फेस्टिव्हल्स ऑफ इंडिया 
गुजरात सरकारच्या यशस्वी मार्केटिंगमुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय झालेल्या या फेस्टिव्हलमधून गुजराती संस्कृतीचं दर्शन होतं.

गुजरातमध्ये रण फेस्टिव्हलसाठी जायचं तर भूजहून धोडरे गावाजवळच्या टेण्ट सिटीला जावं लागतं. टेण्ट सिटी हे आहे वाळूने भरलेलं मोकळं मैदान. रण फेस्टिवलपुरतं एक-दीड महिना हे मोकळं मैदान जिवंत होतं, असंख्य रंगांनी सजतं.
२००९ मध्ये या महोत्सवाला सुरुवात झाली. सुरुवातीला फारसे पर्यटक सामील झाले नाहीत, मात्र अमिताभ बच्चनने या महोत्सवाला प्रमोट केल्यानंतर पर्यटकांची उपस्थिती वाढली. रण फेस्टिव्हलच्या या पांढऱ्या वाळवंटातला सूर्यास्त आणि सूर्योदय अतिशय देखणा असतो. वाळवंटात साचलेलं आणि दूरदूपर्यंत पसरेलं मीठ जेव्हा उगवतीच्या आणि मावळतीच्या तिरप्या सूर्यकिरणांनी चमकून उठतं तेव्हाचं दृश्य शब्दबद्ध करणं कठीणच! या दृश्यामुळे एक भव्य-दिव्य जाणीव मनात आकाराला येते. त्या पांढऱ्या रंगामुळे त्याला पवित्रताही लाभते.
यानंतरचा महत्त्वाचा अनुभव म्हणजे बॉर्डरकडे प्रस्थान. रण महोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या गाडय़ांना सीमेपर्यंत नेण्यात येतं आणि पर्यटक सीमेचं भक्तिभावाने दर्शन घेतात. अनेक पर्यटक रण उत्सवाला या सीमेवरील भेटीसाठी पसंती देतात.
बॉर्डर बघायची नसते त्यांच्यासाठी मांडवीचा समुद्रकिनारा, क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांचं स्मारक, ७२ कळस असलेलं आदीनाथाचं देऊळ, विजय विलास पॅलेस, भूज शहरातला आरसे महाल अशा गोष्टींचा टूरमध्ये समावेश केला जातो.
याशिवाय विजय विलास पॅलेस आणि आरसे महाल या दोन गोष्टी इतिहासाशी जोडणाऱ्या. या वास्तूंच्या भिंतींवरची कलाकुसर खूपच देखणी आहे. विजय विलास पॅलेसच्या गच्चीवरून आजूबाजूच्या परिसराचं सुंदर दर्शन होतं. आरसे महालातल्या काही ऐतिहासिक गोष्टी पर्यटकांना आजही चांगल्या स्थितीत पाहायला मिळत आहेत. .
तीन दिवसाच्या या रण महोत्सवाच्या भेटीपैकी शेवटचा दिवस हा ब्लॅक हिल्स म्हणजे काळा डोंगर आणि गांधी नु ग्रामसाठी ठेवण्यात आला आहे. या काळ्या डोंगरावरून आजूबाजूला पाहताना वाळवंट, समुद्र, डोंगररांगा असा मिलाप पाहायला मिळतो. याच डोंगरावरून कच्छ आणि भारत-पाक सीमावर्ती भाग यांना जोडणारा इंडिया ब्रिजही दिसतो.
येणारा पर्यटक घरी जाताना थोडय़ा फार आठवणी फोटोंच्या आणि भेटवस्तूंच्या रूपात घरी घेऊन जातो. त्यामुळे या टेण्ट सिटीमध्येच शॉपिंगची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. इथे बटवे, मोजडय़ा, बाहुल्यांपासून सगळ्या गोष्टी मिळतात. या भूमीवर मुलींसाठी, स्त्रियांसाठी शॉपिंगला, नटायला-थटायला खूप वाव आहे. त्या मानाने पुरुषांना खरेदीसाठी जॅकेट्स, हॅट्स, मोजडय़ा आणि कुडते एवढंच उपलब्ध आहे.
कच्छ महोत्सवात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पर्यटक उपस्थित असूनही कुठेही अस्वच्छता, गलिच्छपणा, टाकून दिलेलं अन्न, खरकटय़ाचा ढिगारा वगैरे गोष्टी पाहायला मिळत नाहीत त्यामुळे ती जागा अधिक प्रसन्न वाटते आणि जत्रा, महोत्सव अशा ठिकाणी अनेकदा वाटणारी किळस इथे अजिबात फिरकतही नाही. पर्यटकही इथल्या अतिथ्यशीलतेवर प्रचंड खूश असतात.