lp10दिवाळी २०१४
मनमोकळ्या गप्पा, बिनधास्त स्वभाव, बोलण्याची स्टाइल या सगळ्यामुळे रेड एफएमच्या ‘नॉटी नाइट्स’ हा कार्यक्रम चालवणाऱ्या आरजेला भेटण्याची उत्सुकता गेल्या अनेक दिवसांपासून मनात होती. हा आरजे म्हणजे नसर खानला भेटण्याची संधी अखेर मिळालीच. योगायोगाने वेगळ्याच क्षेत्रात करिअर करणाऱ्यापैकीच एक नसर. ‘२००६ मध्ये एका कॉफी शॉपमध्ये एका रेडिओ चॅनलची काही माणसं तिथे होती. त्यांचं माझ्या बोलण्याकडे लक्ष गेलं. त्यांनी आरजेच्या ऑडीशनसाठी मला सुचवलं. तेही नवीन चॅनल्स सुरू झालेले होते. त्यामुळे ते आरजेच्या शोधात होतेच. माझी स्थानिक रेडिओसाठी निवड झाली’, नसर आरजे प्रवासाची सुरुवात सांगत होता. इतर प्रांतातली मंडळी मुंबईत आल्यावर त्यांच्या एकेक कहाण्या असतात. अनेक स्वप्नाळू मुलांप्रमाणे एक नसर. तो सांगतो, ‘एकदा आरजे प्रीतम प्यारे यांना त्यांच्या वडिलांची तब्येत बरी नसल्यामुळे नागपूर जावं लागलं होतं. त्या वेळी त्यांच्या जागी काम करण्यासाठी मला बोलवण्यात आलं. माझं काम आवडल्यामुळे मुंबईच्या टीमने मला तिथेच थांबवून घेतलं. आणि मुंबईकर झालो.’ इतकी र्वष राहिल्यानंतर नसरच्या बोलण्यातून मुंबईविषयीचं प्रेम झळकत होतं. गप्पांच्या ओघात तो बोलून गेला की, ‘भोपाळ मेरा बचपन का खिलौना है और मुंबई मेरी जवानी की रोटी.’
श्रोते एकटे, उदास असतील तर ते सहज रेडिओचा आधार घेतात. पण, आरजे त्यांचे मूड कसे सांभाळत असतील हा मला सतावणारा नेहमीचा प्रश्न. त्याने त्याच्या मिश्कील स्वभावात उत्तर दिलं, ‘मी ते करू शकतो. म्हणूनच मला पैसे मिळतात.’ पुढे जरा गंभीर होऊन म्हणाला, ‘तुम्ही आरजे असता तेव्हा तुम्ही श्रोत्यांचे असता. त्यांची मन:स्थिती सांभाळणं जास्त महत्त्वाचं असतं. आम्हीही कधी कधी मूडमध्ये नसतो, काळजीत असतो. तरी तेव्हा स्वत:ला सावरणं, मनावर ताबा ठेवणं हे आवश्यक असतं.’ पुढे याबाबतचा एक किस्सा त्याने सांगितला, ‘कार्यक्रम ऑन एअर सुरू होण्याच्या अगदी काही मिनिटं आधी मी कोणाशी तरी वाद घालत होतो. शो सुरू झाल्यावर मात्र मी एकदम हसरा, मजेत असं दाखवलं. मग पुन्हा शोमध्ये गाणी किंवा जाहिरातींच्या वेळेत तो वाद सुरू. असं बराच वेळ सुरू राहिलं. मग ज्याच्याशी वाद घालत होतो तोही हसायला लागला.’
टीव्ही कार्यक्रमाची लोकप्रियता टीआरपीवरून समजते. पण, रेडिओच्या कार्यक्रमांचं काय, या मला पडलेल्या प्रश्नावर नसर सांगतो, ‘रेडिओ कार्यक्रमांनाही टीआरपी असतो. त्यानुसार चॅनल, कार्यक्रम, रेडिओ जॉकी यांची क्रमवारी ठरवली जाते. दोन वर्षांपासून माझा कार्यक्रम आणि मी पहिल्या क्रमांकावर आहे.’ हे सांगताना त्याचा चेहऱ्यावरचा आनंद स्वाभाविक होता. सिनेमाच्या प्रक्रियेत त्यातल्या कलाकारांचा हस्तक्षेप नसतो. पण, रेडिओ में ऐसा नहीं चलता है बॉस.. यात शोची संकल्पना जरी चॅनलची असली तरी त्याच्या प्रक्रियेत आरजेलाही मेहनत घ्यावीच लागते. तो सांगतो, ‘सकाळी-दुपारी असलेल्या कार्यक्रमांसाठी पूर्वतयारी जास्त करावी लागते. तर रात्रीच्या कार्यक्रमांसाठी समयसूचकता आवश्यक असते. माझ्या मेंदूचा एक भाग सतत माझ्या कार्यक्रमासाठी काम करतो. यासाठी सभोवतालच्या गोष्टींचं निरीक्षण महत्त्वाचं ठरतं.’
श्रोत्यांशी संवाद साधण्याचं मोठं आव्हान पेलत नसरच्या पहिल्या नोकरीची सुरुवात झालेली ती १८०० रुपयांनी. रेड एफएममध्ये पर्यायी रेडिओ जॉकी म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या नसरने सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल केला. त्या काळी गैरहजर असलेल्यांची तो काम करायचं. याचाच त्याला फायदा झाला. इतके कष्ट घेऊनही तो म्हणतो, ‘स्ट्रगल आजही आहे आणि उद्याही. आपण स्वत:ला यशस्वी समजायला लागलो की, आपली वाढ, प्रगती खुंटते.’ यावरून आजही त्याचं जमिनीवर असणं प्रत्ययास येतं. आजचा जमाना ऑनलाइनचा आहे. ‘सो सोशल साइट्सपें अकाऊंट तो बनता है’. आरजेंची ओळख म्हणजे त्यांचा आवाज मग ते सोशल साइट्वर असतील की नसतील हा संभ्रम नसरने एका झटक्यात दूर केला. ‘हो तर. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा साइट्सवर मी सक्रिय आहे. यामुळेच आज लोक आम्हाला आमच्या चेहऱ्यावरूनही ओळखतात. पोस्ट्सना मिळणाऱ्या लाइक्स, कमेंटमुळे लोकप्रियता वाढल्याचं लक्षात येतं. मजा म्हणजे, आधी लोक ‘कसला हरामी माणूस आहे तो नसर वगैरे’ असं संभाषण करायचे. यावरून लोकांच्या खऱ्या प्रतिक्रिया समजायच्या. पण, आता चेहऱ्याने ओळखत असल्यामुळे आता तसं समजत नाही,’ असं सागंत त्याला एक किस्सा सांगितल्यावाचून राहावलं नाही. ‘मागच्या वर्षी माझे होर्डिग लागले होते. मी माझ्या गाडीची काच खाली करून बघत होतो. बाजूला एका बाईकवर दोन मुलं होती, ती त्या पोस्टरकडे आणि माझ्याकडे वळून वळून बघत होती. मग मीच त्यांना गमतीने म्हणालो, ‘तो माणूस दिसतो की नाही माझ्यासारखा?’ अशा गमती करायला मला मजा येते’. अशा वागण्यामुळेच नसरच्या स्वभावाचा अंदाज येतो. सोशल साइट्वर टाकलेल्या पोस्टवरच्या कमेंट्सचा तो कार्यक्रमात उपयोग करतो, असंही त्याने पुढे नमूद केलं.
बॉलीवूड स्टार्सप्रमाणे आरजेही आता असेच सेलिब्रेटी झालेत. मग त्यांच्याही खासगी आयुष्याबाबत अशीच चर्चा असते का? हा आणखी विचारण्यासारखा प्रश्न. ‘खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातला समतोल कसा साधतोस, खासगी आयुष्यातल्या अनुभवाचा व्यावसायिक आयुष्यात काही उपयोग होतो का?’, माझे प्रश्न.. नसर यावर उत्तरला, ‘माझा व्यवसाय हा माझ्या खासगी आयुष्याचाच हिस्सा आहे. मित्रांबरोबर चहा प्यायला जाण्याइतकंच सहजतेने मी रेडिओचं काम करतो. माझी संपूर्ण टीमही खूप मदत करते. हलक्याफुलक्या वातावरणात आम्ही सगळेच काम खूप एन्जॉय करतो. त्यामुळे खासगी आयुष्यातल्या घटनांचा कधी आमच्या कार्यक्रमावर परिणाम होत नाही. आयुष्य वेगळे वाटत नसले तरी कुटुंबाला वेळ देणंही महत्त्वाचं असतं. तो काढला जातोच. यामध्ये समजूतदारपणा महत्त्वाची भूमिका बजावतो. एकमेकांना समजून घेतलं की झालं, वेळ मिळालाच म्हणून समजा. रेडिओ जॉकीसाठी समृद्धपणे आयुष्य जगता येणं खूप महत्त्वाचं. असं जीवन जगताना येणाऱ्या अनुभवांचाच कार्यक्रमात उपयोग होतो. लहानपणापासूनच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या अनुभवांची शिदोरी ही नेहमीच उपयुक्त ठरते. श्रोते जेव्हा माझ्याशी बोलतात तेव्हा मी त्यात साधम्र्य पाहून त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊ शकतो.’
एफएमचा पसारा वाढण्यापूर्वी घराघरात आकाशवाणी ऐकलं जायचं. सरकारी असल्यामुळे तिथे काम करणाऱ्यांना साहजिकच तिथे सुरक्षित वाटायचं. पण, आता काळ बदललाय. तरुण पिढी आता खासगी चॅनल्सना प्राधान्य देते. नसरला मला नेमकं याबाबतच मला विचारावसं वाटलं. ‘सरकारी रेडिओ चॅनल्स आणि तिथे काम करणाऱ्या लोकांबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. कमी सोयींमध्ये त्यांना चांगलं काम करावं लागतं. त्यामुळे त्यांच्या कामाचा व्याप आमच्यापेक्षा जास्त असतो. पण, आता मला सरकारी चॅनल्समध्ये काम करणं जमेलसं वाटत नाही’, नसर प्रामाणिकपणे सांगतो. इतर क्षेत्रांप्रमाणे रेडिओ याही क्षेत्रात स्पर्धा डोकावते. अर्थातच आरजेंमध्येही स्पर्धा असणारच. पण, नसर या सगळ्याकडे निकोप स्पर्धा म्हणून बघतो. ‘स्पर्धा नसेल तर माणसाची प्रगती खुंटते. माझे बाबा म्हणायचे की, ‘जर धावण्याच्या स्पर्धेत तुझ्या पुढे कुणी कोणी असेल तर त्याला मागे खेचून जिंकू नकोस, तर अजून जोरात धावून त्याच्यापुढे जाऊन ती शर्यत जिंकू’, अशा प्रकारची स्पर्धा आमच्यात असल्याचा मला आनंद आहे,’ असं तो बिनधास्त सांगतो.
मोस्ट स्टायलिश म्हणून नसरचा उल्लेख त्याचे चाहते करत असतात. याचं रहस्य त्याला विचारल्यावर ‘मी तर जन्मापासून स्टाइलिश आहे. ‘सडक का आदमी हूँ मैं’. रस्त्यावर भेळपुरी, पाणीपुरी खातो. माझे चाहते आले तर त्यांनाही खायला घालतो. त्यामुळे स्टाइलिश होण्यासाठी वेगळं कशाला काय करू?’, असं तो मजेत म्हणतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात मी जसा असतो तसाच इतर कार्यक्रमात लोकांसमोर वावरतो. आरजेचं क्षेत्र खूप ग्लॅमराइज्ड झालंय. त्याचं आकर्षण वाटणं अगदीच साहजिक आहे. पण, आरजे होणं इतकं सोपं नक्कीच नाही. ‘आरजे होण्यासाठी आत्मविश्वास, बोलण्याची लकब, संवादकौशल्य हे गुण आवश्यक आहेत. फक्त आवाज चांगला असणं गरजेचं नसतं. मित्रमैत्रिणी असणं, समृद्ध जीवन जगण्याची कला अवगत असणं, आयुष्यातील अनुभवांचा योग्य प्रकारे योग्य वेळी वापर करता येणं, जगण्याला अर्थ असणं, त्याचा सार कळणं याही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत’, असं तो सांगतो. रेडिओ जॉकीच्या वयोमर्यादेवरही तो स्पष्ट मत करतो. ‘वयोमर्यादा नसावी. वयाने तरुण असण्यापेक्षा हृदय तरुण असणं महत्त्वाचं.’
बकरा करणं हे आरजेचं जणू कामच. पण त्यांचाच कोणी बकरा करत असेल का, हे विचारल्यावर त्याने लगेचच एक किस्सा सांगितला. ‘आरजे मलिष्काने माझ्या कार्यक्रमात फोन लावला होता. वेगळा आवाज काढून माझ्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. पण, तिच्या हसण्याच्या पद्धतीवरून मी तिला ओळखलं.’ त्याच्या कार्यक्रमाविषयी तो सांगतो , ‘तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘नॉटी नाइट्स’ या कार्यक्रमाची संकल्पना प्रोग्रामिंग हेड रिषी क्रिश्नानी यांची होती. सुरुवातीला मी फार सहमत नव्हतो. कालांतराने कार्यक्रम केल्यानंतर मला आवडू लागलं. यात हलकेफुलके विषय हाताळले जातात.’ त्याच्या या कार्यक्रमात श्रोते गुपित सांगतात त्याप्रमाणे नसरचं गुपित त्याला विचारलं, ‘खरं तर काहीच नाही. माझी ‘लाइफ खुली किताब की कहानी’ आहे. मला बऱ्याच मैत्रिणी होत्या. पण, मी कधी कुणाला फसवलं नाही. एवढंच सांगू शकतो.’ प्रत्येक आरजेची एक स्टाइल असते. तशीच ‘भागता घोडा, बेहता पाणी और नसर अपना रास्ता खुद बनाते है!’ हे वाक्य बोलण्याची नसरची सवय आहे. याविषयी तो सांगतो, ‘धावणारा घोडा, वाहणारं पाणी जसा आपला मार्ग शोधतात तसंच माझा मार्गसुद्धा मीच शोधेन. जशी वाट मिळेल तसा मी जात राहीन. माझ्या स्वप्नांच्या मागे मी नेहमी धावत राहीन’, नसरचा हा लाइफ फंडा आवडला.
सध्या टीव्ही, बॉलीवूड यांचंही जाळं वाढतंय. या प्रभावी माध्यमांविषयी नसर सांगतो, ‘मनोरंजनाची सगळी साधने मला प्रिय आहेत. पण, रेडिओ त्यांच्या तुलनेत वेगळा आहे. तिथे अभिनय, व्यक्तिरेखा नसतात. ‘रिटेक’ नसतात. त्यामुळे हे आव्हानात्मक काम आहे. शिवाय रेडिओ प्रवासात, मोबाइलवर, गाडीत कुठेही ऐकता येऊ शकतो.’ अशा माध्यमांमध्ये काम करताना मोकळा वेळ मिळणं कठीणच. पण, नसर मोकळ्या वेळेत फिरणं, लोकांना भेटणं, पोहणं, समुद्री खेळ खेळणं, घरी असलेल्या दोन मांजरींशी खेळणं आणि विविध साधनं दुरुस्त करणं इतक्या गोष्टी करतो. जीवनात आदर्श कोणाला मानतोस यावर तो म्हणतो, ‘माझे वडील माझे आदर्श आहेत. तसंच मलिष्का, प्रीतम, रिशी कपूर हेही आहेत. आम्ही एकमेकांकडून सतत शिकत असतो. आरजेची आमची पहिली पिढी आहे, हे अभिमानास्पद आहे’. खूप दिवसांची नसरला भेटण्याची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद चेहऱ्यावर घेत एक नवा मित्र भेटल्याचं समाधानही होतं.