रामचंद्र बिस्वास या पश्चिम बंगालमधल्या तरुणाने हातात केवळ एक डॉलरएवढी रक्कम असताना सायकलवरून जगप्रवासाला जाण्याचं धाडस अवलंबलं. या वेडय़ा धाडसाची चित्तरकथा-
‘‘मित्रांनो, लवकरच मी जगप्रवासाला निघणार आहे. त्या वेळी मी केवळ एक डॉलर खिशात ठेवणार आहे. तेव्हा मला पैशांची आवश्यकता नाही. पण माझ्याबरोबर कोणी येणार असेल तर त्यानं आनंदानं यावं’’ रामचंद्र बिस्वासनं मित्रांपुढे घोषणा केली. त्या वेळी तर कोणाचा हात वर गेला नाही. पण काही दिवसांनी एक सहकारी मिळाला.
प. बंगालमधील गंगेच्या तीरावर असणाऱ्या उत्तर पारा गावातला हा २८ वर्षांचा तरुण पोस्टात मदतनीस म्हणून काम करत होता. घरखर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी रात्री एका जिममध्ये तो ट्रेनरचे काम करायचा. तिथे तो जादू आणि हातचलाखीचे प्रयोग शिकला होता. त्याला जगप्रवासाचे वेध लागले होते आणि खरोखरच एक दिवस त्याने आपली सायकल दिल्लीच्या दिशेने वळवली.
पंतप्रधान इंदिरा गांधींची भेट मिळवून त्याने आपला महोदय सांगितला. त्यांच्याकडून काही मदत मिळावी ही अपेक्षा होती. इंदिराजींनी त्याच्या उत्साहाचे कौतुक केले. त्याचबरोबर एक सल्ला दिला. ‘तरुण मित्रा, कुठेही भीक मागू नकोस आणि भारताच्या दारिद्रय़ाचं प्रदर्शन करू नकोस.’
जगप्रवासाची सुरुवात आफ्रिकेपासून करायची हे रामचंद्रने ठरवले होते. कारण त्याच्या मते आफ्रिकेतील प्रवास खडतर असण्याची शक्यता होती. तो आणि त्याच्या मित्राने नैरोबीकडे प्रयाण केले तेव्हा तिकिटाव्यतिरिक्त त्याच्या खिशात खरोखरच एक डॉलर होता. त्याच्या बळावर त्याला जगाच्या शांततेचा संदेश द्यायचा होता! त्यासाठी त्याने २९ वर्षांत १५७ देशांतील ६२७५०० कि.मी. अंतर सायकलवरुन कापले होते. या दीर्घ प्रवासात त्याला भाषेची अडचण आली नव्हती. हावभावाची भाषा जागतिक असते, हा प्रत्यय त्याला वारंवार आला. गरिबाच्या झोपडीत हा अनुभव त्याला येत गेला, तर कधी श्रीमंत घरीही त्याचे स्वागत झाले होते. मात्र कल्पनेने खडतर वाटणाऱ्या आफ्रिकेत त्याचा पाहुणचार अधिक चांगला झाला होता. ‘गरीब देशात मानवी आदरातिथ्य, प्रेम आणि शांती मिळते, तर संपन्न देशात क्रोध, असूया, धास्ती आणि स्वार्थीपणा दिसतो’ हा आहे त्याचा अनुभव. ‘ज्या देशात जावे त्या देशातील लोकांच्या संस्कृतीचा आदर करण्याहून अधिक काही महत्त्वाचे नसते’ हेही तो आवर्जून सांगतो. तो मसाई लोकांबरोबर शिकारीला गेला व त्यांनी देऊ केलेले म्हशीचे गरम रक्त त्याने त्यांच्यासोबत आनंदाने घशाखाली उतरवले. प्रसंगी त्याच्यापुढे जे मांस आले ते त्याने खाल्ले. फक्त वाघ-सिंहाचे मांस कोणी न दिल्याने ते खाता आले नव्हते. जेव्हा तो आफ्रिकी शहरांतील गुजराती-मारवाडी व्यापाऱ्यांकडे गेला होता तेव्हा अर्थातच शाकाहारी होत होता.
69त्याचा सोबती सोमनाथ मुखर्जीने गिनी बिलाऊ येथे महिनाभर मुक्काम करण्याचे ठरवले तेव्हा महिनाभराने सेनेगल येथे भेटण्याचे ठरवून राम पुढे निघाला. पण सोमनाथ पुन्हा भेटलाच नाही. आफ्रिकेतील खेडय़ापाडय़ात तो जादूचे प्रयोग दाखवत असे. त्यामुळे त्याला राहायला जागा व पोटापुरते अन्न मिळत असे. आफ्रिकेत काळय़ा जादूचा प्रभाव असल्याने या जादूगाराचे आदरातिथ्य होत असे. मोंबासा या मोठय़ा शहरात अमिताभ बच्चन विलक्षण लोकप्रिय दिसला. ‘हा आला अमिताभ बच्चन’ असे म्हणत त्याचे स्वागत होई.
नव्या शतकाच्या प्रारंभी त्याने आक्र्टिक सागरात गोठलेल्या स्पिट्सबर्जेनवर पाऊल ठेवले, तेव्हा तिथे पोचलेला तो पहिला भारतीय नागरिक होता. मध्यरात्री तळपणाऱ्या सूर्याच्या प्रकाशात त्याचे स्वागत झाले रशियन कोळसा खाण कामगारांकडून. अशा निगर्म ठिकाणी माणूस खोदकाम करीत असेल याची कल्पना त्याला नव्हती.
कॅनडातील यलोनाईफ येथे सोन्याच्या आणि हिऱ्याच्या खाणी आहेत. तिथे पोचल्यावर क्षितिजावर दिसणारे प्रकाशाचे विभ्रम, ज्याला आरोरा बोरोलिस म्हणतात, पाहून तो विस्मयचकित झाला होता. तिथे आत्मशुद्धी होत असल्याची जाणीव त्याला झाली. यलोनाईफला त्याची गाठ झाली रेमंड द रॅव्हन या उद्योगपतींशी. त्यांनी एक प्रशस्तिपत्रकच देऊन टाकले- ‘प्रमाणपत्र देण्यात येते की, रामचंद्र बिस्वास हे यलोनाईफ येथे आले होते. कॅनडाच्या सीमा भागातील हे आधुनिक शहर आहे. यलोनाईफमधील व्यावसायिक रेमंड द रॅव्हन यांच्याशी त्यांचे बंधुत्वाचे नाते जुळले हे नमूद करताना आनंद होत आहे.’ ‘या प्रशस्तिपत्राच्या कडेवर तांबडा शिडकावा आहे, तो म्हणजे रेमंड यांच्या रक्ताचा नमुना आहे’, असे बारीक अक्षरांत लिहून ठेवलेले आहे.
रामचंद्रचा जगप्रवास एकंदर ३० वर्षे चालला होता. या काळात त्याने आक्र्टिकचा वितळता बर्फ पाहिला. अंटाक्र्टिक सागरात मैल-मैल लांबीच्या तरंगत्या बर्फाच्या भिंती पाहिल्या. आक्र्टिक भूमीत तेलविहिरी खणण्याचे काम सुरू झाल्यामुळे तिथे विनाशाची नांदी पाहिली. अॅमेझॉनच्या जंगलातील वृक्षांची अमाप कत्तल पाहिली. माणसाच्या हावरेपणाला सीमा नाही हे त्याला प्रकर्षांने जाणवले.
अमेरिकेवरील ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर जग बदलले आहे.
जिथे तिथे संशयीपणा बळावला आहे. देशोदेशींचा व्हिसा मिळवणे दुरापास्त झाले आहे. परक्या देशांत फिरत असताना कुठेही प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावे लागते. त्याचा प्रवास १५७ देशांमधून झाला आहे. त्या देशांची क्रमवार नावे विष्णुसहस्रनामाप्रमाणे त्याला मुखोद्गत आहेत. रवींद्रनाथांचे एक वचन तो नेहमी म्हणतो, ‘जगभरात सर्वत्र तुमचं घर असतं. फक्त ते शोधावं लागतं. तुम्हाला ते जरूर मिळतं.’
१९९०च्या अखेरीस तो ब्राझीलमधून पेरूला जाण्यासाठी एका जहाजावर चढला. प्रवास होता १५ दिवसांचा. पण वाटेत जहाज नादुरुस्त झाले. ते दुरुस्त हाईपर्यंत अॅमेझॉनच्या जंगलात फेरफटका मारण्यासाठी काही सहप्रवाशांसोबत तो किनाऱ्यावर उतरला. चालून चालून थकल्यावर झाडांना हॅमॉक बांधून ते विसावले. सकाळी जाग आली तेव्हा त्याच्या शरीराला दोन अजगरांनी लपेटलेले होते! अजगर भक्ष्याला आवळून गुदमरून टाकतो, हे त्याने वाचलेले होते. ती वेळ आली म्हणत तो शांत राहिला. बऱ्याच वेळाने तो अजगर विळखा सोडून निघून गेला. रामचंद्रला गिळण्याचा त्याचा विचार नव्हता. मानवी शरीराची ऊब घेण्याकरता तो बिलगला होता. अशा अनेक विस्मयजनक प्रसंगांना तोंड देत तो पुढे पुढे जात होता.
एल् साल्वाडोरमधून भारतीय बनावटीच्या बीएसए सायकलवरून जात असता एका भूमिगत टोळक्याने त्याला घेरले. हा अमेरिकन गुप्तहेर असावा या संशयाने तो धरला गेला होता. आपल्या मोडक्यातोडक्या स्पॅनिशमध्ये आपण भारतीय असून जगप्रवासाला जात असल्याचे सांगण्याचा प्रयत्न त्याने केला, पण ते त्याला पटले नाही. तो त्याला आपल्या तळावर घेऊन गेला. तिथे आधी पकडून आणलेल्या एका माणसाचा त्यांनी रामचंद्रसमोर गळा चिरला. तेव्हा जिवाच्या आकांताने त्याने टोळीप्रमुखाकडे घेऊन जाण्याची मागणी त्याच्या गळी उतरवली. सुदैवाने टोळीप्रमुखाला इंग्रजी समजत होते. बऱ्याच संभाषणानंतर तो अमेरिकन नसल्याची खात्री पटल्यावर त्याला खायला देण्यात आले. रामचंद्रची कहाणी ऐकून टोळीप्रमुख हेलावला होता.
जगप्रवासाचा एक टप्पा संपवून तो घरी आला, तेव्हा त्याची ८० वर्षांची आई आजारी होती. त्यामुळे या ६० वर्षांच्या रामचंद्रचा प्रवास सध्या तरी खंडित झालेला आहे.