विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
भारतीय संस्कृतीतील धर्मामध्ये तीर्थ नावाची संकल्पना असून ती नैसर्गिक जलस्रोतांशी आणि पर्यायाने त्यांच्या पावित्र्याशी जोडलेली आहे. भारतात सापडलेले सर्वात प्राचीन मंदिर हेदेखील नदीकिनारीच होते. त्या संकल्पनेवरूनच तीर्थयात्रा ही संकल्पना नंतर विकसित झाली. आदिम काळापासून म्हणजे मानवी जीवन हे संस्कृती म्हणून सुरू होण्यापूर्वीपासूनच पाण्याचे पर्यायाने जलस्रोतांचे महत्त्व अधोरेखित झालेले होते. किंबहुना म्हणूनच पाण्याला ‘जीवन’ हा समानार्थी शब्दप्रयोगही केला जातो. पण या जलजीवनाची आजची स्थिती अतिशय भयावह आहे. गेली काही वर्षे विशिष्ट गरज अधोरेखित करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन एक ठरावीक विषय घेऊन साजरा केला जातो. परिसंस्थांचे पुनरुज्जीवन हा यंदाचा विषय आहे. त्यानिमित्ताने तिन्ही बाजूंनी समुद्र असलेल्या, नदी-नाले, तळी, सरोवरे यांचे प्रमाण विपुल असलेल्या भारतासारख्या देशाच्या बाबतीत जलस्रोतांशी संबंधित परिसंस्था या अनन्यसाधारण महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच या निमित्ताने आपल्याकडील या परिसंस्थांची सद्य:स्थिती जाणून घेणे अत्यावश्यक ठरावे.

भारतात १४ प्रमुख नद्या आहेत, गंगा-यमुना या दोन्ही देशांतील महत्त्वाच्या नद्या, त्यातील गंगा ही सर्वात मोठी नदी. आज दोन्ही नद्या मोठय़ा प्रमाणावर प्रदूषित आहेत. एकेकाळी गंगेचे पाणी एवढे शुद्ध होते की, विदेश प्रवासातही ते बाटलीत भरून नेले तरी स्वच्छच राहायचे. गंगादर्शन करणारे त्या पाण्याचे भरलेले गडू घेऊन जायचे आणि भाविक ते तीर्थ म्हणून प्राशन करायचे या दंतकथेवरच आपण जगतो आहोत. विजय मुडशिंगीकरांसारखी पर्यावरणवादी मंडळी महाराष्ट्रातून गंगाकाठावर जाऊन गावोगावी काम करत आहेत. राजीव गांधींनी गंगा शुद्धीकरण प्रकल्प आणला खरा, मात्र एवढय़ा वर्षांनंतरही ‘गंगा मलीनच राहिली’ हे प्रदूषित वास्तव आहे. यमुनेच्या बाबतीत तर आपण यापूर्वीच तिला अधिकृतरीत्या मृत नदी म्हणून घोषित केले आहे.

गंगेचेच कशाला अगदी महाराष्ट्रातील नद्यांची स्थितीही काही फारशी दिलासादायक नाहीच. मानवी आयुष्याचा अतिप्राचीन जीवनाधारस्रोत राहिलेल्या या नदीकडे आपण आई-वडिलांची जपणूक करावी, त्याच भूमिकेतून पाहायला हवे. आपण यांच्याच काठावर उद्योगध्ांदे आणून उभे केले, कारण त्यांना मोठय़ा प्रमाणावर पाणी लागते. बहुतांश एमआयडीसी कोठे उभ्या आहेत आणि तेथील सांडपाणी व औद्योगिक कचरा कुठे विसर्जित होतो याचा शोध घेतला तर डोळे उघडणाऱ्या खूप गोष्टी अगदी सहज लक्षात येतील. अनेक शहरे हीदेखील आता नदी किंवा खाडीकिनारी विकसित झाली आहेत. भारतातील अशा मोठय़ा शहरांची संख्या ५३ आहे. त्यांचे सांडपाणी विसर्जन याच जलस्रोतांमध्ये होते. अनेकांच्या बाबतीत सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच आपण ते या जलस्रोतांमध्ये सोडून देतो. एक अब्ज ३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाची अर्थव्यवस्था कृषीआधारित आहे आणि ९० कोटी लोकसंख्या ग्रामीण भागात जलस्रोतांशेजारी राहाते. हे जलस्रोत वाहात वाहात शहरांत पोहोचतात तेव्हा त्यांच्याच किनारी आपण क्षेपणभूमी तयार करतो आणि प्रदूषण वेगास करण्यास हातभार लावतो. बहुसंख्य क्षेपणभूमी खाडी किंवा नदीकिनारी आहेत हे दुसरे वास्तव.

म्हणूनच उत्तराखंड उच्च न्यायालयाने गंगा-यमुनेस व्यक्तीचा दर्जा देणारा निवाडा २०१७ साली जारी केला त्या वेळेस पर्यावरणवाद्यांना आनंद झाला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यावर अक्षरश: ‘पाणी फेरले’! त्यामुळे जलस्रोतांना तीर्थस्थळांचा दर्जा द्यायचा आणि दुसरीकडे प्रदूषण करतच राहायचे हा भंपकपणा समाजाने सोडायला हवा. म्हणूनच विजया जांगळे यांनी लिहिलेली आणि जलस्रोतांच्या बाबतीत आपले डोळे उघडणारी मुखपृष्ठकथा म्हणूनच या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ‘लोकप्रभा’ने सादर केली आहे. तिच्या शीर्षकात म्हटले आहे त्याप्रमाणे ‘एवढंच करा, काहीही करू नका!’

हाच संदेश आपण ऐकला तरी पुरे!