गोल्ड विशेष
प्राचीन काळापासून ते आजतागायत सोन्याचं महत्त्व केवळ टिकूनच आहे, असं नाही तर ते दिवसेंदिवस वाढतं आहे. आजच्या महागाईच्या काळात सोन्याचे दर सतत चढे असतानाही ग्राहक सातत्याने सोनं खरेदी करताना दिसतात, त्यामागे असतात सोनं विकणाऱ्या विविध ग्राहकोपयोगी योजना.
अशा काही योजनांबद्दल-

प्राचीन युगापासून सोन्याला सूर्यदेवतेचं प्रतीक मानलं आहे. शुभकार्यात आशीर्वाद देण्यासाठी सूर्यदेवता प्रत्यक्ष येऊ शकत नाही, म्हणून प्रतीकरूपात सोन्याचा वापर केला जातो. सोनं हा सौरधातू मानला आहे. सूर्य, तोच अग्नी म्हणून पिवळ्या रंगाचं सोनं, गाईचं पिवळं तूप, हळद ही सूर्याची प्रतीकं मानली आहेत. पूर्वीच्या काळी लग्नाच्या दिवशी वधूला सुवर्णजलानं म्हणजे सोनं ठेवलेल्या पाण्यानं आंघोळ घालण्याची प्रथा होती. बाळाच्या ‘जातकर्म विधी’त मध, दही आणि तूप बाळाला सोन्याच्या तुकडय़ाने किंवा अंगठीने चाटवलं जाई. सोन्याचं तेज बाळात यावं हा त्यामागचा उद्देश असायचा.
सोन्याचा रंग बदलत नाही. ते खराब होत नाही. त्याची किंमत सहसा कमी होत नाही.  अशा अनेक वैशिष्टय़ांमुळे इतर धातूंच्या तुलनेत सोनं मौल्यवान मानलं जातं. सोन्याच्या ठायी असलेल्या विविध गुणधर्मामुळे पुरातन काळापासून चालत आलेलं त्याचं महत्त्व आजही अबाधित आहे.
सोन्याबद्दलचं आकर्षण आणि आसक्ती आजच्या काळातही कायम आहे. अनेक गुंतवणूक सल्लागार लोकांना सोनं खरेदी करण्याचा; पण आपल्या एकूण गुंतवणुकीच्या पाच-दहा टक्के एवढाच हिस्सा सोन्यामध्ये गुंतवण्याचा सल्ला देतात. सोन्याच्या दरांमधील चढ-उतार मधल्या काळात वृत्तपत्रांच्या पहिल्या पानाचे विषय बनले. एकूण परिस्थिती, सोन्याचे सातत्याने कमी-जास्त होणारे भाव आणि खरेदीबाबत ग्राहकांचा एकूण दृष्टिकोन याबाबत जाणून घेण्यासाठी काही सराफ व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यातून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे लोकांमध्ये सोन्याचं आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाही. दिवसागणिक ते वाढत आहे. त्यातच आता दसरा, त्यानंतर येणारी दिवाळी आणि पाठोपाठ येणाऱ्या लग्नसराईमुळे सोन्याच्या खरेदीमध्ये आणि दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
‘गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव कमालीचा अस्थिर आहे. सातत्याने सोन्याच्या भावात चढ-उतार होत आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये थोडी साशंकता आहे. पण तरीदेखील दसरा-दिवाळी आणि त्यानंतर लग्नाचे मुहूर्त असल्याने लोकांनी दागिन्यांच्या ऑर्डर्सही दिल्या आहेत. नवरात्रीमध्ये त्या पूर्ण केल्या जातील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सोन्याच्या खरेदीला सुरुवात होईल,’ अशी माहिती ‘पेडणेकर ज्वेलर्स’चे आनंद पेडणेकर यांनी दिली. असंच मत पुण्यातील सराफ मििलद मराठे, विश्वास वैद्य-गाडगीळ सराफ, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ, अष्टेकर ज्वेलर्सचे नितीन अष्टेकर यांनीही व्यक्त केलं.
 भारतीय बाजारपेठेत सोन्याची मोठय़ा प्रमाणात उलाढाल होते. पसा हाताशी आला की अनेकदा त्या पशांची गुंतवणूक सोन्यामध्ये करण्याला प्राधान्य दिलं जातं. कारण अडीअडचणीच्या वेळेला हेच सोनं पसा मिळवून देण्यासाठी कामी येतं. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी सोनं साठवून ठेवू नका, असं कितीही सांगितलं तरी त्यातच केलेली गुंतवणूक प्रत्येकाला फायदेशीरच वाटते. याच कारणामुळे सोन्याचा भाव कितीही वाढला तरी त्याची मागणी कधीही कमी होणार नसल्याचं मत बहुतेक सराफ मंडळींनी व्यक्त केलं.सोन्यामध्ये गुंतवणूक ही सर्वाधिक सुरक्षित असल्याने ग्राहकांच्या सोयीसाठी त्यांना परवडेल अशा योजना विविध सराफांकडे सुरू आहेत. या सर्व योजनांना ग्राहकांकडून खूपच चांगला प्रतिसाद दिसून येतो. या योजनांमध्ये हप्त्या हप्त्यांमध्ये एका ठरावीक मुदतीसाठी ग्राहकांनी एक ठरवीक रक्कम सराफांकडे जमा करायची असते. ती मुदत संपली की ग्राहकाची जमा झालेली रक्कम आणि सराफाने भरलेला एक हप्ता अशी सर्व एकूण जमा झालेल्या रकमेचं ठोक सोनं अथवा सोन्याचा एखादा दागिना ग्राहकाला घेता येतो. या योजनांमुळे सोन्यामध्ये ग्राहकाला गुंतवणूक करणं सहज शक्य होतं.  
पुण्यातील मराठे ज्वेलर्सचे मििलद मराठे यांनी त्यांच्याकडील सोन्याच्या भिशीची माहिती देताना सांगितलं की, ‘आमच्याकडे येणारे ग्राहक सर्व वर्गातील असल्याने त्यांच्या गरजा ओळखून आम्ही भिशी ठेवतो. ग्राहकाने दर महिन्याला किमान एक हजार रुपये अथवा त्या पटीमध्ये पसे १२ महिन्यांसाठी भरल्यानंतर १३ व्या महिन्यात तितक्याच रकमेचा हप्ता आम्ही भरतो. आणि त्यानंतर १४ व्या महिन्यात एकूण जमा झालेल्या रकमेचं सोनं ग्राहकाला दिलं जातं. या खरेदीच्या वेळी ग्राहक त्याच्या आवश्यकतेनुसार सोन्याची खरेदी करतो.’
अशाच पद्धतीची भिशी पेडणेकर ज्वेलर्सकडे आहे. या भिशीचं एक वेगळेपण म्हणजे इतर सराफ ग्राहकांच्या भिशीच्या रकमेइतक्या हप्त्याऐवजी ते त्या हप्त्याच्या प्रमाणात काही मिलीग्रॅम सोनं ग्राहकाला देतात. याबाबत अधिक माहिती देताना आनंद पेडणेकर यांनी सांगितलं की, ‘आमची सुवर्ण संचय योजना आहे. ही योजना १५ महिन्यांसाठी आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांकडून दर महिन्याला त्या वेळी जो भाव असेल त्यानुसार पसे घेतो. भिशीचा कालावधी संपला की मग ग्राहकाला जमा झालेलं सोनं देतो. शिवाय एक ग्रॅमची भिशी असेल तर जमा झालेल्या सोन्यावर ७५० मिलीग्रॅम अधिक सोनं दिलं जातं.
पुण्यातील मराठे ज्वेलर्स यांच्याकडेही साधारणपणे अशाच पद्धतीची भिशी आहे. त्यांच्याकडे असलेल्या भिशीत १३ व्या महिन्यात ग्राहक भरत असलेली भिशीची रक्कम ते भरतात आणि भिशी संपतेवेळी जमा झालेल्या रकमेतून ग्राहक सोनं अथवा हिऱ्यांची खरेदी करू शकतो.
पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ यांनी त्यांच्याकडे असलेल्या भिशीची माहिती देताना सांगितलं की, ‘प्रत्येक व्यक्तीला सोनं खरेदीची हौस असते. पण त्यांचं उत्पन्न आणि एकूण खर्च यांचा ताळमेळ साधताना ही हौस अनेकदा बाजूला ठेवली जाते. पण एकूणच भविष्याचा विचार करता सोन्यातील गुंतवणूक केव्हाही फायदेशीरच असते. ‘संचयात धनवर्धनम्’ हे आमचं ब्रीद असल्याने ग्राहकाला परवडेल अशा पद्धतीने काही योजना आखल्या आहेत. यामध्ये १२, २४ आणि ३६ महिन्यांसाठी भिशी आहे. १२ महिन्यांच्या कालावधीसाठी ग्राहकाने किमान एक हजार रुपये भरायचे त्यानंतर १३ व्या महिन्यात भिशी संपतेवेळी आम्ही एक हजार रुपये भरतो. सरतेशेवटी ग्राहकाचे एकूण १३ हजार रुपये जमा होतात. त्या रकमेचं तो चोख सोनं अथवा सोन्याचा दागिना खरेदी करू शकतो. अशी भिशी २४ आणि ३६ महिन्यांसाठीदेखील आहे. यामध्ये ग्राहकाने एक हजार रुपये भरले असता त्यामध्ये आम्ही २४ महिन्यांसाठी तीन हजार आणि ३६ महिन्यांसाठी सात हजार रुपये हप्ता भरतो. त्यामुळे या भिशी संपण्याच्या मुदतीमध्ये ग्राहकाच्या हाती ठोस रक्कम आल्यामुळे त्याला सोन्याचा घसघशीत ऐवज खरेदी करणं सहज शक्य होतं. या योजनांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद असल्याचंही गाडगीळ आवर्जून नमूद करतात.पूर्वी प्रत्येक कुटुंबाचा ठरलेला सराफ असायचा. बदलत्या जीवनशैलीमुळे माणसं नोकरीसाठी दुसऱ्या शहरांत जातात. तेव्हा तिथल्या अनोळखी सराफांकडे दागिने घेण्यापेक्षा ब्रँडेड दागिने वापरण्याचा ट्रेंड अलिकडच्या काळात वाढला आहे. त्यानुसार सराफांऐवजी ब्रँडेड कंपन्याही आता सोन्याच्या व्यवसायात दिसतात. टायटन कंपनी ‘तनिष्क’ ब्रॅन्डखाली दागिनेही बनवते. तनिष्क कंपनीला भारतीय सुवर्णकार व रत्नकारांची ही पाच हजार वर्षांची परंपरा जगाच्या समोर आणावी असं वाटलं. यासाठी तनिष्क कंपनीने गोल्ड प्लस हा ब्रॅन्ड निर्माण केला आहे. त्याअंतर्गत गोल्डन हार्वेस्ट स्कीम, सुवर्णनिशी स्कीमसारख्या योजना ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. गोल्डन हार्वेस्ट स्कीम ही एक वर्षांसाठी आहे. या योजनेत किमान ५०० अथवा त्या पटीत रक्कम भरता येऊ शकते. ग्राहकाने तीन हजार रुपये महिन्याला जमा केले असतील तर ११ महिन्यांसाठी त्याचे ३३ हजार रुपये जमा होतात. तनिष्कतर्फे तीन हजार रुपये भरले जातात, त्यामुळे योजना संपतेवेळी ग्राहकाकडे ३६ हजार रुपये जमा होतात. तितक्या रक्कमेचं सोनं अथवा दागिने तो खरेदी करू शकतो. सुवर्णनिशी योजना एका वर्षांसाठी आहे. या योजनेत ग्राहक सोनं राखून ठेवू शकतो. सोनं राखून ठेवल्यामुळे त्याने ज्या महिन्यात सोनं राखून ठेवायला सांगितलं असेल त्या भावाप्रमाणे त्याला पसे भरावे लागतात. महिन्यातून किमान दोन हजार रुपयांचा हप्ता भरणं अपेक्षित आहे.
आजही बाजारामध्ये सोन्याच्या बरोबरीनेच हिरे अथवा प्लॅटिनमचे दागिनेही आहेत, पण हे दागिने अजून तरी उच्चभ्रू वर्गामध्येच वापरले जातात. हिरे आणि प्लॅटिनमचे दागिने सोन्याच्या तुलनेत महाग असल्याने ते अजून तरी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांचं महत्त्व तसूभरही कमी झालेलं नाही.
सोन्याच्या शुद्धतेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यावर ग्राहकांनी सोनं खरेदी सजगपणे करावी यावर भर दिला. मोठय़ा पॉश दुकानांमध्ये सोन्याचा भाव न परवडणारा असतो, त्यामुळे परिचयाचे किंवा परंपरागत नसेल तर गल्लीबोळातील दुकानादाराकडून सोनं खरेदी करण्याची वृत्ती कमी करायला हवी. कारण त्या शुद्धतेबाबत ग्राहकाची फसवणूक होण्याची भीती असते, असे अनेक सराफ व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
सोन्याचे दागिने करताना हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करावेत, असा सल्ला सगळे देतात.
एकूणच काय तर सोन्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा दिवसेंदिवस अधिक उजळ होत जाताना दिसते. आजही मुहूर्तावर सोन्याची खरेदी करण्याचा ट्रेंड आपण सेट केलाय. महत्त्वाच्या सणा-वारांना बाजारपेठेत त्याचं प्रतििबब दिसतं.

सोन्याच्या भिशीचा लाभ ..
मोठमोठय़ा सराफांच्या सोन्यासाठी विविध योजना आहेत. तशाच योजना काही लहान लहान सोन्याच्या व्यापाऱ्यांच्याही आहेत. अशाच एका ज्वेलर्सच्या भिशी योजनेसाठी अनुजा आंबेरकर गेल्या काही वर्षांपासून काम करत आहेत. या कामाबाबत त्या सांगतात, ‘प्रत्येकाच्या कष्टाच्या पशांचे मोल अनन्यसाधारण असते. आपला पसा योग्य त्या ठिकाणी गुंतवला जावा यासाठी प्रत्येक जण आग्रही असतो. तो सोन्यात गुंतवला तर नक्कीच फायदेशीर ठरतो. ज्या ज्वेलर्ससाठी मी काम करते त्याच्या दोन, तीन आणि चार वर्षांसाठी भिशीची योजना आहेत. ज्याला जमेल तो तितक्या वर्षांसाठी पसे भरतो. भिशीच्या शेवटी ग्राहकाच्या रकमेइतकीच रक्कम सोनार देतो. त्यामुळे वर्षांअखेरीला एक ठोक दागिना करता येईल इतकी रक्कम ग्राहकाकडे जमा होते. किमान ५०० रुपयांपासून भिशीची सुरुवात होत असल्याने निम्न वर्गातील महिलांनाही या भिशी योजनेचा लाभ घेता येतो. घरकाम करणाऱ्या काही महिलाही या योजनेत आहेत. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी या योजनेतून पहिला दागिना विकत घेतला तेव्हा त्यांच्या डोळ्यांत दिसलेला आनंद मी आजही विसरू शकत नाही. सोन्याच्या भिशीमधून भविष्याची तसेच मुला-मुलींच्या लग्नाची तरतूद होत असल्याने महिला वर्गाकडून या योजनांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो.