lp29चिमके वडे

साहित्य : २ वाटी चणाडाळ, ३/४ वाटी तूरडाळ, हळद, तिखट, चवीपुरते मीठ.
पाण्याकरिता मसाला : ४-५ ग्लास पाणी, ४-५ चमचे मोहरी डाळ, धणे, जिरे, हिंग, चवीपुरते मीठ.
वडे कृती :
१. चणाडाळ आणि तूरडाळ ३-४ तास पाण्यात भिजत ठेवणे.
२. डाळ भिजल्यावर मिक्सरमध्ये एकत्र बारीक करणे. मिक्सरमध्ये फिरवताना पाणी जास्त घालू नये. बारीक केलेल्या डाळीत हळद, मीठ, तिखट घालून एकत्र करावे.
३. आता नॉनस्टिक गरम तव्यावर २-३ चमचे तेल घालून थोडा डाळीचा गोळा घेऊन तव्यावर वडय़ासारखे थापावे. वरून वडय़ांच्या बाजूने तेल सोडावे.
४. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने चांगले होऊ द्यावे.
५ हे वडे भिजवण्यास पाणी तयार करण्याकरिता, थोडी मोहरी डाळ, धणे आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
६. आता पाण्यामध्ये ही बारीक केलेली पेस्ट, हिंग, १ चमचा अख्खी मोहरी डाळ आणि चवीपुरते मीठ घालून एकत्र करावे.
७. या पाण्यामध्ये वर केलेले वडे घालावे. पाणी साधारण वडय़ांच्या वर राहील असे घ्यावे.
८. १-२ दिवस तसेच झाकून ठेवावे, त्यामुळे वडे आणि पाण्याला आंबटपणा येईल.
९. नंतर हे वडे पाण्यात कुस्करून वरून बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आवडत असल्यास तेल आणि तिखट भुरभुरून खाण्यास द्यावे.
आंबट झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवावे, ५-६ दिवस चांगले राहतात. पाण्यात न घालता गरमगरम लाल मिरचीचे तिखट, कैरी लोणचेबरोबर छान लागतात.
हे वडे उन्हाळ्याच्या दिवसात करतात, तापमान जास्त असल्यामुळे पाणी लवकर आंबट होते आणि वडे पाण्यात भिजवलेले असल्यामुळे उन्हाळ्यात खाण्यास थंड बरे वाटतात.

lp28वसावण सार

साहित्य : १ वाटी तांदूळ, १/२ वाटी तूरडाळ, १ कैरी, १/२ वाटी कोथिंबीर, २ छोटे चमचे धणे,
२ चमचे जिरे, ८-१० लसूण पाकळी, १ छोटा आल्याचा तुकडा, ३-४ हिरवी मिरची

कृती :
१. भाताची पेज काढण्याकरिता तांदळात थोडे जास्त पाणी घालून भात शिजवून घ्यावा.
२. आता कुकरमध्ये थोडी भिजवलेली तूरडाळ पाणी घालून वरणाकरिता शिजवतो तशी मऊ शिजवणे आणि थोडी डाळ पाणी न घालता एका ताटलीत ठेवून अर्धीकच्ची शिजवणे.
३. नंतर कोथिंबीर, धणे, जिरे, लसूण, आले, हिरवी मिरची याची बारीक पेस्ट करावी.
४. आता एका भांडय़ात भाताची पेज, थोडी भाताची शिते, बिजाळ अर्धीकच्ची शिजलेली डाळ, १ चमचा तूरडाळीचे वरण, वर बारीक केलेली पेस्ट, चवीपुरते मीठ, कैरीच्या लांब कापलेल्या फोडी, हे सर्व एकत्र करावे.
५. वरून तेलाची हिंग, मोहरी, जिरे, हळद घालून फोडणी देऊन उकळी आणावी.
हे सार सूपसारखे पिण्यास किंवा भाताबरोबरही छान लागते.
हिरवी कैरी नसल्यास, वाळवलेल्या कैरीच्या फोडी किंवा आमचूर पावडर घालू शकता.
राजश्री नवलाखे – response.lokprabha@expressindia.com