वैशाली चिटणीस यांचे ‘पोटपूजा’सदरातील लेख चटपटीत असतात. ‘कुर्रम कुर्रम’ किंवा ‘काय खाल?’ सारखे लेख आधुनिक खाद्य संस्कृतीची मजेशीर ओळख करून देतात. त्यातलाच एक लेख म्हणजे ‘सर्वव्यापी पाव’ लेख (२ सप्टेंबर) हा टेस्टी होता.

‘सर्वव्यापी पाव’ लेख वाचताना, पावाच्या बेकरीत मैदा हा ‘पायाने’ कालवला व मळला जातो म्हणून त्याला ‘पाव’ असे म्हणतात. या विनोदाची आठवण झाली. त्याचप्रमाणे सँडविचचे अनेक प्रकार वाचल्यावर ‘दो पाव’ के बीचमे दबी हुई ‘चीज’ म्हणजे सँडविच ही व्याख्या आठवली. दोन पावाच्या स्लाइसमध्ये चक्क श्रीखंड लावून सँडविच खातात ही अतिशयोक्ती वाटली.

वडा‘पाव’ आणि ‘पाव’भाजी म्हणजे पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश असे सर्वव्यापी पावाचे झाले आहे. या दोन्ही पदार्थानी बर्गर आणि हॉटडॉगच्या या परदेशी पदार्थाना मागे रेटले यात मला आनंद आहे. मैद्यापासून पाव बनतो म्हणून पाव खाऊ नका, असे डॉक्टर लोक सांगत असले तरी हॉस्पिटलमध्ये बरेचदा मस्कास्लाइस हाच नाश्ता देतात व त्यात असलेले इस्ट हा पदार्थ चांगला असतो असे म्हणतात. म्हणून आपल्या खाण्यात ‘पाव’ हा पावभाग ठेवला की झालं! असो.

फार पूर्वी पाव हा फक्त इराण्याकडेच बेकरीत मिळायचा. क्रॉसपाव, बनपाव, ब्रुमपाव असे प्रकार असत. क्रॉसपाव म्हणजे त्याच्यावर मैद्याच्या दोन पांढऱ्या लोळ्या क्रॉस करून चिकटवलेल्या असत, तो थोडा गोडसर असून त्यात संत्र्याच्या मऊ सालींचे बारीक बारीक तुकडे (साखरेच्या रंगीत पाकातले) असत.

ब्रुमपावाचा कडक, कुरकुरीतपणा, हीच त्याची खासीयत असायची.

माझी आई (९४ वर्षांची) वसईची असल्यामुळे ती अजून पावाला शिवत नाही, कारण तिच्या मनात त्या काळातील भीती अजून आहे. त्या काळी वसईत पोर्तुगीजांनी बऱ्याच कुटुंबांना विहिरीत पाव टाकून बाटवले होते (ख्रिश्चन) असे म्हणतात. धर्मातरित पिढय़ान्पिढय़ा त्या वाढलेल्या कुटुंबात अजून ‘गणपती’ आणतात- असो.

याच्या उलट माझी सून पावाचा पुरेपूर उपयोग करते. ती स्लाइस ब्रेडच्या कापलेल्या तपकिरी कडा वाळवते व त्याचा ब्रेडक्रम (पावडर) बनवते. पदार्थ कुरकुरीत करण्यासाठी किंवा त्याचा सैलपणा थिलथिलीतपणा घालविण्यासाठी ब्रेडक्रमचा उपयोग करते.

स्वच्छतेच्या दृष्टीने मात्र ‘पाव’ म्हणजे सहा पावांची असलेली लादी हा प्रकार मला चांगला वाटत नाही. कारण दुकानदार, फेरीवाले, धाबावाले, घरातले तो लादीपाव खायचा पदार्थ एवढा हाताळतात, त्याच्यावर थापल्या मारतात, डायरेक्ट पिशवीत भरतात, तेव्हा मनात येते अशा तऱ्हेने पोळ्या (चपात्या) हाताळल्यावर आपण खाऊ का?

जसा पेपरवाला, दुधवाला, घरोघरी रतीब टाकतो, तसा पुढील काळात घरोघरी दुकानदार स्लाइस ब्रेडचा पुडका दाराशी टाकून जाईल. एव्हढा ‘सर्वव्यापी पाव’ झाला असून त्याच्याशिवाय आपलं ‘पान’ हलणार नाही हे खरे.
श्रीनिवास डोंगरे – response.lokprabha@expressindia.com