रामायणाने भारतीयच नव्हे तर इतर अनेक देशांतील लोकांच्या मनावर गारूड घातले आहे.
अलीकडील काळातील आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या ५६ गीतांच्या गीतरामायणानेही पुन्हा एकवार रामकथेस उजाळा दिला गेला व असंख्य भाविकांच्या भावभक्तीने त्यांची रसपूर्ण दाद घेतली. या सर्व गीतास सुधीर फडके अर्थात बाबूजी यांनी लावलेल्या चाली अनेक दशके लोटूनही तितक्याच लोकप्रिय आहेत. गदिमांचे गीतरामायण इतके लोकप्रिय झाले, की अनेक भाषांमधून त्यांची भाषांतरे झाली. पैकी आसामी भाषेत त्याचे भाषांतर माझे मामेसासरे सुधाकर देशपांडे यांनी केले होते. ते संघाचे काम करण्याच्या निमित्ताने अनेक वर्षे आसामात मुक्कामास असल्याने त्यांना आसमिया भाषा चांगली अवगत झाली होती.
गदिमा अर्थात कै. अण्णासाहेब माडगूळकर अत्यंत प्रतिभावान कवी, गीतकार, लेखक, इ. विविध नात्याने सुपरिचित आहेत. त्यांच्या प्रतिमेला आस्तिकतेचा स्पर्श आहे. त्यांच्या गावाकडे अर्थात माडगूळला असताना शेताच्या बांधावर पहुडले असता, त्यांना आकाशात काही चैतन्यमय प्रकाशदर्शन झाल्याचे अर्थात अशा आशयाचे काहीतरी कित्येक वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवते. त्यांच्या अंतर्मनातील हा भावभक्तीचा स्पर्श केवळ गीतरामायणातच नव्हे, तर इतर अनेक भक्तिगीतांतही आढळतो. त्यांच्या या भक्तिभावाला वेगळे आयाम लाभले ते त्यांनी जेव्हा अक्कलकोटवासी गजानन महाराज यांचे दर्शन घेतले तेव्हा! त्या प्रसंगी अत्यंत सुवाच्य हस्ताक्षरात त्यांनी ‘‘श्रीमंत कृपासागर परमसद्गुरू श्रीगजानन महाराज यांच्या चरणसेवेसी’’ असे शब्दांकन लिहून श्रींना अर्पण केली होती. योगायोगाने ती गीतरामायणाची प्रत आता माझ्या संग्रही आहे. गीतरामायणाचे काही वेगळे परंतु महत्त्वपूर्ण अनुभव माझ्या गाठीशी आहेत. पुण्यातील एक प्रसिद्ध दिवंगत उद्योगपती म.स.ऊर्फ बाबुरावजी पारखे हे गदिमा यांचे व्याही. त्यामुळे जेव्हा जेव्हा श्रींचे वास्तव्य पुण्यास असे, तेव्हा ते पारखेसाहेबांच्या शिवाजीनगरमधील ‘विद्याविलास’ या प्रासादतुल्य वास्तूत उतरत असत! तेथे त्यांच्या दर्शनाला अनेकजण विद्याविलासवर येत असत, श्रींच्या कनिष्ट भगिनी कमलाबाई या कै. पारखेसाहेबांच्या पत्नी होत्या. जेव्हा श्री पुण्यात येत, तेव्हा अनेक वेळा ते पारखे यांच्या खोपोली येथील पेप्को या कागदाच्या कारखान्यातील निवासस्थानावर असे. श्रींचे आम्ही काही भक्तही खोपोलीला जात असू, तेथे त्यांना बारामतीचे मदन टांकसाळे हे गीतरामायण ऐकवत असत, त्यात आम्हीही सामील होत असू.
श्रींसमोर गीतरामायण सादर करण्याचा काळ अत्यंत आनंददायक होता. एकदा श्रींनी गीतरामायणाचे पुस्तक घेऊन त्यावर यज्ञविषयक गीतांवर खुणा करण्यास सांगितले. ती १३ गीते भरली व खुणा केलेली गीतरामायणाची प्रत श्रीचरणी सादर केली. नंतर अण्णासाहेब माडगूळकर श्रीदर्शनाला विद्याविलासवर आले असता, ती प्रत घेण्यास सांगून व त्यातील यज्ञविषयक गीते पाहण्यास सांगत श्री बोलू लागले, ‘‘अण्णासाहेब हे गीतरामायण रचलेले नसून स्फुरलेले आहे. संपूर्ण रामायणाचा संबंध यज्ञाशी आहे. प्रभु रामांचा जन्म यज्ञप्रसादातून झालेला आहे. यज्ञरक्षणार्थ त्यांनी धनुष्यबाण हातात घेऊन आसुरी शक्तींचा संहार केला आहे. यज्ञ हीच मानवाची मूलभूत उपासना असून संपूर्ण रामायणभर त्याचा प्रत्यय दिसून येतो. राम-सुग्रीव मैत्री कराराच्या वेळीही हनुमानाने मंगल हवन करून त्यासमक्ष तो मदतीचा करार झाला आहे. किंबहुना यज्ञ हेच रामकथेचे मर्म म्हणता येते. म्हणून रामायण हे वास्तविक यज्ञायन आहे.’’
श्रींच्या या खुलाशाने भारावलेल्या गदिमांनी, ‘‘प्रभो आपण ही मला नवीन दृष्टी दिलेली आहे. आता पुन्हा ही बाब लक्षात घेऊन नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करतो.’’ परंतु हा योग आला नाही, कारण पुढील अल्पकाळातच गदिमांचा स्वर्गवास झाला. त्यांनी दैनंदिन यज्ञ अग्निहोत्र चालू केले होत, व या सर्व प्रसंगाचा मी साक्षी आहे.