बोस्की बिटिया,
कुछ ख्वाबों के खत इनमें, कुछ चाँद के आयनें,
सूरज की शुआंए है, नज्मों के लिफाफों में कुछ मेरे तजुर्बे हे
कुछ मेरी दुआएँ है
निकलोगे सफर पे जब ये साथ में रख लेना,
शायद कही काम आएं
गुलजार यांच्या ‘पुखराज’ कवितासंग्रहाच्या अर्पण पत्रिकेत लिहिलेल्या या ओळीत, एकुलत्या एक मुलीबद्दल वडिलांच्या मनातील भाव गुलजार यांनी अचूक शब्दांत टिपले आहेत. त्याचप्रमाणे अरुण शेवते यांनी एकच मुलगी असलेल्या मान्यवरांना व्यक्त होण्याची संधी ‘एकच मुलगी’ या पुस्तकात दिली आहे. शेवते यांनी दिवाळी अंकातून विविध नात्यातील ‘स्त्री’ ही संकल्पना ‘एकच मुलगी’ या पुस्तकामागील हीच खरी प्रेरणा. मात्र, या पुस्तकातून एकच मुलगी असलेल्या मान्यवरांनी मांडलेली मते, वडिलांच्या मनात मुलीसाठी असणार हळवा कोपरा, आई-वडिलांसाठी असलेले प्रेम, विलक्षण जिव्हाळा समाजासाठी आदर्शवत ठरावा असा आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, माजी कृषिमंत्री शरद पवार, गुलजार, निळू फुले, शास्त्रीय संगीतकार बेगम परवीन सुलतान, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, समाजसेविका मृणाल गोरे, अभिनेत्री रीमा लागू, संगीतकार आरती अंकलीकर-टिकेकर, नीलम गोऱ्हे, सदा कऱ्हाडे, रझिया पटेल, ना. स. इनामदार, अरुण शेवते या सर्वाना एकच मुलगी आहे. मुलीला वाढविताना किती सजग आणि सृजनशील असले पाहिजे, हे या पुस्तकातून वाचायला मिळते.
ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांना अभिनय क्षेत्रात असल्यामुळे मुलगी गार्गीला पुरेसा वेळ देता येत नसे. मात्र, तरीही वेळ मिळाल्यावर गार्गीशी नाटक, चित्रपट, अभिनय या विविध विषयांवर चर्चा करण्यास फुले प्राधान्य देत. त्यांनी गार्गीला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते. वडिलांच्या बऱ्या-वाईट भूमिकेबद्दल ती त्यांच्याशी स्पष्टपणे बोलायची. वडीलांच्या नावाचा प्रभाव न वापरता तिने जिद्दीने नाटक-सिनेमा क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले.
गुलजार यांची मुलगी मेघना ऊर्फ बोस्की. बोस्कीची आई राखी यांना चित्रपटाच्या शूटिंगसाठी सतत बाहेर जावे लागत असल्याने गुलजार यांनी बोस्कीच्या आईचीही जबाबदारी समर्थपणे पेलली. तिची वेणी घालण्यापासून ते शाळेत पोहोचवण्यापर्यंत जबाबदारी सांभाळताना त्यांनी तिच्यावर कविता आणि पुस्तकेही लिहिली. मुलीच्या विवाहाचा काळ आई-वडिलांच्या दृष्टिकोनातून अतिशय कठीण काळ असल्याचे गुलजार सांगतात. या विचित्र परिस्थितीत मनात उदासीनता दाटून येते. बोस्की भविष्याकडे पाऊल ठेवत असताना डोळ्यांसमोर तिचा भूतकाळ उभा आहे. त्या भूतकाळावर पांघरून कसे घालणार हा त्यांचा प्रश्न भावनावश करवतो.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपली मुलगी इंदिरा यांना लिहिलेल्या पत्रांचे या पुस्तकात एक प्रकरण देण्यात आलेले आहे. या पत्रांमधून नेहरू त्यांना निसर्गाशी संवाद साधण्याचा सल्ला देतात. जगाचा इतिहास रोमांचक भाषेत समजावून सांगतात. एका वेगळ्या पद्धतीने मुलीची जडण-घडणीचा हा वस्तुपाठच ठरावा असे आहे.
समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांनी त्यांची मुलगी अंजली हिला अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढविले. अंजलीचे वडील तिच्या बालपणीच निधन पावल्यामुळे मृणाल गोरे यांच्यावरील जबाबदारी वाढली होती. मात्र, त्यांनी अंजलीला वडिलांची उणीव जाणवू न देता तिला वाढवलं. सामाजिक कार्य करताना येणाऱ्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. अंजलीला त्यांनी कधीही जबरदस्तीने अभ्यासाला बसविले नाही. त्यांनी तिला अभ्यासाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न केले. अंजलीचे वडील नसल्यामुळे माय-लेकीचे नाते अधिक खुलले असे मृणाल गोरे सांगतात.
ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचीही आपल्याला मुलगीच व्हावी अशी इच्छा होती. एकुलत्या एक लेकीचे नाव त्यांनी मृण्मयी ठेवले. मृण्मयीला पाचगणीला होस्टेलवर ठेवण्याचा निर्णय घेतल्यावरही रीमा यांचे मन तयार नव्हते. मात्र, शेवटी त्यांनी तिला होस्टेलवर ठेवण्याचा निर्णय घेतला. आईपासून दूर जाताना मुलीच्याही मनातील घालमेल या प्रसंगात अचूक टिपण्यात आली आहे.
‘स्त्री’ आपल्याला नवनिर्मितीचा आनंद देते. आयुष्य पुरून उरणाऱ्या एका नितळ नातेसंबंधाला ती जन्म देत असले. पत्नी, आई, बहीण, मैत्रीण नातेसंबंधांत ‘स्त्री’ हवी असते मग मुलगी का नको, असा प्रश्न या पुस्तकाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे. भ्रूणहत्येच्या बातम्यांनी मन अस्वस्थ होताना एकच मुलगी असलेल्या मान्यवरांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे. आपण सर्वानी स्त्री-भ्रूणहत्येविरोधात आवाज उठवला पाहिजे, लेक वाचवली पाहिजे, समाज निरोगी बनविला पाहिजे, हाच या पुस्तकाचा हेतू आहे. एकुलत्या एक मुलीला वाढविणे, तिला समजून घेणे, तिच्या जडणघडणीविषयी, नातेसंबंधाविषयी वेगवेगळे बंध पुस्तकात आहेत. प्रत्येकाची कौटुंबिक परिस्थिती वेगळी, आयुष्याची जडणघडण वेगळी. त्याचे प्रत्ययकारी दर्शन पुस्तकात वाचायला मिळते.
एकच मुलगी, संपादन : अरुण शेवते, प्रकाशक : ऋतुरंग प्रकाशन, पृष्ठे : २०७, किंमत : २०० रुपये.
उमेश जाधव – response.lokprabha@expressindia.com