गेल्या वर्षभरात या सदरातून आपण किल्ल्याच्या प्रत्येक भागाची रचना, त्याचं महत्त्व, त्यातील खुबी याची माहिती घेतली. या शेवटच्या लेखात आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या इतिहासाच्या साक्षीदारांची माहिती घेऊ या.

प्रत्यक्ष किल्ल्याबरोबर किल्ल्याखालचे गाव, किल्ल्यापर्यंत जाणारे रस्ते यावर अनेक ऐतिहासिक खुणा, अवशेष विखुरलेले असतात. किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात देवळात किंवा पारावर अनेकदा वीरगळ, समाध्या, सतीचे हात, तुळशी वृंदावन, छत्री इत्यादी इतिहासाचे साक्षीदार पाहायला मिळतात. युद्धात कामी आलेल्या, गोरक्षण करताना धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारके म्हणून वीरगळ उभारले जात असत. या स्मारकांमुळे पुढील पिढीला प्रेरणा मिळत असे. त्या वीरांबरोबर सती गेलेल्या स्त्रियांसाठी सतीचा हात उभारला जात असे. तर मातब्बर सरदार, राजघराण्यातील लोक यांच्या समाध्या व स्त्रियांसाठी तुळशी वृंदावन उभारले जाई.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गावात आढळणारे वीरगळ हा खरंतर आपला ऐतिहासिक ठेवा आहे, पण अतिपरिचयामुळे एकतर त्याचा शेंदूर फासून देव बनवलेला असतो किंवा दुसरे टोक म्हणजे पायरीचा, कपडे धुण्याचा दगड म्हणूनही वापर केलेला पाहायला मिळतो.  पुरातत्त्व खात्याने केलेल्या परांडा किल्ल्याच्या डागडुजीमध्ये वीरगळीचे तुकडे तटबंदीत वापरलेले पाहायला मिळतात. शिलाहार काळापासून साधारणपणे सतराव्या शतकापर्यंत वीरगळ बनवण्याची प्रथा चालू होती.  वीरगळ ही स्मृतिशिळा आहे. युद्धात, गोधनाचे रक्षण करताना एखाद्या पवित्र कार्यासाठी बलिदान करताना जर एखाद्याला वीरमरण आले, तर त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वीरगळ उभारला जात असे. त्यापासून पुढच्या पिढीलाही आपल्या धर्मासाठी, राजासाठी लढण्याची, बलिदान करण्याची प्रेरणा मिळत असे.

वीरगळ हा आयताकृती दगडावर कोरलेला असतो. या दगडावर १, २, ३ किंवा ४ चित्र (शिल्प) चौकटी कोरलेल्या असतात. सर्वात खालच्या चौकटीत ज्या कारणामुळे योद्धय़ाला वीरमरण आले ते शिल्पांकित केलेले असते. यात तो वीर युद्ध करताना, गोधनाचे रक्षण करताना, िहस्र प्राण्याशी लढताना, शिकार करताना दाखवलेला असतो. दुसऱ्या चौकटीत तो अप्सरांबरोबर दाखवलेला असतो. याचा अर्थ अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जात आहेत, तो स्वर्गसुख उपभोगत आहे असा होतो. त्यापुढील तिसऱ्या चौकटीत ब्राह्मण/ साधू पूजा सांगत आहे आणि वीर एकटा किंवा सपत्नी शंकराच्या पिंडीची पूजा करताना पाहायला मिळतो. याचा अर्थ त्याने केलेल्या पुण्यकर्मामुळे तो देवाशी एकरूप झालेला आहे. त्याला मोक्ष मिळालेला आहे. या चौकटीच्या वर मंगलकलश आणि त्याच्या एका बाजूला चंद्र आणि दुसऱ्या बाजूला सूर्य कोरलेला असतो. याचा अर्थ सूर्य आणि चंद्र असेपर्यंत या वीराची कीर्ती आसमंतात राहील. पण सत्य परिस्थिती अशी आहे की, वीरगळावर फार कमी प्रमाणात शिलालेख आहेत. त्यामुळे वीरगळ पाहून त्यातील वीर कोण आहे, कुठल्या युद्धात तो कामी आला आणि वीरगळाचा निर्माता कोण आहे हे सांगता येत नाही. अर्थात याला काही अपवाद आहेत. बोरीवलीतील एकसर भागात असलेल्या वीरगळीवर शिलाहार राजा सोमेश्वर आणि यादव राजा महादेव यांच्यात झालेले नौकायुद्ध कोरलेले आहे. अशा प्रकारे नौकायुद्ध कोरलेला महाराष्ट्रातील हा एकमेव वीरगळ आहे. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यत वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर असलेल्या मठ गावात सावंतांचे वीरगळ आहेत, त्यावर शिलालेखही कोरलेले आहेत. या शिलालेखात वीरगळांचा उल्लेख भडखांब म्हणून केलेला आहे.

वीरगळांच्या चित्रचौकटींच्या वरच्या भागात कलशाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी पाहायला मिळतात. वीर कोणत्या धर्माचा ( हिंदू, जैन बौद्ध), कोणत्या पंथाचा (शैव, वैष्णव इत्यादी) उपपंथाचा असेल त्याप्रमाणे शिल्पांकन बदलत जाते.  वीर वैष्णव पंथी असल्यास विष्णू, गाणपत्य पंथीय असल्यास गणपती, बौद्ध असल्यास स्तूप पाहायला मिळतो. वीरगळांसारख्याच काही ठिकाणी साधुशिळा पाहायला मिळतात. त्यात पहिल्या चौकटीत साधू ध्यान करत असलेला किंवा आडवा पडलेला दाखवलेला असतो. त्यावरील चौकटीत तो शिविलगाची पूजा करताना दाखवलेला असतो. बहुतेक वीरगळ आयताकृती दगडाच्या एका बाजूला कोरलेले असतात. तसेच काही वीरगळ चारही बाजूला कोरलेले पाहायला मिळतात. चारी बाजूने कोरीवकाम करण्यासाठी नक्कीच जास्त खर्च येत असणार. त्यामुळे वीराच्या हुद्दय़ाप्रमाणे, ऐपतीप्रमाणे (वीर किती सधन आणि मातबर होता) त्याचे वंशज खर्च करून वीरगळ तयार करत असणार. त्यामुळे काही वीरगळ एका बाजूला कोरलेल्या तर काही चारही बाजूंनी कोरलेले पाहायला मिळतात. वीरगळांसाठी वापरला जाणारा दगड, त्यावरील कलाकुसर या गोष्टीही खर्चीक असल्याने जवळपास उपलब्ध होणारा दगड वापरून कमीतकमी कलाकुसर केलेले वीरगळी मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतात. याउलट राजाने एकसारख्या वीरगळ त्याच्या विजयानिमित्त उभारल्यामुळे त्यासाठी बाहेरून आणलेला उत्कृष्ट दगड, त्यावरील सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते.

किल्ले, डोंगरदऱ्या फिरताना आदिवासी/वनवासी वस्ती, पाडय़ाजवळ एखाद्या उभ्या लाकडी फळीवर कोरलेले चक्र/फूल त्याखाली कोरलेल्या सूर्य-चंद्राच्या प्रतिमा आणि त्याखाली कोरलेली घोडय़ावर बसलेली किंवा युध्द करणाऱ्या वीराची प्रतिमा पाहायला मिळते. या असतात आदिवासी वीरांचे वीरगळ. याशिवाय दगडात कोरलेल्या वीरगळात घोडय़ावर बसलेला योद्धा दाखवलेला असतो. वरच्या बाजूला सूर्य-चंद्र कोरलेले असतात. ठाणे जिल्ह्य़ात महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या सेगवा किल्ल्यावर असे वीरगळ आपल्याला पाहायला मिळतात.  गमतीचा भाग म्हणजे त्या वीराचा पोशाख काठेवाडी पद्धतीचा आहे. नगर जिल्ह्य़ातील भरवगड (शिरपुंजे) किल्ल्यावर घोडय़ावर बसलेल्या वीराची प्रतिमा कोरलेली आहे.

डोंगरवाटा धुंडाळताना काही लाकडी फळ्यांवर सूर्य-चंद्राच्या प्रतिमा आणि त्याखाली कोरलेली वाघाची प्रतिमा पाहायला मिळते. याला आदिवासी लोक ‘वाघदेव’ म्हणतात. लाल, पिवळा, केशरी या नसíगक रंगात वाघदेवाची प्रतिमा रंगवलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी वाघाच्या खाली सापाची प्रतिमाही कोरलेली आढळते. जंगलातील िहस्र श्वापदांपासून आदिवासींचे, त्यांच्या गाईगुरांचे रक्षण वाघदेव करतो अशी आदिवासींची श्रद्धा आहे. जंगलाशी नेहमीच संबंध येणाऱ्या आदिवासींना वाघ, बिबटे इत्यादी मार्जारवंशीय प्राण्यांकडून होणाऱ्या प्राणघातक हल्ल्याची भीती मनात ठेवूनच जंगलात जावे लागते. या भीतीतूनच ‘वाघदेव’ या कल्पनेचा जन्म झाला असावा. लाकडी फळीवर कोरलेली वाघदेवाची प्रतिमा असलेले काष्ठशिल्प आदिवासी आदिम काळापासून बनवत असावेत. जंगलात सहजपणे उपलब्ध होण्याऱ्या लाकडावर कोरीवकाम करून त्याला नसíगक रंगात रंगवून ‘वाघदेव’ तयार केला जातो. त्यानंतरच्या काळात दगडात कोरलेलं वाघाचं शिल्प (हरिश्चंद्र गडावर जाताना टोलार खिंडीत वाघाचं शिल्प पाहायला मिळतं.). याशिवाय नाशिक जिल्ह्य़ातील बागलाण भागात असलेल्या न्हावीगडावर चढताना, ठाणे जिल्ह्य़ातील अशेरीगडावर वाघदेव पाहायला मिळतात.

लाकडावर कोरले जाणारे हे वाघदेव ऊन-पावसाच्या माऱ्याने खराब होत. त्यावर उपाय म्हणून आताच्या आधुनिक काळात वाघदेवाची सिमेंटची बेढब आणि भडक रंगात रंगवलेली मूर्ती पाहायला मिळते. काही ठिकाणी अशी वाघदेवांची मंदिरेही पाहायला मिळतात. काळाबरोबर होणाऱ्या सिमेंटच्या या आक्रमणामुळे लाकडावर वाघदेव कोरण्याची ही कला आणि पद्धत लुप्त होईल. भारतभर पसरलेल्या जंगलात असलेल्या वाघदेवांची पूजा दरवर्षी ‘वाघबारसीला’ म्हणजेच अश्विन वद्य द्वादशीला होते.

वीरांबरोबर सती जाणाऱ्या स्त्रियांच्या स्मरणार्थ सतीशिळा बनवल्या जात. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात आढळणाऱ्या सतीशिळांमध्ये स्त्रीचा खांद्यापासून हात चित्रित केलेला असतो. हा हात कोपरात काटकोनात वळलेला असतो. हातात बांगडय़ा असतात. हाताखाली दोन प्रतिमा कोरलेल्या असतात. या त्या स्त्रीच्या मुलांच्या प्रतिमा असाव्यात. या हाताची रचना आशीर्वाद देणाऱ्या हाताप्रमाणे असते. तसेच सतीशिळा देवळाच्या परिसरात उभारल्या जात असत. त्यामुळे सतीशिळेची शेंदूर लावून पूजा केल्याचे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. वीरगळाप्रमाणे एक, दोन किंवा तीन शिल्पचौकटीत सतीशिळा कोरलेली असते. त्यात खालच्या चौकटीत चितेवर बसलेली स्त्री, चितेच्या बाजूला उभी असलेली स्त्री किंवा नवऱ्याचं डोकं मांडीवर ठेवून चितेवर बसलेली स्त्री, वाघावर, घोडय़ावर बसलेली स्त्री कोरलेली असते. दुसऱ्या चौकटीत नवरा-बायको हातात हात घालून उभे राहिलेले दाखवलेले असतात. पहिल्या किंवा दुसऱ्या चौकटीत उजव्या बाजूला सतीचा कोपरापासूनचा हात दाखवलेला असतो. तिसऱ्या चौकटीत नवरा-बायको िपडीची पूजा करतांना दाखवलेले असतात. त्यावर सूर्य-चंद्र कोरलेले असतात. वीराबरोबर त्याच्या दोन किंवा तीन पत्नी सती जात असत. त्यांचे प्रतीक म्हणून कोपरात वाकवलेले दोन किंवा तीन हात दाखवलेले असतात. काही वीरगळामध्ये वीराची पत्नी आणि सतीचा हातही दाखवलेला असतो. त्याला वीरसतीगळ असे म्हणतात. ही वीराची आणि सती या दोघांची एकच स्मृतिशिळा असते.

धेनूगळ म्हणजे गाय-वासरू दगड हे एक दानपत्र आहे. दान दिलेल्या गावाची, जमिनीची सीमा दाखवण्यासाठी धेनूगळ वापरला जात असे. या आयताकृती उभ्या दगडावर गाय आणि वासरू कोरलेले असते. वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात. गाय हे राजाचे प्रतीक असून वासरू हे प्रजेचे प्रतीक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो. या गाय-वासरू दगडांवर काही ठिकाणी शिलालेखही कोरलेले पाहायला मिळतात.

प्रजेचा प्रतिपाळ करणारा राजा प्रजेने राजाज्ञा मोडली तर त्याची गय करणार नाही हे दर्शविण्यासाठी गद्धेगाळ कोरले जात असत. गद्धेगाळ हे दानपत्र होते. शिलाहार राजांच्या काळात चालू झालेली ही प्रथा इस्लामी राजवटीपर्यंत असावी. कारण विजापूर येथील गद्धेगाळांवर फारसी शिलालेख आहे. गद्धेगाळ हा दगड आयताकृती असून यावर गाढव स्त्रीशी संभोग करताना दाखवलेले असते. दिलेल्या दानाचा दुरुपयोग केल्यास, नियम मोडल्यास काय शिक्षा होईल हे सांगणारी ही शिल्पांकित केलेली धमकी / शिवी असते. वरच्या बाजूस सूर्य-चंद्र आणि मध्ये कलश कोरलेले असतात. हे अर्थात दान देणाऱ्या राजाची कीर्ती आसमंतात कायम राहील हे दर्शवणारी असतात. काही गद्धेगाळांवर संस्कृत, मराठी, फारसी भाषेत शिलालेख कोरलेले पाहायला मिळतात. त्यात कोणी  कोणाला दान दिले. त्याचा गरवापर केल्यास काय शिक्षा होईल याचा उल्लेख केलेला असतो. डोंबिवलीतील गावदेवी मंदिराजवळ असा शिलालेख असलेला गद्धेगाळ पाहायला मिळतो. कल्याणजवळ असलेल्या लोणाड गावात, मुंबईतही गद्धेगाळ सापडलेले आहेत. परांडा किल्ल्यातील हमामखान्यातही एक गद्धेगाळ ठेवलेला आहे. याशिवाय मंदिर परिसरातही गद्धेगाळ पाहायला मिळतात. संगमेश्वरजवळील कर्णेश्वर मंदिर, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले पूरचे नारायणेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळ्याचे वेतोबा मंदिर इत्यादी अनेक ठिकाणी गद्धेगाळ आहेत. गावात सापडलेले वीरगळ, मूर्ती देवळाच्या परिसरात आणून ठेवलेल्या असतात. तसेच हे शेतात, बांधावर सापडलेले वीरगळ मंदिरात आणून ठेवलेले असतात, या दगडांचे ऐतिहासिक महत्त्व माहिती नसल्यामुळे आणि केवळ यावर अश्लील शिल्प आहे, या कारणास्तव गद्धेगाळ नष्ट केला जातो. सध्या पूरचा गद्धेगाळ जमिनीत पुरला आहे, तर परुळ्याचा विहिरीत फेकलेला आहे.

किल्ल्यांवर आणि गावांमध्ये आपल्याला अनेक समाध्या पाहायला मिळतात. सुधागड किल्ल्यावर भोराई देवी मंदिराच्या बाजूला असलेल्या माळावर अनेक समाध्या विखुरलेल्या पाहायला मिळतात. समाध्या साधारणपणे आयताकृती किंवा चौरस असतात. ज्याची समाधी आहे त्याच्या हुद्दय़ाप्रमाणे, ऐपतीप्रमाणे त्यावर नक्षीकाम केलेले असते किंवा स्थानिक दगडापेक्षा वेगळा दगड वापरलेला असतो. समाधीवर पावले किंवा शिविलग कोरलेले असते. राजघराणातल्या व्यक्तींच्या समाधी सहसा एकाच ठिकाणी कलात्मक पद्धतीने बांधलेल्या पाहायला मिळतात. इस्लामी स्थापत्यशैलीत खाशांच्या कबरींवर घुमट बांधले जात. धुळे  जिल्ह्य़ातील थाळनेर गावात फारुकी घराण्यातील राजांच्या व महत्त्वाच्या व्यक्तींच्या कबरी आहेत. त्या कबरीवर बांधलेले घुमट, कोरलेले शिलालेख पाहायला मिळतात. या घुमटावरूनच राजस्थानी शैलीतील छत्रीचा उगम झाला. महाराष्ट्रातही छत्री समाध्यांसाठी स्वीकारली गेली. त्यामुळे पंधराव्या शतकानंतर बांधलेल्या समाध्यांवर याची छाप दिसते. फलटण येथील िनबाळकरांच्या समाध्या, शेगावजवळच्या बाळापूर गावात जसवंतसिंहाने बांधलेली समाधी यावर राजस्थानी शैलीतील प्रभाव दिसून येतो.

वीरगळ, सतीशिळा, गद्धेगाळ, गायवासरू दगड (धेनुगळ) हे काही अपवाद वगळले तर मूक दगड आहेत. कारण त्यावर कुठलेही लिखाण नसल्यामुळे ते कुठल्या काळातले आहेत, कशाबद्दलचे आहेत हे कळत नाही. शिलालेखामुळे ही उणीव भरून निघाली आणि दगड बोलके झाले. मौर्य सम्राट अशोकच्या काळात इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात शिलालेख कोरण्यास सुरुवात झाली.  आजमितीला महाराष्ट्रात लेण्यांमध्ये, किल्ल्यांत, मंदिरांत, तोफांवर संस्कृत, मराठी, उर्दू, फारसी, पोर्तुगीज, इंग्रजी भाषेतील तसेच ब्राह्मी, मोडी, देवनागरी इत्यादी लिपीतील शेकडो शिलालेख पाहायला मिळतात.

धारुर किल्ल्यावर एकच शिलालेख संस्कृत, उर्दू आणि फारसीत कोरलेला आहे. विजय संपादन केल्यावर, किल्ला मंदिर, मंदिर, मस्जिद इत्यादींची बांधणी, पुनर्बाधणी दानपत्र म्हणून जो शिलालेख लिहिलेला असतो त्यात पाच गोष्टींचा उल्लेख असतो. हे दानपत्र कोणी दिलं, कोणाला दिलं, कधी दिलं, दानात काय दिलं आणि त्या वेळी कोण कोण उपस्थित होते याची माहिती कोरलेली असते. किल्ल्याची बांधणी, पुनर्बाधणी केल्यावर करणाऱ्याचे नाव, तारीख, त्या बुरुजाचे, दरवाजाचे नाव कोरलेले असते.  इस्लामी काळात महालामध्ये, मशिदीत कुराणातील वचन, आयता कोरलेल्या पाहायला मिळतात. मंदिरातही अनेक शिलालेख पाहायला मिळतात. त्यात मंदिर बांधणाऱ्याचा, त्याचा जीर्णोद्धार करणाऱ्याचा उल्लेख केलेला असतो. लेण्यातही दान देणाऱ्याच्या नावाचा शिलालेख कोरलेला असतो. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्य़ातील अंतुर किल्ल्यापासून नागापूरला जाताना रस्त्याच्या बाजूस डावीकडे एक पुरातन मलाचा दगड पाहायला मिळतो. त्यावर फारसी भाषेत चार शहरांना जाणारे मार्ग चार बाजूंना कोरलेले आहेत. वीरगळ, सतीशिळा, गद्धेगाळ, धेनुगळ, शिलालेख यावर लिहिलेली माहिती बऱ्याचदा त्रोटक असते. त्या काळाच्या संदर्भात त्यांचा अभ्यास केल्यास बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो, नवीन संदर्भही मिळू शकतात.  इतिहासाचे असे अनेक मूक, बोलके साक्षीदार आपल्या आजूबाजूला विखुरलेले आहेत. त्यांच्याकडे डोळसपणे पाहिलं तर काळाच्या ओघात इतिहासातील हरवलेले दुवे आपल्याला नक्कीच सापडू शकतात.

(समाप्त)

अमित सामंत response.lokprabha@expressindia.com