29 May 2020

News Flash

प्रेमाला वय नसावे का?

आज आजूबाजूला नजर टाकते किंवा ऐकायला मिळते ते म्हणजे नको त्या वयात मुले प्रेमात अडकून बसतात. शाळेत असतानाच झालेल्या ओळखी पुढे वाढत जातात.

| December 19, 2014 01:13 am

01-vachak-lekhakआज आजूबाजूला नजर टाकते किंवा ऐकायला मिळते ते म्हणजे नको त्या वयात मुले प्रेमात अडकून बसतात. शाळेत असतानाच झालेल्या ओळखी पुढे वाढत जातात. एकमेकांना वह्या, पुस्तके देण्यापर्यंत किंवा परीक्षेत एकमेकांना पेपर सोडविण्यात मदत करणे, किंवा एकमेकांना आर्थिक किंवा इतर अडचणींत मदत करताना जी झालेली ओळख पुढे इतकी वाढते की त्यांचे त्यांनाच एक दिवस वाटते की आपण प्रेमात पडलेले आहोत आणि यापुढे ‘माझा जोडीदार हाच’ हे मनोमनी ठरवून टाकतात आणि ‘तुझ्याशिवाय मी दुसरा कोणाचाच विचार करणार नाही’ जणू काही माझे आयुष्य मी तुला आतापासूनच समर्पित केले आहे. म्हणजे ही फुटकीएवढी केलेली मदत एवढी भारावून टाकते की त्यांचे आयुष्य एकमेकांना समर्पित करतात आणि आपल्या लग्नाची स्वप्ने पाहतात. ते करताना ते एकमेकांसाठी किती पूरक आहेत याचा जरासुद्धा अंदाज घेत नाहीत. या प्रकरणामध्ये सर्वात केविलवाणी अवस्था होती, ती मुलांच्या आई-बाबांची. 

आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे. दहावी-बारावीत चांगले मार्क्स मिळावेत, याहीपलीकडे मुलांनी चांगले खेळ जोपासावे, चांगले व्यक्तिमत्त्व असणाऱ्या लोकांची आत्मचरित्रे वाचावी, पुस्तकांचे छंद जोपासावेत. निष्पापपणे आपले बालपण घालवावे असे प्रत्येक आई-बाबांना वाटत असते. आपली चांगली जडणघडण होण्याचे हे वय असताना ही मुले अशी का करतात? टी. व्ही. सारख्या माध्यमांमुळे हा परिणाम झालाय का? आज दहावीतली मुले-मुली अभ्यास या विषयावर न बोलता ‘बॉयफ्रेंड’, ‘गर्लफ्रेंड’ यावर उत्स्फूर्तपणे बोलत असतात. दहावीपर्यंत किंवा पुढे अकरावी, बारावी हे वय आपल्याला जोडीदार निवडण्याचे नसते तर चांगले मार्क्स मिळवून भविष्य उज्ज्वल करण्याची संधी असते. ती संधी एकदा हातातून गेली की पुन्हा परत येत नाही. मग अनेक वेळा बऱ्याच मुला-मुलींच्या पदरात नैराश्य पडते. त्यातून काहीजण तर ते आपल्याला संपविण्याची भूमिका घेतात. तात्पर्य काय, ज्या आई-वडिलांनी मुलांना वाढविण्यासाठी कष्ट घेतले असतात त्यांचं संगोपन, आजारपण, ऐपत नसताना त्यांना दिलेल्या सोयी, सुविधा याचाही मुले प्रेमात पडताना जरासुद्धा विचार करत नाहीत, हे किती गंभीर आहे, याचा कोणीतरी विचार केला पाहिजे. दशकापूर्वी मनातल्या सुप्त भावना काळाच्या ओघाबरोबर आतल्या आत विरून जात असत. पण आता, ही मुले तेच आपलं अंतिम रूप समजून आपली किशोरवयातील कारकीर्दच संपवून टाकतात. ही समस्या पुढे एवढी वाढणार आहे की याचा गुंता सुटणे नंतर फारच कठीण होणार आहे.
दशकापूर्वी सुप्त प्रेम हे काळाच्या ओघात विरूनही जात होते. पण आताची मुले लग्नाच्या आणाभाका या वयात करण्याचं धाडस करतात, हे बघून पालकांना किती त्रास होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. म्हणून मुलांनी अशी मैत्री वाढवून लग्नापर्यंत त्याचा विचार करू नये. ते तिथल्या तिथेच थांबवावे आणि आपल्या अभ्यासात त्यांनी लक्ष द्यावे. जमत असेल तर चांगल्या कविता कराव्यात, खेळाकडे, व्यायामाकडे लक्ष द्यावे. मुलींनी गायन, वाचन, खेळ, अभिनय या गोष्टींत आपली आवड जोपासावी. जेणेकरून आपले बालपण मस्त मजेत घालवावे. त्यात एक निरागसपणा, निष्पापपणा असावा. उगीचच अकाली मोठे कशाला व्हावे? या नको त्या वयात प्रेमात पडून आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये आणि आपल्या सुसंस्कृत आई-वडिलांचा ताप वाढवू नये. त्यांच्या विचारांचा, संस्कारांचा नेहमी आदर राखावा. त्यांच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण करावेत. काही घरांत तसे वातावरण नसेल तर चांगल्या पुस्तकांना जवळ करावे, म्हणजे आपला एकटेपणा निघून जाईल. पुस्तकांनाच आपले मित्र-मैत्रिणी करावेत. उगीचच बाहेरच्या मित्र-मैत्रिणीशी संबंध जुळवून आपले किशोरपण वाया घालवू नये.
पाश्चात्त्य देशांत घटस्फोटित लोकांचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे तिकडे मुले एकटी पडतात. अशा वेळी मुले-मुली एकमेकांचा आधार घेऊन मोठी होतात. पण आपल्या देशात, किंबहुना समाजात एक कुटुंबव्यवस्था आहे. या कुटुंबाचे दोन भक्कम प्रमुख आधारस्तंभ म्हणजे आपले आई-वडील. आपल्या मुलांबरोबर ते अगदी मरेपर्यंत मुलांच्या पाठीशी उभे राहतात. म्हणूनच त्यांच्याही मुलांकडून काही अपेक्षा असतात. आपल्या मुलांमध्ये त्यांचा जीव गुंतलेला असतो, हे मुलांनी समजून घ्यायला हवे. सगळेच काही मोठय़ा पदावर जात नाहीत. पण आजकालच्या स्पर्धामय युगात आपले स्वत:चे अन्न, कपडा या मूलभूत सोयींसाठी आपल्याला किशोरवयातच अभ्यासासाठी किंवा इतर कलात्मक गोष्टींसाठी वेळ काढावाच लागतो. त्यातूनच मुलांचे भवितव्य घडणार असते. म्हणून पालकांनीही जागृत होऊन आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे, मुले काय करतात, कुठे जातात याकडे लक्ष दिले पाहिजे. मोबाइल, फेसबुक यांचे तर अलीकडे मुलांना लहानपणापासूनच व्यसन लागले आहे. यालाही कुठेतरी बंधन घालून पालकांनी आपल्या मुलांशी प्रेमाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून या किशोरवयातील प्रेमाला जर आपण थांबविले नाही, तर खरोखरच पुढे समाजव्यवस्था, परिणामी कुटुंबव्यवस्था कोलमडून पडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2014 1:13 am

Web Title: vachak lekhak 20
टॅग Story,Vachak Lekhak
Next Stories
1 K की कहानी
2 जिचा नवरा दासट…
3 चिमणीचं घरटं आणि कावळा…
Just Now!
X