पर्यटन विशेष : आम्ही पाहिलेला युरोप

वास्तुशैलींसाठी प्रसिद्ध अशा इमारती, आल्प्सच्या रांगा, सतत भुरभुरणारा बर्फ, थंडी, चॉकोलेट्स, यांचा आस्वाद घेत स्वच्छ, सुंदर देखणे युरोप पाहण्याची, अनुभवण्याची मजा काही औरच असते.

वास्तुशैलींसाठी प्रसिद्ध अशा इमारती, आल्प्सच्या रांगा, सतत भुरभुरणारा बर्फ, थंडी, चॉकोलेट्स, यांचा आस्वाद घेत स्वच्छ, सुंदर देखणे युरोप पाहण्याची, अनुभवण्याची मजा काही औरच असते.

युरोपला जाण्यासाठी आमचे फ्लाइट मुंबई ते दोहा – दोहा ते लंडन असे होते. मुंबईहून दोह्य़ाला पोहोचल्यानंतर दोह्यातून सकाळी सहा पस्तीसला डिपार्चर झाले. मी खिडकीतून बाहेर पाहिले. समुद्र, घरे, रस्ते, वाहने अगदी लहान दिसू लागली. क्षणातच विमानाने भरारी घेतली आणि आकाशातील पांढऱ्या ढगांवर ते आरूढ झाले. दुपारी बारा वाजता विमान उतरण्याची सूचना झाली. बाहेर पाहिले तर प्रचंड धुकेच धुके. बाकी काहीच दिसत नव्हते. मनात शंका आली विमान कसे उतरणार? पण पायलटने विमान अचूक खाली आणले. हिथ्रो विमानतळावर उतरण्याची ही माझी दुसरी वेळ होती.
आम्ही ट्रॅव्हल्सने निघालो होतो. मिस्टर आणि मिसेस पाटील आणि आम्ही दोघे अशी दोन जोडपी युरोप पाहायला निघालो. तेथील रस्ते प्रशस्त, कमालीची शांतता, आखीव रेखीव रस्त्याकडेची झाडे ! दुतर्फा इंग्रजी धर्तीची कौलारू घरे दिसू लागली. दुसऱ्या दिवशी लंडन आय, थेम्स नदी, झुलता पूल पाहिले. थेम्स नदीकाठी वसलेले लंडन शहर, उंच आकाशाला भिडणाऱ्या अतिशय सुंदर इमारती, त्यांचे सौंदर्य नदीच्या पाण्यात प्रतिबिंबित झाले होते. लंडन आय हे फार मोठे आकर्षण होते. प्रचंड आकाशाशी भिडणाऱ्या वर्तुळाकार गोलाकार लिफ्टमधून वर्तुळ फिरत होते. आम्ही हळूहळू उंच जाऊ लागलो. टॉपवर पोहोचलो नि लंडनच्या कानाकोपऱ्याचे दर्शन झाले. या अप्रतिम दृश्याने डोळ्यांचे पारणे फिटले.
लंडनमध्ये फिरताना जाणवले की तेथील घरे-खिडक्या, दारे एकसारखीच होती. प्रत्येक घराला चिमण्या मात्र होत्या. रस्त्याच्या कडेला हिरवळ दिसत होती. अंतरा अंतरावर झाडे लावलेली होती. दुसऱ्या दिवशी आम्ही रेल्वे स्टेशनवर गेलो. आम्ही लंडन ते पॅरिस ट्रेनने प्रवास करणार होतो. बॅगा-पासपोर्ट चेकिंग झाले. एकाच्या पासपोर्टमध्ये शंका निघाली त्याला बाहेर काढले गेले. त्याचे पुढे काय झाले कळलेच नाही.
रेल्वे स्टेशनवर घाई गर्दी कुठेच दिसत नव्हती. सगळेच कसे शिस्तबद्ध! लिफ्ट, सरकते जिने यातून आम्ही रेल्वेत शिरलो. मला मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनची आठवण झाली. नुसती झुंबड, घाईगर्दी, चेंगराचेंगरी, आत गर्दी, बाहेर गर्दी, माणसाचे लोंढेच्या लोंढे.. इथे तसे नव्हते. ही ट्रेन ताशी ३०० कि.मी. वेगाने जाते. ती स्वच्छ होती. डब्यात शांतता होती. कुणी वाचनात मग्न होते. कुणी लॅपटॉप उघडून त्यांचे काम करत होते. गाडी भरधाव वेगाने चालली होती. गाडीतून बोगदे, हिरवळ, पिवळी शेते, दुतर्फा दिसत होती.
आम्ही पॅरिसला पोहोचलो. आयफेल टॉवर पाहण्यासाठी गेलो. गर्दी खूप होती. युरोपियन लोक जीन्स, स्वेटरमध्ये होते. आम्ही भारतीय मात्र कपडय़ांमुळे वेगळे दिसत होतो. तेथेही तिकीट बुकिंग चालले होते. तिकिटे काढून रांगेत उभे राहिलो. तेथे मात्र थंडी फारच होती. पण सूर्याची उन्हे दिसत होती. सूर्याच्या किरणांनी पॅरिसच्या सौंदर्यात भर घातली होती. आम्ही लिफ्टने वर जाऊ लागलो. तीन टप्प्यांवरून दृश्य पाहावयास मिळाले. आम्ही तिसऱ्या टॉपच्या टोकावर गेलो. तिथून संपूर्ण पॅरिसचे दर्शन झाले. तेथील पूल, नद्या, घरे, उंच इमारती, शहरीकरण यांचा उत्तम नमुना नजरेस पडला. सर्व काही अप्रतिम होते. फ्रान्सची राजधानी पॅरिस हे फॅशनचे उगमस्थान आहे. पॅरिसची संध्याकाळ पाहण्यासारखी असते. आकाशातील ग्रह, ताऱ्यांनी खाली येऊन हिरे, माणिक, रत्ने धारण करून जणू काही फेर धरला आहे, नव्हे जणू कंठातील हिऱ्यांचा हारच धरणीमातेने जणू ल्यायला आहे असे वाटत होते.
पुढे आम्ही फ्रान्समध्ये फिरलो. रस्त्यावर सिग्नल दिसत होते, पण ट्रॅफिक पोलीस दिसत नव्हता. युरोपात प्रत्येक शहराची रचना वेगळी आहे. फ्रेंच राज्यक्रातींच्या वेळी तेथील राजा-राणीला (१४वा लुई) ठार करण्यासाठी फ्रेंच सैनिकांनी युद्ध केले. त्या युद्धात ११२ फ्रेंच सैनिकांनी प्राण पणास लावले. राणीला वाचविण्यासाठी पराक्रमाची शर्थ करणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ घायाळ सिंहाचे चित्र रेखाटले आहे. फ्रान्समधील घरांचे नक्षीकाम विशिष्ट प्रकारचे होते. येथील डच लोकांची अतिशय सुंदर अशा रचनांची चर्च पाहावयास मिळाली.
आम्ही पुढे बेल्जियमला गेलो. तेथे डायमंडची फॅक्टरी, ग्लासची फॅक्टरी, चीझची फॅक्टरी पाहिली. एकंदर युरोपात लोकसंख्या कमी, आणि साधने जास्त होती. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स हे ऐतिहासिक शहर आहे. तेथे सायकली भरपूर प्रमाणात आहेत. सायकलींसाठी सिग्नल आहेत. सायकलींचे स्टँड आहेत. पुढे नेदरलँडला टुलीप गार्डनला भेट दिली. तेथे विविध प्रकारची, विविध आकाराची फुले दिसत होती. विविध आकाराची फुले, विविध रंगांची फुले, फुलांची उधळण! झाडांना सुंदर आकार दिला होता. हिरवळीचे विविध आकार म्हणजे युरोपियन लोकांच्या कलेची अभिरुची. बेल्जियम चॉकलेटसाठी प्रसिद्ध आहे. तेथे सू करणाऱ्या मुलाचा पुतळा आहे. त्याने असंख्य लोकांचे प्राण वाचविले. आगीपासून शहर वाचविले म्हणून त्याला गॉड म्हणतात.
पुढे आल्प्स पर्वताच्या रांगा दिसल्या. आम्ही पुढे स्विसला निघालो. निसर्गाचा एक सुंदर नमुना दिसला. बर्फानं आच्छादलेले डोंगर, उतारावर हिरवळ व सपाटीला पिवळी-हिरवी शेती.. पुढे पुढे गर्द हिरव्या, पोपटी रंगाची झाडे दिसू लागली.
येथील हवामान सारखे बदलत राहते. पावसाच्या सरी आल्या की, सगळे कसे टवटवीत होते. सूर्यबिंब ढगाआडून स्वच्छ व तेजस्वी दिसते. सूर्यकिरणांमुळे हिरवा रंग खुलून दिसतो. पर्वत शिखरावरचा डायमंड सूर्याच्या प्रकाशात लखकन चमकताना दिसतो. इंद्रधनुष्य पुन्हा त्या सौंदर्यात भर घालते. निळ्या रुपेरी आकाशात ते सात रंग उठून दिसतात. अशा प्रकारची रमणीय दृश्ये आल्प्समध्ये पाहावयास मिळतात.
आम्ही स्विसमध्ये दहा हजार मीटर उंचीवर जाण्याचे ठरविले. तेथे तीन टप्प्यावरून बर्फाच्छादित प्रदेशात जाता येते. त्यासाठी आम्ही पास घेतले. हे तीन टप्पे रोप-वेनेच करावे लागणार होते. पहिल्या टप्प्यावरून बर्फमय पर्वत दिसत होते. बर्फाच्या राशीच्या राशी, जणू बर्फाचाच डोंगर बनला आहे, असे वाटत होते. कमालीची थंडी होती. आम्ही स्वेटर, जर्किन घातले होते. बर्फाचाच पाऊस पडत होता. तिसऱ्या टप्प्यावर अक्षता पडल्याप्रमाण्ेा बर्फ पडत होते. आम्ही ओंजळी भरून चुरा एकमेकांच्या अंगावर टाकून खूप मजा केली. त्या थंडीत आईस्क्रीमही खाल्ले. रोप-वेने खाली येताना वर रुपेरी आकाश व बर्फाच्छादित प्रदेश हेच विश्व वाटत होते. तेथे आम्ही कूकू क्लॉक कारखान्यास भेट दिली. नंतर हॉलंड, ऑस्ट्रियाकडे निघालो.
ऑस्ट्रिया म्हणजे आल्प्सच्या रांगा, बर्फाचे डोंगर.. उंच पर्वत रांगामधून ऱ्हाईन नदी वाहत होती. नदीकाठी दाट हिरवळ, हिरवीगार झाडे होती. उतरणीवर कौलारू घरे उठून दिसत होती. निळे आकाश, ढगातून चकाकणारे सूर्यबिंब अप्रतिम दिसत होते. पुढे अनेक पर्वतांवरून दुधाचे लोट आपटत असल्यासारखे धबधबे दिसले. पुढे क्रिस्टलचे म्युझियम पाहिले. तेथे काचेपासून सुंदर डायमंड तयार केलेले पाहिले. तलावांची संख्या जास्त होती. त्यामुळे बोटिंगची मज्जा लुटता आली. युरोपातून प्रवास करताना जर्मनीतून जावे लागते. जर्मनीत अकराव्या शतकातील मोठे चर्च पाहिले. त्याचे बांधकाम सातशे वर्षे चालले होते. ते आम्ही पाहिले.
इटलीत बर्फाचे प्रमाण कमी होते. शेती मात्र समृद्ध दिसली. द्राक्षाचे, सफरचंदाचे मळेच्या मळे दिसले. मोहरी, गव्हाची शेते दिसली. शेतात काम करताना माणसे दिसत नव्हती. पण यंत्रे काम करताना दिसायची. इटलीमध्ये वायनरी भरपूर प्रमाणात दिसल्या. रस्त्यांचे सर्वत्र जाळे पसरलेले दिसले. वीज, पाणी, रस्ते खेडय़ांपर्यंत पसरलेले दिसले. काश्मीरच्या दल सरोवरातील शिकाराप्रमाणे इटलीमध्ये बोटी होत्या. त्यातून आम्ही सफर केली. बोटीतच डिनर घेतले. वाद्य व डिस्कोचा कार्यक्रम पाहिला. त्या तालावर आमचेही पाय थिरकायला लागले. इटलीमध्ये बोटी तयार होतात. आम्हीही बांधकाम सुरू असलेल्या, तयार झालेल्या अशा मोठमोठय़ा बोटी पाहिल्या. सात हजार माणसे वाहून नेणारी बोट प्रथम पाहिली.
प्राचीन इटलीमध्ये जुने राजवाडे होते, ऐतिहासिक इमारती होत्या. तेथे गरुड आणि सिंहाची चित्रे रेखाटलेली दिसली. अतिशय कोरीवकाम दिसून आले. मायकेल एन्जेलोने तयार केलेला येशूचा व त्याच्या आईचा, मदर मेरीचा पुतळा पाहिला. सुळावरून काढून मुलाला मांडीवर घेतलेला तिचा पुतळा पाहून मन हेलावले. अतिशय सुंदर कोरीवकाम असलेले ते भव्यदिव्य चर्च होते. अनेक धर्मगुरूंचे पुतळे होते. त्या दालनातून आम्ही दोन तास फिरलो. तेथून आमचा पाय निघत नव्हता. त्यानंतर आम्ही जगातील सर्वात मोठा उंच पिसाचा मनोरा पाहिला. हे सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य आम्ही मान उंच करून पाहत होतो. आम्ही तेथील एक मोठे थिएटर पाहिले. तेथे प्राण्यांच्या झुंजी होत असत. सात ते आठ हजार लोक बसण्याची व्यवस्था होती. ते जुने शहर अतिशय सुंदर होते. दोन हजार वर्षांपूर्वीची रोमन, ग्रीक, संस्कृती त्यांनी जतन केली होती. हे लोक पुढारलेले होते. त्या कलेत सुंदर स्त्रिया, गरुड, सिंह यांना स्थान होते. मोनालिसाचे चित्र काढणाऱ्या लिओनार्दी दा विन्सीचा पुतळा बेल्जियममध्ये पाहावयास मिळाला. काही कलाकृतींमध्ये सिंहाला गरुडाचे पंख होते.
लिक्टेस्टाइन हा देश सर्वात लहान आहे. तिथे जागतिक परिषदा होतात. अतिशय सुंदर आल्प्सच्या रांगा, हिरवीगार झाडी, सुंदर विविध रंगांची फुले, हिरवळीचे विविध आकार पाहिले. तेथे डायमंड शॉप होते, पण ते आमच्या खिशाला परवडणार नव्हते. आम्ही चॉकलेट मात्र भरपूर खरेदी केली. शॉपिंग सेंटरमध्ये फक्त एक-दोन काऊंटरला स्त्रिया होत्या. मॉलची रचना अतिशय सुंदर होती. इटलीतील कलोनियम पाहिले. तेथील प्राचीन इटलीतील सुंदर इमारती, पाण्यातील बांधकाम व नक्षीकाम सुंदर होते. तेथील स्त्रिया पुरुष गोरे, सडपातळ, अतिशय देखणे, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गुलाबी छटा दिसते.
रोम पाहिल्यानंतर आमची परतीची वाट धरली. विमानातून सुंदर रोम पाहात युरोपला बाय बाय केले.
शैलजा पाटील – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Travel and tourism special

Next Story
दानाचे स्वरुप काळानुसार बदलायला हवे