दररोज किती तरी जणांना डॉक्टरेट जाहीर होते.. महाविद्यालये-विद्यापीठ पातळीवर शेकडो संशोधने होत असतात.. संशोधनाच्या विविध विषयांवर किती तरी चर्चा-परिसंवाद-परिषदा होतच असतात.. पण त्यांच्या अभ्यासाचा समाजाला कितीसा उपयोग होतो? उत्तर सर्वानाच माहीत आहे- अगदीच नाममात्र! कारण, शिक्षण आणि समाज यांच्यात मुळी संबंधच नाही किंवा तो पूर्णपणे तुटलेला आहे. एकीकडे शिक्षण क्षेत्र आपल्या विश्वात मग्न आहे, दुसरीकडे समाजाच्या गरजा/ तऱ्हतऱ्हेच्या समस्या तर वाढतच आहेत. स्वाभाविकपणे प्रश्न पडतो, शिक्षणाने या गरजांना/ समस्यांना भिडायला नको का? याबाबत सर्वसाधारणपणे विपरीत स्थिती असली तरी त्याला काही अपवाद नक्कीच आहेत. समाजाच्या गरजांना भिडणे हेच शिक्षण; या गरजा बदलतील तसा अभ्यासक्रमही बदलायचा हा विचार राबविणारी आणि त्याच पद्धतीने चालणारी एक संस्था तीन दशकांहून अधिक काळापासून कार्यरत आहे. तिने आता घट्ट पाय रोवून आपला विस्तारही चांगलाच वाढविला आहे. पाबळ हे ऐतिहासिक गाव. बाजीराव पेशव्यांच्या मस्तानीचे थडगे याच गावात. गावालगतचे टेकाड चढून गेले, की एक मोबाइलचा टॉवर लागतो. हीच विज्ञान आश्रमाची खूण. बाहेर छोटीशी पाटी. भारतीय शिक्षण संस्था, पुणे संचालित विज्ञान आश्रम, पाबळ!
डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग या ऋषितुल्य अवलियाच्या संकल्पनेतून आणि कष्टातून उभी राहिलेली ही संस्था. ते हिंदुस्थान लिव्हर या प्रसिद्ध कंपनीच्या ‘इंजिनीअरिंग सायन्स’ विभागाचे प्रमुख होते. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा, चिंतनाचा विषय. त्यांनी १९८३ च्या सुमारास विज्ञान आश्रम सुरू केला. शाळा सोडलेली अनेक मुले जीवनात यशस्वी होतात. औपचारिक शिक्षणाशिवाय ती कुठे शिकतात?.. ती काम करत करतच शिकतात. याचाच अर्थ काम करत करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. समाजातील जास्तीत जास्त मुले अशा प्रकारे शिकत असतील तर शिकण्याची हीच मुख्य पद्धत हवी.. या विचारातून डॉ. कलबाग यांनी विज्ञान आश्रमाची स्थापना केली. त्यांनी ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्याशी चर्चा केली. भारतातील एक प्रातिनिधिक खेडे म्हणून आश्रम पाबळ येथे सुरू झाला. पुढे इथेच इतिहास घडला. पाच एकरांवर पसरलेला पाबळचा विज्ञान आश्रम पाहताना हा इतिहास उलगडत गेला. सध्याचे संचालक योगेश कुलकर्णी माहिती देत होते. काही जण गोठय़ात गायीची धार काढत होते, चारा घालत होते. त्यांचा या कामांचा दिवस होता. इथे आपापल्या शिक्षणाच्या तासांचे वेळापत्रक असते! आश्रम एक असला तरी त्याचे वेगवेगळे विभाग, तेसुद्धा स्वायत्त! त्यांचा एकमेकांशी व्यवहार चालतो. डेअरी विभाग, शेती विभाग, पशुपालन विभाग, रोजच्या स्वयंपाकाची जबाबदारी असलेला विभाग आदी.. विशेष म्हणजे हे विभाग आपले उत्पन्न आणि खर्च यांचा हिशेब ठेवतात. उदाहरणार्थ- पशुपालन विभाग जनावरांचे दूध काढतो आणि ते स्वयंपाकाची जबाबदारी असलेल्या विभागाला विकतो. त्यातून जे (कागदोपत्री) पैसे मिळतात. त्यातून जनावरांच्या चाऱ्याचा खर्च भागवतो.
आश्रमात फेरफटका मारताना एक वास्तू दिसली. ती विद्यार्थ्यांनी उभारली होती. आश्रम पाहायला आलेल्या लोकांना बसण्यासाठी काहीच नव्हते, म्हणून ती उभारली होती, तीसुद्धा शिक्षणाचा भाग म्हणून! ती बनविणारी मुले कोण? असे विचारताच जवळच खेळत असलेला अक्षय आला. मूळचा आंध्र प्रदेशातला. छान मराठी बोलत होता. त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी ही वास्तू उभारली होती. ती उभारताना फॅब्रिकेशन, फेरोसिमेंट वापरणे, बांधकाम, इलेक्ट्रिकची कामे अशा अनेक गोष्टींचे आपोआपच शिक्षण झाले.. इथे सुटे-सुटे विषय शिकवले जात नाहीत. समस्या सोडविण्यातून मुले शिकतात. आश्रमात एक वर्षांचा ‘ग्रामीण तंत्रज्ञान पदविका’ हा अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे- आठवी पास किंवा नापास. वास्तववादी शिक्षण दिले जात असूनही येथे शिक्षण घेणाऱ्यांमध्ये तथाकथित हुशार वगैरे मुलांचे प्रमाण नगण्यच. बहुतांश जण औपचारिक शिक्षणात रस न घेणारे, त्यात गती नसलेले, आर्थिक कारणामुळे औपचारिक शिक्षण घेऊ न शकणारे किंवा इतरत्र प्रवेश न मिळालेले. ‘त्यांच्यातच प्रचंड ऊर्जा असते.’ कुलकर्णी सांगतात.

संस्थेपर्यंत कसे जाल?
पुणे-नाशिक रस्त्यावरील राजगुरूनगर किंवा पुणे-नगर रस्त्यावरील शिक्रापूर या ठिकाणांवरून पाबळकडे जाता येते. दोन्हीकडून एसटी बसची व्यवस्था आहे. पाबळ गावाजवळच्या टेकडीवर, गावापासूनचे अंतर- दीड किलोमीटर.