१६ व्या लोकसभेकरिता नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या आणि अभूतपूर्व निकालाच्या पाश्र्वभूमीवर ३० मेच्या ‘लोकप्रभा’तील ‘नो उल्लू बनाविंग’ हे विनायक परब यांचे संपादकीय यथार्थ विचार व्यक्त करणारे वाटले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या यशाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन सदरहू लेखात करण्यात आले आहे. या निवडणुकीच्या आधी अनेक पत्रकार आणि वृत्तपत्र लेखकांची मोदींना नाही नाही ती दूषणे देण्यात आणि त्यांच्यावर टीका करण्यात जणू स्पर्धाच लागली होती. परंतु मोदी यांच्या आश्वासक नेतृत्वावर विश्वास ठेवून देशातील तमाम मतदारांनी आणि विशेषत: तरुणाईने या सर्व टीकाकारांना जोरदार चपराक दिली आहे. लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आघाडीचे राजकारण करताना तारेवरची कसरत सत्ताधारी पक्षाला करावी लागते, या अनुभवातून देशातील मतदारांनी प्रगल्भपणा दाखवून कोणत्याही त्रिशंकू अवस्थेला थारा न देता स्थिर सरकार निवडून दिले आहे. या निवडणुकीचे वैशिष्टय़ असे की स्थिर सरकारच्या मार्गात अडथळा आणू शकणाऱ्या काही पक्षांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. मतदारांची अपेक्षा आहे ती विविध क्षेत्रांतील विकासाची.
– सुरेश पटवर्धन, कल्याण.

सुट्टी विशेषांकाने बालपण आठवले…
‘लोकप्रभा’चा सुट्टी विशेषांक वाचला, नॉस्टॅल्जिक झालो! लहानपणी टीव्ही, व्हिडीओ गेम, मोबाइल गेम वगरे असण्याची शक्यताच नव्हतीच, वर्तमानपत्रांत आठवडय़ातून एखाद्या दिवशी काही सामग्री असायची पण मुख्य स्रोत होता ‘चंदामामा’ नंतर ‘चांदोबा’, ‘कुमार’, ‘किशोर’, ‘चंपक’ इ. मासिके. चांदोबातील कथा, कथाकाळ, त्यातील पात्रांची नावे आणि मुख्य म्हणजे त्यातील चित्रे, एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जायची. चित्रकलेची आवड असल्यामुळे मी चित्रे बारकाईने बघायचो. त्यांपकी Chitra, Sankar अशी सही असलेली चित्रे आवडायची व त्यांच्या पद्धतीतला फरकपण कळायला लागला होता. कुमारमधील भागवतांच्या ‘फास्टर फेणे’ने तर वेड लावले होते! त्याच्याप्रमाणे साहसी बनावे, असे वाटत राहायचे. ‘चंपक’ आणि इन्द्रजाल कॉमिक्समधील वेताळ, जादुगार मॅन्ड्रेक्स यांनी खूप करमणूक केली. ‘किशोर’ महाराष्ट्र सरकार प्रकाशित करायचे आणि त्यातील रंगीत चित्रांचा दर्जा उच्च प्रतीचा होता. ‘लोकप्रभा’तील चित्रे पाहून त्याची प्रकर्षांने आठवण झाली. ‘लोकप्रभा’चा अनेक वर्षांपासून मी नियमित वाचक आहे. प्रत्येक अंक वैशिष्टय़ांनी भरलेला असतो, अंकाच्या स्वरूपातील बदलही काळानुरूप असतात. माहिती, मार्गदर्शन, मनोरंजन या आघाडय़ांवर ‘लोकप्रभा’ मराठीतील पहिल्या क्रमांकाचे साप्ताहिक आहे.
– संजय ज. ढोमणे, वर्धा.

लहरी मान्सून
‘पाऊस सरासरी गाठणार..’ ही १६ मेच्या अंकातील अभ्यासपूर्ण कव्हरस्टोरी वाचली. देशातील पावसाचा र्सवकष आढावा घेणारा हा लेख उत्तम होता, त्याबद्दल वरुण शास्त्रींचे अभिनंदन. कोणताही पूर्वग्रह न ठेवता, किचकटपण टाळून दिलेली शास्त्रीय माहिती हा यातील महत्त्वाचा भाग. मान्सूनचा लहरीपणा, हवामान खात्याचे अनेक प्रयोग आणि महत्त्वाचे म्हणजे या सर्वाची शास्त्रीय मीमांसा ही मांडणी आवडली. लेख वाचल्यावर एक लक्षात आले की, मान्सून हा आपल्या देशासाठी महत्त्वाचा असला तरी त्यावर परिणाम करणारे एल निनोसारखे घटक आणि जगातील अनेक घटक कार्यरत असतात. त्यावर आज शास्त्र इतके पुढे जाऊनदेखील फारशी प्रगती झाली नाही. पृथ्वीवरील नैसर्गिक घटना आणि मान्सूनवर होणारे परिणाम यांचा संबंध अजूनही उलगडला नाही हे लेखातील मत विचार करण्यासारखे आहे. त्यामुळेच आज आपण कितीही प्रगत तंत्रज्ञान वापरत असलो तरीदेखील काही कोडी अजूनही बाकीच आहेत.
– मानसी भोसले, जळगाव.

क्रीडा क्षेत्र.. शोकांतिका
९ मे च्या लोकप्रभातील ‘भारतीय क्रीडाक्षेत्राची शोकांतिका’ लेख वाचण्यात आला. सुंदर व सत्य विवेचन केले आहे. वाचून खूप वाईट वाटले. पण दुसरीकडे ‘हसावे’ की ‘रडावे’ समजले नाही. कारण आम्ही मतिमंद. तरी दोन मिनिटांचा दुखवटा म्हणून स्तब्ध उभा राहिलो. तुम्ही मनातल्या मनात म्हणाल, हा काय वाचक आहे? लेखकांने इतक्या पोटतिडिकीने हा लेख लिहिला असताना हा ‘हसावे’ की ‘रडावे’ असा प्रश्न पडला असे म्हणतो.
भारतात कोणतेही क्षेत्र घ्या, शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार, वीज नगरपालिका, पंचायत, सरकारी ऑफिसेस, संसद, सरतेशेवटी माय बाप सरकारचा कोणताही विभाग घ्या, त्याच्यावर शोकांतिकेव्यतिरिक्त दुसरे कोणतेही लिखाण करण्याची कुणी हिंमत दाखवू शकेल काय? आतापर्यंत संरक्षण खात्याबद्दल थोडा विश्वास होता. पण ‘लोकप्रभा’ संपादकीय वाचून भ्रमनिरास होत आहे. अर्थात एक विभाग आहे, ज्याच्यावर शोकांतिका लिहिता येणार नाही. तो म्हणजे राजकारण. जे लोक खासदार, आमदार म्हणून निवडून येतात, ते स्वच्छ असतात. कारण १५ ते २० टक्के लोकांनी निवडून दिलेले असतात.
या निवडणुकीत नवमतदारांचा खूप बोलबोला झाला. पण लाखो लोकांची नावे मतदार यादीतून गायब होती. याची जबाबदारी कोणाचीच नाही. गुन्हा झाल्यास फाशी होते, पण अंमलबजावणी होत नाही. कारण दयेचा अर्ज असतोच. खासदार, आमदारकीचे तिकीट नवमतदारांना नाही, ते फक्त ६० वर्षांवरील व्यक्तीकरिता आरक्षित आहे. हे नवमतदार खुच्र्या व सतरंजा उचलण्याकरिता असतात, उपाय काहीच नाही. चलता है..
– डॉ. जयंत जुननकर, नागपूर.

मस्त स्मरणरंजन
‘ये जो है जिंदगी’ ही मालिका जेव्हा सुरू झाली तेव्हा आजच्याप्रमाणे मालिकांचे पीक आले नव्हते आणि ज्या काही मोजक्याच मालिका असायच्या त्या दर्जेदार असायच्या. तेव्हाचा टीव्ही पाहण्याचादेखील एक प्रकारे कार्यक्रमच असायचा. घरोघरी टीव्ही पोहोचला नव्हता, मग ज्याच्या घरी टीव्ही त्याच्या घरी झुंबड असायची. एक वेगळेच वातावरण तयार व्हायचे. कोणतीही मालिका पाहताना त्याला एक सामूहिक चर्चेचे स्वरूप असायचे. मालिकांमधील चित्रणदेखील त्या काळाशी निगडित असेच होते. ‘यही तो है जिंदगी’ या लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या.
– ॠतुजा देसाई, सांगली.

मतदारा, बदल तुझ्यात होणे गरजेचे आहे
मतदारराजा पुन्हा एकदा बदलाचा प्रयोग करण्याचे योजिले असले तरी नुसते सत्ताबदल करून भागणार नाही. एक राजकारणी जाऊन दुसरा येणार. या वेळी फक्त मोदींनी तुला गिऱ्हाइक केले आहे. त्यांच्या दृष्टीने निवडणूक एक वस्तू आहे, ज्याचे योग्य मार्केटिंग केले की, गिऱ्हाईक वश होते. जसे दोन-तीन महिन्यांपासून रेडिओवर ऐकवण्यात येणारी जाहिरात पाहा –
’ मला (भ्रष्टाचार) हा देश सोडून जाणे भाग पडत आहे कारण तो येतो आहे. कोण तो? अरे मोदी येतो आहे.
’ अब की बार मोदी विकास ले के आयेगा.
अशा अनेक जाहिरातींमधून असे दर्शवण्यात आले की, काँग्रेस सरकार भ्रष्टाचाराने बरबटले आहे, विकासाचा नावाने बोंब आहे. ह्यचे प्रत्युत्तर मनमोहन सरकार योग्य रीतीने परिणामकारक देऊ शकले नाही. उलट मोदींची हेटाळणी चहा विक्रेता म्हणून करून, मागच्या दंगलीचे भांडवल करून, गुजरातचा खोटा विकास कसा दाखवत आहेत, स्त्रीवर पाळत कशी ठेवत आहेत, असे बरेच वैयक्तिक आरोप करून काँग्रेसने आपल्या दोषांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. पण मतदारराजा तू एक गोष्ट लक्षात घेत नाही. ती म्हणजे, बदल तुझ्यात झाला पाहिजे. भ्रष्टाचार तुझ्या घरापासून बंद झाला पाहिजे. शिस्त अंगात बाणवली गेली पाहिजे. देशाविषयी ममत्व, प्रेम निर्माण झाले पाहिजे. काळ्या पशावर नियंत्रण आणले पाहिजे. कायदे सर्वानी पाळले पाहिजे. कायद्याचा आदर राखला गेला पाहिजे. नुसती भीती असून उपयोग नाही. अंधश्रद्धा सोडून शास्त्राने प्रगती साधली पाहिजे. तरच आपला देश सुराज्य होऊ शकतो. तुझ्या अपेक्षांचे ओझे एकटय़ा मोदींवर टाकून भागणार नाही. जसे बराक ओबामांच्या अमेरिकेचे झाले तसे अपेक्षाभंगाचे दु:ख उराशी
बाळगून जगावे लागेल. – सतीश कुलकर्णी, माहीम, मुंबई.

काँग्रेस अ‍ॅनिमल इिन्स्टक्टचा बळी
‘पहिलं आव्हान पराभूत मानसिकतेचं’ ही कव्हरस्टोरी (३० मे) वाचली. राजीव गांधींच्याच धोरणांमुळे आशा-आकांक्षांचे धुमारे फुटलेल्या आणि विस्तारलेल्या मध्यम वर्गानेच आजच्या काँग्रेसचा पराभव केला आहे. १९८० च्या दशकात राजीव गांधींनी दाखवलेली एकविसाव्या शतकाची व्हीजन ही त्यांच्याच पक्षाला आणि आप्तस्वकीयांना समजली किंवा झेपली नाही, असे म्हणावे लागते. याला काव्यात्म न्याय म्हणायचे की दिव्याखाली अंधार?
मनमोहन सिंग एकदा अर्थव्यवस्थेच्या अ‍ॅनिमल इिन्स्टक्टबद्दल बोलले होते. ८० च्या दशकातील तंत्रज्ञानाधारित क्रांती, ९० च्या दशकात आलेला जागतिकीकरणाचा रेटा आणि स्पर्धा या गोष्टी तोपर्यंत संरक्षित आणि समाधानी आयुष्य जगणाऱ्या सामान्य माणसाचे अ‍ॅनिमल इिन्स्टक्ट जागवणाऱ्याच होत्या. विशेष कष्ट न करता मालकाने दिलेले चार घास आरामात खाणाऱ्या िपजऱ्यातील (पाळीव) श्वापदाला हे लाड बंद करून जंगलातील स्पध्रेत ठेवले गेले. संगणक क्रांतीमधून निर्माण झालेल्या संधी आणि त्यातून सेवा-क्षेत्राचा विकास यामुळे त्या श्वापदाची भूक २००५-२००६ पर्यंत भागत होती. त्यानंतर जागतिक मंदीमध्ये संधी घटत गेल्या, पण आता चार घास खाऊन समाधानी राहण्याची वृत्तीही लोपली होती. एकीकडे ही वाढलेली भूक भागत नव्हती तर दुसरीकडे त्याकरिता काही ठोस कृती दिसण्याऐवजी जो तो आपल्या पोळीवर (मोठमोठे भ्रष्टाचार करून) कसे तूप ओढून घेत आहे ते दिसत होते. पूर्वीही असाच भ्रष्टाचार असेलही, पण सुस्तावलेल्या श्वापदाला त्याचे नेहमीचे चार घास वेळेत मिळाले तर इतरांनी किती किलो मटण-चिकन फुकट ओरबाडून फस्त केले यात काही रस नव्हता. पण आता जंगलातील स्पध्रेत उतरलेल्या श्वापदाची भूकही वाढलेली आहे आणि डोळे, नाक, कान तीक्ष्ण झालेले आहेत. वाट पाहण्याचा संयम आता नाही. त्यामुळे त्या भुकेल्या श्वापदाने संधी मिळताच नेहमीप्रमाणे चार घास घालायला आलेल्या मालकालाच रागावून खाऊन टाकले तर त्यात काही आश्चर्य वाटायचे कारण नाही. अ‍ॅनिमल इिन्स्टक्ट जागवणे सोपे असते, पण ते वाघावर स्वार होण्यासारखे किंवा बाटलीतला राक्षस बाहेर काढण्यासारखे असते, हे विसरून चालत नाही.
हे भारतीय श्वापद अजूनही तुलनेत बरेच कमी िहस्र आहे. भारतीय नागरिक अजूनही बस मिळण्याकरिता मुकाटय़ाने बराच काळ वाट पाहत उभे राहतीलही, पण आता किमान रांगेची काटेकोर शिस्त आणि बसमध्ये चढण्याची न्याय्य संधी मिळालीच पाहिजे, असा आग्रह मात्र ते यापुढे नक्कीच धरतील.
– प्रसाद दीक्षित, ठाणे (ई-मेलवरून).

राजकीय उन्मत्तांना भंगारात फेकले
राज्य, केंद्राच्या राजकारणाचा विविध लेखांतून घेतलेला वेध ‘लोकप्रभा’च्या ३०मेच्या अंकात वाचला. राजकारणाच्या महासागरात वर्षांनुवष्रे स्वच्छंदपणे डुंबत राहणाऱ्या कैक दिग्गजांना मोदी लाटेने किनारी फेकून दिले. लोकसभेच्या निकालाचा हा लक्षवेधी केंद्रिबदू होय. सदरची यादी तर भली मोठी आहे. कोकणचे सर्वेसर्वा असल्याच्या घमेंडी आविर्भावात मिरवणाऱ्या, अन्य पक्षांना पायपुसणे समजणाऱ्या राणे पिता-पुत्रांच्या मुजोरीस कोकणी जनता प्रचंड वैतागल्याने त्यांनी त्यांचा सुपडाच साफ केला. तर नाशिककरांनी विकासाच्या वल्गना करणाऱ्या भुजबळांचे ‘बळ’च हिरावून घेऊन त्यांना अस्वस्थ केले. गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांनी पराभवानंतर जाहीरच करून टाकले की ‘माझा पराभव माझेच लोक करणार आणि या खेपेस मी हरणार हे मला ठाऊक होते.’ असे जरी असले तरी देशाच्या माजी गृहमंत्र्याचे हे वक्तव्य निर्लज्जपणाचा कहर करणारे आहे. वादग्रस्त वक्तव्य करून त्यावर चुकीचे सल्ले देत राहणाऱ्या िशदेंना सोलापूरकरांनी त्यांच्याच जिल्हय़ात कैद केले. जनतेचा आवाज असणाऱ्या प्रसारमाध्यमांवर गृह खात्याचा बडगा उगारण्याची धमकी देणारे असे नेते जनतेस कसे रुचतील? राज्यातील या तीन लढतींवर सर्वाचेच विशेष लक्ष होते. तिघांनाही सत्तेची प्रचंड गुर्मी असल्याने जनतेने त्यांना भंगारात फेकून देत आपला हिसका दाखवला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समदु:खींनी लक्षात घ्यायला हवे की जनतेस विनाशक नव्हे तर विकासक हवे आहेत.
वडे-सूपचं केविलवाणं राजकारण करून जनतेच्या नजरेत हीरो बनू पाहणाऱ्या राज ठाकरेंना झीरोवरच आणून त्यांनाच त्यांची औकात दाखवून जनता समाधान पावली. दिग्गजांच्या पाठीवर लोकशाहीने ओढलेले आसूडाचे फटके लक्षात राहण्याजोगे आहेत. मतदारराजा खऱ्या अर्थाने जागृत झाला आहे, हेच लोकशाहीकडून अपेक्षित होते.
कोणत्याही क्षेत्रातील आपल्या प्रतिस्पध्र्यास कधीच कमी लेखू नये. ‘बाकी सारे कनिष्ठ आणि मीच काय तो श्रेष्ठ’ हा जो फुसका बाणा आहे तो लोकशाहीत चालत नाही. गर्वाने उन्मत्त झालेल्यांचे पानिपतच होते यास कैक इतिहासकालीन घटना साक्षी आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. लोकसभेच्या तालमीत राज्यात महायुतीने बाजी मारत बाकीच्या पक्षांची भाजी करून टाकली आहे. आता विधानसभेत कोणाच्या पक्षाचा भाजीपाला होणार, या भीतीने अनेकांच्या पोटात आतापासूनच गोळे येत आहेत.
– जयेश राणे, भांडुप, मुंबई. (ई-मेलवरून)