28 February 2020

News Flash

सूर्योदय ते सूर्यास्त

सूर्य उगवणे आणि मावळणे म्हणजेच सूर्योदय आणि सूर्यास्त या आपल्या आयुष्यात रोज घडणाऱ्या घटना. पण ठिकाण बदलले की या घटनांचे सगळे संदर्भच बदलून जातात..

| July 10, 2015 01:02 am

lp55सूर्य उगवणे आणि मावळणे म्हणजेच सूर्योदय आणि सूर्यास्त या आपल्या आयुष्यात रोज घडणाऱ्या घटना. पण ठिकाण बदलले की या घटनांचे सगळे संदर्भच बदलून जातात..

मनुष्य, प्राणिमात्र, पक्षी, कीटक, पाने व फुलझाडे अशा सर्व सजीवांना प्रेरणा देणारी निसर्गाची अद्भुत देणगी म्हणजे सूर्य, म्हणजेच सविता! गायत्री मंत्रात सूर्याचे ध्यान करून बुद्धीला उत्तम प्रेरणा मिळावी अशी प्रार्थना केली जाते. सविताच्या तेजाचे ध्यान केले जाते. सूर्योदय होतो आणि शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी या सर्वामध्ये नि:संशयपणे प्राणसंचार होतो. सूर्याइतकी स्फूर्तिदायक देवता दुसरी कोणतीही नाही. सूर्यदेवाचे डोंगर, नदी, सरोवरे, समुद्र येथून निसर्गपटावर सोनेरी तांबडे रंग उधळत होणारे आगमन, पसरत जाणारे किरण आणि संध्याकाळी तेच किरण आपल्या आत ओढून घेण्याची क्षमता यातच सूर्याचे देवत्व आहे. त्याची लीला अगाध आहे.
राजा ते सामान्य माणूस हे दोन सोहळे पाहताना आपली दु:खे विसरतो. त्याला अनन्यसाधारण मन:शांती मिळते. अहाहा असा शब्द उत्स्फूर्त फुटतो आणि पर्यटकांच्या स्थलदर्शनाची पूर्तता या सोहळ्यानीच होते. असे म्हटले जाते की, जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या समयी झोपून राहते त्याचा लक्ष्मी त्याग करते.
माझ्या आठवणीतील पहिला सूर्यास्त अलिबाग येथील समुद्रकिनाऱ्यावरून माझ्या वडिलांबरोबर पाहिलेला असावा. मी त्या वेळी जेमतेम सातेक वर्षांचा असेन.
भरसमुद्रात पसरलेला कुलाबा किल्ला, किनाऱ्यावर अस्ताव्यस्त पसरलेले खडक आणि संपूर्ण परिसरात आम्ही इन मिन तीन माणसे, अस्तानंतर पसरलेली भयाण शांतता, या एकमेव दर्शनाने मला या सोहळ्याची अवीट गोडी जी लागली ती ६० वर्षे टिकून आहे.
भारताच्या अतिपूर्वेकडील ज्या प्रदेशावर पहिली सूर्यकिरणे पडतात असा उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणजे अरुणाचल. दिब्रुगड येथे ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावरील पहाटेच्या सूर्यकिरणांचे दर्शन घेत १९८५ स्क्वे कि. मी. पसरलेल्या अवाढव्य नामधापा नॅशनल पार्कमध्ये प्रवेश केला. भर दुपारी घनदाट जंगलामुळे सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचतच नव्हते. भन्नाट शांतता, दुथडी भरून वाहणारे पाण्याचे अनेक प्रवाह, काठावर मरून पडलेले साप, गाडी रस्ता शोधण्याच्या प्रयत्नात आणि काही वेळातच लक्षात आले, संपूर्ण रस्ता खचलेला! त्यावरून नदीच वाहत होती. आकाशातून तळपता सूर्य आमची मजा पाहत होता. सरहद्दीवरील शेवटचे खेडे गांधीग्राम. तेथे मोजक्या दहा-एक आदिवासींच्या झोपडय़ा. भारतातील पहिले सूर्यकिरण या खेडय़ावर पडतात, परंतु त्या जागेपर्यंत जाण्याचा योग नव्हता.
अरुणाचल प्रदेशाचा पश्चिम भाग म्हणजे हिमाच्छादित डोंगररांगा. त्यात नऊ हजार फूट उंचीवर वसलेले छोटेखानी टुमदार गाव तवांग. पहाटे पाच वाजता सोनसळी किरणात नाहून गेलेली हिमशिखरे. आसमंतात पसरलेल्या कोवळ्या उन्हाच्या छाया. वाहणारे बोचरे गार वारे झेलत सेला पासकडे आमचा अविस्मरणीय प्रवास चालू होता.
दूरवर पॅरेडाइज लेकचे निळे संथ पाणी सोनेरी किरणात चमकत होते. या पहाटेची नजाकत औरच होती.
उत्तरांचल प्रदेशातील नैनितालपासून ६२ किमी.वरील २४१२ मीटर उंचीवरचे बिनसर खेडे एका पहाडावर वसलेले. सरकारने बांधलेले भव्य गेस्ट हाऊस, त्यातील प्रशस्त खोल्या. दरीच्या बाजूने खोलीची खिडकी लांबच लांब काचेची व पडद्याआड झाकलेली. संध्याकाळी पाच वाजता हुडहुडी भरणारी थंडी, खिडकीचा पडदा दूर केला आणि समोर क्षितिजाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत १८० अंशात थेट आकाशाला भिडलेल्या बर्फाच्छादित डोंगररांगा सोनसळी तांबूस सूर्यकिरणात चमकत होत्या. जसजसा सूर्य डोंगराआड लपत होता, तसतसे आकाशातील पांढरे ढग पांगू लागले आणि काळ्या ढगांनी अवघे आकाश व्यापून टाकले. आकाशाच्या कडा लाल रंगात नाहून निघत होत्या. बघता बघता आकाशात विजांचे तांडव सुरू झाले. हृदयाचा ठोका चुकविणारा ढगांचा गडगडाट व धुवाधार पाऊस. समोरील दरी पूर्ण अंधारात बुडून गेलेली. खोलीतील मेणबत्तीच्या प्रकाशात पडणाऱ्या आमच्याच छाया भयाण वाटत होत्या. पहाटे केव्हा तरी पाऊस थांबला असावा. सकाळी गच्चीकडे धाव घेतली आणि ओ हो! चहुबाजूंनी समुद्राच्या शुभ्र लाटा पसरलेल्या, आम्ही जणू ढगांच्या अथांग महासागरातील बेटावर उभे आहोत असे वाटत होते. कालची हिमशिखरे, हिरवीगार वनश्री ढगांच्या माहोलात पूर्णपणे बुडून गेली होती. ढगांच्या लाटाच्या लाटा धडकत होत्या. काही क्षणात सोनेरी किरणांचे आगमन झाले आणि जादूची कांडी फिरवावी तसे हिमशिखरांचे रंगमंचावर आगमन झाले. ढगांची पांगापांग झाली. हिमशिखरांसमोर इंद्रधनुष्याचे तोरण लागले. निळ्या आकाशात कोवळ्या सोनेरी रंगाची उधळण सुरू झाली. थोडय़ाच वेळात सूर्यदेव विराजमान झाले. अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली.
नैनितालपासून ७२ किमी. अंतरावरील कौसानी हे १८९० मीटर उंचीवरील पाइन व देवदार वृक्षांच्या घनदाट वनश्रीत लपलेले टुमदार गाव. दोन वा तीनमजली आठ ते दहा हॉटेल्स. प्रत्येकात खास मोठी गच्ची सूर्योदय दर्शनाकरिता बांधलेली. सकाळी सहा वाजता प्रचंड कुडकुडायला लावणाऱ्या थंडीत तमाम पर्यटक सूर्यदेवाच्या प्रतीक्षेत उभे. अर्धवर्तुळाकर क्षितिजाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हिमशिखरांच्या रांगांच्या रांगा अस्ताव्यस्त पसरलेल्या. केशरी, सोनसळी तांबूस रंगात नाहून निघालेल्या जणू, एखाद्या पलटणीत उभ्या असलेल्या सैनिकांसारख्या वाटत होत्या. त्यातील प्रमुख चोखंबा, निळकंठ, त्रिशूल, नंदादेवी व नंदाकोट. काहींनी ढगांची टोपी घातलेली. जसजसे सोनेरी किरण पसरू लागले तसतसे एकेका शिलेदाराचे रंगमंचावर आगमन होऊ लागले. दुर्बिणीतून पन्नासेक शिखरांचा चमू दिसत होता. तीन दिवस रोज पहाटेचे हे सूर्यदर्शन विविध रूपांत पाहण्याची अनोखी संधी मिळाली होती. कौसानीच्या या रम्य सोहळ्याच्या महात्मा गांधीजी इतके प्रेमात पडले होते की, त्यांनी आपला एक दिवसाचा मुक्काम वाढवून आठ दिवस केला होता.
चिलका अथवा चिलिका हे ११०० स्क्वे. कि.मी. व्याप्ती असलेले सरोवर ओडिसाच्या पूर्वेकडील तीन जिल्ह्यंत पसरलेले. विशाखापट्टणम-भुवनेश्वर या रेल्वे मार्गावरील बाळूगाव स्टेशन पासून दहा किमी अंतरावर ही स्थलांतरित पक्षांकरता असलेली प्रसिद्ध जागा. त्यात संपूर्ण सरोवर पूर्वाभिमुख असल्याने सूर्योदय सोहळा आवर्जून बघावा असा. पहाटे पाच वाजल्यापासून आकाशात लाली पसरू लागली. क्षितिजाला भिडलेल्या पाण्याच्या कडेतून लालबुंद चकोर वरवर सरकू लागली. हळूहळू भडक लालबुंद गोळा उमललेल्या फुलासारखा झपझप आकाशात सरकू लागला, तांबडय़ा किंचित सोनेरी रंगाच्या विविध छटांनी संथ पाणी उजळून निघाले होते. मासे पकडण्यास जाणाऱ्या छोटय़ा होडय़ा डुलत डुलत मार्ग आक्रमित होत्या. पांढऱ्या, कबरी, काळ्या रंगाच्या बदकांची भिंतची भिंत पाणवनस्पती खाण्यात मग्न होती.
भारताचे दक्षिण टोक कन्याकुमारी. तिथे हिंदी व अरबी समुद्र मिळतात. त्या जागेला विवेकानंद शिला स्मारक आहे. तिथे सूर्योदय सोहळा अनुभवण्यासाठी बरीच हॉटेल्स अशी बांधलेली आहेत की खोलीमधून हे विहंगम दृश्य मनमुराद लुटता येते. आकाशातील केशरी, सोनेरी, लाल रंगाची उधळण, तांबूस रंगांनी नाहून निघालेल्या संथ लाटा, डुलत जाणाऱ्या नावा, किलबिलाट करत जाणारे पक्ष्यांचे थवे.. आरामात खुर्चीत बसून हातात चहाचा कप घेत हा आनंद मनमुराद लुटण्याची मजा औरच. येथील महात्मा गांधी स्मारक कल्पकतेने बांधलेले असून गांधीजींचा अस्थी कलश ज्या जागी ठेवलेला आहे त्या जागेवर दोन ऑक्टोबर दुपारी बारा वाजता सूर्यकिरण नेमके त्यावर पडतात.
ओडिसामधील कोणार्क सूर्य मंदिर म्हणजे सूर्य देवाचे रथावर आरूढ असलेले एक महान शिल्प. जेथे शेकडो वर्षांपूर्वी तेथील राजा सूर्यदेवाची पूजा करीत असे, आणि त्यावेळी मूर्तीवर सकाळचे किरण पडत असत. संपूर्ण मंदिर पाहून मती गुंग होते.
केरळातील सदाबहार हिल स्टेशन पीरमेड हे एर्नाकुलमपासून १२० किमी अंतरावर तीन हजार फूट उंचीवरच्या चहाच्या हिरव्यागार मळ्यात लपलेले. सर्व बाजूंनी डोंगरमाथे. त्या वरील दोन निसर्ग लेणी असलेल्या जागा ग्राम्पी व परुनथमपुरा या काळ्या दगडाच्या डोंगर रांगा (eagle`s rock.Tagore remembered spot) या अगदी टागोरांच्या दाढी असलेल्या चेहऱ्याची आठवण करून देणाऱ्या. तेथील माथ्यापर्यंत जाण्यास उत्तम सिमेंटचा रस्ता. सूर्यास्त पाहण्यास शेकडोंनी प्रवाशांच्या झुंडी. तांबडय़ा सोनेरी, केशरी रंगाची आकाशात चाललेली उधळण व साथीला ढगांचा सूर्याबरोबर चाललेला लपाछपीचा खेळ, डोळ्याचे पारणे फिटविणारा सूर्यास्त सोहळा.
केरळातील बॅकवॉटर्स म्हणजे निसर्गाचा अनोखा आविष्कार. नदीची अनेक मुखे समुद्राला ज्या जागी मिळतात त्या ठिकाणी लहान-मोठी सरोवरे तयार होतात व ती एकमेकांना जोडली जात असल्याने प्रचंड मोठा जलाशय निर्माण होतो. भारतातील नंबर एकचे सर्वात मोठे सरोवर वेम्बेनाड लेक व काठावर वसलेले छोटे टुमदार गाव कुमारकोम. हा परिसर म्हणजे स्वर्गभूमीच जणू. लेकची लांबी १०२ किमी व रुंदी १५ किमी. जवळजवळ २०३३ चौ. किमी. परिसरात पसरलेले. एर्नाकुलम पासून ९० किमी अंतरावर. रस्त्याचा शेवटचा पोहचण्याचा टप्पा अगदी सरोवराच्या कडेने गर्द झाडीतून जातो. लेकमधील दोन तासांचा मोटरबोट प्रवास जणू अथांग महासागरातूनच चाललेला. काठावरच्या हाऊसबोटी, टुमदार घरे, चर्चचे मनोरे भराभर मागे पडत होते आणि आमची एकमेव बोट अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा पाठलाग करत होती. बोटीत आम्ही चार प्रवासी. केबीनमध्ये बसलेला चालक दिसतही नव्हता. त्याने अस्ताला जाणाऱ्या सूर्यासमोर आमची बोट उभी केली. आसमंतात पसरलेले पाणी, वर निळे आकाश आणि मावळता सूर्य हेच आमचे सोबती. निस्सीम शांतता, आकाशातील रंगांची उधळण, ध्यानात बसल्यागत होतो व कानात जणू सूर्याकडून येणारा ओंकार ध्वनी घुमत होता. हा एक अपूर्व योगच होता.
सावंतवाडी वेंगुर्ले रस्त्यावरील शिरोडे गाव व लेखक वि. स. खांडेकर यांचे एक अनोखे नाते. रोज सायंकाळी किनाऱ्यावरील सुरूच्या बनातील एका ठरलेल्या बाकावर सूर्यास्त बघण्यास ते येत. त्या बाकावर बसून आम्ही त्यांच्या काळात रममाण झालो. सूर्यास्ताने त्यांना केवढी स्फूर्ती दिली होती.
सावंतवाडी जवळील अंबोली हिल स्टेशन पाऊस, धुके आणि ढग यात सदा गुरफटलेले. सनसेट पॉइंटसमोर पांढऱ्या, कबऱ्या काळ्या ढगांचा सूर्याबरोबर लपाछपीचा खेळ चालू होता. साथीला भुरभुरता पाऊस, ढगात लपलेल्या डोंगररांगा, तांबूस केशरी रंगाच्या मधेच पडणाऱ्या छाया. सूर्यास्त न दिसता वातावरण त्यासारखे हा एक अनोखा अनुभव. दूर डोंगरावर छत्री खाली उभे असलेले जोडपे पाहताना आवारा सिनेमातील राज कपूर-नर्गिस जोडीची आठवण येत होती.
डॉ. अविनाश वैद्य response.lokprabha@expressindia.com

First Published on July 10, 2015 1:02 am

Web Title: sunrise to sunset
Next Stories
1 टाहाकारीचे जगदंबा मंदिर
2 सागरी पदभ्रमण
3 सिक्कीमानुभव
Just Now!
X