रिअल इस्टेट विशेष : कोल्हापूर – घरबांधणीला अच्छे दिन

ऐतिहासिक करवीर नगरीत उद्योग-व्यापाराच्या संधीमुळे वाढती निवाऱ्याची गरज, पश्चिमेकडील निसर्गसंपन्न डोंगराळ भागात सेकंड होमची वाढती व्याप्ती, निमशहरी भागात रुंदावत चाललेली फ्लॅट…

lp13ऐतिहासिक करवीर नगरीत उद्योग-व्यापाराच्या संधीमुळे वाढती निवाऱ्याची गरज, पश्चिमेकडील निसर्गसंपन्न डोंगराळ भागात सेकंड होमची वाढती व्याप्ती, निमशहरी भागात रुंदावत चाललेली फ्लॅट संस्कृती.. यामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या बांधकाम क्षेत्राची रंगत वाढत चालली आहे. शहरी भाग असो की निमशहरी बांधकाम व्यवसायाचा पाया दिवसेंदिवस रुंद होत चालला आहे. या क्षेत्रातील गुंतवणूक कोटींचे आकडे पार करीत चालले आहे. श्रीमंत-मध्यमवर्गीयांना स्वप्नातला बंगला उपलब्ध होत चालला असताना श्रमिकांनाही परवडणाऱ्या घरांना आकार मिळत चालला आहे.

कोल्हापूर शहराची एक खास संस्कृती-परंपरा आहे. स्वत:ची अनेक वैशिष्टय़े-परंपरा यांना तडा जाऊ न देता करवीरवासीयांनी नवनव्या आधुनिक बाबी व तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. येथील बांधकाम व्यावसायिक या सर्व गोष्टींचा तपशिलाने विचार करून आपले गृह प्रकल्प पूर्णत्वास नेत आहेत. कोल्हापूर शहराचा होणारा विकास आणि त्याच वेळी भासणारी जागेची कमतरता यावर खुबीने मात करून एकत्रित सहजीवनाचा आनंद देणारी अपार्टमेंट संस्कृती करवीरकरांनी आपलीही केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये धार्मिक, ऐतिहासिक, औद्योगिक, पर्यटन पुरोगामी विचारधारा, संशोधक वृत्ती अशा अनेक वैशिष्टय़ांनी बद्ध असे कोल्हापूर हे एक महत्त्वपूर्ण अन् समृद्ध शहर आहे. येथील कल्पक उद्योजकांनी उभे केलेले दर्जेदार उद्योग आणि काळ्या मातीत बळीराजाने मेहनतीने पिकवलेली शेती यामुळे शहराचा नावलौकिक सातासमुद्रापार पोहोचला आहे. चविष्ट खाद्यसंस्कृती, दर्जेदार शिक्षण संस्था, करमणुकीच्या नानाविध संधी, अत्याधुनिक आरोग्य सुविधा, रोजगाराची विपुल संधी यामुळे पंचगंगा काठच्या लोकांचे जीवनमान आनंददायी न बनले तर नवल. अशा या करवीरनगरीत स्वाभाविकच रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी मागणी आहे. शहरात उभ्या असलेल्या आकर्षक, दर्जेदार गृह व वाणिज्य प्रकल्पांच्या इमारती याचेच प्रतीक आहे. गेल्या दशकभरात रिअल इस्टेट क्षेत्राची कमान कायम चढती राहिली आहे. या क्षेत्रात ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना आकर्षक परतावा मिळाला आहे. यामुळे अलीकडे या शहरात १, १.५, २.५, ३, ४ बीएचके आकारांचे फ्लॅट्स, डय़ुप्लेक्स, पेंट हाऊसेस उपलब्ध आहेत. तद्वतच आवडीनुसार रो-बंगलो, रो-हाऊसेसची निर्मितीही होत आहे. व्यावसायिक-व्यापारी यांच्या सोयीनुसार अनेक आकर्षक शोरूम, ऑफिसेसचे पर्यायही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. ही गरज लक्षात घेऊन नवनवीन बांधकाम योजनांचा धडाक्यात शुभारंभ होत असून ग्राहकांनी आकर्षित व्हावे याकरिता आकर्षक योजना, ऑफर्स बांधकाम व्यवसायिकांकडून दिल्या जात आहेत.
राजर्षी शाहू महाराजांच्या या नगरीत पूर्वीपासूनच उद्योगाचा पाया रचला गेला. नंतरच्या काळात तो अधिकच विकसित होत राहिला. व्यापार पेठ म्हणूनही कोल्हापूर हे गोवा, कोकण अन् पठार भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा बनले. व्यापारउदीम, उद्योगाचे बस्तान बसू लागले तसतसे श्रमिकांचे पायही या नगरीकडे ओढले जाऊ लागले. अर्थात या सर्वाच्या निवाऱ्याची गरज महत्त्वपूर्ण बनली. त्याचे महत्त्व जाणले ते बांधकाम व्यावसायिकांनी. येथेही बिल्डर्सचे प्रस्थ वाढीस लागले आहे. जागेची कमतरता लक्षात घेता फ्लॅट संस्कृतीही वाढीस लागली. शहराच्या चोहोभोवती आणि लगतच्या ग्रामीण भागात उंचच उंच इमारती आकारास आल्या. आता तर अकरा मजली इमारती आकाशाला साद घालत आहेत. ग्राहकांच्या गरजांनुसार आणि थीमनुसारही फ्लॅट संस्कृती बहरू पाहत आहे.
घर तर सर्वानाच हवे. त्यासाठी प्रत्येकाचे बजेटही वेगळे. घराची अपेक्षा व बजेट याचा ताळमेळ घालत इमारती बांधल्या जात आहेत. मुख्यत्वेकरून मागणी आहे ती दीड-दोन बीएचके घरांना. यातही आकर्षक सोयीसुविधांना महत्त्व दिले जात आहे. हेल्थ क्लब, क्रीडांगण, गार्डन, स्वििमग पूल, लहान मुलांची खेळणी अशा आकर्षक प्रकल्पांना पहिली पसंती मिळत आहे. दरवर्षी अशा प्रकारचे १५ ते २० प्रकल्प शहरात उभे राहत आहेत. प्रत्येक प्रकल्पात शंभर ते दोनशे फ्लॅट्सचे नियोजन असते. हे पाहता वर्षांकाठी करवीरनगरीत सुमारे दोन हजार फ्लॅट बांधले जातात. अर्थात मागणीही तितकीच आहे. किंबहुना मागणी व पुरवठा यांचे संतुलन राखले जात असल्याचे पाहायला मिळते.
अलीकडेच, म्हणजे वर्षभरापासून ११ मजली इमारती कोल्हापुरात उभ्या राहू लागल्या आहेत. आकर्षक पद्धतीचे बांधकाम होत असल्याने त्यासही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. ११ मजली इमारतींचे ६ प्रकल्प मंजूर झाले आहेत. तर आणखी तीन-चार प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. एक-दोन वर्षांत हे सारे प्रकल्प पूर्ण होतील, तेव्हा ११ मजल्यांचे शहर म्हणून कोल्हापूरची नवी ओळख होईल. ११ मजली इमारतीच्या प्रकल्पामध्ये अनेक टॉवर उभे राहतील. एकाच इमारतीत अनेक कुटुंबे राहण्यास येणार आहेत. इथे राहणारा सदनिकाधारक हा उच्च व मध्यमवर्गातला आहे. त्याच्याकडे एक मोटार, एक स्कूटर अशी किमान दोन वाहने आहेत. हे लक्षात घेता पुरेशा पाìकगचे नियोजन अशा गृहप्रकल्पामध्ये केलेले आहे. खेरीज, लिफ्ट, बॅटरी बॅकअप, वॉटर सॉफ्टनर अशा मूलभूत सुविधांना मागणी आहे.
कोल्हापूर शहराचे हवामान पोषक आहे. परिणामी, इथे घर घेण्यास पसंती दिली जात आहे. चांगल्या गुंतवणूकदारांचा ओढा करवीरनगरीकडे पूर्वीपासूनच आहे. आणि आता तर अमेरिका, दुबई या विदेशांसह मुंबई, पुणे, बेंगलोर येथील ग्राहकही कोल्हापुरात घर घेण्यासाठी वळू लागला आहे. अर्थात, हा ग्राहक मूळचा कोल्हापूरकरच आहे. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने तो तिकडे गेला आहे. गुंतवणूक आणि आईवडिलांसाठी चांगले घर यासाठी फ्लॅट खरेदी केले जात आहेत. सेकंड होमच्या या संकल्पनेला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतो आहे.
सेकंड होमचे दुसरे चित्र दिसते ते जिल्ह्य़ाच्या डोंगराळ भागात. ऐतिहासिक पन्हाळा, विशाळगड, आंबा, गगनबावडा, आंबोली, सादळे मादळे या ठिकाणी टुमदार बंगले, फार्महाऊस बांधण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मनाजोगती जागा हेरून तेथे मनपसंद घर बांधणे अनेकांना भावत चालले आहे. व्यस्त शहरी जीवनाला कंटाळलेल्या शहरी बाबूंना आठ-पंधरा दिवस बदलती जीवनशैली अनुभवण्यासाठी निसर्गरम्य परिसरात राहणे भलतेच आवडू लागले आहे. यामुळेच सदर परिसरात सेकंड होम – ग्रीन हाऊस संकल्पना बहरत चालली आहे, असे मत क्रेडाई या संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष राजीव परीट यांनी व्यक्त केले.
शहरी भागात बांधकामाचे नवे चित्र उदयास येत आहे. जुने वाडे-इमारती पाडल्या जात आहेत. याच जागी अत्याधुनिक सुविधा पुरवणाऱ्या घरांची निर्मिती होत आहे. या माध्यमातून घरांचा पुनर्वकिास उद्योग मूळ धरू लागला आहे. खेरीज टीडीआर व प्रीमिअर एफएसआय या धोरणामध्ये बदल झाल्यामुळे शहरी भागातील बांधकामांना गती आली आहे.
गृहनिर्माण उद्योगाची चांदी होत असली तरी इथे सामान्यांचे काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण याचीही सोय होत आहे. इथल्या उद्योग-व्यवसायामध्ये काम करण्यासाठी आलेल्या कामगारांसाठी परवडणारी घरे शहरालगत बांधली जात आहेत. उचगाव, मुडिशगी, सरनोबतवाडी अशा औद्योगिक वसाहतींना लागून असलेल्या भागात ४०० ते ५०० चौ. फूट आकाराची वन बीएचके घरे बांधली जात आहेत. १५ ते २० लाख रुपये किमतीला ती ग्राहकांना उपलब्ध होत आहेत. तर २० लाखांची रो-हाऊसेसही कनिष्ठ मध्यमवर्गीयांना कर्जपुरवठय़ाच्या सर्व सुविधांसह मिळत असल्याने त्यावरही ग्राहकांच्या उडय़ा पडत आहेत.
स्वत:चे घर असावे हे तर सर्वाचेच स्वप्न असते. ते पूर्ण होईतोवर भाडय़ाच्या घराला पर्याय नसतो. भाडय़ाच्या घराची सोय या शहरात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. किंबहुना ही गरज ओळखून काहींनी इमारती बांधून भाडय़ाने घरे देण्याचा नवा व्यवसायच आरंभला आहे. गुंतवणुकीचा नवा पर्यायही याकडे पाहिले जात आहे. एकूणच कोल्हापूरचा गृहनिर्माण व्यवसाय स्थिर गतीने प्रगती करीत आहे. मुंबई-पुण्यामध्ये घरांचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात हक्काचे घर घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आणि यामुळेच करवीरनगरीत गृहबांधणी प्रकल्पांना अच्छे दिन आले असल्याचे दिसते आहे.
कोल्हापूरच का?
कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये सदनिका, फार्महाऊस घेणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढते आहे. यामागचे नेमकी कारणे काय आहेत याचा मागोवा घेतला असता काही महत्त्वाचे मुद्दे हाती आले. कोल्हापूर शहरालगत तीन औद्योगिक वसाहती आहेत. राष्ट्रीय महामार्गावर पंचतारांकित वसाहत आहे. हातकणंगले तालुक्यात तीन, शिरोळ तालुक्यात दोन व बऱ्याच तालुक्यांत एखादी तरी औद्योगिक वसाहत आहे. करवीरनगरीसह इचलकरंजी, गांधीनगर, जयसिंगपूर, गडिहग्लज, कागल येथे व्यापारी पेठा आहेत. उद्योग-व्यापार याच्या निमित्ताने उद्यमींसह श्रमिकांचा ओढा वाढतो आहे. या सर्वाच्या आíथक स्तरानुसार घर, सदनिका, बंगला खरेदी केला जात आहे, असे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अनंत माने यांनी सांगितले.
कोल्हापूर शहराचा सर्वागीण विस्तार होत आहे. शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता या कारणांनी शहरात देशभरातील ग्राहकांकडून घरे खरेदी करण्याचे प्रमाणही वाढत आहे. मुंबई-पुणे येथे घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तुलनेत कोल्हापुरात घर घेणे अनेकांना भावत आहे. माफक दरात आधुनिक सोयीसुविधांचा मेळ घालणाऱ्या घरांची आवडीनुसार उपलब्धता होत असल्याने ग्राहक-गुंतवणूकदार यांच्या यादीत कोल्हापूरचे नाव अग्रस्थानी न राहिले तर नवल.
दयानंद लिपारे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Real estate special