आदित्य बिवलकर – response.lokprabha@expressindia.com
मोबाइलमुळे डोळ्यांना होणारा त्रास, पाठीचे विकार तसेच गेमिंगचे व्यसन या समस्या गेल्या काही दिवसांत लहान मुलांमध्ये वाढत आहेत. मुलांचा मोबाइलचा अतिवापर आणि गेमिंगचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी चीनमध्ये मोबाइल गेमिंगवर र्निबध लादण्यात आले आहेत. १८ वर्षांखालील मुलांना आठवडय़ातून फक्त तीन तास मोबाइल गेम खेळता येणार आहेत. भारतातही पालकांकडून या निर्णयाचे कौतुक होत आहे. पॅरेन्टल कन्ट्रोल आणि काही इतर सॉफ्टवेअरचा वापर करून अशाप्रकारे मुलांच्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण आणता येणे शक्य आहे. जाणून घेऊ या याबद्दल..

कोविडकाळात मुलांचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढलेला आहे. ऑनलाइन शाळा, शिकवणी याशिवाय विरंगुळा म्हणून मोबाइल, लॅपटॉपचा वापर वाढला आहे. अभ्यासासह सर्वच गोष्टी मोबाइलवर होत असल्यामुळे पालकसुद्धा डिजिटल वावराला आवर घालू शकत नसल्याचे चित्र आहे. अनेक मुलांना मोबाइलचे व्यसन जडले आहे. त्यामुळे यावर आता पालकांनाच नियंत्रण ठेवावे लागणार आहे.

चीनमध्ये नवे र्निबध

चीनने किशोरवयीन मुलांच्या (१८ वर्षांखालील) ऑनलाइन गेमिंगवर वेळेचे र्निबध लागू केले आहेत. त्याचबरोबर गेमिंग कंपन्यांनाही नियम आणि र्निबधांच्या कक्षेत आणण्यात आले आहे. महिन्यापूर्वी, चीन सरकार संचालित ‘इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन डेली’ने प्रसिद्ध केलेल्या एका लेखामध्ये, अनेक किशोरवयीन मुलांना ‘ऑनलाइन गेमिंग’चे व्यसन लागले असून त्याचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला होता. चीन सरकारच्या नव्या नियमांमुळे मुलांना आता आठवडय़ातले तीन दिवस फक्त एक तास ऑनलाइन खेळ खेळता येतील. शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मुले रात्री ८ ते ९ या वेळेतच ऑनलाइन खेळ खेळू शकतील.

यूटय़ूबसाठी सुपरव्हाइजड गूगल अकाऊंट

चीनप्रमाणे थेट वेळेवर र्निबध जगात इतर ठिकाणी लागू नसले तरीही वेगवेगळ्या सेटिंग्जच्या माध्यमातून पालकांना मुलांच्या मोबाइल वापरावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. सध्या घरी असल्याने मुलांचा इंटरनेट वरचा बराचसा वेळ यूटय़ूबवर जातो. वेगवेगळे व्हिडीओ बघण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असताना आक्षेपार्ह कण्टेण्ट मुलांसमोर येऊ नये हा विचार पालकांच्या डोक्यात असतो. यासाठी यूटय़ूबच्या सुपरव्हाइज अकाऊंटची मदत होऊ शकते. याच्या मदतीने यूटय़ूबचे कोणते व्हिडीओज मुलांना सर्चमध्ये दिसावेत, कोणत्या विषयांशी संबंधित व्हिडीओ मुलांनी बघावेत याचं नियंत्रण पालकांच्या हातात असतं. त्यानुसार सेटिंग करून पालकांना मुलांच्या व्हिडीओवर नियंत्रण ठेवता येतं. यासाठी सुपरवाइज्ड गूगल अकाऊंटचा वापर करता येतो. त्यामुळे मुलांना दिसणारा आशय पालक नियंत्रित ठेवू शकतात. मुलांच्या वयानुसार यामध्ये विविध पर्याय देण्यात आले आहेत, त्यामुळे पालकांना सेटिंग करणे सोयीचे ठरते.

पालकांचं नियंत्रण फायदेशीर

आपले पाल्य मोबाइलचा वापर कशासाठी करत आहे याची माहिती पालकांना हवी असेल, तर गूगलच्या पॅरेन्टल कन्ट्रोलचा पर्याय फायदेशीर आहे. याद्वारे तुम्ही तुमचा मोबाइल तुमच्या पाल्याच्या मोबाइलशी कनेक्ट करू शकता. नंतर तुम्हाला तुमच्या पॅरेन्टिंग कन्ट्रोल पर्यायमध्ये पाल्याच्या मोबाइलचा पूर्ण डेटा मिळेल. पॅरेन्टल कन्ट्रोलच्या माध्यमातून आपला मुलगा कोणत्या अ‍ॅपचा वापर किती वेळ करतोय, मोबाइलवर कोणती संकेतस्थळे किती वेळ पाहतोय, दिवसभरात किती वेळ स्क्रीनसमोर घालवतोय इत्यादी माहिती सहज मिळते. मोबाइलच्या गैरवापरावर आणि अतिवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी याची मदत होऊ शकते.

एखाद्या ठरावीक गेमचे व्यसन मुलांना लागले असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीसुद्धा पॅरेन्टल कन्ट्रोल फायदेशीर आहे. आपल्या पाल्याने कोणता गेम किती वेळ खेळावा, कोणता गेम खेळू नये याचं सेटिंग पॅरेन्टल कन्ट्रोलमध्ये करता येतं. गेमिंगसाठी राखीव वेळ ठेवता येतो. त्यामुळे मोबाइलचा वापरसुद्धा अभ्यासाव्यतिरिक्त मर्यादित ठेवता येणे शक्य आहे. याचबरोबर ठरावीक संकेतस्थळे पॅरेन्टल कन्ट्रोलच्या मदतीने ब्लॉक करता येतात. यामुळे कोणताही आक्षेपार्ह मजकूर मुलांच्या नजरेस पडणार नाही, याची खबरदारी घेणे शक्य आहे. मुलांच्या स्मार्टफोनवापरावर याद्वारे पूर्ण लक्ष ठेवता येते. याचबरोबर ठरावीक वेळेनंतर पासवर्डच्या मदतीने त्यांचा फोन लॉक करता येतो. त्यामुळे अतिवापर टाळण्यासाठी पॅरेन्टल कन्ट्रोलची मदत होते.

डिजिटल वेलबिइंगचा पर्याय

हा अण्ड्रॉइड मोबाइलमधील असा पर्याय आहे जो तुम्हाला मोबाइल वापराची माहिती रोज देतो. म्हणजे दररोज किती वेळ मोबाइल वापरला गेला, दिवसभरात कोणती अ‍ॅप्स वापरली, ती किती वेळ वापरली, कोणते गेम्स खेळलात, कोणता गेम किती वेळ खेळलात इत्यादी पूर्ण माहिती यात पाहायला मिळते. दिवसभरात गूगल क्रोम व यूटय़ूब किती वेळ वापरले, कोणकोणती संकेतस्थळे आणि यूटय़ूब चॅनल्स पाहिली याबाबत सर्व माहिती या डिजिटल वेलबिइंग या पर्यायमध्ये नोंदवली जाते. याद्वारे मुलांच्या मोबाइल वापरावर नियंत्रण आणि लक्ष ठेवणे शक्य होते.

किड्स मोड आणि चाइल्ड लॉक

टीव्हीचा वापर मर्यादित असावा यासाठी जसा चाइल्ड लॉकचा पर्याय असतो तसंच मोबाइलमध्येही चाइल्ड लॉकसाठी अ‍ॅप आहेत. मुलांच्या मोबाइलमध्ये या अ‍ॅपच्या मदतीने पासवर्ड सेट केला जातो, त्यानंतर मोबाइलमधील ठरावीक गोष्टींचाच वापर मुलांना करता येतो. याचबरोबर सध्याच्या बऱ्याच नवीन मोबाइल फोनमध्ये किड्स मोडचा पर्याय आहे. या मोडमध्ये मोबाइलमधील मुलांच्या उपयोगाच्याच गोष्टी मुलांना वापरता येतात, त्याचबरोबर पासवर्ड सेट करण्याचा पर्याय यामध्ये असतो, यामुळे कोणतेही नवीन अ‍ॅप वापरण्यास सुरुवात करण्यापूर्वी पासवर्ड टाकावा लागतो. ठरावीक वेळापेक्षा जास्त वेळ अ‍ॅप वापरण्यासाठीसुद्धा पासवर्ड वापरावा लागतो. १५ वर्षांवरील मुलांसाठीची अ‍ॅप्स तसेच गेम्स या मोडमध्ये वापरता येत नाहीत. सध्या प्ले स्टोअरमध्येसुद्धा अशी वेगवेगळी अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यासाठी मोफत उपलब्ध आहेत. मुलांचा मोबाइलचा वापर मर्यादित असावा यासाठी ही फीचर्स फायद्याची आहेत.