-सुनिता कुलकर्णी

एक महिला पोलीस अधिकारी आणि एक महिला पोलीस हवालदार सध्या देशभरात चर्चेत आहेत. त्यातल्या गुजरातच्या सुनिता यादवची बातमी वृत्तवाहिन्यांनी दाखवली. समाजमाध्यमांमधूनही ती चित्रफीत भरपूर फिरली, अजूनही फिरते आहे. तिने केलेल्या फेसबुक लाईव्हला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे.

सुनिता यादव ही गुजरातच्या सूरतमधली वराछा येथील पोलीस हवालदार. टाळेबंदीच्या काळात कार घेऊन फिरायला निघालेल्या पाच जणांना तिने अडवलं. त्यांना सोडवायला त्यांचा मित्र आला. तो होता तिथले आरोग्य मंत्री कुमार कनानी यांचा मुलगा प्रकाश. सुनिताने त्यालाही हटकलं. मग त्याने तुला इथेच ३६५ दिवस ड्युटी करायला लावीन अशी धमकी दिली. त्यावर सुनिताने त्याला सांगितलं की मी सरकारची नोकर आहे. तुझ्या वडिलांची नाही. त्याने आपल्या वडिलांना फोन लावला. तर मंत्र्यांशी बोलतानाही ती मंत्र्याचं नाव असलेली कार असेल तर त्यात तुम्ही असायला हवं, तुमचा मुलगा असेल तर ते चुकीचं आहे, असं सांगताना दिसते. तिने तिच्या वरिष्ठांना हा सगळा घटनाक्रम सांगितल्यावर त्यांनी तिला ड्यूटी सोडून घरी जायला सांगितलं. ते ऐकून सुनिताने सरळ राजीनामा दिला.

सुनिताच्या सांगण्यामधला सच्चेपणा, निडरपणा, स्पष्टवक्तेपणा अनेकांना भावला आहे. दबावापुढे न झुकता आपलं काम करण्याच्या तिच्या चोख वृत्तीमुळे लोकांनी तिला जोरदार पाठिंबा दिला आहे. तिचा राजीनामा अजून स्वीकारला गेलेला नाही.

दुसरी आहे मणिपूरमधली नार्कोटिक्स अॅण्ड अफेयर ऑफ बॉर्डर ब्युरो (एनएबी) ची अधिकारी थाऊनाऊजोम बृंदा. तिला अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या जाळ्याचा पर्दाफाश करण्याच्या उत्तम कामगिरीसाठी फिक्कीचं पारितोषिक मिळालं आहे. तिच्या या कामगिरीचं कौतुक करणारं मुख्यमंत्र्यांचं प्रशस्तीपुस्तक, तसंच वीरता पदकही तिला मिळालं आहे. एनएबीने तिच्या नेतृत्वाखाली इम्फाळमध्ये ठिकठिकाणी छापे घालून अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या अनेकांना मुद्देमालासह ताब्यात घेतलं. जून २०१८ मध्ये छापा घालून अमली पदार्थांचा साठा ताब्यात घेतला त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामधली किंमत २८ कोटी, ३६ लाख ६८ हजार होती. या अटकेनंतर मात्र सगळ्या गोष्टी बदलल्या. आधी संबंधित ड्रग माफियाच्या अटकेला संमती देणाऱ्या मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी नंतर त्याला सोडावं असा आग्रह धरला, आपल्यावर यासाठी दबाव आणला असं तिने उच्च न्यायालयात आपल्या शपथपत्रात सांगितलं आहे.

गेल्या महिन्यात तिने अमली पदार्थांच्या संदर्भातील कारवाईत लुखाउसी जू नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. त्याला न्यायालयात जामीन मिळाल्यानंतर तिने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून त्यावर टीका केली होती. त्यामुळे मणिपूर न्यायालयाने तिला शपथपत्र दाखल करायचा आदेश दिला होता. ते करताना तिने यापूर्वीच्या प्रकरणामध्ये आपल्यावर स्थानिक नेते तसंच मुख्यमंत्र्यांनी कसा दबाव आणला होता याचा उल्लेख केला आहे. आता या सगळ्याचं पुढे काय होईल ते माहीत नाही. पण राजकीय दबावापुढे न झुकणाऱ्या पोलीस कर्मचारी म्हणून त्यांची देशाने दखल घेतली आहे.