News Flash

कविता : वर्षां

विझला वैशाख वणवा, ढगफुटी झाली फार अंतरीच्या अंतर्मनी, उठे लाटांचा सागर

| September 12, 2014 01:19 am

विझला वैशाख वणवा, ढगफुटी झाली फार
अंतरीच्या अंतर्मनी, उठे लाटांचा सागर

हृदयाच्या पटलावर, उगवली वनराई
वेलीवर उगवल्या, सुगंधित जाई जुई
मन हुरळून गेले, आल्या सरीवर सरी
पावसात भिजण्याची मनी ओढ फार भारी
भिजून पावसात मन सुखावून गेले
आयुष्यात माझ्या, काही राहूनच गेले
नवनवीन स्वप्नांचे घेतले पांघरूण 
भीती वाटते मनाला जाई जीव गुदमरून
पुष्पा लांबट, नागपूर

निसर्गाचे जीवनगाणे
ग्रीष्माच्या दाहकतेने
जलाशय सर्व आटले
व्याकुळली कृमी किटकेखग
गज मृग अन् बारासिंगे
वाजत गाजत 
लख्ख प्रकाशित 
चपला थिरकत
वर्षां आली धारा बरसत 
टप् टप् टप् टप् 
पाऊसधारा
नाचतो मयूर
फुलवून पिसारा
ग्रीष्माच्या दाहकतेने
वृक्षवल्ली करपलेले
जलामृत सिंचन होता
नवजीवन प्राप्त जाहले
घनघोर जलदपटावर 
बकमाला शोभे त्यावर 
वायूसंगे मान डोलती 
हिरवे हिरवेगार तरुवर
निर्जल निर्झर 
तुडुंब झाले
नागमोडी
वाहू लागले..
वाहत वाहत 
गाऊ लागले
निसर्गाचे 
जीवनगाणे
हिरवागार
शालू लेवुनी
गात बैसली 
ती वनराणी
टप् टप् टप् टप् 
पाऊसधारा
नाचतो मयूर 
फुलवून पिसारा
– पुंडलिक वाघ, 
वांद्रे (पूर्व), मुंबई

सावन

चुकार वाटांचा 
वाऱ्याशी वाद,
रानफुलांचे बहर
घालती साद,

हर्षांला ना खीळ
नृत्यमग्न ओघळ,
अंगांगी भिनते 
पाखरांची शीळ

सावनात सूर्य 
शीतल हळवा,
उनाचा पिसारा
सोनसळी गारवा

तोषविते आल्हादे
भिजली पहाट,
हसविते, फसविते
निसरडी वाट

घाटांच्या वळणांची
नजरबंदी नक्षी,
मेघांना हाकारती
ओले ओले पक्षी

– अनुराधा गुरव, कोल्हापूर

जागर

बाहुगर्दीत जीव गुदमरतोय
उद्यासाठीचे धूसर
अवसान
भरून ठेवायचे आहे
छातीच्या भात्यात
कोरडाच सुस्कार
ओकणाऱ्या यंत्राच्या 
सहवासात
भविष्याचे नगारे बडवीत..
पाठीचा कणा वाकवून
कुर्निसात करणाऱ्या
गुलामांच्या रांगेत
उभे राहून.. भळभळणाऱ्या
जखमांचे स्वगत ऐकत..
मुक्त श्वास कोंडून 
गारुडी बीन फुंकत 
असतो विस्फारल्या डोळ्यांनी
यंत्राचे बळ वाढविण्यासाठी..
याच संगीतावर
ताल धरताहेत
उद्याचे गुलाम..
नरो वा कुंजरो चा 
जागर मांडून

– विनायक येवले,
नांदेड

एका झाडाची हत्या

त्यांनी मोठय़ा थंडपणे
घातलाय घाव धारदार
कुऱ्हाडीचा फळा-फुलांनी
डवरलेल्या फांदीवर!
फांदी प्राणांकित वेदनेनं
व्याकुळ
आठवत राहिलीय
पाखरांना दिलेली माया
माणसांना दिलेली छाया
आठवलं तिला
रसरसलेलं अमृती फळ
वाऱ्याला घातलेली गळ!
पुन्हा एक घाव जोराचा
नेमका वर्मावर!
खोडापासून अलग होताना
फांदीनं घातलीय साद 
पावसाला ह्य़ा धरतीवर 
पुन्हा पुन्हा येण्यासाठी
त्यांचे डोळे विलक्षण
छद्मी हसलेले
ह्य़ादरम्यान
त्यांनी घेतलीय मुळांकडे 
धाव
झाड मुळापासून छाटण्यात
ते भयंकर पटाईत!
कुऱ्हाडीचा हरएक घाव
झेलून घेताना
झाडाला स्मरलाय 
मुळांचा मातीशी असलेला
आदिमसंदर्भ!
‘हे निसर्गा, त्यांना कळत
नाहीय ते काय करताहेत ते!’
झाडाच्या सद्गदित ओठांवरची 
प्रार्थना त्यांना ऐकू आलेली
नसेल काय?

रवींद्र जवादे, मूर्तिजापूर

उरलेल्या आयुष्याला

थोडेसे संगीत देऊ उरलेल्या आयुष्याला
थोडेसे रंगीत ठेवू उरलेल्या आयुष्याला

नको तिथे गुंतत गेलो नको तेच वेचित आलो,
आता तरी जाणून घेऊ उरलेल्या आयुष्याला

जगण्याच्या स्पर्धेमध्ये ईर्षेने सहभागी मी
सबुरीने थोडे घेऊ उरलेल्या आयुष्याला

डाव घाव बघुनी बहुधा प्रेम इथे बदलत जाते
सावरून, संयत सेवू उरलेल्या आयुष्याला

भय अविरत पसरत भवती नानाविध रूपांमध्ये
भय तमात तेवत ठेवू उरलेल्या आयुष्याला

उतरवून ठेवू थोडे हाव अपेक्षांचे ओझे
मनमुराद नटवत नेऊ उरलेल्या आयुष्याला

वि. म. बोते, कागल

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2014 1:19 am

Web Title: poem 4
Next Stories
1 गोल्डन रेलिश
2 सहस्रशब्दमंजुषा।
3 भूत आणि काळ
Just Now!
X