News Flash

कहाणी चिमणा चिमणीची..

आटपाट नगर होतं. नगरात एक चिमणा आणि एक चिमणी राहत होते. नुकतेच सज्ञान झालेले. कुठलीही एम.बी.ए.ची डिग्री नसताना आयुष्य मॅनेज केलेल्या पालकांची ही अपत्ये मॅनेजमेंट

| January 2, 2015 01:11 am

आटपाट नगर होतं. नगरात एक चिमणा आणि एक चिमणी राहत होते. नुकतेच सज्ञान झालेले. कुठलीही एम.बी.ए.ची डिग्री नसताना आयुष्य मॅनेज केलेल्या पालकांची ही अपत्ये मॅनेजमेंट शिकत होती.  शिकता शिकता एकमेकांच्या डोळ्यांनी त्यांचं प्रेमही  मॅनेज केलं. चोरून पाहणे, एकमेकांची वाट पाहणे इथपासून एकमेकांना नोट्स देणे, मग चॅटिंग मोबाइलवर तासतासभर गप्पा. सिनेमा-नाटक इथपर्यंत गाडी व्यवस्थित चालली होती. नातेवाईक, मित्रमैत्रिणींच्या नजरा दोघांकडे वळत होत्या, पण प्रेमात आंधळ्यांना सगळं जगच आंधळं वाटत होतं. पण प्रेम व्यक्त करायला मुहूर्त काही सापडत नव्हता. एक दिवस तमाम प्रेमिकांचा प्रेमप्रकट दिन उगवला. व्हॅलेंटाइन डे. घरच्यांना थापा मारून कॉलेज बंक करून मित्र-मैत्रिणींना ‘हा असला फालतूपणा आपल्याला आवडत नाही’ असे शेरे मारून दोन्ही जीव एका बागेत भेटले. डोळ्यांत डोळे घालून आपल्या प्रेमभावना व्यक्त केल्या. त्यानंतरचे कित्येक दिवस त्या दोघांना कुणी जमिनीवर बघितलं नाही. दिवस भराभर जात होते. बघता बघता दुसरा व्हॅलेंटाइन डे उगवला. या वेळीसुद्धा दोघे खूप खूश होते. वर्षभर एकमेकांना समजून घेण्याच्या प्रयत्नात झालेली भांडणं- रुसवाफुगवा- विरह या सगळ्यांतून पार पडल्याचं समाधान दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. या वेळी जरी पहिल्या व्हॅलेंटाइन डेची हुरहुर नसली तरी प्रेमाचा फुलोरा चांगलाच फुलला होता. दोघांनीही मॅनेजमेंटला शिकवल्यानुसार आपल्या प्रेमाचा आलेख तपासला. तो अपेक्षेप्रमाणे चढताच निघाला. दोघांनी आता वर्षभर शिक्षणाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. ते वर्ष करिअरच्या मागे धाव धावण्यात गेलं. भेटीगाठी जरी आधीएवढय़ा नसल्या तरी सुरूच होत्या, शिवाय कनेक्ट राहण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप होतंच की. त्यांच्या कष्टाला फळ आलं. चिमण्याला एका चांगल्या कंपनीकडून भली मोठी ऑफर आली. तिला पण दोन-तीन ठिकाणांवरून ऑफर्स होत्या, पण तिनं त्याच्या करिअरसाठी थोडं थांबायचं ठरवलं. या धामधुमीत त्यांचा तिसरा व्हॅलेंटाइन डे उगवला. आज दोघांनीही एकमेकांना काही गिफ्ट आणलं नव्हतं. तिनं एक छोटंसं गुलाबाचं फूल त्याला दिलं. त्यानं एक कोरडं हास्य फेकलं. त्याच्या कपाळावर करिअरच्या आठय़ा स्पष्ट दिसत होत्या. जॉब नवीन होता. टार्गेट समोर होतं. डेडलाइन्स ठरलेल्या होत्या. तूर्तास तरी प्रेमासारख्या फालतू गोष्टीत घालवायला त्याच्याकडे वेळ नव्हता. ती समजून घेत होती. आपल्या भावी आयुष्यासाठी त्याचं करिअर ही गोष्ट किती महत्त्वाची आहे याची तिला जाणीव होती. त्या दिवशी चिमणा लगेच पळाला. चिमणी पण थोडा वेळ तिथेच रेंगाळून घरी परत गेली. त्याचं करिअर जोम धरू लागलं. कंपनीकडून राहायला आलिशान निवासस्थान मिळालं त्याला. शिवाय प्रमोशन, मोठं पॅकेज आणि बरंच काही.
त्यानं लगेच चिमणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. ती या क्षणाचीच तर वाट बघत होती. अगदी मोजक्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत त्यांचं लग्न पार पडलं. त्याचं घर खरंच खूप मोठं होतं. चिमणीला ते आवरण्यात आणि सजवण्यातच खूप वेळ जाऊ लागला. त्याचं शेडय़ूल तर खूपच बिझी झालं होतं. सकाळी लवकर उठून आवरून पळायचं आणि रात्री उशिरा घरी यायचं हा रोजचा दिनक्रम झाला. तिला त्याच्याशी खूप बोलावंसं वाटायचं. ती सारखा त्याचा फोन ट्राय करायची, पण त्याचा फोन आउट ऑफ कवरेज किंवा बिझी. सुरुवातीला ‘नंतर करतो’ असा मेसेज यायचा, पण नंतर नंतर तो पण बंद झाला. चिमण्याचा घरातला जेवढा वेळ कमी कमी होत गेला तसतसं त्यांच्या घरातलं सामान वाढत गेलं. संध्याकाळी ती त्याची वाट बघत डायनिंग टेबलवरच झोपी जायची. दिवस फार लवकर जात होते. जसजसं त्यांच्या घरातलं सामान वाढत होतं तसतसं तिच्या मनात फार जागा शिल्लक राहत होती. हल्ली ती फक्त घरात वस्तू साठवायची, मनात भावना साठवायचं बंद झालं होतं.
कंटाळा येतो म्हणून तिनं त्याच्याकडे जॉब करण्याचा प्रस्ताव मांडला, पण त्यानं तो फेटाळला. त्याचं म्हणणं होतं, त्याच्या पगारात त्यांचं आरामात भागत होतं. दारात गाडी होती, घरात कामाला बाई होती. तिला काम करायची काहीच गरज नव्हती. असंच एक दिवस त्यांचा प्रेमप्रकट दिन उगवला. १४ फेब्रुवारी. तिला पुन्हा उत्साह आला. हा दिवस स्पेशल बनवायचा असा तिनं निर्धार केला. तिला तिचा आधीचा चिमणा हवा होता. ती कामाला लागली. भराभर घर आवरलं. मोबाइलमधले कॅमेरामधले सगळे फोटो लॅपटॉपवर एकत्र करून त्यातले ठरावीक फोटो निवडले. बाजारात जाऊन प्रिंट करून आणले. त्या दोघांच्या पहिल्या भेटीपासून ते आजपर्यंतच्या निवडक आठवणींचा तिनं एक छानसा अल्बम बनवला. त्याच्या आवडीच्या रेस्टॉरंटला फोन करून त्या दिवशीचं टेबल बुक केलं. त्याच्या आवडत्या कलरचा एक शर्ट विकत आणला. १३ फेब्रुवारीच्या रात्री ती नेहमीसारखी त्याची वाट बघत बसली. डोळ्यासमोर अंधारी यायला लागली. सगळं घर फिरतंय असं वाटू लागलं. चक्कर येऊन सोफ्यावर पडली. कामवाल्या बाईने तोंडावर पाणी मारून उठवलं तिला. डॉक्टरकडे जाऊ या, असा आग्रह कामवाली बाई करू लागली, पण दिवसभराच्या दगदगीचा शीण असेल म्हणून ती टाळू लागली. पण बाई ऐकेचना म्हणू तिच्याबरोबर दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी प्रेग्नंसी टेस्ट सुचवली. टेस्टसाठी सँपल देऊन घरी परतली. नेहमीप्रमाणे त्याची वाट बघत डायनिंग टेबलवरच झोपी गेली. रात्री कधीतरी त्याच्या फोनमुळं तिला जाग आली. कंपनीच्या कामासाठी बाहेरगावी जात असल्याचं व परतायला दोन दिवस लागणार असल्याचं त्यानं सांगितलं.
तो दिवस उगवला. सकाळी तिनं लवकर उठायची गडबड नाही केली. निवांत आवरून स्वत:साठी नाष्टा बनवला, चहा घेतला. कपडे वगैरे आवरून बाहेर पडली. बाजारात सगळीकडे ग्रीटिंग कार्ड गिफ्टची दुकानं सजली होती. प्रेमिकांच्या चेहऱ्यावर सणासारखा उत्साह ओसंडत होता. वाटेत तिला त्यांनं प्रपोज केलेली बाग दिसली. ती बागेत गेली. ज्या ठिकाणी त्यांनी एकमेकांना प्रपोज केलं होतं त्याच ठिकाणी आज एक जोडपं एकमेकांना प्रपोज करत होतं. आता तिला तिथं बसवेना. ती तिथून निघाली. वाटेत लॅबमधून रिपोर्ट घेतला. न बघताच पर्समध्ये टाकला. ठरवलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली. थोडा वेळ थांबून ऑर्डर केलेला केक एकटीनेच कापला. त्यातला छोटासा तुकडा तोंडात ढकलून परत घरी आली. आज त्याचा एक पण फोन आला नाही. तिनं पण केला नाही. पर्स उघडून रिपोर्ट बघितला. पॉजिटिव्ह होता. डोळ्यांत पाण्याच्या धारा लागलेल्या. तिनं त्याला फोन केला. बराच वेळ रिंग वाजत राहिली. परत परत ती ट्राय करत होती. शेवटी फोन केल्यावर एकच उत्तर सारखं ऐकू येऊ लागलं, जे तिच्या आयुष्याचं सार बनलं होतं, ते म्हणजे ‘द पर्सन यू आर ट्राइंग टू रिच इज मूव्हड आऊट ऑफ कवरेज एरिया.’

लेखक-  इरफान मुजावर
सांगली
9373080040
8626074475 मांडोळीची हौस
नीलेश पाटील
बसस्टॉपवर बसची वाट बघत उभा होतो. पारोळ्यातील मोंठाळे पिंप्री येथे यायचे होते. तेथे माझ्या जवळून एक छोटा मुलगा मांडोळी फिरवत गेला. माझे लक्ष त्याच्या हातातील मांडोळी व मांडोळीसाठी केलेल्या आकोडय़ाकडे गेले. मला लहानपणाचा मी आठवू लागलो.
मी किंवा माझे मित्र जसे सुबाभुळाच्या शेंगेची फिरकी/ भिंगरी तयार करून खेळायचो, तसेच आम्ही मांडोळी हा खेळही भरपूर खेळायचो. या खेळामध्ये पळून आकोडय़ात मांडोळी अडकवून खेळल्यामुळे भरपूर व्यायाम होत असे. इकडे पळ, तिकडे पळ त्यातल्या त्या मांडोळी व आकोडय़ांच्या मधील घर्षणामुळे मधुर ध्वनी येत असायचा. हा ध्वनी खरंच त्याच्या माधुर्यात गुंगवून टाकायचा. या  ध्वनीचा नाद काही औरच होता.

या खेळाचे जन्मस्थान खान्देश विभागच आहे. यात एक रिकामी गोल अशी लोखंडाची रिंग असते. याचा आकार लहान किंवा मोठाही असतो. या रिंगाला (मांडोळीला) एका वाकडय़ा, पाचच्या आकारातील आकोडय़ाला अडकवत असतात व हा आकोडय़ाच्या वरच्या टोकाला धरून पळावे लागते. ही मांडोळी चालतही खेळू/फिरवू शकतात.
मी मामाच्या गावाला, म्हणजेच पारोळा तालुक्यातील लोणीसिम (फरकांडय़ाच्या जवळ) येथे जायचो तेव्हा मांडोळी खेळायचो. माझे आजोबा मला आजोबा हट्ट न करता, न मागता मांडोळी तयार करून देत. मला काही २-३ दिवस खेळता नाही आली, पण नंतर मी मांडोळी या खेळात अगदीच चपळ व निष्णात बनलो. नंतर या मांडोळीने माझ्या मनात घर केले.
मी जेव्हाही मामाच्या गावाला जायचो तेव्हा हाच खेळ जास्त खेळायचो. या खेळात लवकर थकल्यामुळे रात्रीची झोपही मस्त लागयची. यामुळे व्यायाम करण्याची, अथवा रनिंग करण्याची गरजच पडत नसे. यातच व्यायामाचे सर्व इव्हेंट होऊन जायचे. आम्ही सर्व मित्र रेस लावायचो. संपूर्ण लोणीसिम पालथे घालायचो, डवरून, हिंदडून यायचो व घरी आले की, थकवा काढत, आराम करत बसून राहायचो. मी जेव्हा सुटय़ा संपल्यानंतर परत जायचो, तेव्हा माझे आजोबा माझी मांडोळी व आकोडा सांभाळून ठेवायचे.
जेव्हाही मी मामाकडे जायचो तेव्हा हा खेळ खेळत असायचो. आजोबांना जसे कळायचे, की मी येतोय लोणीला, जेव्हा माझे आजोबा दोन दिवस अगोदर ती मांडोळी व आकोडा काढूनच ठेवायचे. अगोदरची मांडोळी नसली किंवा सापडली नाही की, ते लगेचच दुसरी मांडोळी काढूनच ठेवत असत. कारण, त्यांना माहीतच होते की, हा आला म्हणजे मांडोळी खेळणारच. मला या मांडोळी खेळासमोर क्रिकेट व इतर खेळ क्षुल्लकच होते, कारण मांडोळी या खेळातील मजा इतर कोणत्याही खेळात नव्हती.
नंतर तर हा खेळ हातातून सुटूनच गेला व मांडोळीची जागा माझ्या हातात क्रिकेट व बॅडमिंटन रॅकेटने घेतली. आता हा मांडोळी खेळ दुर्मीळच नव्हे, नामशेषच किंवा इतिहासजमाच झाला आहे, पण त्या  बसस्टॉपवर उभा असताना मांडोळी खेळताना एका ८-१० वर्षांच्या मुलाला बघितले, तेव्हा मनाला थोडे तरी बरे वाटले. हा खेळ अजून तरी खेडेगावात जिवंत आहे. या खेळाबद्दल मुलांच्या मनात आवड निर्माण व्हावी व ती आवड क्रिकेट किंवा इतर खेळांमुळे कमी होऊ नये, हीच आता देवाकडे प्रार्थना करतो. या मांडोळीशीही सुबाभुळाप्रमाणेच बालपणाच्या आठवणी जुळलेल्या आहेत. खरंच, मस्त आहे हा खेळ व त्याच्याबद्दलच्या उरलेल्या व जाग्या झालेल्या आठवणी.
नीलेश पाटील
पाचोरा, जि. जळगाव (खान्देश)
मो. ९५०३३७४८३३
E-mail- nileshpatil1188@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:11 am

Web Title: stories written by readers in lokprabha
Next Stories
1 ब्लॉगर्स कट्टा -माझे पक्षी मित्र!
2 रुचकर -ग्रीन सूप
3 टेक फंडा -२०१५ चे स्मार्ट फोन्स
Just Now!
X