केंद्रीय ग्रामविकासमंत्री तसंच भाजपचे ज्येष्ठ खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे समाजाच्या सगळ्या थरांमधून आपलंच कुणीतरी जवळचं माणूस गमावल्याची भावना व्यक्त झाली. मुंडे आपल्यासाठी कसे महत्त्वाचे होते, याबाबत राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुंडे यांच्या आकस्मिक जाण्याने मनाच्या तळाशी असलेल्या अनेक आठवणींच्या लाटा उचंबळून आल्या. त्यांचा आणि माझा स्नेह हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा होता. विद्यार्थी परिषदेचे काम करीत असल्यापासून त्यांचा सहवास मला मिळाला. त्यांच्यासोबत काम करायचे भाग्य मला मिळाले. ते एक कुशल संघटक होते. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. मला पोहोचायला थोडा उशीर झाला, त्यांना दुसऱ्या कामासाठी बाहेर जायचे होते, पण ते माझ्यासाठी थांबले, त्यांनी मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. वहिनींनी माझे औक्षण केले. आता तू नेतृत्वाच्या कक्षेत प्रवेश केला आहेस, त्यामुळे तुझ्याकडे आता नवीन जबाबदारी आली आहे. त्यासाठी त्यांनी मला शुभेच्छा देत पाठीवर शाबासकीची थाप दिली, तो प्रसंग आजही मला जसाच्या तसा आठवतो. त्यांच्या स्वभावाची अनेक वैशिष्टय़े होती. ते नेहमी दुसऱ्यांच्या वेदना जाणून घेत, त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी त्यांची धडपड नेहमी सुरू असायची. जनसामान्यांच्या कामासाठी ते नेहमी झटत असत, तळागाळातील लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसून त्यांना हसायला लावणे याला त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्राधान्य दिले.
तो साधारणत: १९८४-८५ चा काळ असेल. त्यावेळी मी विद्यार्थी परिषदेचे काम करीत होतो. माझ्याकडे विद्यार्थी परिषदेच्या महाराष्ट्र विभागाची जबाबदारी होती. त्यावेळी मी परिषदेच्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत होतो. परिषदेच्या या काळात मला संघाच्या बैठकीस उपस्थित रहावे लागायचे. गोपीनाथजी मुंडे यांच्याकडे महाराष्ट्र भाजपची त्या काळात जबाबदारी होती. त्यामुळे तेसुद्धा संघाच्या बैठकीस हजर असायचे. त्यावेळी त्यांची आणि माझी खास ओळख नव्हती. ते अनेक वेळा मला संघाच्या बैठकीत दिसायचे, पण त्या बैठकांमध्ये त्यांचा आणि माझा फारसा संपर्क यायचा नाही.
परिषदेच्या कामानिमित्त मी एकदा औरंगाबादला चाललो होतो. पंचवटी एक्स्प्रेसने आम्ही मनमाडपर्यंत पोहोचलो. मनमाडहून पुढे मराठवाडय़ात जाण्यासाठी दुसरी गाडी बदलून मीटरगेज गाडीने पुढचा प्रवास करायचो. गाडी बदलण्यासाठी साधारणत: २ तास वेळ मिळायचा. त्यावेळी मुंडेसाहेब त्याच गाडीने प्रवास करीत होते. मनमाड स्थानकावर ते कार्यकर्त्यांशी चालता चालता गप्पा मारत होते. मनमाडच्या त्याच प्लॅटफॉर्मवर मुंडेसाहेबांची आणि माझी पहिली खरीखुरी ओळख झाली. त्या प्लॅटफॉर्मवर मी त्यांच्याशी पहिल्यांदाच गप्पा मारल्या. मी करत असलेल्या परिषदेच्या कामाचा उल्लेख त्यांच्या आणि माझ्या गप्पांमधून आला. त्यावेळी त्यांनी अतिशय आपुलकीने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर काय करता येईल याबद्दलही ते माझ्याशी मोकळेपणाने बोलले. मराठवाडा विद्यार्थी परिषदेत नेमकं काय करता येईल, या परिषदेचे काम अधिक मोठय़ा प्रमाणात कसे वाढविता येईल, अशी चर्चाही त्यांनी माझ्याशी केली. त्या प्लॅटफॉर्मवरच्या गप्पा पुढे अशाच सुरू राहिल्या. जेव्हा जेव्हा मी औरंगाबादला जायचो तेव्हा तेव्हा त्यांच्याशी नेहमीच सविस्तरपणे गप्पा आणि चर्चा व्हायच्या. पुढेही असा सिलसिला कायम राहिला.
विद्यार्थी परिषदेमध्ये माझे काम जोमाने सुरू होते. विविध प्रश्न, आंदोलने आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी माझी धडपड सुरू होती. राजकारणात येण्याचे तसे माझ्या मनात नव्हते. पण विद्यार्थी परिषदेच्या कामाच्या निमित्ताने मुंडेसाहेबांचा सहवास या ना त्या कारणाने मिळत गेला. त्यांच्या सहवासात राजकीय विषयांवरही चर्चा होऊ लागली आणि कळत-नकळत माझाही ओढा मुंडेसाहेबांमुळे राजकारणाकडे आपोआप वळला. त्यानंतर माझा राजकीय प्रवास इथपर्यंत येईल असे तेव्हा मला वाटले नव्हते.
काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. विविध आंदोलने करूनही निगरगट्ट काँग्रेस सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले होते. मुंडेसाहेबांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण होती. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न तडीस नेले होते. शेतकरी म्हणजे बळीराजा.. शेतकरी टिकला तर राज्य टिकेल.. असे ते नेहमीच सांगायचे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा कळवळा असणारा असा नेता मी यापूर्वी पाहिला नव्हता. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुंडेसाहेबांनी मंत्रालयावर प्रचंड मोर्चा काढला. दोन लाखांची गर्दी असलेल्या या महाप्रचंड मोर्चाचे नेतृत्व मुंडे यांनी केले. मी त्यावेळी विद्यार्थी परिषदेचा पदाधिकारी या नात्याने त्या मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. हा मोर्चा इतका मोठय़ा प्रमाणात यशस्वी झाला की, त्या दिवसापासूनच मुंडेसाहेबांचे नेतृत्व महाराष्ट्राला अधिकच भावले. त्यांच्यामधील व्यक्तिमत्त्वाविषयी आदर तर होताच, परंतु हा आदर त्यानंतर अधिकच वाढला. त्यांचे नेतृत्व विद्यार्थी चळवळीपासून पाहात आलो होतो. पण शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठय़ा यशानंतर त्यांच्या नेतृत्वाविषयी अधिक आकर्षण निर्माण झाले. एक विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून हे आकर्षण स्वाभाविकच होते.

wardha lok sabha constituency, Amar Kale, sharad pawar ncp, amra kale campaign, Faces Setback , Complaints of Financial Mismanagement, amar kale not spending money, finance in campaign,
वर्धा : ‘हवेत राहू नका ‘, अमर काळे यांना सहकाऱ्यांचा इशारा
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Political Speculation Swirls as Former Minister Ambrishrao Atram Remains Absent from Campaigning in Gadchiroli Chimur
भाजपच्या प्रचारात अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अनुपस्थितीची चर्चा; मन वळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…

मुंडेसाहेबांचे एक वैशिष्टय़ म्हणजे कोणतीही घटना कुठेही घडली असो, त्या जागेवर जाण्याची त्यांची मानसिकता होती. मग तो रेल्वे बॉम्बस्फोट असो, दुष्काळ असो अथवा गारपीटची घटना असो, मुंडेसाहेब त्या भागात थेट पोहोचायचे.

मुंडेसाहेब कार्यकर्त्यांच्या कामाबद्दल अतिशय तत्पर होते. विद्यार्थी परिषदेचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यावेळचे लोकायुक्त व्यंकटराव देशपांडे यांना बोलवायचे ठरले. व्यंकटराव देशपांडे हे मराठवाडय़ाचे होते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत कसे पोहोचायचे व त्यांना निमंत्रण कसे द्यायचे यावर आम्हा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्याच वेळी गोपीनाथ मुंडे यांचे नाव समोर आले. देशपांडे हे मराठवाडय़ातील बीडमधील असल्यामुळे मुंडेसाहेबच त्यांना सांगू शकतात, हे ध्यानात आले. त्यानंतर या कामासाठी आम्ही त्यांना भेटायला प्रदेश कार्यालयात गेलो. आम्ही येणार याची कल्पना आम्ही मुंडेसाहेबांना दिल्यामुळे ते आमची वाटच पाहात होते. त्या काळात मोबाइल सुविधा नव्हती. त्यांनी देशपांडे यांना प्रदेश कार्यालयातील लॅण्डलाइनवरून फोन लावला. तुम्हाला भेटायचे आहे.. थोडे काम आहे.. कधी वेळ मिळू शकतो.. अशी विचारणा त्यांनी फोनवरून देशपांडे यांना केली. देशपांडे यांनी त्यांना भेटण्याचे तात्काळ निमंत्रण दिले. मग मुंडेसाहेब आणि मी देशपांडे यांना भेटण्याकरिता चर्चगेटच्या दिशेने निघालो. प्रदेश कार्यालयाच्या खाली उभ्या असलेल्या अ‍ॅॅम्बॅसिडरची चावी त्यांनी घेतली, दरवाजा उघडला आणि स्वत:च ड्रायव्हिंग सीटवर बसले, मला त्यांनी बाजूला बसण्याची सूचना केली आणि आमचा प्रवास अ‍ॅॅम्बॅसिडर गाडीमध्ये चर्चगेटच्या दिशेने सुरू झाला. मुंडेसाहेब म्हणजे गप्पांचा मोठा खजिनाच. ड्राइव्ह करता करता आमच्या गप्पा सुरू झाल्या. आमच्या गप्पांच्या सोबतीला गाडीमधील टेपरेकॉर्डरही सुरू होता. टेपरेकॉर्डरवर छानशी गझल सुरू होती. गप्पा सुरू असताना आम्ही गझल ऐकत होतो. माझे आणि संगीत-गझल यामधले तसे बेताचेच ज्ञान. त्यामुळे मी त्यांना संगीतातले काही प्रश्न विचारले. मुंडेसाहेबांचे संगीत विषयाचे ज्ञान फारच चांगले होते. त्यांनी मला भजन, गझल याविषयी माहिती दिली. कोणती गझल कोणाची आहे, ती कोणी गायली, कोणाचे भजन प्रसिद्ध आहे, त्या भजनाचे बोल काय आहेत, हेसुद्धा त्यांनी मला निटपणे सांगितले. संगीतामधील त्यांचे ज्ञान पाहून मीसुद्धा त्यावेळी थक्क झालो. अ‍ॅॅम्बॅसिडरमधील हा संगीत आणि गप्पांचा प्रवास लोकायुक्तांचे निवासस्थान येईपर्यंत सुरूच राहिला. कधी लोकायुक्तांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचलो हे कळलेच नाही.
१९९२ ला मुंबईत जातीय दंगल उसळली होती. संपूर्ण मुंबई पेटली होती, मुंबईमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण होते. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून मीसुद्धा मदतकार्यात आघाडीवर होतो. त्यावेळी मुंडेसाहेब महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होते. जोगेश्वरीमधील रमाबाई चाळ पेटली होती. या परिसरातील हिंदू संकटात सापडला होता. त्यावेळी डय़ुटीवर असलेला एक पोलीस आयुक्त हिंदू वस्तीमधील लोकांना जाणीवपूर्वक त्रास देत होता. याची वर्दी त्या वस्त्यांमधील लोकांनी मला दिली. विरोधी पक्षनेत्यांनी या भागाला भेट द्यावी अशी तेथील लोकांची भावना होती. मुंडेसाहेबांनी तेथे येण्याचा आग्रह त्या लोकांनी माझ्याकडे धरला. परंतु त्या काळात दंगल इतकी भडकली होती की, जोगेश्वरीला येणे फार रिस्की होते. मी मुंडेसाहेबांना फोन लावला. तुम्ही जोगेश्वरी भागाला भेट द्यावी अशी येथील जनतेची अपेक्षा आहे. आपल्याला शक्य नसेल तर कोणीतरी यावे व येथील जनतेला दिलासा द्यावा, त्यांची कैफियत समजून घ्यावी, अशी येथील जनतेची अपेक्षा आहे. हे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी लगेच जोगेश्वरीला मला येण्याचे मान्य केले. थोडय़ा वेळात ते जोगेश्वरी येथे पोहोचले. मी त्यावेळी त्यांच्यासोबत होतो. तेथील जनतेने आपले गाऱ्हाणे मुंडेसाहेबांसमोर मांडले. मुंडेसाहेबांनी त्यांचे म्हणणे नीट ऐकून घेतले आणि थेट पोलीस स्टेशन गाठले. पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीत जाऊन ते बसले आणि पोलिसांकडून सर्व घटनेची माहिती घेतली. मुंडेसाहेबांचा रुबाब इतका जबरदस्त होता की, पोलीस स्टेशनमधील पूर्ण स्टाफच घाबरून गेला. सर्वच स्टाफने मुंडेसाहेबांना रिपोर्टिग करत घटनेची माहिती दिली.
रमाबाई आंबेडकर नगरमधील दंगलही अशीच पेटली होती. त्यावेळी ते राज्याचे गृहमंत्री होते. या भागात गृहमंत्र्यांनी जाऊ नये, सावधानता बाळगली पाहिजे, तिकडची दंगल आटोक्यात येण्यास वेळ लागत आहे, तेथील जमाव बेभान झाला आहे, त्या भागात तणाव आहे, त्यामुळे गृहमंत्र्यांनी त्या परिसरात जाऊ नये, असे त्यांना पोलिसांकडून सांगण्यात येत होते. परंतु पोलिसांच्या या सूचनेची कुठलीही पर्वा न करता मुंडेसाहेब थेट रमाबाई आंबेडकरच्या स्पॉटवर पोहोचले. तेथील लोकांशी बोलले, भडकलेल्या जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले आणि काही तासांनंतरच रमाबाईची दंगल निवळली. या घटनेचा मी साक्षीदार आहे. ज्या पद्धतीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे होते. मुंडेसाहेबांचे एक वैशिष्टय़ म्हणजे कोणतीही घटना कुठेही घडली असो, त्या जागेवर जाण्याची त्यांची मानसिकता होती. मग तो रेल्वे बॉम्बस्फोट असो, दुष्काळ असो अथवा गारपीटची घटना असो, मुंडेसाहेब त्या भागात थेट पोहोचायचे, तेथील लोकांना ते धीर द्यायचे, त्यांच्या तेथे त्या भागात पोहोचण्यामुळे तेथील जनतेला एक आधार मिळायचा, तेथे जाऊन मुंडेसाहेब तेथील लोकांना मार्गदर्शन करायचे. गरज पडल्यास मुंडेसाहेब तेथील आपल्या कार्यकर्त्यांनाही समजवायचे. मुंडेसाहेब त्या भागात आल्यामुळे लोकांना त्यांच्याविषयी आत्मीयता वाटत असे, आपला माणूस येऊन गेल्याचे समाधान तेथील लोकांच्या चेहऱ्यावर दिसायचे.
आपल्या राजकीय आयुष्यात सतत संघर्षमय प्रवास करणारे मुंडे आता कुठे राजकारणातील यशाच्या शिखराकडे पोहचत होते. महाराष्ट्रातील जनतेच्या समस्यांची त्यांना जाण होती, सबंध महाराष्ट्र, अगदी राज्याचा प्रत्येक तालुका, गाव आणि तेथील लोकांशी त्यांचा थेट संबंध होता. त्यांच्यासमवेत अनेक दौरे आणि आंदोलने केली, दौऱ्यात असताना ते त्या ठिकाणच्या एखाद्या कार्यकर्त्यांच्या घरी पोहचायचे आणि चहा प्यायला बसायचे, त्यामुळे तो कार्यकर्ताही सुखावून जायचा. राज्यामधील नेते असूनही त्यांनी याबाबत कधी कुठला संकोच बाळगला नाही. समाजातील प्रत्येक घटकाशी त्यांची नाळ जोडली गेली होती. समाजकारण हे मुंडेसाहेबांच्या रक्तात होते, एकदा दिशा ठरली की मग परिणामांची पर्वा न करता झोकून देऊन काम करण्याची, समोर कितीही विरोध झाला तरी न घाबरण्याची, डगमगण्याची आणि राजकीय विरोधकांना तोंड देण्याची जबरदस्त जिगर त्यांच्यामध्ये होती. मुंडे यांचा पक्षापलीकडील राजकारणी आणि समाज जीवनाशी असलेला संबंध हा फार ताकदीचा होता. समाज जीवनाशी त्यांनी जोडलेली नाळ ही त्यांची राजकारणातील खरी ताकद होती आणि अखेपर्यंत ती कायम राहिली.

सत्ताकारणात मोठी पदे मिळाली तरी पाय जमिनीवर ठेवायचे या त्यांच्या बाण्यामुळे महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत त्यांचा मोठा चाहता वर्ग होता.

पक्षात कधी कधी काही मुद्दय़ांवर वाद निर्माण व्हायचे, पण त्या वेळी मी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायचो. माझे मत वेगळे असले तरी ते मी त्यांच्यासमोर मांडायचो, त्यांना माझे मत समजावून सांगायचो, त्यावेळी ते मला नेहमी सांगायचे, तू एखाद्या मुद्दय़ाला विरोध केला तरी तो बोलून दाखवतोस, परस्पर विरोध करत नाहीस. ही तुझी भूमिका नक्कीच चांगली आहे, आपले मतही तू स्पष्टपणे माडतो, तुझ्या भावी राजकीय आयुष्यात हे नक्कीच उपयोगी पडेल, असे ते मला प्रेमाने सांगायचे..
सत्ता असो वा नसो तरीही मुंडेसाहेबांच्या आजूबाजूला कायम शेकडो कार्यकर्ते आणि जनतेची गर्दी असायची. सत्ताकारणात मोठी पदे मिळाली तरी पाय जमिनीवर ठेवायचे या त्यांच्या बाण्यामुळे महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत त्यांचा मोठा चाहता वर्ग होता, महाराष्ट्रातील मराठा केंद्रित राजकारणाला ओबीसी-बहुजनवादी चेहरा घेऊन त्यांनी भाजपला महाराष्ट्रात मुख्य प्रवाहात आणले. महाराष्ट्रातील बहुजन चेहरा आणि लोकनेता म्हणून त्यांची महाराष्ट्रासाठी ओळख होती. समाजाच्या तळागाळातील जनतेला महायुतीमध्ये आणताना त्यांनी सोशल इंजिनीअिरग कौशल्य त्यांच्यामुळे शक्य झाले. महायुतीमधील हा त्यांनी केलेला प्रयोग मोठय़ा प्रमाणात यशस्वी झाला.
आपल्या राजकीय प्रवासात नेहमीच संघटना वाढविण्याचे, पक्षाचा विस्तार करण्याचे विचार मुंडेसाहेबांच्या मनात नेहमीच असायचे. पक्ष जास्तीत जास्त बळकट कसा करावा, भाजपच्या परिवारात कोणकोणत्या व्यक्तींना सहभागी करून घ्यायचे, कोणत्या पक्षातील व्यक्तींना हेरायचे व त्यांना आपल्याकडे ओढून घ्यायचे यामध्ये त्यांचा हातखंडा होता. राजकीय पक्षांच्या भिंती तोडून अन्य राजकीय पक्षांमध्ये गरजेचे राजकारण कसे करायचे यामध्ये त्यांचे विशेष राजकीय कौशल्य होते. सोलापूर पट्टय़ामध्ये प्राबल्य असलेले नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या घरातील व्यक्तीला भाजपात आणण्याचे कसब फक्त मुंडेसाहेबांनाच जमले. उदयसिंहराजे भोसले यांना भाजपात आणण्याची किमया मुंडे यांनी अतिशय सहजपणे पार पाडली. विधानसभेमध्ये आपली राजकीय ताकद वाढली पाहिजे, पक्ष अधिक मोठा झाला पाहिजे हा विचार त्यांच्या डोक्यात नेहमीच घुमत असायचा. अन्य पक्षातील नेते अथवा कार्यकर्ते हेरण्यामध्ये त्यांचे कौशल्य होते. त्या व्यक्तींची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे असायची, अन्य पक्षांतील आमदारसुद्धा त्यांच्या संपर्कात असायचे, त्या आमदारांच्या मतदारसंघातील राजकीय गणिते तेथील बेरजेची समीकरणेही त्यांना पक्की ठाऊक असायची. अन्य पक्षांतील आमदारांच्या मतदारसंघात पक्षाची ताकद वाढविण्यातच त्यांचा कल होता. कोणत्या मतदारसंघात जनहिताचे प्रकल्प राबविले पाहिजेत, त्याचे गणित काय, त्याचा फायदा तेथील जनतेला व आमदारांना कसा होऊ शकतो, हे त्या आमदारांना पटवून द्यायचे आपल्या पक्षातील आमदारांनाही त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन असे. त्यांच्यामध्ये जनाधार वाढविण्याची क्षमता होती. त्यामुळेच प्रत्येक तालुक्यातील, जिल्ह्यातील कार्यकर्ता मुंडेसाहेबांच्या प्रेमात पडायचा. एकदा त्यांच्याबरोबर सोबत सुरू झाल्यावर आपले पुढील राजकारण ते नक्कीच सुरक्षित असल्याची भावना आणि मानसिकता ही कार्यकर्त्यांमध्ये असायची. त्यामुळे त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात अनेक कार्यकर्ते जोडले होते.
अन्य राजकीय पक्षांतही मुंडेसाहेबांची राजकरणाच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक स्वरूपाच्या मैत्रीचे, स्नेहाचे व घरोब्याचे संबंध होते. विजयसिंह मोहिते-पाटील यांची आई मुंडेसाहेबांना आपला मुलगाच मानायची इतका त्यांचा त्या घराण्याशी स्नेह होता. विलासराव देशमुख, छगन भुजबळ यांच्या परिवाराशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या घरातील सुख-दु:खामध्ये ते नेहमीच सहभागी व्हायचे. राजकारणात जरी ते कठोर असले तरी मनाने मात्र ते फार हळवे होते. सामान्यांच्या वेदनांशी ते जोडले गेले होते. प्रत्येक वेळी संघर्षांचा त्यांचा स्वभाव होता. पण या संघर्षांतून त्यांनी आपली राजकीय वाटचाल पुढे चालत ठेवत यशाचे एक शिखर गाठले. जनसामान्यांचे, शोषितांचे, कष्टकऱ्यांचे ते खरेखुरे आधारस्तंभ होते. मराठवाडासारख्या मागास आणि पाण्याचे दुíभक्ष असलेल्या भागातही ऊसतोडणी कामगाराचे नेतृत्व करीत साखर कारखाने काढण्याचे धैर्य त्यांनी दाखवले, त्यामुळे या दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतात उसाचे मळे फुलले. गरीब शेतकऱ्यांना सुगीचे दिवस दिसावेत ही त्यांची खरीखुरी तळमळ होती. त्यासाठी ते नेहमी झटले, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून अनेक आंदोलने केली, पण त्यांनी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला.