04 June 2020

News Flash

‘फुल’राणीचा रुपेरी शिरपेच!

भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने नुकतेच बॅडमिंटनच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद मिळवल्यानंतर तिच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत.

| August 28, 2015 01:34 am

भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने नुकतेच बॅडमिंटनच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद मिळवल्यानंतर तिच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. तिची एकाग्रता, जिद्द, शिस्त यांमुळे ती या अपेक्षा निश्चितच पूर्ण करेल.

वैयक्तिक क्रीडा प्रकारात करिअर करणारा प्रत्येक खेळाडू जागतिक स्तरावर अव्वल यश पाहण्याचे स्वप्न पाहतो आणि त्यासाठी तो जगतही असतो. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविल्यानंतरही भारताची सर्वोत्तम बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिची पदकांची भूक संपलेली नाही. जागतिक स्पर्धेतील पदकाचे स्वप्न अनेक वर्षे तिला हुलकावणी देत होते. ऑल इंग्लंड स्पर्धेतील रौप्यपदकानंतर तिने नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्यानंतर सायना पुन्हा जागतिक स्तरावर खूप चमक दाखवू शकेल की नाही अशी साशंकता होती. कारण त्यानंतर तिला अनेक स्पर्धामध्ये अपेक्षेइतके यश लाभत नव्हते तसेच तिला तंदुरुस्तीच्या समस्यांनीही ग्रासले होते. तरीही तिने २०१२ ते २०१४ या कालावधीत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळविले. त्यामध्ये डेन्मार्क ओपन, इंडियन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आदी अनेक स्पर्धामधील विजेतेपदांचा समावेश होता. हे यश मिळविताना तिने कॅरोलिना मरीन, वाँग यिहान, वाँग शिक्सियन आदी आपल्या पारंपरिक प्रतिस्पध्र्यावर मात केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये तिने आपले गुरू पुलैला गोपीचंद यांच्याशी फारकत घेतली. काही वेळा मतभेद निर्माण झाल्यानंतर ती दरी वाढू नये म्हणून वेळीच दूर होणे उचित असते. म्हणूनच सायनाने हैद्राबादऐवजी बंगळुरू येथील प्रकाश पदुकोण यांच्या अकादमीत विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कटू वाटणारे निर्णय पुढे सुखावह असतात याचाच प्रत्यय सायनाला आला. अनेकांसाठी तिचा हा निर्णय अनपेक्षित होता मात्र काही वेळा भविष्याचा विचार करता असे निर्णय घेणे अनिवार्य असतात. घरापासून थोडेसे दूर राहताना खेळाडूंना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. तथापि काटय़ावाचून गुलाब नसतो तद्वत ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवायचे असेल तर असे कष्ट आवश्यक असतात हे तिने ओळखले आहे. गोपीचंद यांच्यापासून दुरावल्यानंतर तिने विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. चीन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळवीत तिने ऐतिहासिक पराक्रम केला. ही स्पर्धाजिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
ऑल इंग्लंड स्पर्धा ही बॅडमिंटन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळण्याची संधी मिळणेदेखील खूप मोठी कामगिरी मानली जाते. यंदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना सायना हिने उत्तुंग झेप घेतली. दुर्दैवाने अंतिम सामन्यात तिला पराभवास सामोरे जावे लागले. तरीही या स्पर्धेतील उपविजेतेपद ही तिच्या दृष्टीने अतिशय श्रेष्ठ कामगिरी आहे. भारताच्या प्रकाश पदुकोण व गोपीचंद या दोनच खेळाडूंनी या स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. जागतिक स्पर्धेतील पदकाने तिला अनेक वेळा हुलकावणी दिली होती. ऑल इंग्लंडमधील उपविजेतेपदामुळे तिचा आत्मविश्वास उंचवला. जागतिक स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी तिने विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला. या स्पर्धेत पदक मिळविण्याच्या निर्धाराने तिने भाग घेतला. अंतिम फेरीत तिने प्रवेश केल्यानंतर साऱ्या भारतीयांच्या नजरा तिच्या कामगिरीकडे वळल्या होत्या. मात्र अंतिम फेरीत तिला कॅरोलीनाविरुद्ध अपेक्षेइतका सर्वोच्च खेळ करता आला नाही. तिला निसटता पराभव स्वीकारावा लागला. अर्थात रौप्यपदक मिळविणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. तिची सहकारी पी. व्ही. सिंधू हिने लागोपाठ दोन वेळा या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे. मात्र तिला अंतिम फेरीत स्थान मिळविता आले नव्हते. त्यामुळेच सायनाचे उपविजेतेपद ही भारतीय बॅडमिंटन क्षेत्रासाठी महत्त्वाची कामगिरी आहे. यंदाच्या मोसमात तिने दोन वेळा जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकन मिळविले आहे. भारतीय महिला खेळाडूंसाठी तिचे हे यश प्रेरणादायक आहे. हे अव्वल स्थान टिकविणे खूप अवघड असते तरीही तिने आजपर्यंत केलेल्या कामगिरीची तुलना होणे अशक्य आहे.
सायनाला आदर्शस्थानी ठेवीत शेकडो मुला-मुलींमध्ये आपणही तिच्यासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रात यश मिळवावे अशी प्रेरणा निर्माण झाली आहे. सायनाने या क्षेत्रात केलेल्या कामगिरीपूर्वी बॅडमिंटनमध्ये प्रकाश पदुकोण, विमलकुमार, पुलैला गोपीचंद आदी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विजेतेपदांची कमाई केली. मात्र या क्षेत्रातही करिअर करता येते हा आत्मविश्वास अनेकांना वाटत नव्हता. बॅडमिंटन क्षेत्रात भक्कम पाया रोवून करिअर करता येते हा आत्मविश्वास अनेक खेळाडूंमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये निर्माण करण्याचे श्रेय सायनाला द्यावे लागेल. केवळ बॅडमिंटन नव्हे तर अन्य खेळांमध्येही भारतीय खेळाडूंबरोबरच परदेशातील खेळाडूंनाही तिच्या कामगिरीने नवोदित खेळाडूंना प्रेरित केले आहे.
सायना नेहवालला ऑलिम्पिक स्पर्धेत नशिबामुळेच कांस्यपदक मिळाले अशा टीकेस तिला अनेक वेळा सामोरे जावे लागले आहे. या टीकेकडे दुर्लक्ष करीत तिला आपल्या कामगिरीने उत्तर द्यावे अशी खूणगाठ मनाशी बांधून तिने गेल्या तीन वर्षांमध्ये अनेक स्पर्धामध्ये स्वप्नवत कामगिरी केली आहे व आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. त्यासाठी तिने अपार कष्ट केले आहेत आणि अजूनही करीत आहे. आपल्याकडे ऑलिम्पिक पदक मिळविण्याची अजूनही क्षमता आहे हे दाखवून दिले आहे.
बॉक्िंसगमधील भारताची सुपरमॉम मेरी कोमला डोळ्यासमोर ठेवूनच सायना सराव करीत असते. ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या मेरी कोमने जुळ्या मुलांपासून दोन-दोन वर्षे हजारो मैल लांब राहून सराव केला. आपणही त्याच जिद्दीने सराव केला पाहिजे असे सायनाला वाटत असते व त्याप्रमाणे ती सराव करतही असते.
बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनच्या खेळाडूंचे प्राबल्य पूर्वी होते. जागतिक स्तरावर एकाच वेळी चीनच्या किमान सात-आठ खेळाडूंशी स्पर्धा करावी लागते. मात्र चीनच्या खेळाडूंपुढे एका सायनाचेच आव्हान असते असे सायना नेहमी सांगते. चीनचे खेळाडू जर एकाग्रतेने केलेला सराव व एकनिष्ठा याच्या जोरावर जागतिक स्तरावर वर्चस्व निर्माण करू शकतात तर आपणही मेहनतीच्या जोरावर त्यांचा कित्ता गिरवीत सर्वोच्च यश मिळवू शकतो हे सायनाने ओळखले. सायनाही एकाग्रतेने सराव करण्याबाबत ख्यातनाम आहे. सराव सत्रास विनाकारण अनुपस्थितीत राहणे ती टाळते. सराव करतानाही आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या प्रशिक्षणाचा कार्यक्रमात शॉर्टकट न करता ती सतत सरावावर लक्ष केंद्रित करीत असते. सरावाची दिनचर्या कितीही कठीण असली तरी तक्रार न करता त्याप्रमाणे सराव करण्याबाबत सायना नेहमीच प्राधान्य देत असते.
आपली बॅडमिंटन कारकीर्द घडविण्यासाठी आपल्या आईवडिलांनी घेतलेले कष्ट, त्याग डोळ्यांसमोर ठेवीत त्याचे उत्तरदायित्व आपल्यावर आहे याची जाणीव तिला आहे. त्यामुळेच कधीही तिने मेजवान्या किंवा चैनीच्या सवयी ठेवलेल्या नाहीत. त्याऐवजी तिने सरावासाठी वेळ देण्यावर भर दिला आहे.
अव्वल दर्जाचे खेळाडू कधीही अल्पसंतुष्ट नसतात. एक स्पर्धा जिंकल्यानंतर ते नेहमीच पुढच्या स्पर्धेचा विचार करतात. सायनादेखील त्यांचेच अनुकरण करीत असते. अधिकाधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे विजेतेपद कसे मिळविता येईल याचाच विचार करीत असते. त्याकरिता आपल्याला कितीही कठोर मेहनत घ्यावी लागली तरी चालेल, पण आपण हे यश मिळविणारच हाच ध्यास तिच्यासमोर असतो. आपल्या देशात अनेक खेळाडू आशियाई किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये पदक मिळविल्यानंतर जणू काही आपण जगज्जेतेपद मिळविले असाच आव आणतात. सायना ही अशा खेळांडूमधील खेळाडू नाही. सतत पुढच्या स्पर्धाचाच ध्यास तिला असतो.
सर्वात जास्त कमाई करणाऱ्यांमध्ये भारतीय महिला खेळाडूंमध्ये सायनाचा क्रमांक अग्रस्थानी आहे. असे असूनही तिचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. अनेक खेळाडू विजेतेपद मिळविल्यानंतर चुकीच्या पद्धतीने आनंद व्यक्त करतात. तिच्यापेक्षा कमी यश मिळविणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंनी आपल्या सर्वोच्च यशानंतर संबंधित संघटना किंवा शासनास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. सायनाने राष्ट्रकुल विजेतेपद किंवा ऑलिम्पिक कांस्यपदक मिळविल्यानंतर संघटना किंवा अन्य कोणावरही भरघोस पारितोषिके किंवा सवलतींबाबत संघटकांवर दडपण आणलेले नाही. अनेक महिला खेळाडू कामगिरीपेक्षाही बॉयफ्रेंड किंवा फॅशन्स याबाबत जास्त चर्चेत असतात. सायनाने यापासून नेहमीच स्वत:ला दूर ठेवले आहे. आपला पोशाख, सवयी आदीबाबत आपल्यावर टीका होणार नाही याची काळजी ती सतत घेत असते. प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचना तत्परतेने आत्मसात करण्याबाबत ती ख्यातनाम आहे. कोणतेही प्रशिक्षक किंवा ज्येष्ठ खेळाडू हे आपल्या पित्यासमान आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले तरच आपल्याला अव्वल दर्जाचे यश मिळणार हे तिने ओळखले आहे. खेळातील आपल्या चुकांचा स्वीकार करीत त्या लगेचच दुरुस्त कशा होतील यावरच तिचा सरावात भर असतो. आत्मपरीक्षणासारखा उत्तम गुरू नाही असे नेहमी म्हटले जाते. सायना याच तत्त्वाचा पाठपुरावा करीत असते. संयम, चिकाटी, महत्त्वाकांक्षा या गुणांच्या जोरावरच तिने आजपर्यंत सर्वोत्तम यश मिळविले आहे. शेवटच्या गुणापर्यंत प्रतिस्पर्धी खेळाडूला झुंज देण्याबाबत तिची ख्याती आहे. दडपणाखाली आपली कामगिरी खराब होणार नाही याबाबतही ती जागरूक असते. परिपूर्ण खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिच्या खेळात स्मॅशिंग, प्लेसिंग, कॉर्नरजवळ शटल टाकणे, समांतर फटके मारणे आदी विविधता आहे. संयम व शांत वृत्तीबाबत सायना नेहमीच आदर्श खेळाडू मानली जाते.
ऑल इंग्लंड व जागतिक स्पर्धेतील उपविजेतेपदामुळे ऑलिम्पिक पदक पुन्हा मिळविण्याची क्षमता आहे हे सायनाने दाखवून दिले आहे. हे पदक सतत तिच्या डोळ्यासमोर असते. ते पुन्हा जिंकल्याखेरीज आपली कारकीर्द अपूर्ण राहील असेच तिचे मत आहे. रिओ येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये तिचे हे स्वप्न साकार होईल, अशी तिच्या लाखो चाहत्यांची अपेक्षा आहे.
मिलिंद ढमढेरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2015 1:34 am

Web Title: saina nehwal 2
Next Stories
1 राधेमाँचे कुठे काय चुकले?
2 श्रावणरंग : प्राजक्तफुलांची सय
3 श्रावणरंग : वडिलांची आठवण
Just Now!
X