वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com
विषाणू, संसर्ग, साथ, लस या शब्दांना २०१९ या वर्षांच्या शेवटापर्यंत तरी सामान्य माणसाच्या लेखी पेन, टेबल, खुर्ची, बॅग या शब्दांइतकंच महत्त्व होतं. पण २०२० हे वर्ष उजाडलं तेच या शब्दांना वेगळे संदर्भ घेऊन. केवळ सूक्ष्मदर्शकाखालीच दिसू शकणाऱ्या सार्स कोव्ही टू या विषाणूची साथ सुरू झाली आणि बघता बघता सगळं जग वेठीला धरलं गेलं. सिनेमास्टार, क्रिकेटपटू, राजकीय नेते यांना असलेलं मार्केट, ग्लॅमर क्षणार्धात उतरलं आणि कोविडशी लढणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवेतले कर्मचारी, संशोधक, शास्त्रज्ञ एका रात्रीत समाजाचे हिरो ठरले. आणि हे अमुक एका देशात नाही, तर जगभरात सगळीकडेच घडलं. हे सगळे करोनायोद्धे होते आणि आहेत म्हणून आपण आज जिवंत आहोत ही भावना प्रत्येक माणसाच्या मनात आहे आणि त्याच्या जोडीला आहे या माणसांच्या कामाबद्दल, त्यांच्या क्षेत्राबद्दल अमाप औत्सुक्य.

सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) या अभ्यासशाखेचा एक भाग असलेल्या विषाणूशास्त्राचा (व्हायरॉलॉजी) गेली अनेक वर्षे अभ्यास होत असला तरी सार्स कोव्ही टू या विषाणूने या शांतपणे अभ्यास सुरू असलेल्या क्षेत्राला एका अर्थाने सोन्याचे दिवस दाखवले आहेत. आपल्या जगण्यावर इतका परिणाम करणारे विषाणू, त्यांचा अभ्यास करणारं विषाणूशास्त्र, विषाणूंच्या अटकावासाठी केलं जाणारं संशोधन, या अभ्यासशाखेचा संशोधनाव्यतिरिक्तचा आवाका याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याबरोबरच यापुढच्या काळात आरोग्याच्या क्षेत्रावरचा खर्चही वाढण्याची शक्यता असल्यामुळे या क्षेत्रात करियरच्या संधीही वाढू शकतात. म्हणजे या क्षेत्रात रस निर्माण झाला आहे म्हणून आणि संधी आहेत म्हणूनही विषाणूशास्त्र हे यापुढच्या काळात अनेकांसाठी करियरच्या वाटेवरचा महत्त्वाचा पर्याय असण्याची शक्यता आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

असं असेल तर या अभ्यासशाखेचा आवाका, त्याच्यामधल्या करियरच्या शक्यता, संधी काय काय असू शकतात, विषाणूशास्त्राचा अभ्यास करणारे नेमकं काय काम करतात, हे करियरची आखणी करू पाहणाऱ्यांना माहीत असायलाच हवं. या क्षेत्रामधल्या आजच्या काळातल्या देशामधल्या महत्त्वाच्या नावांपैकी एक नाव आहे, डॉ. वर्षां पोतदार. एनआयव्ही म्हणजे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी या पुणेस्थित संस्थेत त्या नॅशनल इन्फ्ल्यूएन्झा सेंटरच्या प्रमुख आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या इन्फ्ल्यूएन्झा संदर्भातील भारतातील कामाचंदेखील हेच केंद्र आहे. त्यामुळे डॉ. वर्षां यांचं काम राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाचं आहे.

रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेतलेल्या डॉ. वर्षां यांनी आपल्या करियरची सुरुवात एनसीएल (नॅशनल केमिकल लॅबोरेटरी) या पुण्यातील संस्थेमधून केली. त्यांना मूलभूत संशोधनात रस होता. त्यामुळे एनसीएलमध्येच त्यांच्या या आवडीला खतपाणी मिळालं. तिथून काही काळाने त्या एनआयव्हीमध्ये आल्या. त्यांच्या संशोधनातील आवडीचा पाया इथेच घातला गेला आणि त्यांची संशोधन क्षेत्रामधली करियरची निवड पक्की झाली. तिथेच त्यांचं रेट्रो व्हायरस या विषयावर पीएच. डी. झालं. त्यानंतर त्यांनी हिपॅटायटीस, श्वसनसंस्थेशी संबंधित आजार निर्माण करणारे विषाणू या विषयावर काम केलं. गेली काही वर्षे त्या इन्फ्लूएन्झाचे विषाणू या विषयावर काम करत आहेत.

टेक्निकल स्टाफ म्हणून त्या एनआयव्हीमध्ये दाखल झाल्या आणि आता त्या एनआयव्हीमध्येच शास्त्रज्ञ आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांचा करियरचा हा आलेख फक्त त्यांची वैयक्तिक प्रगती नोंदवणारा नाही. कोविडच्या महासाथीच्या, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘वॉर लाइक सिच्युएशन’ असलेल्या काळात त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाजाला, देशाला बहुमूल्य ठरेल असं योगदान दिलं आहे. त्यांच्या या योगदानाच्या मुळाशी विषाणूशास्त्राचा अभ्यास आहे, हे त्या आवर्जून सांगतात.

विषाणूशास्त्र ही आता एक विशेष शाखा झाली आहे. इतर अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना विषाणूशास्त्राचा अभ्यास केल्याचा विशेष फायदा होतो कारण हे क्षेत्र वेगवेगळ्या क्षेत्रांशी जोडलं गेलेलं आहे. त्याचं महत्त्व सांगताना डॉ. वर्षां सांगतात की नवीन नवीन येऊ घातलेल्या विषाणूंमुळे म्हणा, सध्याच्या महासाथीमुळे म्हणा, या क्षेत्रात उत्तम संधी आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल यांच्याबरोबरच उत्तम विषाणूतज्ज्ञ निर्माण होणं ही काळाची गरज आहे. एक काळ असा होता की खूप कमी लोक या विषयाच्या अभ्यासाकडे वळत. त्यामुळे विषाणूशास्त्रज्ञांची संख्याही कमी होती. एनआयव्ही गेली दहा वर्षे पुणे विद्यापीठाबरोबर विषाणूशास्त्रात एमएससीचा अभ्यासक्रम चालवत आहे. देशात आणखीही दोन-तीन ठिकाणी विषाणूशास्त्रात तो सुरू आहे. त्याशिवाय आता आणखीही बरीच विद्यापीठं तो सुरू करू इच्छित आहेत.

विषाणूशास्त्र हे अत्यंत व्यापक असं शास्त्र आहे. विषाणू हे माणसं, प्राणी, कीटक, जिवाणू, बुरशी, वनस्पती या सगळ्यांवरच परिणाम करतात. त्यामुळे प्लान्ट व्हायरॉलॉजी, अ‍ॅनिमल व्हायरॉलॉजी या आता महत्त्वाच्या शाखा आहेत. अगदी सूक्ष्म अशा जिवाणूंनादेखील विषाणूंचा संसर्ग होत असतो. शेतीच्या क्षेत्रात विषाणूशी संबंधित संशोधन मोठय़ा प्रमाणावर चालतं. या अर्थाने विषाणूंचं अत्यंत सूक्ष्म पातळीवर आणि व्यापक पातळीवर असं एकाच वेळी अस्तित्व आहे. डॉ. वर्षां सांगतात की पक्षी, सस्तन प्राण्यांसह सर्व प्रकारचे लहानमोठे प्राणी हे बऱ्याच विषाणूंचे साठे आहेत. त्यांच्या अधिवासावर आपलं आक्रमण जितकं वाढतं आहे, तितका विषाणूजन्य आजारांचा धोका वाढत गेलेला आहे. खरंतर तो आपणच वाढवून घेतला आहे. प्राण्यांमार्फत माणसामध्ये येणारे विषाणू हवेच्या माध्यमातून येत असल्यामुळे त्यातून होणाऱ्या आजारांमध्ये श्वसनमार्गात पसरणारे रोग जास्त प्रमाणात आहेत. याच अनुषंगाने सरकारने ‘वन हेल्थ’ प्रकल्प हाती घेतला आहे. माणसाचं आरोग्य हा त्याच्या जगण्यामधला महत्त्वाचा घटक आहे आणि विषाणू त्यावर परिणाम करत असतात, त्यामुळे विषाणूशास्त्राचा अभ्यास आणि त्यातलं करियर महत्त्वाचं ठरतं.

त्या सांगतात की विषाणूशास्त्र हा विषय घेऊन मूलभूत संशोधनामध्ये करियर घडू शकतं. अनेक क्षेत्रांच्या अनुषंगाने विषाणूशास्त्राचं मूलभूत ज्ञान नसेल तर त्यात पुढे जाणं अवघड ठरतं. कारण आजच्या काळात या सगळ्यांचा एकमेकांशी परस्पर संबंध आहे. सार्वजनिक आरोग्याच्या अभ्यासामध्ये विषाणूशास्त्र जाणणं गरजेचं आहे. एखाद्या रोगाचा प्रसार नक्की कसा होतो, त्यातलं विषाणूचं वर्तन कसं आहे. त्याचा सीझनॅलिटी पॅटर्न कसा आहे, हे सांगणारं शास्त्र म्हणजे साथरोगशास्त्र (एपिडेमॉलॉजी). ते कळण्यासाठी विषाणूशास्त्र कळणं गरजेचं आहे. त्यात विषाणूचा प्रसार कसा होतो हे समजून घेतलं जातं, मग बाकीचं विश्लेषण केलं जातं. संसर्गाचं स्त्री-पुरुषांमधलं प्रमाण, कुणासाठी तो विषाणू धोकादायक ठरू शकतो, या पुढच्या विश्लेषणासाठी विषाणूशास्त्राच्या अभ्यासाचा खूप उपयोग होतो. त्यानंतरची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे औषधनिर्माणशास्त्र. त्यामध्ये सुद्धा विषाणूशास्त्र माहीत असणं आवश्यक आहे. विषाणूची रचना माहीत असेल, त्याची रिप्लिकेशन सायकल माहीत असेल तर त्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारची नवीन औषधं डिझाइन करता येतील किंवा आहे त्या औषधांचं रिपर्पझिंग करता येईल. विषाणू आणि होस्ट इंटरॅक्शन, इम्युनॉलॉजी हेदेखील संशोधनाचे विषय आहेत.

आजच्या काळातला परवलीचा शब्द आहे लस. करोनाच्या महासाथीचं संकट सगळ्या जगाला व्यापून राहिलेलं असताना लसनिर्मितीमध्ये, तिचा वापर झाल्यानंतरच्या तिच्या परिणामांचा अभ्यास करण्यामध्ये, लस अधिकाधिक अद्ययावत करण्यामध्ये विषाणूशास्त्राचा मोठा हातभार आहे. लसनिर्मितीमध्ये वेगवेगळी रिकॉम्बिनेशन्स माहीत असणं गरजेचं असतं. त्या विषाणूला नियंत्रित करण्यासाठी आपण काय करू शकणार आहोत, यासाठी मूलभूत विषाणूशास्त्र माहिती असण्याची गरज असते, असं डॉ. वर्षां नमूद करतात. त्याबरोबरच विषाणूशास्त्राचं मूलभूत ज्ञान असेल तर उत्तम दर्जाचे किट्सदेखील तयार करता येतील. त्यातून आंत्रप्रोनरशीपही करता येऊ शकते. विषाणूशास्त्र अप्रत्यक्षपणे प्रॉडक्ट पेटंटिंग, प्रोसेस पेटंटिंग यातही उपयोगी पडतं असंही त्या सांगतात.

करोनाची साथ पसरल्यानंतर विशेषत: दुसऱ्या लाटेदरम्यान निदान करणाऱ्या प्रयोगशाळांवर प्रचंड ताण आलेला होता. घशातील द्रावाचे नमुने दिल्यानंतर अहवाल मिळायला तीन-तीन दिवस लागत होते. कारण त्यासाठीची उपलब्ध यंत्रणा सर्वसाधारण (नॉर्मल) परिस्थितीत काम करण्यासाठी पुरेशी ठरेल इतकीच होती. ‘महासाथ आली म्हणून त्यासाठी लागणारी तंत्रकुशल माणसं, विषाणूतज्ज्ञ तातडीने निर्माण करता येत नाहीत. पण त्याचं मूलभूत ज्ञान असलेली माणसं उपलब्ध असतील तर ते काम पुढे जाऊ शकतं. त्यामुळे रोगनिदान (डायग्नोसिस), उपचार (ट्रीटमेंट), नियंत्रण (कंट्रोल), साथरोगशास्त्र (एपिडेमालॉजी), जनुकीय विश्लेषण (जिनोम अ‍ॅनॅलिसिस) या सगळ्यासाठीदेखील विषाणुशास्त्राचा उपयोग होऊ शकतो,’ असं डॉ. वर्षां सांगतात.

जनुकीय रचनेचा अभ्यास (जिनोम सिक्वेन्सिंग) ही संकल्पनाही आपण गेली काही र्वष सातत्याने ऐकत आहोत. सार्स कोव्ही टूच्या संदर्भात देखील तिचा वारंवार उल्लेख होताना दिसतो आहे. सार्स कोव्ही टूच्या जनुकीय रचनेचा अभ्यास (जिनोम सिक्वेन्सिंग), विषाणूचं डीकोडिंग, त्याचे उत्परिवर्तित प्रकार (म्युटेशन्स) निर्माण होत आहेत का, ते औषधांना कसा प्रतिसाद देत आहेत या सगळ्याबद्दलच्या बातम्या, माहिती वारंवार पुढे येते आहे. डॉ. वर्षां त्या संदर्भात सांगतात की, २००९ मधल्या स्वाइन फ्ल्यूच्या महासाथीमध्ये एका विशिष्ट जनुकामध्ये एक विशिष्ट म्युटेशन असेल तर स्वाइन फ्ल्यूसाठीचं ओसाल्टामावीर टॅमीफ्ल्यू हे औषध उपयोगी ठरत नव्हतं. त्याच्या जनुकीय रचनेचा अभ्यास (जिनोम सिक्वेन्सिंग) झाल्यामुळे हे समजलं. आता हेच सार्स कोव्ही टूच्या बाबतीत होणं आवश्यक आहे. जनुकीय रचनेचा अभ्यास करून त्याचं विश्लेषण करणं, ते समजून घेणं हेदेखील एक वेगळं शास्त्र आहे. त्याला बायोइन्फॉरमॅटिक्स म्हणतात. त्यात गृहीतकं (प्रेडिक्शन्स), प्रारूपं (मॉडेलिंग), प्रतिपिंडं (अ‍ॅण्डिबॉडीज), स्ट्रक्टरल मॉडेलिंग करण्यासाठी विषाणुशास्त्राचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे.

२००९ ची स्वाइन फ्ल्यूची महासाथ आणि आताची कोविडची महासाथ या दोन्हीमध्ये डॉ. वर्षां यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एखाद्याला भविष्यात या क्षेत्रात करियर करायचं असेल, महत्त्वाची जबाबदारी घेऊन काम करायचं असेल, तर त्याला कोणती आव्हानं पोलावी लागतील हे डॉ. वर्षां पोतदार यांच्या कामाकडे बघून लक्षात येतं. जागतिक आरोग्य संघटनेने ‘महासाथीला तोंड देण्यासाठी तयार असणं’ (पॅण्डेमिक प्रीपेअरनेस) ही संकल्पना राबवली आहे. त्यासाठी आव्हानात्मक गोष्ट म्हणजे सतत तयार असणं. डॉ. वर्षां सांगतात की प्रयोगशाळांना ज्ञानाच्या पातळीवर सतत अपग्रेड, व्हावं लागतं. अलीकडेच चीनमध्ये एचटेन एनथ्री हा विषाणू माणसांमध्ये सापडल्याची बातमी आली. तो आपल्याकडे येईल न येईल, पण आला तर त्याला तोंड द्यायला आपण तयार आहोत ना, याची माहिती सरकारला सतत हवी असते. त्यामुळे सतत अपडेट राहणं, किट्स, प्रोटोकॉल्स नीट काम करतात का, त्यात काही अडचणी नाहीत ना, हे तपासून पाहणं गरजेचं असतं. कोविडच्या बातम्या यायला लागल्या तेव्हापासून म्हणजे १८ डिसेंबर २०१९ पासून आम्ही त्यासाठीच्या तयारीला लागलो होतो. आपल्याकडचे प्रोटोकॉल्स बघणं, किट्स (रीएजंट्स) तपासून बघणं हे सगळं करत होतो. तशी तयारी केली नसती तर २४ जानेवारी २०२० रोजी आमच्याकडे टेस्टिंगसाठी पहिलं सॅम्पल आलं आणि ३० जानेवारीला आम्ही संसर्गाचं रिपोर्टिग केलं, ते करूच शकलो नसतो. अशी सतत अप टू द मार्क तयारी ठेवणं हे खरोखरच आव्हानात्मक आहे. ती असल्यामुळेच आम्ही या महासाथीत आपल्याकडचा पहिला रुग्ण अतिशय नेमकेपणे डिटेक्ट करू शकलो.

त्या सांगतात, जागतिक आरोग्य संघटनेने सार्स कोव्ही टूच्या बाबतीत तीन-चार प्रोटोकॉल शेअर केले होते, त्या सगळ्यांमधल्या सर्वोत्तम गोष्टी घेऊन आम्ही एक प्रोटोकॉल तयार केला. तो गेले वर्षभर ‘गोल्ड स्टॅण्डर्ड’ म्हणून देशभर वापरला गेला. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आमच्या प्रयोगशाळेमध्ये ५७ लाख रीएजंट्स (किट्स) तयार केले गेले. वेगवेगळे कंपोनंट, रॉ मटेरियल आणून किट तयार करून आम्ही ते सर्व सरकारी प्रयोगशाळांना पुरवले. आत्ता यूके व्हेरियंट, दक्षिण भारत व्हेरियंट असे वेगवेगळे उत्परिवर्तित विषाणू येताहेत, पण आम्ही केलेलं हे किट त्यांनाही डिटेक्ट करतं आहे. म्हणजे अजूनही ते तेवढंच सक्षम आहे.

गेले वर्ष- दीड वर्ष सार्स कोव्ही टू हा विषाणू डिटेक्ट करणं, त्याचे उत्परिवर्तित प्रकार (व्हेरिअंट्स) समजून घेणं या सगळ्यामध्ये गेलं आहे. आता यापुढे काय या प्रश्नावर त्या सांगतात की जनुकीय रचनेचा अधिकाधिक अभ्यास. कोणताही विषाणू जितक्या प्रमाणात पसरतो, तितक्या प्रमाणात तो माणसाच्या शरीरात स्वत:च्या प्रतिकृती तयार करतो. त्यासाठी ती अस्तित्वाची लढाई असते. त्या प्रक्रियेमध्ये तो स्वत:मध्ये काय काय बदल करतो आहे, ते कुठल्या कारणामुळे आहेत, आपण लसीकरण सुरू केलं आहे तर त्यामुळे काही बदल होताहेत का, उत्परिवर्तित विषाणू आपल्याकडे बाहेरून येतो आहे का, आपल्याकडे एस्केप म्युटंट तयार होताहेत का, ते एस्केप होण्याचं कारण काय आहे, लसीला प्रतिसाद न देणारे उत्परिवर्तित विषाणू येताहेत का हे सतत तपासणं गरजेचं आहे. ते जनुकीय रचनेच्या अभ्यासाच्या माध्यमातून केलं जातं. आपल्याकडे सरकारी पातळीवर जिनोम कन्सोर्शन तयार केलं आहे. त्यात एनआयव्हीसह देशभरामधल्या दहा संस्था आहेत. त्या हे सगळं काम करत आहेत. मी मागच्या वर्षी निदानावर सगळं लक्ष केंद्रित केलं होतं, आता माझा भर जनुकांच्या विश्लेषणावर असणार आहे.

गेला साधारण दीड वर्षांचा काळ सगळ्यांसाठीच परीक्षेचा होता. करोना महासाथीतील आघाडीवरच्या योद्धय़ांसाठी तर तो त्यांच्या सगळ्या क्षमतांचा कस पाहणारा होता. डॉ. वर्षां म्हणतात तशी ती सगळी युद्धसदृश परिस्थिती होती.. तिच्यामध्ये करोनासारख्या अदृश्य शत्रूबरोबर लढणारी ही सगळी माणसं आणि त्यांचं काम या क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

प्रश्न आणि मूलभूत संशोधन

डॉ. वर्षां सांगतात, स्वाइन फ्ल्यूच्या महासाथीच्या वेळी आम्हाला विचारलं जायचं की इतक्या प्रचंड उन्हाळ्यात हा विषाणू जिवंत राहू शकतो का? तसंच आताही कुठल्याही घटकाच्या पृष्ठभागावर सार्स कोव्ही टू विषाणू जिवंत राहतो का? त्याला नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मुखपट्टीचा आकार पुरेसा आहे का? असे प्रश्न सतत विचारले जातात. अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ शकतो, कारण या संदर्भातलं मूलभूत संशोधन. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करायची नाही, सहा फूट अंतर ठेवायचं या धोरणात्मक निर्णयांसाठीदेखील मूलभूत संशोधन फार महत्त्वाचं आहे. विषाणू शोधण्यापासून ते धोरण निर्मितीपर्यंत सगळीकडे त्याचा संबंध आहे.

संशोधन आणि संयम

डॉ. वर्षां सांगतात, संशोधनाच्या क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट एका रात्रीत घडत नाही. संकल्पनेच्या पातळीवर एखादी गोष्ट लक्षात येणं गरजेचं असतं. ते प्रत्यक्षात कसं आणायचं यासाठी वेळ द्यावा लागतो. त्याअनुषंगाने अ‍ॅकॅडमिक आणि अप्लाइड नॉलेज असायला हवं. माहिती असलेलं सिद्धांताच्या पातळीवर कसं मांडणार आणि प्रत्यक्षात कसं आणणार, हे सगळं म्हणजे संशोधन आणि शोधनिबंधाच्या स्वरुपात तो प्रसिद्ध करणं हे त्याचं अंतिम स्वरूप असतं. जगभरामधल्या शास्त्रज्ञांनी ते वाचणं, त्याच्यावर अभिप्राय देणं हा सगळा संशोधनाचाच भाग आहे. संशोधन ही झटपट उत्तर देणारी गोष्ट नाहीये. तिथे संयम बाळगावा लागतो. वाट बघावी लागते. नुसतं तंत्र येऊ चालत नाही. प्रत्येक गोष्टीवर विचारांची प्रक्रिया होणं गरजेचं असतं. आज मांडली गेलेली कल्पना उद्या बदलू शकते याची तयारी ठेवावी लागते. आजच्या पिढीमधल्या मुलांना मला सगळं येतंय असं वाटत असतं. त्यांच्याकडे संयमाचा अभाव आहे.

विषाणूशास्त्रज्ञ काय करतात?

गेल्या दशकभरात आपण स्वाइन फ्ल्यू आणि सार्स कोव्ही टू या विषाणूजन्य आजारांच्या दोन महासाथी अनुभवल्या. या दोन्ही महासाथींच्या संदर्भात प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून डॉ. वर्षां पोतदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोणत्याही महासाथीमधल्या निरीक्षणांमध्ये त्यासंदर्भातल्या निरीक्षणामध्ये रिपोर्टिग, रिकग्नेशन आणि रिस्पॉन्स हे तीन आर महत्त्वाचे असतात. तो आजार ओळखता येणं, त्याचे विषाणू माहिती होणं यावर त्याला दिला जाणारा प्रतिसाद अवलंबून असतो. त्याबरोबरच विषाणू स्वत:मध्ये बदल घडवत राहतो तेव्हा विषाणूच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करणं, त्यानुसार राज्याला आणि देशाला इनपुट्स देणं, त्या त्या साथीच्या आजारातील औषधोपचारासंदर्भातले (उदाहरणार्थ स्वाइन फ्ल्यूच्या साथीमध्ये टॅमी फ्लू हे औषध उपयोगी आहे की नाही हे संशोधन) संशोधन यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. इनफ्ल्यूएन्झा हा आजार पाणपक्ष्यांमार्फत माणसांमध्ये येतो. त्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर, पाणवठय़ांवर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा, त्यांच्या शरीरात आढळणाऱ्या विषाणूंचा अभ्यास करणं, त्याच्या मार्फत होऊ शकणाऱ्या संभाव्य आजारांचा इशारा देणं यासाठी काम करणाऱ्या टीमच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे. लसीकरणाचा विषाणूच्या वर्तनावर काय परिणाम होतो आहे या अनुषंगानेही त्या काम करत आहेत. विषाणूशास्त्र या क्षेत्रात काम करायचं असेल तर काय ती वाट कुठे घेऊन जाते, हे त्यांची कारकीर्द बघितल्यावर समजू शकेल.