01-vachak-lekhakचतुरा बडय़ा घरातली सगळ्यात लहान मुलगी. मुलगाच तो. मुलगी आपली म्हणायची. मुलींच्या क्रिकेटची टीम तिनेच तयार केली. मुलाला ‘बघायला’ जाऊ लागली. ‘‘तुला जेवण करता येतं का रे अनिकेत? नाही ना? मग मला तुझा उपयोग नाही. जेवण करण्यासाठी माझा जन्म नाही. ‘किचन’ नावाची खोली हवीच कशाला?’’ इथपर्यंत चतुरा पोहोचली. पुरुष तिला नकोच होता असं नाही, पण बायकांना हे जमत नाही, बायकांनी ते करू नये, हे पुरुषांचं, ते बायकांचं असलं काही तिला मान्य नव्हतं. ‘रणगाडा’ चालवायला दिला तरी मी चालवेन, असं ती मलाच म्हणाली. तेव्हापासून तिला तेच नाव पडलं.. रणगाडा! फेंड्रशिपचं पिवळं फूल ती मला द्यायची. लाल रोझ देणारी नाजूक परी वेगळी होती. रणगाडय़ाशी कोण लग्न करणार होतं? मैत्रीण म्हणून ती खरोखर चांगली होती. माझ्याच इतकी नास्तिक होती. भूत-भविष्याची भंकसही ती मानायची नाही. हा रणगाडा प्राध्यापकांनाही असे प्रश्न विचारायचा की, ‘कुठून या वर्गावर आलो’ असं त्यांना वाटेल. आमचं कॉलेजशिक्षण संपल्यावर मात्र आमचा तो रणगाडा एकटा पडला. मी कॉलेजशिक्षक झालो. ‘पाटकर कॉलेज’पासून मी शिकवायला सुरुवात केली. नंतर ‘एस.एन.डी.टी.’त नियुक्त झालो. रणगाडय़ाचा अवतार पाहिल्यावर तिला कुणी नोकरी देईना. तिच्या धिप्पाड, आक्रमक अस्तित्वाची भीतीच वाटायची. तेव्हा मोबाइल नव्हते. त्यामुळे रणगाडा नक्की काय करतोय ते मला कळत नसे. संपर्क तुटला. इतकंच कुणी तरी सांगायचं की, रणगाडय़ाचं लग्न जमणं अवघड झालंय. तिच्या बरोबरच्या मुलींना पोरंही झाली.

आमच्या पुढे चार वर्षे असलेला भावडय़ा सैन्यात गेला होता. रावडय़ा भावडय़ा असंच मी गमतीत म्हणायचो. ‘छंद’ या कॉलममध्ये ‘प्रत्येकाला नावं ठेवणं’ असंही मी लिहिलं होतं. भावडय़ाची माझी दोस्ती जिगरी होती. पोरांना नवल वाटायचं की, हा गवणू झोपा काढणारा आणि रावडय़ा भावडय़ा सरहद्दीवर खडा पहारा करणारा, यांचं कसं जमतं? ‘फौजी भाईयों के लिये’ कार्यक्रमातही भावडय़ाचं नाव असायचं. तो गाणी सुचवायचा. पत्रं पाठवायचा. ‘हेलनला कार्यक्रम सादर करायला बोलवा’ असंही पत्र त्याने विविध भारतीला पाठवलं. मी बोललो, ‘भावडय़ा तुझं कायतरीच. रेडिओला, डान्सचा उपयोग काय? दिसतंय कुठं?’ कधी रजेवर आला, तर रावडय़ा भावडय़ा फक्त मलाच भेटायचा. बॉर्डरवरचा थरार सांगायचा. सगळ्या गोष्टी पेप्रात येत नाहीत. माझ्या टाळक्यात एक ठिणगी चमकली. भावडय़ाला लग्न करायचं नव्हतं. तरी मी म्हटलं, ‘रणगाडय़ाला बायको म्हणून पसंत करशील का तू?.. आपली चतुरा रे.. क्रिकेटवाली.. तुला शोभेल ती. तू ऑफिसर झालास, तर तुझ्याबरोबर तिकडे जंगलात, वाळवंटात, दलदलीत कुठेपण राहू शकेल. रणगाडाच तो! कुठेही जायला, धडक मारायला तयार!’ भावडय़ा लाजला. त्याच्याही गालाला खळी पडू शकते हे मी प्रथमच बघत होतो. ‘रणगाडा चालेल मला, पण तू ते जमवून दे. आयुष्यात, एखादं तरी चांगलं काम कर यार,’ म्हणत त्याने मला धपाटा लगावला. रावडय़ाने मारलं प्रेमाने, पण मी कोलमडलो.
रणगाडय़ाकडे मीच विषय काढला. तिला रावडय़ाच नीट सरळ करेल. शिस्तीत ठेवेल असं मला खात्रीने वाटत होतं. रणगाडा चक्क तयार झाला. सैन्यातला जवान हा तसाही तिच्या अभिमानाचाच विषय होता. ती नेहमी युद्धकथा वाचायची. तशी ती नेमबाज होती. एअरगनने आरे कॉलनीतले कवडे ‘टिपायची.’ त्यांच्या लग्नात मला फार मान मिळाला. ‘कशाला कशाला’ म्हणत मी सगळे मानपान करून घेतले.. लग्नानंतर आमचा रणगाडा किती बदलला! सारखं आरशात बघू लागला. पुनर्जन्म म्हणतात त्यातला प्रकार. नऊवारी साडीत तर त्या रणगाडय़ाला मी ओळखलंच नाही एकदा. तोफा डागणं चतुराने बंद केलं. ती ‘लेकुरवाळी’ झाली. त्या दोघांचं लग्न जमवणं मला साधलं हे बरं झालं. ‘चांगलं सुचतं’ ते हे असं!