ठरवून केलेला प्रवास हा केवळ आपल्या आनंदासाठीच असतो. त्यातून कोण काय घेतो हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण प्रत्येक प्रवासात कुणी काय घ्यायला हवे याचे भान देणारे पुस्तक म्हणजे पद्मा कऱ्हाडेंचे ‘भटकंतीची साद’ होय.

पद्मा कऱ्हाडेंनी देशात आणि परदेशात केलेल्या प्रवासवर्णनाचे हे पुस्तक, पण फक्त वर्णनच आहे का? तर असंही नाही. त्यांनी प्रवास केलेल्या देशांच्या चालीरीती, सांस्कृतिक वारसा, निसर्गसौंदर्य याबरोबरच तिथली माणसं त्या आपल्यासमोर मांडतात. त्यांनी आनंदवन, हेमलकसासारखे प्रवास नक्कीच निर्हेतुक नव्हते हे तर ‘समाजाचं देणं’ या माध्यमातून मांडण्याचा त्यांचा प्रयत्न इथे लक्षात येतो.

प्रवासवर्णन, सांस्कृतिक ठेवा आणि भारतीय सण अशा तीन भागांत या पुस्तकातील लेख आहेत. पुसेगावचा रथोत्सव, अंबेजोगाईची दत्तयात्रा आपण वाचतो तेव्हा त्यांनी केवळ शहरी भागातच प्रवास केलेला नाही, तर महाराष्ट्रातील कानेकोपरेही धुंडाळले आहेत, हे समजते. त्यातून त्यांची प्रवासाची आणि धार्मिक असो वा सांस्कृतिक लहानलहान परंपरा समजून घेण्याची आवड दिसते. त्यांच्या दोन्ही पुस्तकांत त्यांची टिपणं, त्यांची निरीक्षणं आपल्याला दाद द्यायला लावतात. त्यांचे पर्यावरण विषयातील ज्ञान किंवा ते समजून घेण्यासाठी केलेला अभ्यास त्यांच्या लेखांतून वारंवार जाणवत राहतो. ‘भारतीय सण’ भागात दिवाळीप्रमाणे प्रत्येक सणाचं वेगळं महत्त्व आपल्या समोर येतं.

एकंदरच त्यांच्या लेखात त्यांची सजगता, सामाजिक भान, पर्यावरणविषयक असलेले प्रेम आणि कुणाला काही तरी सांगण्याची ऊर्मी दखल घ्यायला लावते. केवळ प्रवास वर्णन म्हणून नाही; तर विविध विषयांची ओळख करून घेण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.

भटकंतीची साद, लेखिका : पद्मा कऱ्हाडे, ग्रंथाली प्रकाशन, मूल्य : २०० रुपये

response.lokprabha@expressindia.com