साप म्हटल्यावर शहरी माणसाच्या अंगावर भीतीने काटा येतो, तर ग्रामीण भागात त्याला एकतर देवत्व देऊन अंधश्रद्धा निर्माण झालेल्या असतात किंवा थेट जिवाच्या भीतीने त्याला मारून टाकलं जातं. आपल्याकडची सापांबद्दलची एकंदरीत भावना ही अशी आहे.

आपण शाळेत शिकतो की साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तो पिकाची नासाडी करणारे उंदीर मारून खातो वगैरे वगैरे. पण तरीदेखील एखाद्या पिकनिकला गेल्यावर अथवा गावाकडच्या घरी साप दिसल्यावर त्याला मारण्याकडेच आपला कल असतो. उगाच पोराबाळांना त्रास नको म्हणून. गेल्या काही वर्षांत याबाबतीत बरीच जागरूकता झाली आहे. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांनी आणि सर्पमित्रांच्या माध्यमातून सापांबद्दलची भीती बऱ्यापैकी कमी होत आहे, पण तरीदेखील सापाबद्दलचं आपलं ज्ञान अगाधच म्हणावं लागेल. सोप्या मराठीतून आणि मुख्य म्हणजे स्पष्ट छायाचित्रांचा समावेश असलेलं पुस्तक ते अज्ञान दूर करणारा एक उत्तम पर्याय असू शकतो. हेच काम प्रदीप कुळकर्णी यांच्या ‘साप आपला मित्र’ या पुस्तकानं केलं आहे.

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Aajibaichi Shala
प्रेरणादायी…! वयाचे बंधन ओलांडले; नऊवारी नेसून अन् डोक्यावर पदर घेऊन आजीबाई गिरवताहेत शिक्षणाचे धडे
Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले

सापांवर मराठीत आजवर वृत्तपत्रं, स्मरणिका, माहितीपुस्तिका, पुस्तकं असं भरपूर लिहिलं गेलंय. ३०-४० पुस्तकं आली आहेत. १८९२ मध्ये ‘हिदुस्थानातील साप’ नावाचं एक पुस्तक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनीदेखील लिहिलं असल्याचं राम भुतकर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगतात. सापांविषयीचे जनमानसातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न अशा हरप्रकारे होत आहे, तरीदेखील आजही अनेक गैरसमज शिल्लक आहेत.

‘साप आपला मित्र’ हे पुस्तक सर्वसामान्यांबरोबरच सर्पमित्रांनादेखील उपयोगी पडणारे आहे. विशेषत: या पुस्तकातील छायाचित्रांच्या मुबलक वापरामुळे एक चांगले फील्ड गाइड म्हणूनदेखील वापर होऊ शकतो.

पुस्तकाची रचना हा अनेक वेळा महत्त्वाचा घटक असतो, याची जाणीव हे पुस्तक पाहताना, वाचताना येते. पाहताना असं मुद्दामच म्हटलं आहे, कारण हे पुस्तक केवळ वाचायचं नाही. पुस्तकाची व्याप्ती ही कोकण प्रांतापुरतीच (काही प्रमाणात मध्य महाराष्ट्र) मर्यादित असली तरी या परिसरात आढळणाऱ्या विषारी, बिनविषारी अशा सर्वच प्रजातींची छायाचित्रं हे या पुस्तकाचं खास वैशिष्टय़ म्हणावं लागेल. प्रत्येक प्रजातीची वैशिष्टय़े दर्शवणारी छायाचित्रं, त्यांची शास्त्रीय माहिती यामुळे हे पुस्तक वाचनीय तर आहेच, पण प्रेक्षणीयदेखील झालं आहे. सापाचं विष नेमकं कसं कामं करतं, त्यावरील प्रतिबंधक लस कशी तयार केली जाते, विषारी साप कोणते, बिनविषारी कोणते, सापांचे राहणीमान कसे असते, त्यांची शरीररचना अशा शास्त्रीय माहितीमुळे पुस्तकांचा दर्जा उंचावलेला आहे.

सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सर्वसामान्यांच्या अनेक शंकांना यात उत्तरं मिळतात. चावलेला प्रत्येक साप हा विषारीच असतो असे नाही आणि काही वेळा प्रत्येक विषारी सापाच्या चावण्यामुळे माणसाचा मृत्यू होत नाही, पण सर्पदंश झाला या भीतीमुळेच घडणाऱ्या अनेक घटनांमुळे काय प्रसंग ओढवू शकतो ते लेखकाने सहज सोप्या भाषेत मांडले आहे.

हरणटोळ साप टाळू फोडतो असं आपल्याला ऐकायला मिळतं, पण प्रत्यक्षात त्याचं वास्तव्य बहुतांशपणे झाडावर असल्यामुळे जेव्हा तो हल्ला करतो, तो आपसूकच माणसाच्या डोक्यावर होतो. सापाला ऐकू येत नाही आणि श्वासोच्छवासामुळे मोठा आवाज करणारे एक-दोन अपवाद वगळता साप कसलाही आवाज काढत नाही. कोणत्याही सापाला केस नसतात, अशी सर्वसामान्यांचे कुतूहल शमवणारी पूरक माहिती हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. याच प्रकरणात साप संपत्तीचं रक्षण करतो का, साप अंडी घालतो की पिल्लं देतो, सापाला दिसतं कसं, साप हवेत उडू शकतो का, नागमणी म्हणजे काय, अशा सर्वसामान्य व्यक्तीला पडणाऱ्या किमान पन्नास एक प्रश्नांची उत्तरं लेखकांनी दिली आहेत. केवळ हे प्रकरण जरी वाचलं तरी सापांविषयीच्या अनेक गैरसमजुती दूर होऊ शकतील.

पुराण आणि साप असं एक उद्बोधक प्रकरणदेखील या पुस्तकात आहे. पुराणातील संदर्भ देताना त्यातील नेमक्या उणिवा दाखवून पुराणातील वानगी पुराणातच शोभून दिसतात हे सोदाहरण दाखवून दिलं आहे. अर्थात, सापाला देवत्व देऊन त्याभोवती निर्माण केलेलं अंधश्रद्धेचं कडं तोडणं गरजेचं आहे.

या पुस्तकाचं आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे हे पुस्तक व्यावसायिक पद्धतीनं तयार केलं आहे, पण त्याची विक्री करताना त्यात व्यापारी वृत्ती दिसून येत नाही. त्यामुळेच गुळगुळीत कागद, भरपूर छायाचित्रं आणि संपूर्ण रंगीत छपाई या साऱ्याचा अंदाज लावला तर खर्चाच्या तुलनेनं केवळ २०० रुपयांत हे पुस्तक उपलब्ध आहे. स्नेक्स अ‍ॅण्ड रेप्टाइल्स प्रोटेक्शन, खोपोली अर्थात सर्प निसर्ग संवर्धन संस्था आणि पन्नास एक सर्पमित्रांच्या माध्यमातून हे पुस्तक आकारास आलेलं आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत भरपूर माहिती देणं यातून जनजागृतीचा उद्देश स्पष्ट होतो.

खरं तर सर्पमित्रांची आपल्याला आठवण येते ती केवळ आपल्या आसपास, घरी साप दिसल्यावरच. पण हेच सर्पमित्र सापांच्या प्रेमातून असं एक सुंदर माहितीपूर्ण अभ्यासू पुस्तकदेखील करू शकतात हा नक्कीच स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाच्या अवश्य संग्रही असावं असंच आहे.

साप आपला मित्र, लेखक : प्रदीप कुळकर्णी, प्रकाशन : सर्प, निसर्ग संवर्धन संस्था खोपोली, पृष्ठे :  ८८, मूल्य : रु. २००/-
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com