळे यंत्रणा अधिक कार्यक्षम बनली. शौचालयांची व्यवस्था, कचरा उचलण्यासाठी पुरेशी यंत्रसामग्री व मनुष्यबळ वापरताना दररोज २०० टन याप्रमाणे आठवडाभर १२०० टन कचरा वेळच्या वेळी उचलला गेला. दररोज २८ एमएलडीप्रमाणे शहरात पाणीपुरवठा करता आला. शहरात सर्वत्र पोर्टाक्लीन व मेल्यथियम या रासायनिक द्रव्यांचा फवारा मारला गेल्याने दरुगधीला अटकाव झाला. यात्रा काळात गटारे तुंबणार नाहीत, यासाठीही योग्य नियोजन होते. पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कामे मेहनतीने पार पाडली.
चंद्रभागेच्या वाळवंटातील व्यवस्थेवर अनेक वारकरी खूश होते. नांदेड जिल्ह्य़ातील जोड सुगावचे संदुकराव भोसले यांनी सांगितले, ‘‘आम्ही गेल्या दहा वर्षांपासून पंढरपूर वारी करतो. विठोबासाठीच येताना येथील साचलेल्या घाणीकडे, दरुगधीकडे बघत नव्हतो. वाळवंटात पायाखाली मैला तुडवतच चंद्रभागेत स्नान उरकत होतो. चंद्रभागादेखील मैली झाली होती, परंतु या वर्षी या नरकयातना भोगाव्या लागल्या नाहीत. विठोबाबरोबर चंद्रभागेचेही खऱ्या अर्थाने दर्शन झाले. वाळवंटात इतकी स्वच्छता यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. त्यामुळेच वाळवंटात आम्ही एकत्र बसून भोजनाचा आनंद घेतला..’’
पैठणजवळच्या पीराचे ब्राह्मणगाव येथील पद्म प्रभाकर शेजवळ गेवराई तालुक्यातील गंगेवाडीचे रामभाऊ विठोबा औंढकर आणि हिंगोली जिल्ह्य़ातील वाघीशिंगीचे तानाजी किसन शिंदे या व अन्य अनेक वारकऱ्यांमध्ये हीच भावना व्यक्त होत होती.
पंढरपूर यात्रेसाठी सुमारे चार कोटींचा खर्च झाला असून यात राज्य शासनाचे दिलेले दोन कोटींचे अनुदान समाविष्ट आहे. यात्रा नियोजनापुरता हा खर्च मर्यादित आहे. परंतु यानिमित्ताने पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाच्या अंमलबजावणीसाठी चांगल्या प्रकारे चालना मिळण्यास वाव आहे. ५५७ कोटी ३१ लाख रुपये खर्चाचा हा विकास आराखडा आहे. यात ३९ कामांचा समावेश असून त्यापैकी १४ कामे पूर्ण झाली आहेत. पाच कामे सुरू आहेत, तर २० कामे सुरू व्हावयाची आहेत. या आराखडय़ांतर्गत पालखीतळासाठी भूसंपादन केले जाणार आहे. याशिवाय पंढरपूर शहरातील प्रमुख तीन रस्ते पूर्ण करणे, विठ्ठल मंदिर समितीमार्फत लोखंडी झुलता पूल उभारणे, पंढरपूर परिसरात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, चंद्रभागा नदीवर जुना दगडी पूल ते विष्णूपद बंधारा या दरम्यान घाट बांधणे, वाळवंटात सुधारणा करणे आदी कामे पूर्ण केली जाणार आहेत. तसेच यंदाच्या आषाढी यात्रेत चंद्रभागेच्या लगतच असलेल्या शासनाच्या मालकीची ६५ एकर जमीन अतिक्रमणमुक्त करून ताब्यात घेण्यात आली व तेथे वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट निवारा व्यवस्था करण्यात आल्यानंतर आता त्यालगतची रेल्वेच्या मालकीची व इतरांच्या ताब्यातील अशी मिळून आणखी ३२ एकर जमीन संपादित करण्याची प्रशासनाची तयारी आहे. या सुमारे शंभर एकर क्षेत्रात चतुष्कोन तीर्थक्षेत्र विकास योजनेत विकास होणे शक्य आहे. या विस्तीर्ण जागेच्या सभोवती संरक्षण भिंत उभारण्यात येऊन परिसरात वारकरी तथा यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी निवारा व्यवस्था करता येईल. पुरेशा प्रमाणात शौचालये, उद्यान, चेंजिंग रूम, क्लॉकरूम आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने यासाठी २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. पाणीपुरवठा व मलनि:सारण योजनाही मार्गी लावण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

राजकारणी मरतडांचा मोडता
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विकासाभिमुख प्रशासनामुळे राजकारणी मरतडांचे हितसंबंध धोक्यात आले आहेत. त्यातूनच त्यांच्या बदलीचा घाट घातला जातोय. मुंढे यांनी दुष्काळाच्या नावाखाली गब्बर बनणाऱ्या टँकर लॉबीला रोखले आहे. वाळू तस्करी व रेशनधान्य तस्करीला प्रभावीपणे आळा घातला आहे, तर दुसरीकडे विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे. पंढरपूर यात्रेच्या नियोजनातही जिल्हाधिकाऱ्यांचा प्रभाव विशेषत्वाने जाणवला. पण राजकारणी मरतडांनी ‘आम्ही सांगितलेली कामे होत नाहीत, जिल्हाधिकारी मुंढे आमचे ऐकत नाहीत, आम्हाला किंमत देत नाहीत,’ अशा अनेक आरोप करायला सुरुवात केली आहे. आषाढी यात्रा काळात पंढरपूर शहरातील सुमारे अडीच हजार अतिक्रमणे कोणाचाही मुलाहिजा न ठेवता जिल्हाधिकाऱ्यांनी भुईसपाट केली गेली. त्यावर वेगवेगळे निमित्त पुढे करून हितसंबंधीयांनी यात्रेच्या तोंडावर तब्बल चारवेळा ‘पंढरपूर बंद’ पुकारून सर्वाना वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला. विधिमंडळ अधिवेशनातही जिल्हाधिकारी मुंढे यांच्या कार्यशैलीवर टीका करून बदलीची मागणी केली गेली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शासकीय महापूजा आणि मुख्यमंत्र्यांना तिष्ठत ठेवण्यावरून बेछूट आरोप केले. स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पवारांचे आरोप खोटे आणि चुकीच्या माहितीवर आधारले असल्याचे स्पष्ट केले आहे. सोलापूरचे पालकमंत्री, भाजपचे विजय देशमुख यांचेदेखील मुंढे यांच्याशी पटत नाही. त्यामुळे मुंढे यांची जर बदली झाल्यास विकासकामांचे काहीही होवो, त्याची चिंता करण्याऐवजी देशमुखांना जास्त आनंदच होईल, असे चित्र आहे.
एजाज मुजावर – response.lokprabha@expressindia.com

More Stories onविठ्ठल
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur wari tukaram pattern
First published on: 14-08-2015 at 01:15 IST