कव्हरस्टोरी
महायुतीला विशाल युतीचा आकार द्यायला निघालेल्या भाजपच्या नेत्यांनी आता या मुद्दय़ावर आपली तोंडे शिवून घेतली आहेत, टाळीसाठी पुढे केलेला हात शिवसेनेने केव्हाच मागे घेतला आहे, तर रामदास आठवलेंची उगीचच लुडबुडही शांत झाली आहे. अंगावरचे झुरळ झटकावे अशा तिटकाऱ्याने राज ठाकरे यांनी हा विषय संपवून टाकला आहे. आता शुकशुक नाही, डोळे मारणे नाही आणि टाळी देणेही नाही.
महायुतीत मनसेला घ्यायचे की नाही यावरून शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतले लिंबूटिंबू रामदास आठवले यांचा रिपाइं यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले वैचारिक धूमशान आता शमले आहे. येत्या वर्षभरात केव्हाही होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप-रिपाइं महायुतीत मनसे सामील होणार नाही आणि आता सेना-भाजप किंवा रिपाइं यांच्या कितीही मनात असले तरी मनसेच्या चौथ्या भिडूसाठी महायुतीत जागा नाही हेही हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे, महायुतीला विशाल युतीचा आकार द्यायला निघालेल्या भाजपच्या नेत्यांनी आता या मुद्दय़ावर आपली तोंडे शिवून घेतली आहेत, टाळीसाठी पुढे केलेला हात शिवसेनेने केव्हाच मागे घेतला आहे, तर रामदास आठवलेंची उगीचच लुडबुडही शांत झाली आहे. अंगावरचे झुरळ झटकावे अशा तिटकाऱ्याने राज ठाकरे यांनी हा विषय संपवून टाकला आहे. आता शुकशुक नाही, डोळे मारणे नाही आणि टाळी देणेही नाही. आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी तिरंगी लढत अनेक मतदारसंघांमध्ये पाहायला मिळेल आणि २००९ मध्ये झालेल्या निकालांचीच पुनरावृत्ती होईल, हे स्वच्छ होऊ लागले आहे.
आगामी निवडणुकीआधी मनसेने महायुतीत यावे असा भाजपचा आग्रह का होता, शिवसेनेचीही तशीच छुपी इच्छा का होती, रामदास आठवलेंनाही नंतरनंतर तसे का वाटू लागले होते, तरीही मनसेने मात्र हा देकार का फेटाळला होता, याचे अनेक राजकीय आणि अ-राजकीय अर्थ-अनर्थ काढले जाऊ शकतात. महाराष्ट्राच्या ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ातील लोकसभा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीचे प्रतिष्ठेचे आणि हक्काचे मतदारसंघ होते. पण २००९ च्या निवडणुकीत गणिते बदलली. राज ठाकरे यांनी या मतदारसंघांमध्ये आपलीही ताकद पणाला लावली, आणि मनसेचा प्रभाव अधोरेखित झाला. आपला राजकीय पक्ष भक्कम व्हावा, पक्षाची ताकद वाढावी यासाठी प्रयत्न करताना, स्वतंत्रपणे निवडणुका लढविणे हा योग्य मार्ग असतो. आघाडय़ा करून आणि जागावाटपात वाटणीला येणाऱ्या मतदारसंघांतील मतविभागणी टाळण्यामुळे होणाऱ्या लाभाच्या आधारावर विजय मिळविण्याने ताकदीचा अंदाज येत नाही, हेही खरेच असते. राज ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत स्वतंत्रपणे उमेदवार उभे करून आपल्या ताकदीचा अंदाज घेतला.
 शिवसेनेचा स्थापनेपासूनचा बालेकिल्ला असलेल्या गिरणगावात, दक्षिण मध्य मुंबईत मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेचे मोहन रावले यांना थेट तिसऱ्या क्रमांकावर ढकलून मतदारसंघावरचे शिवसेनेचे वर्चस्व पुसून टाकले. म्हणजे, तेथे शिवसनेचा उमेदवार नसता, तर काँग्रेस आणि मनसे अशा थेट लढतीत नांदगावकरांनी काँग्रेसला सहज धूळ चारली असती. पण सेना-मनसेच्या लढाईत काँग्रेसच्या पदरात विजय पडला. हीच बाब ईशान्य मुंबईत घडली. भाजपचे किरीट सोमय्या आणि मनसेचे शिशिर शिंदे यांच्या मतसंख्येत नगण्य फरक होता. पण दोघेही आपटले आणि काँग्रेसला फायदा झाला. इतर मतदारसंघांत सेना-भाजपच्या उमेदवारांना पराभव चाखावा लागला.
मनसेमुळे मतांची विभागणी झाल्याने सेना-भाजपचे उमेदवार पडतातच, पण मनसेचादेखील एकही उमेदवार याच कारणामुळे विजयी होऊ शकत नाही, हे निकालांवरूनच स्पष्ट झाले असल्याने, राज ठाकरे यांना मान्य नसले तरी तेच वास्तव आहे. एक तर मनसेला विजय मिळत नाहीच, पण त्यामुळेच काँग्रेस आघाडीचा विजय मात्र सोपा होतो, हेही भाजपचे शल्य आहे. त्यामागचाच अर्थ शोधण्याचे प्रयत्न भाजपमध्ये अस्वस्थपणे सुरू असावा. राज ठाकरे यांची निवडणुकीव्यतिरिक्तची राजनीती काँग्रेस विरोधाची असल्याचे वारंवार दिसते. अनेकदा ते सेना-भाजपपेक्षाही आक्रमकपणे काँग्रेसवर प्रहार करतात. विरोधी पक्ष म्हणून सेना-भाजपपेक्षाही खरमरीत भूमिका घेतात. मग निवडणुकीच्या राजकारणात मात्र, काँग्रेसचा फायदा स्वच्छ दिसत असूनही तसे होईल अशी भूमिका का घेतात, या प्रश्नाचा भुंगा भाजप-सेना नेत्यांची डोकी गेली साडेचार वर्षे पोखरत असावा. राज ठाकरेंच्या या नीतीचा नेमका अर्थ काय असावा, याचा शोध घेण्याचेही त्यांचे छुपे प्रयत्न सुरू असावेत. एकदा अर्थ समजला, की हा प्रश्न आपणही सोडवू शकू असे कदाचित भाजपला वाटत असावे.
शिवसेना-भाजपच्या गेल्या अनेक दशकांच्या युतीला वैचारिक आधार आहे असे दोन्ही पक्षांचे नेते वारंवार सांगत असले, तरी मतांचे विभाजन टाळून निवडणुकीच्या राजकीय भागीदारीचा फायदा दोन्ही पक्षांत वाटून घेता यावा, हा त्यामागचा सरळसरळ राजकीय हिशेब आहे. केवळ वैचारिक आणि भावनेच्या लाटांवर स्वार होऊन दोन्ही पक्ष गळ्यात गळे घालून बसले असते, तर लहानमोठय़ा मुद्दय़ांवर मानापमानाचे आजवर जनतेने पाहिलेले अनेक प्रसंग घडलेच नसते. वैचारिक बैठक एक असलेल्या या दोन पक्षांनी राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या वेळी आपल्या वैचारिक बैठकीची वेगळी चूल असल्याचे दाखवून दिले होते. असे काही घडले, की त्याचे निरागस अर्थ लावण्याची कसरत भाजपला करावी लागते. कारण देशात भाजप हा राष्ट्रीय पक्ष असला, तरी महाराष्ट्रात मात्र, शिवसेनेचे धाकटे भावंड आहे. आपल्या मोठय़ा भावाची राजकीय बैठक एखाद्या कसोटीच्या क्षणीच वेगळी का भासू लागते, याचा अर्थ काय, हे कोडे सोडविण्यासाठी भाजपला शाब्दिक कसरतीही कराव्या लागतात. आणि वैचारिक बैठक हादेखील राजकीय लाभापुरताच हिशेब आहे, अशा निष्कर्षांने स्वत:ची समजूत काढून घेऊन गप्प बसावे लागते.
राज ठाकरे यांच्या मनसेने सोबत यावे असा विचार मांडतानादेखील भाजपचे नेते गेल्या काही दिवसांपासून अशाच, वैचारिक बैठकीच्या भावनिक मुद्दय़ांचा आधार घेताना दिसतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे दैवत आहेत, तितकेच भाजपलाही आदरणीय आहेत, आणि राज ठाकरे यांनादेखील बाळासाहेबांबद्दल नितांत आदर आहे. मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांची बाळासाहेबांवर शिवसैनिकांइतकीच गाढ श्रद्धा आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले असले, तरी ते सेनेत असतानाच त्यांच्याशी जवळकीचे नाते जडले आहे. उद्धव आणि राज हे दोघेही भाजपला सारखेच जवळचे आहेत, असा एक भावनिक मुद्दाही भाजपने गेल्या काही दिवसांत पुढे करून बघितला. तरीही राज ठाकरे त्यालाही बधले नाहीत. महायुतीत मनसेने सामील व्हावे याबद्दलची भाजपची मते राज ठाकरे यांना माहीत आहेत, त्यांच्याशी चर्चाही झाली आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले आणि राज ठाकरे यांनी मात्र उलटाच पवित्रा घेऊन भाजपची पंचाईत केली. भाजपच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेचा सारा तपशील उघड करू अशी तंबी देताच भाजपच्या एकाएका नेत्याने ओठ शिवून घेण्यास सुरुवात केली.
गेल्या काही महिन्यांत, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होताच नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांच्या घराचा उंबरठा झिजविला, मुंबई भाजपचे अध्यक्षपद मिळताच आशीष शेलार यांनी लगोलग कृष्णकुंज गाठून राज ठाकरे यांच्या शुभेच्छा मिळविल्या, विनोद तावडे तर नेहमीच राज ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते, आणि राज ठाकरे यांच्याशी चर्चा होत असते, असे तर फडणवीसच म्हणतात. गोपीनाथ मुंडे तर महायुतीत मनसेने सामील व्हावे या संकल्पनेचे प्रणेतेच मानले जातात. त्यामुळे मनसेला सोबत घेण्यासाठी शिवसेनेपेक्षाही भाजपमध्येच उतावीळपणाच्या उकळ्या अधिक फुटत होत्या.
महायुतीत मनसे या मुद्दय़ाला आता सर्व बाजूंनी पूर्णविराम मिळाला असला, तरी राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते यावर भाजपच्या अनेक नेत्यांचा नितांत विश्वास आहे. खरे म्हणजे, असे केव्हाही, काहीही घडण्याच्या फायद्यापेक्षा धक्केच भाजपला आजवर अनेकदा सोसावे लागले आहेत. अगदी तेरा दिवसांचा सत्ताकाळ हेदेखील अशाच केव्हाही, काहीही घडू शकते या सिद्धान्ताचेच प्रत्यंतर होते. तरीही महायुतीत मनसेच्या मुद्दय़ावर भाजप आशावादीच आहे. कदाचित, निवडणुकीआधी मनसेला सामील करून घेता आले नाही, किंवा चौथ्या भिडूची गरज वाटत नसली, तरी निवडणुकीनंतरच्या गणितांचे दरवाजे बंद होऊ नयेत, यासाठी पुन्हा केव्हाही काहीही सिद्धान्ताचा आधार भाजपने राखून ठेवला असावा.
काँग्रेस आघाडीच्या विरोधातील मतांची फाटाफूट टाळण्यासाठी निवडणुकीआधीची युती हाच योग्य पर्याय असला तरी मनसेला वगळून निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी महायुतीने केल्याचे सध्या तरी दिसते. त्यामुळे आता शिवसेना-भाजपच्या समोर मनसे हा काँग्रेस आघाडीइतकाच मोठा प्रतिस्पर्धी असेल. आता विशाल युती नाही, असे चित्र पूर्ण झाल्याने काँग्रेस आघाडीच्या तंबूत कदाचित आतापासूनच विजयाचे नगारे वाजविण्याची तयारी सुरू झाली असेल. मनसे हा काँग्रेस आघाडीचा शत्रू आहेच, पण शिवसेना-भाजपचा मित्र नाही, एवढा एक दिलासा निवडणुकीआधी तरी काँग्रेस आघाडीला पुरेसा ठरेल, अशा भावनेने ही आघाडी आता निर्धास्त राहील.
भाजपचे निवडणूक प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यातील पक्षाच्या बैठकीतही मनसेच्या मुद्दय़ावर मौन पाळले गेले. शिवसेनेने हा विषय संपविला आहे, तर मनसेने पुरता झटकून टाकला आहे. म्हणजे, निवडणूकपूर्व वातावरण तिरंगी राहील, असे दिसते. एक तर, भाजपला सध्या महाराष्ट्रापेक्षा दिल्लीची चिंता अधिक आहे. कोणत्याही स्थितीत, लोकसभेवर झेंडा फडकला पाहिजे, यासाठी भाजपने कंबर कसली असली, तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नावाने भाजपने जमविलेला गोतावळा आता दुबळा झाला आहे. एका बाजूला आघाडीचे अपरिहार्य राजकारण आणि आपापल्या राज्यात प्रभावशाली ठरणाऱ्या प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेण्याची राजकीय गरज वाढत असताना, एकला चलो रे नीतीने यापुढचे राजकारण करता येणार नाही ही जाणीव आणि भगव्या अजेंडय़ामुळे मित्र जोडण्याच्या मर्यादा अशा विचित्र परिस्थितीत भाजपला आगामी निवडणुकांची नीती आखावी लागणार आहे. महाराष्ट्रात नेमक्या याच परिस्थितीचे प्रतिबिंब आहे, पण शिवसेनेसारखा भक्कम प्रादेशिक पक्ष भाजपच्या साथीला आहे. असे असले तरी मनसे हा नवा भक्कम प्रतिस्पर्धीही समोर ठाकणार आहे. ही कोंडी फोडण्याचे प्रयत्न सध्या थंडावल्यानंतर आता निवडणुकीनंतरच्या बेरजांवर भाजपची भिस्त राहील, असे दिसते. कदाचित, मनसेसोबत निवडणुकीनंतर तरी नाते जोडता यावे यासाठी निवडणुकीच्या रिंगणातच आपल्या बाकडय़ावरची चौथी सीट मनसेसाठी सोपी व्हावी असे छुपे प्रयत्नही होतील. कारण राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते, हेच त्यामागचे सूत्र असेल. तोवर, मनसेच्या निवडणुकीच्या िरगणातील अस्तित्वाचा योग्य अर्थ लावून काँग्रेस आघाडीलाही आपली गणिते जमविणे सोपे होईल.
२००९ च्या लोकसभा निकालांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आगामी निवडणुकीत भाजप-सेना-रिपाइं महायुतीला काहीतरी नवी शक्कल लढवावी लागेल, असे दिसते. यासाठी कदाचित, पक्षाचे नवे निवडणूक प्रचारप्रमुख आणि पंतप्रधानपदाचे भावी अघोषित उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक नीतिकौशल्याची भाजपला महाराष्ट्रात सर्वाधिक गरज भासणार आहे. मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांत, गुजराती समाजाची मते निर्णायक ठरू शकतात. मतविभागणी टाळण्यासाठी या समाजाची एकगठ्ठा मते मिळविण्याकरिता नरेंद्र मोदींचा हुकमाचा एक्का मुंबईत वापरला जाईल, आणि मनसेच्या आव्हानामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पडझडीचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न निवडणुकीआधीच केला जाईल. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला काही लाभ झालाच, तर पाठिंब्याच्या रूपाने निवडणुकीनंतर तरी तो पदरात पाडून घेता यावा, असे धोरण महायुतीला राबवावे लागेल. त्यासाठी कदाचित निवडणुकीआधी राज ठाकरे यांचे महायुतीच्या नावाने फुटणारे फटाके कान उघड ठेवून आणि तोंड बंद ठेवून सहनही करावे लागतील.
कारण, शेवटी, राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते!!

deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक