12 July 2020

News Flash

नोंद : सेकंड होमचा भूलभुलय्या

आज प्रत्येकाला स्वतंत्र संसार थाटायचा असतो त्यासाठी प्रत्येकाला स्वत:चे वेगळे घरटे हवे असते. प्रसंगी पती-पत्नी दोघांचीही बारा-बारा तास राबायची तयारी असते. हाती खुळखुळणारा पैसा सर्वानाच

| May 15, 2015 01:27 am

आज प्रत्येकाला स्वतंत्र संसार थाटायचा असतो त्यासाठी प्रत्येकाला स्वत:चे वेगळे घरटे हवे असते. प्रसंगी पती-पत्नी दोघांचीही बारा-बारा तास राबायची तयारी असते. हाती खुळखुळणारा पैसा सर्वानाच अस्वस्थ करून स्वातंत्र्य उपभोगण्यास प्रवृत्त करीत असतो. त्यामुळे या आधुनिक नव्या युगाची जगण्याची व्याख्याच बदलत चालली आहे. याच बदललेल्या मानसिकतेचा फायदा बिल्डर नामक व्यक्तीने न उपटला तर नवलच म्हणायचे. 

आज कुठल्याही वर्तमानपत्राची वास्तुविषयक जाहिरातीची पुरवणी पाहा. तुमच्या बजेटमध्ये फ्लॅट घ्या, फ्लॅटच्या किमतीत बंगलो घ्या, आयुष्याची संध्याकाळ आपल्या स्वत:च्या बंगल्यामध्ये किंवा सेकंडहोमध्ये निवांत व्यतीत करा. असा आग्रह धरणारी / करणारी जाहिरात पाहिली की आपल्या मेंदूत त्याचे बऱ्यापैकी त्या जाहिरातीचे फीडिंग व्हायला लागते. मग आपल्या मेंदूतील पेशी आपल्याला विचार करायला भाग पाडतात, प्रवृत्त करतात. आपल्या स्वत:च्या मालकीचा फ्लॅट नसेल तर आपण फ्लॅट घेण्याचा विचार करायला लागतो. फ्लॅट असेल तर स्वतंत्र बंगला किंवा सेकंडहोम घ्यायला आपलं मन हळूहळू तयार व्हायला लागतं. अशा प्रकारे आपल्या मेंदूतील प्रत्येक पेशीला आकर्षक जाहिरातीद्वारे आग्रहाने चेतविले जाते. हा असतो निव्वळ जाहिरात तंत्राचा परिणाम. मग ती सुंदर जाहिरात आपल्याभोवती फेर धरून नाचायला लागते.
बघा तर ही एक जाहिरात उदाहरणादाखल.. वर्तमानपत्राच्या जॅकेटवरील जाहिरात. सुंदर फ्लॅटचा प्रशस्त हॉल, मधोमध सोफा सेट, एका बाजूला काचेचे डायनिंग टेबल. बेडमधील दृश्यात सुंदर रंगसंगती असलेले उच्च दर्जाचे पडदे, खिडकीतून दिसणारे विस्तीर्ण आकाश, बाथरूममध्ये उच्च दर्जाची फिटिंग्ज आणि हो खरी जाहिरात यापुढे सुरू होते तुमच्या रेसिडेन्शिअल कॉम्पलेक्सला भव्य प्रवेशद्वार, हिरवाईने नटलेले तुमचे रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्स, हिरव्यागर्द झाडीतून तुमची नजर जॉगिंग ट्रॅकवरून सळसळत पुढे जायला लागते. मनाला प्रचंड सुख देणारे हे दृश्य. कारण, सिमेंटच्या जंगलात जन्माला आलेले आपण, तेच ते सिमेंटचे जंगल पाहून आपली नजर विटलेली असते. जाहिरातीतील सुखसोयी या सदरात अ‍ॅम्फी थिएटरचा उल्लेख असतोच असतो. तसेच त्याच जाहिरातीतील सुंदर तरण तलावाचे दृश्य पाहून आपले मन आपसूक त्या तलावात डुंबून येते. बिल्डरने जणू आपल्यासाठी स्वर्ग उभा केलेला असतो. हे सारं झालं फ्लॅटच्या जाहिरातीसंदर्भात. आणि हो, जर का जवळपास प्रस्तावित विमानतळ असेल तर आकाशात उडणाऱ्या विमानांची चित्रे. विमानतळ जवळ आहे म्हटल्यावर लोक अशा ठिकाणाला प्रथम पसंती देतात. मग त्या विभागातील जागेचे भाव विमानाप्रमाणेच गगनाला स्पर्श करायला लागतात.
सेकंड होम किंवा बंगलोची जाहिरात नुसती पाहून तरी बघा, खरी मजा यातच आहे. या जाहिरातीत काय नसतं.. तुमचा सुंदर बंगला, त्याला साजेसे मनमोहक प्रवेशद्वार, सुंदर बाग, पोर्चमध्ये उभी असलेली तुमची स्वत:ची कार, बंगल्याच्या आवारातील झोपाळ्यावर बसलेले तुम्ही राजाराणी. मस्त झोपाळ्यावर झुलत असता. त्या वेळी तुमच्या स्वप्नाच्या बागेतील झाडावर बसलेले पक्षी तुम्हाला सोबत करीत असतात. आणि आपल्या बंगल्यासमोरूनच एखादी अवखळ नदी खळखळ करीत आपल्याच तालात, मस्त झोकात, आपल्या बंगल्यासमोरून वाहत असते. आणि आपलं मन त्या नदीकाठचा विस्तीर्ण हिरवागार परिसर पाहून, हवेवर अलगद स्वार होऊन, निश्िंचत मनाने नदीत डुंबून येतं आणि उर्वरित आयुष्याची सुखस्वप्ने रंगविण्यात दंग होतं.
या आणि अशा प्रकारच्या शेकडो जाहिराती दृक्श्राव्य माध्यमातून तसेच वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहत असतो. याच कल्पनाचित्राद्वारे भावी फ्लॅट, बंगलो, सेकंड होमचे चित्र आपल्या डोक्यात फिट्ट बसविण्यात बिल्डर नामक व्यक्ती सफल होते. त्याच्या जोडीला त्या जाहिरातीतील मनोरंजनाच्या विश्वातील तारा-तारके अशा जागा घेण्याचे आवाहन आपणास करीत असतात. मग आपण आकडेमोड करू लागतो. प्रसंगी कर्ज काढतो आणि फ्लॅट, बंगलो किंवा सेकंड होम घेतो.
या आणि अशा फ्लॅटमध्ये आपण राहायला गेल्यानंतर तरण-तलाव नामक डबके मेंटेनन्स परवडत नाही म्हणून सोसायटीला बंद करणे भाग पडते. जाहिरातीत पाहिलेला जॉगिंग ट्रॅक तर कधीच जाहिरातीच्या बाहेर येत नाही. जाहिरातीत दाखविलेल्या अन्य गोष्टी कधीच प्रत्यक्षात येत नाहीत. पण आपण घेतलेल्या कर्जाचे हप्ते मात्र आपल्याला वाकुल्या दाखवत आपल्या बँकेच्या खात्यातून वजा होत असतात. आपण बारा-बारा तास काम करून थकून-भागून जेव्हा आपल्या फ्लॅटमघ्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये फक्त झोपण्यासाठी येतो तेव्हा खाली उतरून टिचभर बागेत फेरफटका मारणंही आपल्याला जमत नाही. कारण, जेवणही आपण बाहेरच उरकलेलं असतं. अशा प्रकारे फ्लॅट विकत घेताना पाहिलेल्या जाहिरातीतल्या सुंदर चित्रांचा उपभोग घेत-घेत आयुष्य कंठतो.
सेकंड होम किंवा बंगलासुद्धा बऱ्याच वेळा अशाच रीतीने घेतला जातो. त्यातील नदीकाठचा हिरवा परिसर कधीच आकाराला येत नाही.. नदीचे गटार होऊन त्यातून प्रदूषित पाणी व्हायला लागते. आपल्या कामाच्या धबडग्यातून आपल्यालाही १००-२०० कि.मी.चा प्रवास करून तिथे जाता येत नाही. तिथे लोक फक्त शनिवार-रविवार कधी-कधी जात असतात. बिल्डरचे रेस्टॉरंट असेल तर जेवण फाइव्हस्टार हॉटेलपेक्षाही महाग असते. आपण अशा रेस्टॅरंटमध्ये जेवण घेण्याचं टाळतो. कारण, या महागाईत हे सारं परवडत नाही..
मग आपल्याला पश्चात्ताप व्हायला लागतो.. पण काय उपयोग? आपण जाहिरातीत पाहिलेल्या सुंदर चित्रांचे लाखो रुपये मोजलेले असतात. खरे तर आजच्या जाहिरातीच्या युगात बिल्डरमंडळीचा चित्रे विकण्याचा धंदा जोराने फोफावतो आहे म्हटल्यास वावगे ठरू नये. आपण मात्र या रोजरोजच्या जाहिरातींच्या नव-नवीन क्लृप्त्यांना बळी पडत आहोतच; असे खेदाने म्हणावे लागते. आपण, ‘आपल्यासाठी घर घेतोय की, चित्रे विकत घेतोय’ याचाही आता विचार करण्याची वेळ आलेली आहे!
धनराज माणिक खरटमल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2015 1:27 am

Web Title: second home
टॅग Construction,House,Nond
Next Stories
1 चिंतन : गाभारा मनाचा
2 चटणी-कोशिंबीर
3 लाल मिरच्यांचा रंजका
Just Now!
X