‘..आंधळी कोशिंबीर सुरू आहे!’ हा ‘मथितार्थ’ नेमक्या शब्दात आजच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे संपूर्ण डोळेझाक करून वेगळ्याच पातळीवरून चाललेल्या निवडणूक प्रचाराचा समाचार घेणारा आहे. १९७७ची निवडणूक सोडली तर आतापर्यंत एकही निवडणूक ही जनतेचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून लढली गेलेली नाही त्यामुळेच कृषिमंत्री महाराष्ट्रातले केंद्रात असूनही त्यांनी वेळोवेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला सारलेले आहेत आणि म्हणूनच गारपीटग्रस्त शेतकऱ्यांकडे झालेले/ केलेले दुर्लक्ष तसे नवीन नाही पण निवडणूक प्रचारातही त्याचा उल्लेख असू नये हे दुर्दैवी आहे.
या वेळी प्रचारात ज्या व्यक्तिगत पातळीवरून टीका चालू आहे ती पाहून जनता खरेच अचंबित आहे आणि दलबदलू उमेदवार तर नवीन पक्षाची तारीफ करताना पूर्वीच्या पक्षाला कमी लेखतात तेव्हा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाबद्दल मनात शंका निर्माण होते. खरोखरच या आंधळी-कोशिंबिरीत कुणाला विजयी करायचे, हा प्रश्न जनतेला पडला आहे. शेवटी उडदा माजी काळे गोरे, काय निवडावे निवडणाराने हेच खरे!
‘कोलाहल’ ही ‘दुसरी बाजू’ एकदम मनाला भावली. हल्ली कुणालाच शांत बसणे माहीत नाही आणि आवडत नाही. सकाळी उठल्याबरोबर मोबाइल हातात घेतला जातो, जरा एकटे बाहेर जायचे म्हटले की कानाला जानवे म्हणजे ईयर फोन लागतो, मित्र भेटले की मोठमोठय़ांनी गप्पा मारल्या जातात, भले मग लोकांना त्रास झाला तरी बेहत्तर. नाटक-सिनेमात तर लोकांचे वागणे हा संशोधनाचा विषय आहे. एकूणच जणू लोकांना आता शांततेची पर्यायाने एकटे राहायची भीती वाटते की काय असेच वाटते.
‘शब्दावाचून कळले सारे’ शब्दांच्या पलीकडले’सारखी भावना आता शोधावी लागेल की काय?
– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव.

शंकर धोंडगे नव्हे, केशव धोंडगे!
दि. १८ एप्रिल २०१४ लोकप्रभा साप्ताहिकाच्या अंकात लोकसभा निवडणूक २०१४ संदर्भात. कव्हर स्टोरी, सुहास सरदेशमुख यांच्या ‘विचारशून्यतेचे ढोल-ताशे नगारे’ या लेखातील लिखाणात मराठवाडय़ाच्या आठ जिल्ह्यांत १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची नावे पाहू. यात औरंगाबादहून स्व. बापूसाहेब काळदाते, बीडमधून गंगाधर आप्पा बुरांडे, लातूरमधून (स्व.) उद्धवराव पाटील व नांदेडमधून शंकर आप्पा धोंडगे असे विधान केले आहे. वास्तविक पाहता १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत वेळी नांदेड लोकसभा मतदारसंघातून त्या वेळचे कंधारचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार केशव शंकर धोंडगे हे लोकसभेसाठी उमेदवार होते व त्यांनी गोविंद म्हैसेकर यांचा दारुण पराभव केला होता. सुहास सरदेशमुख यांनी उल्लेख केलेले आताचे राष्ट्रवादी पक्षाचे लोहा तालुक्याचे आमदार शंकर अण्णा धोंडगे हे १९७७ साली राजकारणात होते. असे मला तरी कुठेही वाचनात आलेले आठवत नाही. वर्तमानकाळातील वाचकांना त्या वेळची (१९७७)ची वस्तुस्थिती समजावी याकरिता मी हा केलेला खटाटोप.
– श्रीकांत गोपाळराव देशमुख, पनवेल.

दातृत्वाचा अंक-
उन्हाळ्यातली पावसाची सर
‘देण्यातला आनंद’ हे शीर्षक असलेला लोकप्रभाचा ४ एप्रिल १४ चा अंक वाचला व ऐन उन्हाळय़ात एखादी पावसाची सर येते व मन प्रसन्न व आनंदी होते, तसे माझे झाले. आज मी अनेक वर्षे लोकप्रभाची वाचक आहे, शुक्रवारची मी आतुरतेने वाट पाहात असते. ४ एप्रिलचा अंक ‘दान’या विषयावर होता. विनायक परब यांचा ‘दान, नि:स्वार्थ आविष्कार’ हा लेख (मथितार्थ) वाचून तर खरोखरच अंगावर शहारे आले, आय.टी. कंपनीत असूनसुद्धा एक दिवस रुग्णांची सेवा करण्यात घालवायचा, त्यांची विचारपूस करायची, त्यांची मनापासून सेवा करायची व त्यांची प्रेरणा घेऊन अनेक तरुण सत्पात्री दान करण्यासाठी पुढे आले हे वाचून तर अतिशय आनंद झाला व अभिमान वाटला. अंध मुलांसाठी ५० हजार रुपये वेगळे काढून त्यांना पुस्तके (ब्रेल लिपीतील) तयार करून देणाऱ्या शैला भागवत या आजींना माझा शत:श प्रणाम! तसेच वासुदेव बर्वे (दिवंगत) यांनी पण स्वत:च्या पेन्शनमधून कवी प्रदीप यांच्या नावे पुरस्कार सुरू करून गरजूंना मदत करण्याचा धडा घालून दिला, असे दान करून त्यांनी महाभारतातील कर्णाचे नाव उज्ज्वल केले असे म्हणावयास हरकत नाही.
ग. दि. माडगूळकर रचित व सुधीर फडके (गायक व संगीत) यांचे अजरामर झालेले ‘गीत रामायण’ वरील सर्व लेख अत्यंत सुंदर व मन भारावून जाणारे होते, पूर्वी जी गीतरामायणाचे कार्यक्रम बरेच वेळा (आईवडील व भावंडांबरोबर) ऐकले व प्रत्यक्ष पाहिले व अजूनही एखादे गाणे लागले तर आनंदाने ऐकतो, तेव्हा तर पूर्ण महाराष्ट्र गीतरामायणाने वेडा झाला होता, त्यातील ३/४ गाणी तर काळजाचा ठाव घेतात, त्याची गोडी (६० वर्षांनंतरसुद्धा) अजूनही कमी झालेली नाही, त्यांच्या पुढील पिढीनेही (आनंद माडगूळकर, श्रीधर फडके) त्यांचा वारसा चालू ठेवला आहे, हे पाहून तर प्रभू श्रीरामालासुद्धा त्यांच्या अभिमान वाटावा, असे त्यांचे कार्य आहे व तसेच ते अविरत सुरू राहो.
– वैशाली के. देसाई, मुलुंड.

वैद्यांचा सल्ला उपयोगी पडला
‘लोकप्रभा’ १८ एप्रिलच्या अंकातला वैद्य प. य. खडीवाले वैद्य यांचा ‘स्वास्थ्याकरिता ऋतुचर्या : एप्रिल महिना’ हा नितांत सुंदर लेख वाचला. अर्थातच त्यांच्या नेहमीच्या लिखाणाप्रमाणे माहितीपूर्ण होता. आपण निसर्गाला शरण गेलो तर आपल्या अध्र्याहून व्याधी आपोआप बऱ्या होतील. खडीवाले वैद्यबुवांच्या सल्ल्याप्रमाणे केवळ आहार व विहार अमलात आणल्यामुळे औषधाशिवाय माझ्या सांधेदुखीत लक्षणीय फरक पडला. वैद्य प. य. खडीवाले वैद्य यांच्या आगामी सर्व उपक्रमांना शुभेच्छा.
– तेजस्विनी पानसरे, विलेपार्ले (पूर्व).

‘लोकप्रभा’च्या अंकातून दर महिन्याला वैद्य प. य. खडीवाले वैद्य त्या त्या महिन्याचं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व लक्षात आणून देतात. त्यांची ही माहिती खूपच उपयुक्त आहे.
– सागर पाटील, जुन्नर.

रोचक पर्यटन विशेष
७ मार्चच्या पर्यटन विशेषांकातील ठाणे ते कन्याकुमारी, हम तो चले हा प्रसाद निकते यांचा लेख इंटरेस्टिंग आणि प्रवासाबद्दल शिकवणारा आहे. मलादेखील गाडी काढून कुटुंबासोबत अनेक ठिकाणी भेटी देणे आवडते, त्यामुळे हा लेख आणखी जवळचा वाटला. लेखकाने केलेले प्रवासवर्णन सविस्तर तर आहेच, पण रोचकदेखील आहे.
– मोहन सोरटूर (ई-मेल)

२५ एप्रिलच्या अंकातील गौरी बोरकरांचा ‘भटकंती’ सदरातील हंगेरीवरील लेख खूप आवडला. आपला लेख वाचला आणि १९६८ दरम्यानच्या हंगेरीतील माझ्या जुन्या मित्रांची आठवण झाली. आपल्या भटकंतीवर आपण एखादे प्रवास मार्गदर्शनपर पुस्तक लिहावे, विशेषत: युरोपातील भटकंतीवर.
– रमेश पारेकर, (ई-मेलवरून)

‘मोकळी हवा’ लेख आवडला.
२५ एप्रिलच्या अंकातील डॉ. उज्ज्वला दळवी यांचा ‘मोकळी हवा’ हा लेख वाचला. फार आवडला. अशा अन्य विषयांवर देखील लिहावे.
– रूपेश भालशंकर, (ई-मेलवरून)

डॉ. उज्ज्वला दळवी यांचा ‘मोकळी हवा’ हा लेख वाचला, खूप आवडला. आपल्या लेखामुळे अनेक गैरसमज दूर झाले त्यासाठी धन्यवाद..!
– आनंद बताने, (ई-मेलवरून)

अपंगांसाठी वेगळे संमेलन?
२१ मार्च २०१४ चा अंक वाचला. सर्व अंक वाचनीय आहे. अपंगांचे वेगळे साहित्य संमेलन असते हे प्रथमच कळले तर अपंगांसाठी वेगळे साहित्य संमेलन असावे हे फार खटकले. अपंगांसाठीच्या खेळाच्या वेगळय़ा स्पर्धा, हे ठीक आहे. कारण अपंग खेळात सामान्य खेळाडूंशी स्पर्धा करू शकणार नाहीत, पण साहित्यात असे वेगळे साहित्य संमेलन असावे असे मला वाटत नाही, असे करून साहित्यात अकारण या भिंती घातल्या जात आहेत, असे वाटते. खरे तर विद्रोही साहित्य संमेलनही वेगळे नसावे, कारण विद्रोही साहित्याच्या नावाने कवितेसारख्या ऋजू साहित्य प्रकारातही शिव्यांचा भडिमार पाहून विद्रोही कविता म्हणजे शिव्यांसह काहीही अश्लिल घुसडण्याचा परवाना मिळाल्यासारखे कवितेत अश्लील शब्द घुसडलेले असतात. त्या कविता पूर्णपणे वाचवतही नाहीत.
– विजय परांजपे, एरंडवणा, पुणे.

विचारप्रवृत्त करणारी कव्हर स्टोरी
‘तरुणाईच किंगमेकर’ ही ११ एप्रिलच्या अंकातील कव्हर स्टोरी आवडली. राजकारण्यांचे भवितव्य ठरविणारे तरुण आहेत, पण उमेदवार मात्र साठी ओलांडताना दिसत आहेत. हीच तर आपल्या देशाच्या राजकारणाची शोकांतिका आहे. आपली स्टोरी राजकारण्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहे. उमेदवारांवर किंवा राज्यकर्त्यांवरही अशी स्टोरी वाचायला आम्हास नक्कीच आवडेल.
-महेश गलांडे, नवी दिल्ली.
(वेबसाइट प्रतिक्रिया)