– सुनिता कुलकर्णी
फिटनेस बॅण्ड हे अलीकडच्या काळातलं मध्यमवर्गीयांचं- उच्चमध्यमवर्गीयांचं आवडतं गॅजेट. तुम्ही किती पावलं चाललात, किती किलोमीटर चाललात, त्यातून किती उर्जा खर्च केलीत याचं एका सेकंदात गणित मांडून देणारे फिटनेस बॅण्ड लोकप्रिय आहेत. पण या फिटनेस बॅण्डलाही फेफरं येईल अशी अंतरं गेल्या काही दिवसांमध्ये शरद जोशींनी वर्णन केलेल्या ‘भारता’मधली माणसं चालून गेली आहेत. त्यांच्या या रखरखत्या प्रवासाची दखल देशातल्याच नाही तर परदेशातल्या मोठमोठ्या माध्यमांनीही घेतल्याचं दिसतं आहे.
मोहम्मह समीरूल हा ३८ वर्षांचा तरूण टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर २३ मार्च रोजी आपली सायकल रिक्षा आणि अवघे ७०० रुपये घेऊन दिल्लीहून इतर सायकल रिक्षावाल्यांबरोबर निघाला तो ११८० किलोमीटरचा प्रवास करून आठ दिवसांनी ३० मार्च रोजी बिहारमध्ये मधुबनी जिल्ह्यामधल्या उमंग या त्याच्या गावी पोहोचला. वाटेत ठिकठिकाणी पोलिसांनी थांबवलं, खायलाप्यायला दिलं आणि गावी पोहोचल्यावर गावप्रमुखाला वर्दी देऊन १४ दिवसांचं अलगीकरण करायला सांगितलं असं तो सांगतो.
तेलंगणामधल्या पेरूर गावाहून ११ जणांच्या गटाबरोबर छत्तीसगढमधल्या आपल्या आदेड या गावी निघालेली १२ वर्षांची मुलगी मात्र तेवढी सुदैवी नव्हती. तीन दिवसात १०० किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर गाव अवघं १४ किलोमीटरवर राहिलं असताना अतिश्रमामुळे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सगळे महामार्ग बंद असल्यामुळे तिच्याबरोबर असलेल्यांनी जंगलमार्गे जायचा निर्णय घेतला आणि त्यामुळे तिला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. २१ दिवसांचं लॉकडाऊन आणखी वाढल्यानंतर या मुलीच्या बरोबरच्या गाववाल्या लोकांनी छत्तीसगडच्या आपल्या गावी परत जायचा निर्णय घेतला होता. हे सगळे तेलंगणामधल्या मिरचीच्या शेतात काम करणारे मजूर होते. बालमजुरीला बंदी असलेल्या आपल्या देशात ही १२ वर्षांची मुलगी छत्तीसगढहून तेलंगणात मजुरीसाठी गेली होती, ही गोष्ट तर आणखीनच वेगळी.
अशी कितीतरी उदाहरणं सध्या पुढे येताहेत. ग्रामीण भागातून मोठमोठ्या शहरांमध्ये पोटापाण्यासाठी आलेल्या आणि लॉकडाऊन जाहीर होताच घरी जाण्यासाठी कोणतंही वाहन मिळत नाही हे पाहिल्यावर शेकडो किलोमीटरचं अंतर पायी पार करणारे स्थलांतरित हा जगभर सगळीकडेच करोनाइतकाच चर्चेचा विषय झाला आहे.
त्यामुळेच लॉकडाऊननंतर आपापल्या गावी परतण्यासाठी जिवाचा आटापिटा करणाऱ्या लाखो गरीब भारतीय माणसांचं हे चित्र आपल्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेवर बोलकी टिप्पणी करणारं आहे. लॉकडाऊन जाहीर करताना त्याचे परिणाम काय होतील, अशा पद्धतीने घरी जाऊ पाहणाऱ्या लोकांचं काय करायचं, त्यांना तेवढा अवधी देता येईल का, त्यांच्या हालअपेष्टा कमी करण्यासाठी काय करता आलं असतं याचा किमान विचार करण्यात संबंधित यंत्रणा कमी पडल्या का हे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.