निवडणुकांच्या धामधुमीत सगळीकडे निव्वळ गदारोळ माजला असताना ‘लोकप्रभा’ने दादासाहेब फाळके पुरस्काराचे औचित्य साधून जो काही गुलजार उतारा दिला आहे त्याला तोड नाही. गुलजार या नावात असणारा बगिचा आपण असा काही फुलविला आहे की सारा अंकच बहारदार झाला आहे असे म्हणावे लागेल. गुलजारांच्या व्यक्तिमत्त्वाचे सारे पैलू आपण या एकाच अंकात मांडल्यामुळे वेगवेगळ्या अंगांनी गुलजार समजून घेणे शक्य झाले. आपल्या अंकातील गुलजारांच्या कवितांवरील लेखांमुळे हिंदी चित्रपटांचे गीतकार, लेखक आणि दिग्दर्शक यापलीकडचे गुलजार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहेत. अमृता सुभाष यांनी लिहिलेल्या गुलजारांच्या आठवणी तर एकदम भन्नाट आहेत. कुसुमाग्रजांच्या कविता समजावून सांगताना नृत्य करून दाखविणे ही एकदम अफलातून कल्पना होती. गुलजारांचे साधेपण, शिकविण्याची तन्मयता याचा अनुभव अमृताने खूप सोप्या शब्दांत परिणामकारक पद्धतीने मांडला आहे.
अनिरुद्ध भातखंडे यांनी घेतलेला गुलजारांच्या चित्रपट गीतांचा आढावा वाचताना नकळत गुणगुणायला झाले. त्या त्या गाण्यानुसार प्रसंग आणि आठवणी जाग्या झाल्या. गुलजार दिग्दर्शित चित्रपटाबाबत वेगळ्या लेखाची गरज होती. गुलजारांच्या गीतांची यादी खरं तर आणखीन मोठी करता आली असती. असो, निवडणुका आणि कडक उन्हाळ्यात आपण दिलेली गुलजार भेट मनापासून भावली.
अनंत काळे, पुणे (ई-मेलवरून)

जनता मात्र वाऱ्यावर
‘विवेके करावे मतदान’ हा मथितार्थ आणि ‘अतुल्य भारत, अमूल्य भारत’ ही कव्हर स्टोरी निवडणुकीतील मतदानाचे कर्तव्याचे महत्त्व विदित करतानाच मत देताना ते विचारपूर्वक द्यावे हे सांगणारे आहे. लोकशाहीत निवडणुका जितक्या महत्त्वाच्या तितकेच महत्त्व मतदानाला आहे, ज्यातून सामान्य जनता आपला कौल दर्शवीत असते. भारतीय जनता अनेक वेळा भावनेच्या भरात मतदान करते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे, पण गेल्या काही निवडणुकांमध्ये समाजाचा एक वर्ग ‘कुणीही सत्तेत आले तरी तेच होणार,’ असे म्हणत मतदान न करता स्वस्थ बसत होती, त्यामुळे मतदानाचा टक्का खाली आला आणि वोट बँकेचे राजकारण पोसले गेले त्याच वेळी एका पक्षाला बहुमत मिळणे बंद झाल्याने युती -आघाडीची सत्ता आम झाली, ज्यामुळे सत्ता टिकविणे एवढा एक कलमी कार्यक्रम सत्ताधारी राबवितात आणि जनता वाऱ्यावर राहते.
‘नको असलेल्या भेटवस्तू’ हा ‘ब्लॉगर्स कट्टा ’मधील लेख खूपच आवडला. आपल्या संस्कृतीत काही काही परंपरा उगीचच चालू ठेवल्या जातात त्यातलीच ही रिटर्न गिफ्टची आणि हळदी-कुंक वाचे वाण देण्याची प्रथा आजही चालू आहे. वस्तुत: त्यापेक्षा एखाद्या गरजू बाई वा मुलीस मदत केली तर जास्त चांगले पण..अर्थात कालांतराने बदल होतात /होतील
माया हेमंत भाटकर, चारकोप गाव मुंबई (ई-मेलवरुन)

खूपच आवडला
‘लोकप्रभा’चे सर्वच अंक वाचनीय असतात. १८ एप्रिलच्या अंकातील हृषीकेश जोशी यांचा दुसरी बाजू या सदरातील कोलाहल हा लेख खूपच आवडला. आजकाल शांतत मिळणे फारच कठीण झाले आहे. फ्लॅट संस्कृतीमुळे घरांची रचना फारच जवळजवळ होत असते. आपल्या आवाजाचा इतर लोकांना त्रास होत असेल याचा विसर सर्वानाच पडलेला असताो. सांगायला जावे तर ताबडतोब भांडणच सुरू होते. मोबाईल विषयी तर बोलायलाच नको. स्थळ काळ वेळ यांचे भान न ठेवता जोरजोरात बोलणे सुरू असते. ट्रेनच्या प्रवासात सतत मोबाइल वाजत असतो. त्यामुळे इतरांच्या शांततेवर अतिक्रमण करतोय, कोणाची झोपमोड होते तर त्याबद्दल काही बोलायची सोयच नाही. खरेच देवाने काम बंद करण्याची सोय मानवाला द्यायला हवी होती. म्हणजे मनुष्य सुखी झाला असता. हृषीकेश जोशी यांनी हा विषय लिहला याबद्दल धन्यवाद.
अंजली पेशवे, अमरावती</strong>

चिंतनीय लेख
१४ फेब्रुवारी २०१४च्या अंकात ‘दुसरी बाजू’ हृषीकेश जोशी यांचा लेख ‘जगण्याचा पायाच झालाय भुसभुशीत’ नुसता पठणीय नसून विचारणीय, चिंतनीय व मननीय आहे. या लेखाचे चिंतन-मनन केल्यानंतर दोन मुद्दय़ांवर प्रतिक्रिया द्यावीशी वाटते.
प्रथम म्हणजे लेखाचा पूर्वार्ध. लेखकाने स्वत:च्या मुलाबद्दल सिनियर के.जी.तला अनुभव सांगितला आहे. मीदेखील २०-२२ वर्षे अध्यापिका-प्रधान अध्यापिका हे पद भूषविले आहे. माझा पालकांबद्दलचा अनुभव वेगळाच आहे. मी नर्सरी ते हायस्कूलपर्यंतचे अध्यापन केले आहे.
मध्य प्रदेशाच्या तालुक्याच्या एका प्रायव्हेट शाळेत मी प्र. अध्यापिका होते. आमच्याकडे त्यावेळेस (१९८०-१९८५ पर्यंत) शाळा १ जुलैला सुरू होत. शाळेत प्रवेश चाललेच होते. नर्सरी वर्गात एक मूल आलं. दुसऱ्या दिवशी पालक मुलाचे वडील चीडतच शाळेत आले व तणतणू लागले- अरे! ही काय शाळा आहे? माझ्या मुलाला तुम्ही काही शिकविले नाही. त्याला अक्षर वाचता किंवा लिहिता येत नाही. आम्ही महागडय़ा शाळेत कशाकरिता नाव नोंदवलंय? आमचे पैसे मात्र फुकट गेलेत! त्याला खूप समजविण्याचा प्रयत्न केला. बाबारे! तुझा मुलगा ३ वर्षांचा, नुकताच आपल्या आईच्या कुशीतून बाहेर डोकावतो आहे, त्याला शाळेत रुळायला थोडा वेळ तर घेऊ दे! ही शाळा आहे दुकान नाही की पैसे मोजले की मोबदल्यात हवी ती वस्तू घ्यायला! पण त्याचा एकच हेका. ‘पालथ्या घडय़ावर पाणी’ म्हणत आम्ही त्याला काय आणि कसं समजविणार, काय करावं?
लेखकाचा दुसरा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार व त्यामुळे भिंडसारख्या ठिकाणी शाळेत कॉपी करायला मिळणार नाही व मुलं नापास होतील या भीतीने पालकांनी केलेली दगडफेक. संजय दत्तसाठी मीडिया किंवा लोकमतांतर्फे दाखविली जाणारी दया हे चूकच आहे. मुंब्य्राची इमारत कोसळणे व ७७ जण ठार हाणे हे दु:खद. कसेही करून टेंडर पास करविणे व पैसे कमावणे हे उद्दिष्ट आता तर भ्रष्टाचार शिष्टाचार बनला आहे. याचा अनुभव जुलै २००७ मध्ये ६-७ तारखेला आमच्या गावाला पाउसाने झोडले. पुरामुळे घराघरांतून पाणी भरले, आमचे बरेच नुकसान झाले. पटवाऱ्याकडून आम्हाला चेक वाटप झाले तेव्हा पटवारी कसा म्हणतो,
‘‘आई! (चेक वटवल्यावर) मला काही रक्कम जरूर द्यावी. मी म्हटले- ‘‘का? तुम्हाला तर पगार मिळतो ना? मग कशाला हवे आमचे पैसे? किती कमिशन आहे तुमचं?’’ अर्थात प्राकृतिक आपदा आली की साधारण कर्मचाऱ्यांपासून थेट मंत्र्यांपर्यंत जणू काही सर्वाची लॉटरी उघडते की काय? तेव्हा उद्धटपणे म्हणतो कसा, ‘‘एवढे लाखो रुपये वाटले गेले, मला काय मिळालं? मला माझा वाटा द्या.’’ तो तर या अंदाजात बोलत होता की, ‘‘भ्रष्टाचार हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे, तो मी करणारच.’’
मी पटवाऱ्याला एकही रुपया दिला नाही. उलट त्याची कम्प्लेंटच केली. माझी तरुण मुलं म्हणाली की, ‘आई, हा पटवारी पुढे तुझं काहीच काम करणार नाही.’ अर्थात आपण भयक्रांत आहोत. हे सिद्ध होते.
भ्रष्टाचाराविरुद्ध अनेक आंदोलने झालीत, अगदी अलीकडेच अण्णा हजारे, रामदेव बाबा व अरविंद केजरीवालने तर मुख्यमंत्रीपदही सोडले. पण गहन चिंतन केल तर भ्रष्टाचाराला आपण सामान्य नागरिकपण जिम्मेदार आहोत, असं वाटत नाही का? काही उदा. १) आपण दुकानांतून वस्तू विकत घेतो, पण दुकानदाराकडून पक्कं बिल घेत नाही. अपरोक्षपणे सेल्स टॅक्स चुकवायला हातभारच लावतो नाही का? २) रेल्वेच्या आरक्षित डब्ब्यात विनाआरक्षण शिरतो, टीसीला ५०/१०० रु.ची लाच देतो व जागा करून घेतो. ३) पेन्शन लवकरात लवकर सुरू व्हावी म्हणून बाबूला ५-१० हजार रु. आपणच देतो की नाही?
गरज आहे ती स्वत:मध्ये सुधारणा करण्याची. आचार्य श्रीराम शर्माजींच्या शब्दांत- ‘हम सुधरेंगे जग सुधरेगा’ची नितांत आवश्यकता आहे. तेव्हाच जगण्याचा पाया भुसभुशीत नाही भक्कम बनू शकतो.
संध्या रामकृष्ण बायवार, होशंगाबाद (म. प्र.)