18 February 2020

News Flash

टिकटॉकचा धुमाकूळ

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या टिकटॉक अॅपच्या जन्माविषयी जाणून घेणं गरजेचं आहे.

सुरुवातीला केवळ रिकामटेकडय़ांचा पोरखेळ वाटणाऱ्या टिकटॉक अॅ पने समाजमाध्यमांच्या विश्वात अक्षरश धुमाकूळ घातला आहे.

विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com
कव्हर स्टोरी

प्रसिद्धी कोणाला नको आहे? प्रसिद्धीमागे धावणाऱ्या जगात टिकटॉक म्हणजे जादूची कांडीच! झटपट लोकप्रियता मिळवून देता देता हे चिनी अ‍ॅप अवघ्या दोन वर्षांत जगप्रसिद्ध झालं. सुरुवातीला केवळ रिकामटेकडय़ांचा पोरखेळ वाटणाऱ्या या अ‍ॅपने समाजमाध्यमांच्या विश्वात अक्षरश धुमाकूळ घातला आहे.

लोकप्रिय होणं ‘अपने बस की बात नहीं’ असं वाटणाऱ्यांच्या हाती टिकटॉकने जादूची कांडी दिली आणि अवघ्या दोन वर्षांत या नवख्या खेळाडूने समाजमाध्यमांतील प्रस्थापितांना सळो की पळो करून सोडलं. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूटय़ूब, स्नॅपचॅटसारख्या कितीतरी आधीपासून मैदानात असणाऱ्या तगडय़ा खेळाडूंपुढे आव्हान निर्माण केलं. समाजमाध्यमांच्या विश्वातल्या अमेरिकेच्या वर्चस्वापुढे प्रश्नचिन्ह उभं केलं. डेटाच्या सुरक्षिततेविषयी अनेक देशांना चिंतेत टाकलं. कधी चीनला अडचणीत आणणारे आवाज इथे दाबले जात असल्याची टीका झाली. कधी टिकटॉकसाठी चित्रीकरण करताना होणारे अपघात, नियमभंग, भावना दुखावणं, तेढ निर्माण करणं यावरून वाद झडले. कारणं काहीही असोत, टिकटॉक जन्मापासूनच चर्चेत राहिलं. सुरुवातीला केवळ पोरखेळ वाटणाऱ्या या नव्या तंत्राने अल्पावधीत विविध आघाडय़ांवर उलथापालथ घडवून आणली.

टिकटॉकविषयीच्या अनेक वादांचं मूळ आहे त्याच्या चिनी पाश्र्वभूमीत. इतर देशांतल्या समाजमाध्यमांना चीनमध्ये स्थान नाही. त्यांची समाजमाध्यमं त्यांच्यापुरतीच आणि कडेकोट बंदोबस्तात असतात. पण चिनी कंपन्या मात्र जगभरातली गर्दी खेचत राहणार आणि त्याआधारे मिळणारे आर्थिक लाभ उपभोगत राहणार, या दुटप्पीपणाविषयी नाराजी आहे. अमेरिकेत या नाराजीची तीव्रता अधिक! कारण चीनने दरवाजे बंद ठेवल्यामुळे अमेरिकेतली समाजमाध्यमं एका प्रचंड मोठय़ा ग्राहकवर्गाला आणि तेवढय़ाच मोठय़ा व्यवसायाला मुकत आहेत. त्याच वेळी चिनी टिकटॉकच्या लोकप्रियतेत मात्र अमेरिका भारतानंतर दुसऱ्या स्थानी आहे.

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या या अ‍ॅपच्या जन्माविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. अ‍ॅलेक्स झू आणि लुयू यांग या दोन मित्रांनी २०१४ साली ‘म्युझिक.ली’ हे अ‍ॅप सुरू केलं. गाणी किंवा संवादांवर लिपसिंक केलेले, कलागुण दर्शवणारे किंवा विनोदी व्हिडीओ तयार करून ते जगासमोर मांडण्याची संधी या अ‍ॅपने दिली. बीजिंगमधल्या झँग यिमिंग यांच्या ‘बीजिंग बाइट डान्स टेक्नॉलॉजी कंपनी’ने २०१७ साली अवघ्या एक अब्ज डॉलर्समध्ये हे अ‍ॅप खरेदी केलं आणि त्याचं टिकटॉक असं बारसं झालं. २०१९पर्यंत या अ‍ॅपच्या माध्यमातून १६.८ अब्ज डॉलर्स एवढा महसूल मिळवण्याचं लक्ष्य बाइट डान्सने निश्चित केलं होतं. प्रत्यक्षात गेल्या दोन वर्षांत टिकटॉकद्वारे मिळालेला महसूल तब्बल ७५ अब्ज डॉलर्सचा आकडा पार करून पुढे गेला आहे. यावरूनच या अ‍ॅपच्या अजस्र यशाची कल्पना येऊ शकेल.

अशा प्रकारे अवघ्या दोन वर्षांत जगातल्या अनेक देशांत लोकप्रियतेचे विक्रम मोडणारं टिकटॉक चीनमध्ये मात्र उपलब्धच नाही! तिथे बाइट डान्सचंच ‘डॉइन’ हे स्वतंत्र अ‍ॅप आहे. केवळ चीनपुरतंच मर्यादित असलेलं हे अ‍ॅप म्हणजे टिकटॉकचं प्रगत रूप आहे. डॉइन २०१६पासून म्हणजेच टिकटॉकच्या आधीपासूनच तिथे उपलब्ध आहे. अर्थातच डॉइनचे युझर्स आणि तिथे गोळा झालेला डेटाही टिकटॉकपेक्षा जुना आहे. इंटरनेटसंदर्भात चीनमध्ये असलेल्या नियमांचं पालन करता यावं म्हणून एका स्वतंत्र सव्‍‌र्हरद्वारे या अ‍ॅपचा कारभार चालवला जातो.

डॉइन हे टिकटॉकप्रमाणे निव्वळ मनोरंजन करणारं अ‍ॅप नाही. व्यावसायिक वापराच्या दृष्टीने ते टिकटॉकपेक्षा अधिक प्रगत आहे. या अ‍ॅपमधील व्हिडीओत दिसणारी उत्पादनं अवघ्या तीन टॅप किंवा क्लिकमध्ये खरेदी करता येतात. एखाद्या हॉटेल रूममध्ये व्हिडीओ शूट केलेला असेल, तर अ‍ॅपद्वारे सहज ती रूम बुक करता येते. व्हिडीओत दिसणाऱ्या अनेक व्यक्तींपैकी एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं चित्रण असणारे अन्य व्हिडीओ पाहायचे असतील, तर फेस रेकग्निशनचा पर्यायही देण्यात आला आहे. अशा प्रकारे व्यवसायाच्या दृष्टीने हे अ‍ॅप अधिक उपयुक्त आणि अद्ययावत आहे. टिकटॉकमध्ये ही सर्व फीचर्स सध्या तरी नाहीत. इतरांच्या तुलनेत ते नवखंच आहे. तरीही अनेक समाजमाध्यमांच्या गदारोळात टिकटॉकचं नाणं खणखणीत कसं वाजलं, हे जाणून घ्यायला हवं.

टिकटॉक हे फेसबुक, इन्स्टाग्रामप्रमाणे मित्र मिळवण्याचं किंवा वाढवण्याचं ठिकाण नाही. इथे तुम्हाला फॅन्स मिळवावे लागतात. इथला आशय चकचकीत असण्याची गरज नाही. सुंदर रंगरूप, महागडे कपडे, लोकेशन्स, लाइट्स, साउंड्स यावर एक दमडीही खर्च न करता इथे कोणीही हिरो किंवा हिरोइन होऊ शकतं. अब्जावधी लोकांपर्यंत पोहोचू शकतं. फक्त जे काही कराल ते तुमची कल्पकता दाखवणारं असायला हवं. आणखी एक वेगळेपण म्हणजे इथे तुम्हाला उत्तम इंग्रजीत पोस्ट लिहिण्याची गरज नाही. त्यामुळे केवळ भाषेच्या न्यूनगंडामुळे इतर माध्यमांपासून दूर राहणारेही इथे मोकळेपणाने व्यक्त होतात. थोडक्यात झटपट लोकप्रिय होण्याचं सूत्र टिकटॉकने वापरकर्त्यांच्या हाती दिलं आणि वापरकर्त्यांनीही ते अक्षरश डोक्यावर घेतलं. शेवटी प्रसिद्धी कोणाला नको असते?

या प्रसिद्धीलोलुपतेचं फलित म्हणजे गेल्या वर्षभरात भारतात सर्वाधिक डाउनलोड झालेल्या अ‍ॅप्समध्ये टिकटॉक पहिल्या स्थानी पोहोचलं. पण नव्या तंत्रज्ञानाचा आनंद घेताना, त्यामागोमाग येणाऱ्या धोक्यांचा विचार करणं अनेकदा राहूनच जातं. अ‍ॅप्स आपल्याला अनेक सेवा मोफत देतात. पण बहुतेक वेळा ‘मोफत’ हे केवळ चकाकतं वेष्टन असतं. ते पाहून आपण भुलतो आणि आपल्याही नकळत रोजच्या रोज मोठी किंमत मोजू लागतो. ही किंमत म्हणजे आपला डेटा. या डेटाच्या सुरक्षिततेवरून नेहमीच कोणतं ना कोणतं अ‍ॅप वादाच्या गर्तेत अडलेलं दिसतं. अ‍ॅपची लोकप्रियता जेवढी मोठी, तेवढे हे धोकेही मोठे. टिकटॉकबाबत तर हे संशयाचं धुकं अधिक दाट आहे. टिकटॉकच्या हाती लागलेला डेटा चीनला पुरवला जात असल्याचा आरोपही अनेकदा केला जातो. टिकटॉकचा सव्‍‌र्हर चीनमध्ये नाही, त्यामुळे चीनला डेटा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं स्पष्टीकरण ‘बाइट डान्स’कडून दरवेळी दिलं जातं. पण चीन सरकारने मागितलेली माहिती देणं चिनी कंपन्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे टिकटॉकवरच्या डेटाच्या सुरक्षेविषयी जगाची चिंता अनाठायी नाही.

टिकटॉकवरून भावना भडकवणारे, हिंसेला चालना देणारे, दोन समाजांत तेढ निर्माण करणारे व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यावरून इंडोनेशिया, बांगलादेश आणि भारतातही काही काळ टिकटॉकवर बंदी घालण्यात आली होती. अमेरिकेत डेटा सुरक्षिततेच्या मुद्दय़ावरून लष्कराशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला टिकटॉक वापरण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा अकाउंटविषयी तक्रार आल्यास टिकटॉक ते व्हिडीओ डिलीट करतं. अकाउंट्सवरही बंदी घालण्याची कारवाई केली जाते. पण इंटरनेटवर एकदा अपलोड झालेला आशय कायमचा मिटवता येणं अशक्यच! तर या स्वरूपाच्या तक्रारींसंदर्भातला एक अहवाल (ट्रान्स्परन्सी रिपोर्ट) टिकटॉकने नुकताच आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला. त्यात विविध देशांतून आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा अकाउंटसंदर्भात जानेवारी ते जून २०१९ दरम्यान टिकटॉककडे आलेल्या तक्रारींची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली होती. अशा तक्रारी करणाऱ्यांत भारताचा पहिला तर अमेरिकेचा दुसरा क्रमांक होता. या सहा महिन्यांत एकूण १०७ तक्रारी करण्यात आल्या. त्यापैकी ११ व्हिडीओ आणि नऊ अकाउंट्सवर कारवाई करण्याची मागणी केंद्र सरकारने केली होती. सरकारने केलेल्या तक्रारींपैकी चार व्हिडीओ आणि आठ अकाउंट्सवर कारवाई करण्यात आल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं होतं. अवघ्या सहा महिन्यांत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तक्रारी आणि तक्रारींत पहिला क्रमांक यावरून नेमका आपला आशय आक्षेपार्ह आहे की आपण जरा जास्तच संवेदनशील झालो आहोत, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

टिकटॉक आणि हॅलो ही दोन अ‍ॅप्स देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याची तक्रार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या स्वदेशी जागरण मंचाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीच्या आधारे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दोन्ही अ‍ॅप्सकडून स्पष्टीकरण मागितलं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे इतर देशांतील तक्रारी अहवालाद्वारे प्रसिद्ध करणाऱ्या बाइट डान्सने चीनमधल्या डॉइनविषयीच्या तक्रारींची आकडेवारी मात्र कधीही जगासमोर मांडलेली नाही.

चीनमधील सरकारच्या धोरणांवर टीका करणारे किंवा चीनसाठी त्रासदायक ठरतील, अशा स्वरूपाचे व्हिडीओ टिकटॉकवरून डिलीट करण्यात येत असल्याचा आरोप अनेकदा केला जातो. हाँगकाँगमध्ये चीनविरोधात झालेल्या आंदोलनांचे व्हिडीओ असेच अचानक गायब केल्याचे आरोप झाले होते. त्यावर अशा प्रकारे चीन सरकारने व्हिडीओ डिलीट करण्याचे आदेश कधीही दिलेले नाहीत आणि दिले तरीही त्यांचं पालन केलं जाणार नाही, असं स्पष्टीकरण टिकटॉककडून देण्यात आलं होतं. आशय सेन्सॉर करण्यावरून फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झकरबर्ग यांनीही टिकटॉकला लक्ष्य केलं होतं. फेसबुकच्या मालकीचं व्हॉट्सअ‍ॅप ‘एण्ड टू एण्ड  एण्ड एन्क्रिप्शन’ने सुरक्षित करण्यात आलं आहे. या तंत्रामुळे केवळ एकमेकांशी संवाद साधणाऱ्या दोन व्यक्ती वगळता अन्य कोणालाही, अगदी स्वत व्हॉट्सअ‍ॅपलाही त्यांच्यातला संवाद जाणून घेता येत नाही. एकीकडे एवढं सुरक्षित अ‍ॅप दिलं जात असताना दुसरीकडे टिकटॉकसारखं आशय सेन्सॉर करणारं अ‍ॅप वापरणं योग्य आहे का, असा प्रश्न झकरबर्ग यांनी हाँगकाँगमधले व्हिडीओ सेन्सॉर केल्याच्या पाश्र्वभूमीवर उपस्थित केला होता. ‘अशा प्रकारचं इंटरनेट आपल्याला हवं आहे का,’ असा सवाल त्यांनी एका परिषदेत केला होता.

हे झाले राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न. पण टिकटॉकमधल्या सिक्युरिटी बग्जमुळे वैयक्तिक नुकसान झाल्याची उदाहरणंही अनेक आहेत. वापरकर्त्यांची खासगी माहिती इतरांच्या हाती लागू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना टिकटॉक अ‍ॅप तयार करताना केल्या नसल्याचं अनेकदा उघडकीस आलं आहे. हॅकरने एखादं अकाउंट हॅक करून त्यावरची वैयक्तिक माहिती मिळवल्याच्या, त्यात बदल केल्याच्या, व्हिडीओचं सेटिंग (‘प्रायव्हेट’ व्हिडीओ ‘पब्लिक’ करणे) बदलल्याच्या, व्हिडीओ डिलीट केल्याच्या, युझरचा ईमेल आयडी किंवा मोबाइल नंबर मिळवून त्याचा गैरवापर केल्याच्या अनेक तक्रारी जगभरात ठिकठिकाणी दाखल झाल्या आहेत.

टिकटॉक आणि बालकांची सुरक्षितता हा मुद्दाही अनेकदा चर्चेत आला आहे. अ‍ॅप पोर्नोग्राफी आणि हिंसक दृश्यांवरून वारंवार वादात सापडलं आहे. त्यामुळे हे अ‍ॅप बालकांच्या हाती पडणं योग्य नाही, अशी टीका होत असते. बालकांशी संबंधित माहितीची चोरी केल्याच्या मुद्दय़ावरून टिकटॉकला अमेरिकेच्या ‘फेडरल ट्रेड कमिशन’ने ५.७ कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला होता. टिकटॉकची आधीची कंपनी ‘म्युझिक.ली’ने पालकांची परवानगी न घेता बालकांचं वय, शाळा, ईमेल आयडी इत्यादी माहिती चोरल्याचा आरोप त्यात करण्यात आला होता. अल्पवयीन व्यक्तींना टिकटॉकचा अ‍ॅक्सेस मिळू नये म्हणून काय उपाययोजना करण्यात आली आहे, याचं उत्तर देण्यात टिकटॉक अपयशी ठरलं होतं.

टिकटॉकच्या लोकप्रियतेत भारताचा पहिला क्रमांक लागतो. या अ‍ॅपची ‘मातृभूमी’ असलेल्या चीनलाही (डॉइन) यात भारताने मागे टाकलं आहे. याचा संबंध आर्थिक विकासाशी आणि शहरीकरणाच्या प्रमाणाशी असल्याचा अंदाज वर्तवला जातो. कारण चिनमधलं टिकटॉकचं भावंड डॉइन तिथल्या बीजिंग, शांघायसारख्या पहिल्या आणि दुसऱ्या दर्जाच्या शहरांत फारसं लोकप्रिय नाही. त्यावर निर्माण केला जाणारा आशय तिथल्या महानगरांतल्या तरुणांच्या पसंतीस उतरत नाही. चीनच्या तुलनेत भारतातला शहरीकरणाचा वेग कमी आहे. भारतातही ग्रामीण भागांत टिकटॉकची लोकप्रियता अधिक आहे. तिथून निर्माण होणारा आशयही शहरांच्या तुलनेत अधिक आहे.

फायदे, तोटे, धोके यांचा विचार केला तरीही टिकटॉकने समाजमाध्यमांना हादरवलंय हे  निश्चित! समाजमाध्यमांतलं अंतिम सत्य एकच आहे. इथे निरंतर असं काहीही नाही. एखादं तंत्र लोकप्रिय होईपर्यंत दुसरं त्यापेक्षा अधिक अजस्र असं काही ना काही बाजारात येतं आणि आधीच्या तंत्राला अक्षरश गिळूनच टाकतं. या प्रक्रियेदरम्यानच्या काळात या क्षेत्रातले इतर खेळाडू एकतर अस्तित्वात असलेलं लोकप्रिय अ‍ॅप खरेदी करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याची नक्कल तरी बाजारात आणतात. सध्या तरी टिकटॉकचा धुमाकूळ थांबवू शकेल असं बाजारात काहीच नाही. टिकटॉक वापरकर्त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी फेसबुकने ‘लासो’ नावाचं अ‍ॅप तयार केलं होतं, मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फेसबुकने रिल्स नावाचं एक नवं फीचर उपलब्ध करून दिलं. सुरुवातीला त्याची चाचणी ब्राझीलमध्ये घेण्यात आली. ज्या देशांत टिकटॉक लोकप्रिय नाही, तिथे या फीचरची चाचणी घेऊन नंतर जिथे टिकटॉकचे वापरकर्ते मोठय़ा प्रमाणात आहेत, तिथे ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर इन्स्टाग्रामवरही सिन नावाचं फीचर देण्यात येणार आहे. त्यात स्टोरीतील व्हिडीओ एडिट करण्याची, त्यांची लांबी, वेग कमी-अधिक करण्याची, त्यांना पाश्र्वसंगीत देण्याची सोय असणार आहे. या फीचरचं टिकटॉकशी बरंच साधम्र्य असणार आहे.

अमेरिकन कंपन्यांच्या स्पर्धेत टिकटॉकचा करिष्मा किती काळ टिकतो, त्यासाठी कोणते नवे पर्याय निर्माण होतात, व्यवसायाचं हेच सूत्र वापरून आणखी काही चिनी समाजमाध्यमं स्वतचं अस्तित्व निर्माण करतात का, याविषयी सध्या समाजमाध्यमांत उत्सुकता आहे. थोडक्यात टिकटॉकचा दोन वर्षांतला प्रवास पाहता, नवनवी, आकर्षक फीचर्स आणून अधिकाधिक वापरकर्त्यांना आपल्याकडे वळवणं आणि विस्तार करत राहणं यावरच बाइट डान्सचं लक्ष अधिक केंद्रित झालं आहे. विस्तार वाढवण्याच्या स्पर्धेत एवढय़ा अवाढव्य संख्येतल्या वापरकर्त्यांच्या डेटाच्या सुरक्षेकडे मात्र दुर्लक्षच झालं आहे. त्यासाठी योग्य उपाययोजना करण्यास कंपनीने फारसं प्राधान्य दिल्याचं दिसत नाही. त्यामुळे विश्वासार्ह अ‍ॅप म्हणून स्वतची प्रतिमा निर्माण करण्यात टिकटॉक अपयशी ठरलं आहे.

First Published on January 17, 2020 1:03 am

Web Title: tiktok popularity
Next Stories
1 टिकटॉक चालते जोमात!
2 विद्यार्थी चळवळी नेतृत्वाच्या शोधात!
3 वार्षिक भविष्य २०२०
Just Now!
X