मथितार्थ
भारतीयांचे अर्धे लक्ष राजकारणावर आणि उरलेले बॉलीवूड व क्रिकेटवर खिळलेले असते. राजकारण आणि बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या कोलांटउडय़ांची मजा घेताना मात्र देशाचे संरक्षण हा संवेदनशील व महत्त्वाचा विषय दुर्लक्षिला जातो. संरक्षण व्यवस्थेतील प्रश्न, समस्या यांच्याकडे तर भारतीय म्हणून कधीच आपले लक्ष नसते. त्यात लक्ष घातले तर अस्वस्थता वाढून वेदनाच अधिक होतील म्हणून आपण सोईस्कर दुर्लक्ष करतो. पण तिथे लिहिल्या जात असलेल्या नव्या, चांगल्या अध्यायांचे काय? त्याबद्दल आनंद, समाधान व्यक्त करणे हेही भारतीय म्हणून आपले कर्तव्य आहेच की! पण तिथेही आपण कमी पडतो.
२०१४ ला सामोरे जाताना दोन महत्त्वाच्या गोष्टी या देशात घडल्या. त्यातील पहिली म्हणजे गेली सुमारे ४० वर्षे या देशाच्या हवाई सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी सक्षमपणे पेलणारी मिग ही लढाऊ विमाने आकाशाच्या दिशेने अखेरची झेपावली. कोलकत्याच्या दक्षिणेस असलेल्या कलाईकुंडा या हवाई दलाच्या तळावरून त्यांनी अखेरचे उड्डाण केले. खरे तर मिगला झालेल्या अपघातांनंतर त्यांच्या माथी बदनामीच अधिक आली. अखेरच्या पाच- सहा वर्षांमध्ये तर त्यांना हवाई दलातून निवृत्त करावे आणि वैमानिकांचे प्राण वाचवावेत, यासाठी काही मोहिमाच हाती घ्याव्या लागल्या. अर्थात यात मिगचे चुकण्यासारखे काही नव्हते. त्यांचे आयुष्यमान संपलेले होते आणि त्यांच्याकडून तरीही खूप मोठे काम करून घेण्याचा प्रयत्न आपणच करत होतो. खरे तर वेळोवेळी झालेले तत्कालीन संरक्षण मंत्री त्यासंदर्भातील निर्णय घेण्यात कमी पडले. झाले काय की, या साऱ्याचे खापर आपण मिगवर फोडले. सामान्यांच्या दृष्टीने विचार करता ते साहजिकच होते. कारण सामान्य माणूस केवळ डोळ्यांसमोर जे दिसते त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न फारसा कधीच करत नाही.
पण ही तीच मिग विमाने होती की जी दरदिवशी भारताच्या हवाई हद्दीच्या दिशेने झेपावायची आणि चारही बाजूंना असलेल्या हवाई सीमांचे रक्षण करण्याचे काम करायची. पाकिस्तानविरोधातील १९७१ च्या युद्धात तर त्यांनी बजावलेल्या भूमिकेमुळेच भारताला विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकता आले. याच मिग विमानातून भारतीय वैमानिकांनी ढाकामधील संसदेवर थेट हल्ला चढवून पाकिस्तानला केवळ चकित केले नव्हते तर त्यांच्या उरात धडकी भरवली होती. अशा या मिगचा अखेरचा ताफा भारतीय हवाई दलातून सेवानिवृत्त झाला. भारतीय हवाई दलातील ती पहिली स्वनातीत म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने जाणारी विमाने होती.
त्याच वेळेस दुसरीकडे एक नवा तेज:पुंज अध्याय भारतीय हवाई दलाच्याच नव्हे तर भारताच्याच इतिहासात लिहिला गेला तो होता ‘तेजस’चा.  कोणत्याही देशासाठी त्यांनी विमानाची निर्मिती करणे किंवा लढाऊ विमानाची निर्मिती करणे हा देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा असा टप्पा असतो. साधारणपणे ९०च्या दशकात आपल्याला असे लक्षात आले की, महासत्तेच्या किंवा प्रगत देशाच्या दिशेने जायचे तर आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार त्यात विमान निर्मिती हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. त्यातही लढाऊ विमानाची निर्मिती म्हणजे तंत्रज्ञानातील पारंगतताच मानली जाते. म्हणून आपण स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानाच्या निर्मितीचे स्वप्न सुमारे ३० वर्षांपूर्वी पाहिले आणि गेल्या वर्षी डिसेंबरअखेरीस जेव्हा तेजस या भारतीय बनावटीच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानाला ‘इनिशिअल ऑपरेशनल क्लिअरन्स’ म्हणजे ‘अंतिम उड्डाणासाठी सक्षम’ असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले त्यावेळेस त्याचा सोहळा करण्यात आला.
अर्थात अजूनही ते पूर्णपणे लढाऊ विमान झालेले नाही. कारण त्यावर शस्त्रसाठा पूर्णपणे बसवायचा आहे. पण आता त्याच्या उड्डाणामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहिलेली नाही असे हे प्रमाणपत्र सांगते. इतर कोणत्याही लढाऊ विमानाप्रमाणेच ते पूर्ण क्षमतेने उड्डाण करू शकते. हा टप्पा पार केल्यानंतरच त्यावर शस्त्रसाठा बसविण्यात येतो. आता ते काम सुरू झाले असून या वर्षअखेरीपर्यंत पूर्णपणे शस्त्रसंभार असलेले एलसीए म्हणजेच तेजस तयार असेल अशी शक्यता आहे. पुढच्या वर्षी तर अशा प्रकारे पूर्णपणे तयार असलेली आठ तेजस विमाने तामिळनाडूतील सुलूर हवाई तळावर दाखल होणे अपेक्षित आहे. त्यानंतरच्या वर्षांत दुपटीने म्हणजेच प्रत्येक वर्षी १६ तेजस विमाने हवाई दलात दाखल होतील. सुलूरला एकूण २० तेजस लढाऊ विमानांचा ताफा कार्यरत असेल.
तेजसची निर्मिती हिंदूुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीने केली असून पहिल्या टप्प्यात भारतीय हवाई दलासाठी १२० तेजस विमानांची निर्मिती करण्यास हवाई दल आणि पर्यायाने संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. आता त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये लढाऊ क्षमता वाढविण्यासाठीच्या चाचण्या आणि सुधारणा करण्यात येणार आहेत. तेजसचा हवाई हल्ल्याचा संभार तयार असून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच त्याच्या यशस्वी चाचण्या पार पडल्या आहेत. त्यात हवेतून हवेत डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांचा प्रामुख्याने समावेश होता. याशिवाय जवळ आलेल्या लक्ष्यावर मारा करण्यासाठीच्या अत्याधुनिक बंदुका आणि नजरेच्याही पल्याड असलेल्या लक्ष्याचा भेद करण्यासाठीची क्षेपणास्त्र यंत्रणा यांचा शस्त्रसंभारामध्ये समावेश असणार आहे. ही क्षेपणास्त्र यंत्रणा अत्याधुनिक असेल. याशिवाय एक महत्त्वाची सुधारणा केली जाणार असून ती हवेतल्या हवेत इंधन भरण्याच्या आणि विमानाचा पल्ला वाढविण्याच्या संदर्भातील असणार आहे.
केवळ स्वयंपूर्ण किंवा स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान एवढेच याचे महत्त्व नाही तर त्याहीपलीकडे खूप काही आहे. हे सारे नागरिक म्हणून आपण समजावून घेणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारची निर्मिती देशातील उद्योगसमूहांच्या मदतीशिवाय शक्य नसते. तेजसच्या बांधणी आणि विकासामध्ये देशातील महत्त्वाच्या कंपन्या गुंतलेल्या होत्या. तेजसचे यशस्वी उड्डाण हे त्यांनी त्यासाठी खास विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाचे यश आहे. या तंत्रज्ञानाचा वापर या कंपन्या देशाच्या विकासात करू शकतात. ज्या वेळेस त्या देशातील उद्योग प्रगतीचा एक महत्त्वाचा  टप्पा गाठतो, त्याचवेळेस त्या देशाला विमाननिर्मिती करणे शक्य होते. पूर्वी असे मानले जायचे की, खासगी उद्योगांचा सहभाग लढाऊ विमाननिर्मितीत केला आणि त्यांनी शत्रूला ते तंत्रज्ञान दिले तर किंवा माहिती दिली तर? पण तेही तेवढे सोपे नाही. कारण एकच एक कंपनी यात समाविष्ट नसते. दुसरे म्हणजे संपूर्ण विमानातील एक छोटा भाग त्यांच्याकडे असतो. ते तंत्रज्ञान म्हणजे विमान नाही. त्यामुळे अगदीच टोकाचा विचार करून ती माहिती शत्रूकडे गेली तरी फारसा फरक पडणार नाही. शिवाय आपली गुप्तहेर यंत्रणा या साऱ्या बांबीवर लक्ष ठेवून असतेच. या सर्व मुद्दय़ांपेक्षाही एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपण आपल्या लोकांवर, उद्योगांवर विश्वास ठेवायला शिकायला हवे. तेही भारतीयच आहेत, त्यांनाही त्याचा अभिमान आहेच की. शिवाय केवळ हवाई दलानेच याची निर्मिती करायची म्हटली तर खर्च मोठा असेलच, पण त्यांना दुपटीने अधिक वर्षे लागतील. संरक्षणाचा विचार करता ते परवडणारे नसेल. हे सारे लक्षात आल्यावर भारताने खासगी भारतीय उद्योगांसाठी संरक्षणाचे दरवाजे किलकिले केले. ते व्यवस्थित उघडणे गरजेचे आहे.
दरम्यान, चीननेही हा विमान निर्मितीचा महत्त्वाचा टप्पा कधीच पार केला आहे. आता तर गेल्या वर्षी चीनने एक पाऊल पुढे जात नागरी विमानाचीही निर्मिती केली आहे. म्हणजेच या पुढच्या काळात एअरबस किंवा बोईंगच्या स्पर्धेत चिनी कंपनीही असेल. आपल्याकडे नागरी विमानाच्या निर्मितीचा टप्पा सध्या बांधणीच्या अवस्थेत आहे. शिवाय चीन, अमेरिका, फ्रान्स या देशांनी संरक्षणाच्या क्षेत्रात केलेली प्रगती हीदेखील त्यांच्या देशातील खासगी उद्योगाच्या बळावरच झाली आहे, हेही आपण समजून घेतले पाहिजे. शिवाय या संरक्षण उद्योगात विकसित केलेले तंत्रज्ञानच नंतर विविध रूपांत आपल्या घरापर्यंत पोहचत असते आणि आपले जीवन सुकर करते. आज घराघरांत असलेल्या संगणकाची निर्मिती ही प्रथम संरक्षण उद्योगासाठी करण्यात आली होती, इंटरनेटची निर्मितीही संरक्षण संदेश वेगात पाठवण्यासाठी झाली. तसेच तेजसमधून विकसित होणारे तंत्रज्ञान नंतर आपल्याही घरापर्यंत पोहोचलेले असेल; फक्त डोळे उघडे ठेवले तरच आपल्याला त्याचे ज्ञान होईल. म्हणूनच तेजसचे यश हे साधे यश नसून तो लिहिला गेलेला नवा तेज:पुंज अध्यायच आहे!