प्रांतानुसार गणेशाच्या स्त्रिया बदललेल्या दिसतात. उत्तर प्रदेशात त्या रिद्धी, सिद्धी आहेत. आपल्याकडे विवाहित आणि दोन पत्नी असणारा गणेश दक्षिणेत मात्र ब्रह्मचारी आहे. तरीदेखील दक्षिणेकडे अनेकदा त्या सिद्धी, बुद्धी असतात, पण त्या गणेशाच्या सकारात्मक शक्ती मानल्या जातात.
शिव, पार्वती, गणेश आणि काíतकेय असं चौघांचं छोटं पण परिपूर्ण कुटुंब! मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या विवाहाची चिंता जशी सर्वसामान्य मातापित्यांना असते तशीच चिंता शंकर-पार्वतीला वाटू लागली. आपल्या मात्यापित्यांचा विचार जाणून दोघेही, ‘माझा विवाह आधी होणार,’ असं म्हणू लागली. शंकर-पार्वतीला आश्चर्य वाटले. मुलांचा वाद संपावा म्हणून त्यांनी संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा जो कोणी प्रथम पूर्ण करेल त्याचा विवाह आधी होईल, असे सांगितले. काíतकेय लगेच पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले. गणरायांनी मात्र आपल्या मात्यापित्यांची एका आसनावर बसवून विधिवत पूजा केली, प्रदक्षिणा घातली आणि आपल्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. शंकर-पार्वतीला हे आवडले नाही. त्यांना आपल्या मुलाच्या या वागण्याचा थोडा रागच आला, पण गणरायांनी स्पष्टच विचारले,
पित्रोश्च पूजनं कृत्वा प्रक्रािन्त च करोति य।
तस्य वै पृथिवीजन्यफलं भवति निश्चितम्॥
अपहाय गृहे यो वै पितरौ तीर्थमाव्रजेत्।
तस्य पापं तथा प्रोक्तं हनने च तयोर्यथा॥
पुत्रस्य च महत्र्तीथ पित्रोश्चरणपङ्कजम्॥
अन्यर्तीथ तु दूरे वै गत्वा सम्प्राप्यते पुन।
इदं संनिहितं र्तीथ सुलभं धर्मसाधनम्॥
आपल्या वेद आणि शास्त्रात जो कोणी आपल्या मातापित्यांना प्रदक्षिणा घालेल त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ मिळेल, असे सांगितले आहे. तुम्ही हे अमान्य करत असाल तर तुम्ही वेदसुद्धा अमान्य करता आणि तुमचा अवतारसुद्धा. म्हणून तुम्ही माझा विवाह संपन्न करा.
गणेशाच्या या बोलण्यावर शंकर-पार्वती निरुत्तर झाले. हा सारा संवाद प्रजापतींच्या कानावर गेला. ते गणरायांच्या बुद्धिचातुर्याने अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी आपल्या दिव्य रूपाच्या दोन कन्या ‘सिद्धी’ आणि ‘बुद्धी’ गणरायांना देण्याचा मानस व्यक्त केला. पुढे गणपतीला सिद्धीपासून ‘क्षेम’ आणि बुद्धीपासून ‘लाभ’ असे दोन पुत्र प्राप्त झाले. गजाननाच्या विवाहाची ही सारी कथा शिवपुराणात येते. ब्रह्मवैवर्तपुराणात सिद्धी, बुद्धीच्या जागी पुष्टी नावाच्या सुंदर कन्येशी गणपतीचा विवाह झाल्याचे म्हटले आहे.
शिवपुराणात सिद्धी, बुद्धी आहेत, तर ब्रह्मवैवर्तपुराणात सिद्धी आहे, पण बुद्धीची जागा पुष्टीने घेतली आहे. मत्स्यपुराणात रिद्धी आणि बुद्धी आहेत. याशिवाय प्रांतानुसार गणेशाच्या स्त्रिया बदललेल्या दिसतात. उत्तर प्रदेशात त्या रिद्धी, सिद्धी आहेत. आपल्याकडे विवाहित आणि दोन पत्नी असणारा गणेश दक्षिणेत मात्र ब्रह्मचारी आहे. तरीदेखील दक्षिणेकडे अनेकदा त्या सिद्धी, बुद्धी असतात, पण त्या गणेशाच्या सकारात्मक शक्ती मानल्या जातात. कधी कधी त्याचा विवाह सरस्वतीशी, तर कधी शारदेशी झाल्याचे मानले जाते. बंगालमध्ये दुर्गापूजेच्या वेळी गणपतीचा विवाह ‘कल बो’ या देवतेशी केला जातो. ‘कल बो’ या नऊ पत्री आहेत. दुर्गापूजेच्या वेळी या ‘कल बो’ला साडी नेसवली जाते. प्रत्येक पत्री ही कोणत्या तरी एका देवतेचे प्रतिनिधित्व करते आणि एकत्रितपणे ती दुर्गा असते. खरं तर दुर्गा म्हणजे पार्वती. पार्वती ही गणेशाची माता, पण इथे मात्र दुर्गा असलेल्या ‘कल बो’चा विवाह गणेशाशी केला जातो. महाराष्ट्रातसुद्धा साधारण अशीच स्थिती आहे. गणपतीच्या वेळी गौरींचेही आगमन होते. या गौरी म्हणजे गणपतीच्या पत्नी किंवा माता हे चित्र संदिग्ध आहे.
गणेशाचा विवाह झाला आहे किंवा नाही याविषयी असलेल्या संदिग्धतेतूनच कदाचित गणेश मंदिरांतून गणपतीच्या मूर्तीजवळ दोन लहान स्त्री मूर्ती दाखवल्या जातात. या कधी रिद्धी, सिद्धी असतात, तर कधी सिद्धी, बुद्धी. अनेकदा त्या गणपतीच्या दासीही मानल्या जातात. भारतीय दैवत परंपरेत गणेशाचा प्रवेश तसा उशिरा झाल्याने त्याच्या विवाहाचा विचारसुद्धा उशिरा केला गेला असावा.
गणेशाच्या या विवाह सोहळ्यात काíतकेय कुठेच नव्हते. ते अजून पृथ्वी प्रदक्षिणा करत होते. काही काळाने पृथ्वी प्रदक्षिणा करून काíतकेय परत आले तेव्हा देवर्षी नारदांकडून गणपतीचा विवाह संपन्न झाल्याची वार्ता त्यांना कळली. ते अत्यंत व्यथित झाले. त्यांनी आपल्या पितृगृहाचा त्याग करण्याचा निश्चय केला. शंकर-पार्वतींनी त्यांना पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते आपल्या निर्णयापासून विचलित झाले नाहीत. यानंतर ते क्रौच पर्वतावर निघून गेले. तेथपासून त्यांचे कुमार हे नाव त्रलोक्यात विख्यात झाले. ही सारी कथा शिवपुराणात येते.
पण ब्रह्मवैवर्तपुराणाने काíतकेयांच्या विवाहाची ही उणीव भरून काढली आहे. त्यानुसार ब्रह्मदेवाने वेदोच्चारण करून देवसेना या सुंदर, सुस्वभावी कन्येशी काíतकेयाचा विवाह संपन्न केला अशी काíतकेयाच्या विवाहाची कथाही येते. थोडक्यात गणपतीच्या विवाहामुळे रुसून बसलेल्या काíतकेयांचा राग शांत करण्याचा प्रयत्न ब्रह्मवैवर्तपुराणाने केला आहे.
आसावरी बापट – response.lokprabha@expressindia.com