सह्य़ाद्रीच्या सर्वात उंच डोंगररांगेच्या मांदियाळीतील अलंग-मदन-कुलंग या किल्ल्यांच्या त्रिकुटाला कधी तरी भिडायचं हे प्रत्येक डोंगर भटक्याचं स्वप्न असतं. अनगड-अवघड डोंगरवाटा, वाट अडवणारे रॉक पॅचेस पार करत डोंगरमाथ्यावरून दिसणारा सह्य़ाद्रीचा अनुपम नजारा तुमच्या मेहनतीचं चीज करणारा असतो.

मस्त जुळून आलेली संध्याकाळ, शैल कळसूबाईचं भगवं मंदिर आता थोडय़ाच वेळात सारं दिसेनासं होईल, सगळीकडे नीरव शांततेचं साम्राज्य पसरणारं असं दिसतंय. आवाज फक्त वाऱ्यांचा, कानापासून भुर्र करीत जाणाऱ्या रातकिडय़ांचा अन् रात्रीच्या झोपेची तयारी करणाऱ्या रानपाखरांचा. चांदण्याही नटूनथटून नभांगणात अवतारताहेत. चंद्रही डोईवर आलाय. पायथ्याचं आंबेवाडी गावही दिव्यांच्या उजेडात लुकलुकतंय.

kalyan gutkha factory marathi news, malanggad gutkha factory marathi news, gutkha thane marathi news, 7 lakh gutkha seized marathi news
कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी गुटख्याचा कारखाना, सात लाखांच्या गुटख्यासह तीन जण अटकेत
Pune city leads the country in house sales Pune news
घरांच्या विक्रीत देशात पुण्याची आघाडी! जाणून घ्या शहरातील कोणत्या भागाला सर्वाधिक पसंती…
tipeshwar sanctuary, archi tigress, cubs, attracting tourists, viral video, yavatmal, nagpur,
VIDEO : टिपेश्वरच्या जंगलात “आर्ची” आणि तिच्या बछड्याने पर्यटकांना लावले वेड
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला

मी मात्र एकटा अलंगला गेलेल्या टीमची वाट पाहत बसलोय, मदन अन् अलंगच्या िखडीत! आणि अलंग्याचे दोन महाकाय डोंगर जणू दंड थोपटून माझ्या आजूबाजूला उभे ठाकले आहेत असं वाटत होतं. आधी भीती वाटून गेली पण मग झाली मत्री आमच्यात! टीमला यायला वेळ लागेल असं गृहीत धरून मी आपलं लिहीत बसलोय आजचा लेखाजोखा. पहाटेपासून आतापर्यंत घडलेला!

आजचा दिवस सुरूच झाला तो आंबेवाडीतल्या कुडकुडणाऱ्या थंडीने. पुणे अन् मुंबईच्या ट्रेकर मंडळींनी पहाटे पहाटे गारठय़ाचे गोडवे गायला सुरुवात केली होती. लखनच्या पडवीत पहाटेचा चहा-नाश्ता झाला. महत्त्वाच्या सूचना, प्रत्येकाचं थोडक्यात ‘आत्मचरित्र’ ऐकून सामानांची आवराआवर झाली. गिर्यारोहणाची साधनसामग्री वाटप करून आम्ही मिशन अलंग-मदन-कुलंग या सहय़ाद्रीतल्या सर्वात दुर्गम त्रिकुटाकडे रवाना झालो. तीस एक जणांच्या दोन दिवसांच्या जेवणाच्या सामानांसह, भांडी इत्यादी इत्यादींनी प्रत्येकाच्या सॅक काठोकाठ भरल्या होत्या. सकाळच्या मंद वाऱ्यासह गारठा जाणवत होता. कळसूबाईच्या मागून नारायणराव घाईघाईने कामावर रुजू व्हायला निघालेले. अलंग मदनचे त्रिकूटही हळूहळू जागे होत होते. अलंग अन् कुलंग या दोघांच्या मध्ये मदन भाव खाऊन जात होता. शेतातून आत झाडीत शिरलो.
उन्हं वाढत चालली असली तरी, झाडोऱ्यामुळं गारठा काही कमी नव्हता होत. आस्ते कदम करीत चाललो, थोडा वेळ कुलंगने साथ केली नंतर तोही मदनआड झाला. आता पुढय़ात होता पसारा फक्त अलंगचा अवाढव्य डोंगर. उभा नैसíगक तासलेला कडा तर मनाच्या कोपऱ्यात जाऊन भिडला. ट्रॅव्हर्सचा मेरुमणी समजल्या जाणाऱ्या या अलंग्याचे रूपच न्यारे. अन् उजव्या बाजूला मदन आभाळात घुसला होता. किरडा डोंगर डाव्या बाजूला ठेवत, पठारावरून आत शिरलो की नुसती झाडी. जंगलातल्या वाटेचा आनंद घेत राक्षसाला पायाखाली घेतलेल्या दगडात कोरलेल्या हनुमानाजवळ पोहचलो. थोडा पोटोबा करायचा म्हणून थांबलो. हनुमान शिल्पाजवळ शेंडेकाकांनी आणलेल्या खारकाच्या चुऱ्याने मजा आणली. पाणी ढोसून थेट अलंगच्या खालच्या गुहेत जाऊन धडकलो. इथेच बाजूच्या गुहेत पाण्याची सोय असल्यामुळे आमच्या सपोर्ट टीमने स्वयंपाकाचं ठाण मांडलं. या टीमची खासियत म्हणजे सगळेच जण सर्टीफाइड भटके अन् जेवण बनवण्यात सगळ्यांचा हातखंडा. टेस्ट में बेस्ट! आणि ट्रेकरच्या भाषेत सांगायचं तर, आम्हा सगळ्यांची या डोंगरदऱ्यांमध्ये पुरलेली नाळ! योगिता, रेश्मा, पूजा न् पल्लवी अब तुम्हारे हवाले जेवण साथियों.

खरं थ्रील आता सुरू होणार होतं. आंबेवाडीच्या कैलाशने फ्री क्लाइंबिंग करून आधीच अलंगचा सरळसोट ५० फुटी रॉक पॅच सुरक्षित केला होता. त्याखालचा २५ फुटी पॅच दोराने सुरक्षित केलेला. प्रसाद अन् दीपक १२ जणांना घेऊन मदनकडे रवाना झाला. ११ जणांना घेऊन मी अन् विद्युत आधी अलंग सर करणार होतो. खालची सोपी चढाई करून एकेक जण वर पोहोचले. वरून विद्युत बिले देत होता, खालून प्रत्येकानं आपापल्या परीने अलंगचा सुप्रसिद्ध रॉक क्लाइंब केला. वरच्या गुहेत पोहोचलो की पुढे चढायला कातळातल्या खोदीव पायऱ्या. या पायऱ्या पण नीट सांभाळून चढायच्या, कारण थोडी जरी गफलत झाली की, खाली दरीत शंभर टक्के कपाळमोक्ष. अखेरीस गडमाथ्यावर पाय रोवला आणि सर्वात आधी गडावरील जुळ्या टाक्यांनी आमचं स्वागत केलं. त्याच्यापुढे भग्नावस्थेत शिविलग, असंच विनाछप्पर ऊन-वारा झेलत तग धरून राहिलेलं. वर पोहोचल्यावर गडाचा आवाका नजरेत भरतो. इंग्रजी यू आकाराचं वाळलेल्या गवतांनी भरलेलं पठार सोनेरी रंगांनी न्हाऊन निघालं होतं. चढावरचे गुहेचे दोन संच खरंच पाहण्यासारखे आहेत. पकी एकामध्ये ४० एक जणांची राहण्याची आरामात सोय होऊ शकते. उजवीकडच्या गुहेसमोर एक पाण्याचे टाके अन् गणेशशिल्प कोरलेले आहे. बाकी गुहेच्या आतून त्रिकुटातील कुलंग आणि मदन यांचा नजारा अप्रतिम! ह्य़ा गुहा बौद्धकालीन असाव्यात. दुमजली असलेल्या गुहेच्या वर जायला कोरीव जिने काढले आहेत. न्याहाळीत राहिलो तर सगळं कल्पनेपलीकडचं वाटू लागलं. इतक्या उंचीवर दुर्गम ठिकाणी हा सगळा खटाटोप कोणी केला असेल. आजूबाजूला अस्ताव्यस्त पडलेले बांधकामाचे अवशेष, वर्षांनुवर्षे ऊनपावसाचे तडाखे झेलणाऱ्या दरवाजाच्या कमानी मन विषण्ण करतात. गडफेरी इथेच संपत नाही, अजून एक टेकाड आपल्यासमोर उभं ठाकलेलं दिसतं आणि त्यावरील सुस्थितीत दिसणारं बांधकाम साद घालतं. पण तिथे पोहोचायच्या आधीच वाटेत लागणाऱ्या दशकुंड जलाशय, अर्थात कातळात खोदलेल्या दहाएक आखीव-रेखीव टाक्यांनी स्तिमित व्हायला होतं. निळ्याशार आकाशाखाली या टाक्यांचा समूह! हे चित्रच कमाल! टाक्यांच्या उताराकडे एक धरणासारखी िभत बांधून काढलीय. जास्तीचं पाणी वाहून जायला छोटय़ा छोटय़ा मोऱ्या, खरंच अप्रतिम नियोजन. या अमृततुल्य पाण्याने पोटोबा झाला अन् वाडय़ाकडे मार्गस्थ झालो.

बहुधा किल्लेदाराचे निवासस्थान असलेल्या या वाडय़ाचं बांधकाम दुरूनच भव्यदिव्य असावं. किल्ल्याच्या माथ्यावर कुठूनही उठून दिसणारी ही एकमेव वास्तू. पण जवळ जाताच लक्षात येतं याची एकच बाजू शाबूत आहे, बाकी सारं जमीनदोस्त. पण हे लक्षणीय बांधकाम गतकाळातील इतिहासात घेऊन जातं. काय काय पाहिलं असेल त्याने. उन्हा-वाऱ्यात कित्येक वर्षे तो असाच तग धरून उभा असेल. काय घडलं असेल इथे, कोण राहिलं असेल, किती आणि कोणत्या राजवटी नांदून गेल्या असतील, असे किती प्रश्न मन विचारू लागलं.pn

असो, सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो तेव्हा किरडा डोंगराच्या मागे कळसूबाईचं ठाणं खुणावून गेलं. गडफेरी आटोपून परतीला लागलो. अलंग्यावरून मदनाच्या तेवढय़ा पायऱ्या पाहायच्या राहिल्या होत्या अलंग आणि मदन दोहोंच्या मधल्या तीसेक मीटर अंतराच्या दरीने धस्सच झालं आणि येथून दिसणाऱ्या कातळातल्या खोदीव पायऱ्या तर अप्रतिम.

उतरायला सुरुवात केली तेव्हा प्रसाद अन् दीपकची टीम मदनगडाच्या वरच्या पायऱ्या उतरत होती. एकेक जण रॅपिलग करून अलंगचा पॅच पार करू लागले. खालच्या गुहेत जेवणाचा फक्कड बेत जमला होता, आलू-मटार पोळीवर आडवा हात मारत सगळ्यांची जेवणं आटोपली. मदनला गेलेली टीमही हळूहळू परतत होती. दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर आम्ही मदनकडे रवाना झालो. डावीकडचा अलंगचा ट्रॅव्हर्स पार केला की आपण मदन आणि अलंगच्या िखडीत येऊन पोहोचतो. आंबेवाडीतून येणारी नाळेची वाट ही इथेच येऊन मिळते.

उजवीकडच्या पायवाटेने मदनवर चढाईला सुरुवात केली तेव्हा गेल्या वर्षी अरुणसरांसोबत केलेल्या टाकेसफाईच्या आठवणींना उजाळा मिळाला. त्या टाक्यात पाणी साठलं असेल का ही उत्सुकता होतीच. पायऱ्या चढत, खालच्या दरीचा आढावा घेत घेत जसजसे आपण वर चढतो तसतसा शेजारचा अलंग आपल्यासमोर स्वत:चं रूप पेश करत असतो. आता मात्र आपण २५ फुटी कडय़ाजवळ येऊन पोहोचतो आणि कुलंग आपल्या बाजूला उभा ठाकतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला हा अवाढव्य डोंगर चढायचा आहे या कल्पनेनेच धडकी भरते.

प्रसाद साहाय्याने तुलनेने सोपा असलेला हा कडा यायला वेळ नाही लागला. परत ट्रॅव्हर्सला लागलो आणि अलंगच्या नसíगक तटबंदीने पुन्हा लक्ष वेधून घेतले. येथून परत पायऱ्या. त्या चढत गेलो की दरवाजा ओलांडून गडमाथा! आणि सर्वात आधी मी टाक्यांकडे वळलो, नितळ पाण्यानं तुडुंब भरलेलं टाकं पाहून खूप बरं वाटलं. उन्हाळ्यात केलेल्या मेहनतीला फळ आलं होतं. याखेरीज गडावर धुंडाळण्यासारखं म्हणजे एका अखंड दगडात कोरलेली भली मोठी औरस-चौरस गुहा आणि वर टेकडावर चौकी- पहाऱ्याच्या जागेचे अवशेष. आजूबाजूला नजर जाईल तेथपर्यंत पसरलेला आडवा-तिडवा सह्यद्री! माझा सह्यद्री! अफाट, अभेद्य, अजिंक्य सह्यद्री! खाली अलंगगडाचा पसारा नजरेस भरत होता. थोडय़ा वेळापूर्वी आपण तिथे होतो याचीच मजा वाटून गेली. बाकी मदनगडावरून आता अलंग भाव खाऊन गेला. यापेक्षा आणखी सुंदर दर्शन कोठून होणार! महाराष्ट्रातील सहय़पर्वताच्या रांगेतील सर्वात उंच डोंगरांची मांदियाळी येथेच आहे. सर्वाची सरासरी उंची पाच हजार फुटांपेक्षा अधिकच. सर्वात उंचावर असलेल्या कळसूबाईच्या ठाण्यापासून उजवीकडे, छोटा कळसूबाई, श्रीकिरडा, अलंग, घनचक्कर, कात्राबाई, आजोबा, कुलंग अशी महारथींची भलीमोठी रांग जणू pn1अस्ताला जाणाऱ्या दिवाकरास सलामी देतायेत असं वाटतं. कुठे रतनगड डोके वर काढतोय, कधी त्याचा खुटा (सुळका) स्वत:चं अस्तित्व दाखवतोय, कुठे डांग्या सुळका खुणावतोय. खाली घाटघर अन् सांधण दरी मागल्या भेटीची आठवण करून देतायेत, पश्चिमेकडचा भंडारदऱ्याचा जलाशय सांजवेळची सूर्यकिरणे झेलत पहुडलाय, कधी तिकडे तो दूरवरचा पट्टा किल्ला विश्रामासाठी निमंत्रण पाठवतोय. सहय़ाद्रीच्या डोंगरकडय़ांची साद ऐकता ऐकता सांजावून आलं.

गडफेरी आटोपून आम्ही उतरायला सुरुवात केली. पायऱ्या उतरताना दरीची भीषणता जाणवू लागली. सांजवेळी आम्ही िखड जवळ करत होतो. िखडीत पोहोचलो तेव्हा आमची सपोर्ट टीम हजर होती. आणि रिकाम्या हाताने नव्हे तर, रात्रीच्या जेवणाचं पाणी घेऊन. वाह! याला म्हणतात ‘मॅनेजमेंट’!

संध्याकाळचे पावणेसात झाले होते. अरुणसरांनी काही वर्षांपूर्वी मदनचा ट्रॅव्हर्स शोधून काढला होता. त्याच वाटेने उद्या आम्ही कुलंग जवळ करणार होतो अन् आमचा आजचा मुक्काम वाटेत लागणाऱ्या घळीत ठरला होता. टीम मदनला घेऊन प्रसाद त्याच वाटेने पुढे गेला आणि मी टीम अलंगची वाट पाहत िखडीत बसलो. अन् ते येईपर्यंत दिवसभराचा लेखाजोखा लिहून झाला. काही वेळात दीपक अन् विद्युत त्यांच्या टीमसह िखडीत पोहोचले आणि पुढच्या अध्र्या तासात आम्ही पण घळीत येऊन विसावलो. आम्ही पोहोचलो तेव्हा घळीतल्या एका कोपऱ्यात चुलीवर रात्रीचा बेत शिजत होता अन् बाजूला रेश्मा ठाण मांडून बसलेली! प्रत्येकाने आपापल्या जागा बळकावून ताणून दिली होती. सोयाबीनच्या वडय़ा घालून जमवलेल्या त्या ‘व्हेज बिर्याणी’ला खरंच तोड नव्हती. गरमागरम अन्न पोटात घालून झोपी गेलो ते तांबडं फुटेस्तोवर!

सकाळी उठल्या उठल्या डोळ्यांसमोर आला तो रतनगड – कात्राबाई – आजोबा या त्रिकुटांचा भव्यदिव्य नजारा. खाली घाटघर जलाशयातून मंद वाफारे वर येत होते. एकदम ‘दिन बन गया’ नजारा! आवराआवर सुरू झाली, आज एकाच टीममध्ये सगळे कुलंग सर करणार होते. सगळं आवरून आल्या वाटेनेच आम्ही कुलंगकडे ट्रेकस्थ झालो.

जसजसे पुढे सरकतोय, तसतसा या वाटेनं रंग दाखवायला सुरुवात केली. डाव्या बाजूला जवळपास हजार फुटांचा फॉल आ वासून होता तर उजव्या बाजूला कोठे झाडीच्या फांदय़ा, कुठे मुळात, कुठे दगडांच्या खाचाखोचात हात घालून ही वाट पार करावी लागत होती. एक तर निमुळती, जवळजवळ मदनला चिकटलेली, आणि वरून मुरमाड! कुणाच्या शूजखालून चर्र असा आवाज झाला की धडकीच भरायची. कारण घसरून गेला की, डाव्या बाजूला ‘डायरेक्ट शिफ्ट- डिलीट’च. त्यामुळे प्रत्येक पाय जपून टाकावा लागत होता. पुढे घसाऱ्यातून झाडोऱ्याला अँकर करीत कुलंगकडून आलेल्या सोंडेच्या आणि मदनच्या सुळक्यांमध्ये पोहोचलो तेव्हा जरा हायसं वाटलं. आता सोंडेला ट्रॅव्हर्स मारत एकदाचं कुलंगला भिडलो. आता मात्र वाट सगळी झाडीतली. या वाटेने पुढे चालत गेलं की पट उलगडत जावा तसा सह्याद्री उलगडत जातो. सर्वात आधी मदनगडाचा बॅरल शेप समोर येतो. त्याचं नेढं लक्ष वेधून घेतो. कळसूबाई तर सुरुवातीपासूनच साथीला होता. आणि मग किरडा अन् अलंगमधल्या नवरा-नवरीच्या लग्नाला लहान कळसूबाई अन् श्रीकिरडा यांनीही आपली हजेरी लावली. तोपर्यंत आम्ही कुलंगच्या पायऱ्यांना भिडलो. आता येथून चढाई सगळी उभी. तटबंदी दिसल्यावर अजून हुरूप वाढला, जवळपास सगळे जण माथ्यावर आधीच पोहोचले होते. उभ्या खडकात कोरलेल्या खोबणीसारख्या या पायऱ्या चढताना मज्जा येते, पण नीट काळजीपूर्वक पाऊल टाकायचं. चुकून गफलत झाली तर क्षमा नाही. काही ठिकाणी कठडे असल्याने थोडा मानसिक आधार मिळतो अन् दडपण कमी होतं. किल्ल्यात प्रवेश करायच्या आधीच ऐसपस कातळकोरीव गुहा लागतात. दोन क्षण विसावायचा मोह आवरत नाही. पुन्हा शंभर-एक पायऱ्यांचा कातळ चढून आपण वर येतो तोच एक बुरुजाआड लपलेलं प्रवेशद्वार आपल्या स्वागतास सज्ज असतं.

गडमाथ्यावर पोहोचल्या पोहोचल्या आनंदाला पारावारच उरत नाही, आभाळ ठेंगणं वाटू लागतं आणि एवढा डोंगर चढून आल्याचा थकवाही नाहीसा होतो. कुलंगचं भलंमोठं पठार पायांना मोकळं करतं. तेथल्या तीन टाक्यांच्या मधोमध गणेशाची सुंदर प्रतिमा कोरलेली आहे. मुख जरी नसलं तरी उर्वरित शिल्प अजूनही चांगल्या स्थितीत आहे. शेवटच्या दोन टाक्यांच्या अलीकडे शेजारीच िलग नसलेली शिविपड कोरलेली आढळते. अजून पुढे गेलो की खडकात खोदून काढलेल्या तीन टाक्यांच्या समूहाने स्तिमित झालो. अरे काय हे? हा किल्ला आहे का टाक्यांचा मेळाबाजार? आजपर्यंत कुठल्याही किल्ल्यावर पाहिल्या नसतील इतका टाक्याचा समूह या डोंगरयात्रेने एकाच ट्रेकमध्ये दाखवला. पण या समूहाची बांधणी त्यातल्या त्यात खास! हुबेहूब अलंगवरील समूहांसारखी. गोमुखांचे फक्त अवशेष उरले आहेत पण हौदाच्या प्रमाणबद्धतेला तोड नाही. इथेही भव्यतेचा साक्षात्कार होतो. ज्या अर्थी इथे एवढय़ा प्रमाणात पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात, त्या अर्थी किल्ल्यावर बऱ्यापकी राबता असला पाहिजे. काळाच्या ओघात निपचित पडलेले अवशेष गतकाळातील गुजगोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतायेत.

या गुजगोष्टी ऐकत ऐकतच आपण गडाच्या पूर्वेकडील माथ्यावर पोहोचतो अन् डोळ्यांच्या एका फ्रेममध्ये न मावणारा सह्यद्रीपट आपल्यासमोर नजर होतो. पुढय़ात असतो मदनगडाचा खडा डोंगर, सरळ सोट आकाशात घुसलेला अन् त्याच्या पायथ्यापासून सरपटणारी सकाळची जीवघेणी अवघड अन् अनगड वाट! पश्चिमेस अपरान्ताची पोकळी अन् त्याच्या अलीकडे घाटघर जलाशयाजवळील घाटाचा शेवटचा माथा.

अविस्मरणीय! हा एकच शब्द इथे सार्थ होतो. तसं पाहिलं तर अलंग- मदन – कुलंग या सह्यद्रीमधल्या सर्वात दुर्गम आणि अवघड किल्ल्यावर पर्यटकांची सोडाच पण गिर्यारोहकांचीही वर्दळ कमीच. त्यामुळे आजकाल दिसणाऱ्या काही चंगळवादी ट्रेकर्सपासून त्यातल्या त्यात सुरक्षित, पण दुर्गमतेमुळं तेवढाच दुर्लक्षितही! इथे मुक्कामाला प्रसन्न गुहा आहेत, पण वाटा मात्र अनगड अन् अवघड! या त्रिकुटाला भिडायचं असेल तर प्रस्तरारोहणाची थोडी फार जाण आवश्यक आहे. बाकी हे सगळे सोपस्कार उरकून जेव्हा तुम्ही या त्रिकुटावर उभे असता, तेव्हा आभाळही ठेंगणं झालेलं असतं.