निमित्त
शिवाजी आंबुलगेकर – response.lokprabha@expressindia.com
चिंचंनं घासून घासून निर्मळ छक् केलेला पितळंचा लोटा गुडीवर पालथा घातला की खोबराचान् साखरंच्या गाठींचा हार घालून पूजा सुरू. वाडय़ाच्या थोरल्या अन् घरांतल्या दरवाजांवर आंब्याच्या पानांचं हिरवंगार तोरण. त्यात दर पाच पानांआड एखादं पळसाचं फूल बांधलं की तोरण ऐटदार वाटू लागतं. घवघव वाटू लागतं.

पानझडीच्या झाडांवरून फाल्गुन परागंदा होतो अन् कैक झाडाझुडपांवर चैत्राचा चटका उठून दिसू लागतो. कोवळीलुस पानं चमचमायला लागतात. साऱ्या आलम दुनियेवर कवळ्यापिच् वसंताचं राज सुरू होतं. पळसाची झाडं आपली फुलं उधळून उधळून थकून जातात. जशी फाल्गुनात उरलीसुरली थंडी विरत जाते; तसं पुनवंचा चांदही सरता सरता होत जिरत जातो. अन् आवसंच्या अंधारात तर सम्दाच मावळून जातो. फाल्गुनाचं िहदीकरण तर मला मरणाचं आवडतं.. ‘फागुन’ ! ओहो ..फागुन..फागुनाची आवस आपलं आडंग बदलते अन् चताची प्रतिपदा उगवतीला येते. मग सारेजण म्हणतात   ‘पाडवा आला! पाडवा आला!!’

बापूनं रातीच जतून ठेवल्याप्रमाणं झुंजुरक्या झुंजुरक्या जागं होणं.. मारवाडय़ाच्या आसामीत जाणं.. पंदाडातल्या आमराईतल्या केळ्या आंब्याच्या कैऱ्या, लांबसडक पानं, िलबाचा झुबकेदार िलबोरा घेऊन ऐटीत घरी येणं. वाडय़ात पाऊल टाकताच माय न् बापूची गुडी उभारायची धांदल सुरू असायची. दिवसासमक गुडी उभारायचा म्होरत टळू नये म्हणून सम्दा आटापिटा. शिमग्याच्या आगंमागं रमन्याच्या माळावरून लांबलचक सागाची दांडी गुडीसाठी आणलेली. तिला निर्मळ धुऊन पुसून घेतलं की तिला पितांबर नेसवायची मायची गडबड. हा पितांबर पिढय़ान् पिढय़ाच्या संदकात जाबिदी ठेवलेला. चिंचंनं घासून घासून निर्मळ छक् केलेला पितळंचा लोटा गुडीवर पालथा घातला की खोबराचान् साखरंच्या गाठींचा हार घालून पूजा सुरू. वाडय़ाच्या थोरल्या अन् घरांतल्या दरवाजांवर आंब्याच्या पानांचं हिरवंगार तोरण. त्यात दर पाच पानांआड एखादं पळसाचं फूल बांधलं की तोरण ऐटदार वाटू लागतं. घवघव वाटू लागतं.

पाडव्याच्या स्वयंपाकातलं ते पन्हं; तसं आपल्याला कधी आवडत नव्हतं. तरी त्यासाठी लागणारा सारा सरंजाम गोळा करण्यात मोठी मज्जा वाटायची. मारोतीला फोडलेल्या खोबऱ्याचे तुकडे, चिंचचं पाणी, हरभऱ्याची दाळ, चांदण्यांसारखी िलबाची चुटुकदार फुलं अन् कडू लागू नये म्हणून त्यात टाकलेला पाकाच्या सायीचा गूळ. असं हे पन्हं नरडय़ाखाली उतरवायचं म्हणजे भयंकर वाटायचं. परिक बापू म्हणायचे ‘आपल्या शरीराला साऱ्या चवींची गरज असते. पाडव्याच्या निमित्तानं िलबाचा तोर, त्याची कडू चव शरीराला मिळते.’ तर माय म्हणायची, ‘हे पिलं म्हणजे ग्यान येतंय.’ ग्यान इतकं सस्ता आसंल तर चला म्हणून नाक दाबून, डोळे गच्च मिटून गटकन् गिळून मोकळं व्हायचं. अन् गपकन् परातीत दुधा-तुपा-साखरंत घोळलेल्या बोटव्यांवर ताव मारायचा. अन् कुडत्याच्या बाहीला तोंड पुशीत घराबाहेर सटकायचं.

मला िहदू कालगणना निसर्गाच्या अधिक जवळची वाटते. शिशिरात पानन् पान गळून जातं. नुसत्या फांद्या उरतात. साऱ्या झाडाझुडपांचा झाडा होऊन जातो. झाडांखाली पानांचा नुस्ता खच पडलेला असतो. गळून पडलेल्या पानांच्या जागी नवी पालवी जागी होते. बारीक बारीक कोंब म्हणजे पानांचे इवले इवले थेंबच जणू. ते दिवसेंदिवस मोठे होऊ लागतात. उगवताना त्यांचा रंग लालगा-तांबुस असतो. पानं हळूहळू मोठी होऊ लागतात तसतसे त्यांचे रंग बदलू लागतात. तांबुस-नारंगी-पोपटी-हिरवा-गडद हिरवा असा त्यांचा रंगप्रवास सुरू असतो. आणि शेवटचा प्रवासही तस्साच उलटय़ा दिशेनं..

ओहोहोहो! हा बघा आमच्या आंबुलग्याच्या सारतळ्यात, कडय़ावरू बघा कसला मस्त नजारा मांडलाय. टेंबराच्या झुडपाला कसली तांबेरी- तपकिरी कवळी कवळी लुस् पानं लगडलीत. ही झुडपं मार्गशीर्षांपस्तोर चांगली बांड होती. पुसात माणिक महाराजाच्या जत्रंला ही बांडं कुणी तोडून आडवी केली. अन् मिठाईच्या भट्टीत दिवाळी साजरी करीत, तडतडून जळून गेली. साग, हेळा, हेक्कळणी, मोह, बदाम, िपपळ या झाडांनी आपले जुने पेहराव टाकून दिले आहेत. आणि नव्या सालाचा पाडवा गोड करण्यासाठी नवे नवे पेहराव घालून नटून बसले आहेत. पळसाची फुलं बघा फुलून फुलून कशी लालबुंद झाली आहेत. त्यांचं केसरी-शेंदरी तेज आता मावळत आलंय. फुलांमधून फुलून आलेल्या पुंकेसरांनी आता हिरव्या शेंगा धरल्यात. काटशेवरीची गेंद फुलं तर्रारून आली आहेत. अन् त्यांचं काटवन अन्निदार झालंय. पांगऱ्याच्या पिवळसर-पांढुरक्या फांदी फांदीवर लाल-शेंदरी रंगाचे लक्ष लक्ष ज्योतिपुंज लगडले आहेत. झाडाच्या बुडापासून फांदीकडं काळ्या मुंगळ्यांची रांग पुढं सरकत आहे. अवकाळी पावसानं गारगुंड झाल्यावरही त्यातून बचून राहिलेल्या आंब्याच्या बारीक बारीक कुयऱ्या कशा लाडाच्या लेकींसारख्या बापाच्या अंगा-खांद्यावर लोळण घेत आहेत. नुसत्या टिंगारून गेल्या आहेत. चारीचा फुलोरा झडून गेलाय. तिथं आता चिंगळी चारं वाऱ्या-वावदानासंगं िधगाणा घालीत आहेत. अन् या गुलमोहरांना कशाचा राग आला आसंल? कित्ती लालेलाल होऊन गेलेत, हे बापुने. पानं असताना तर किती शांत शांत असतात.

गऊळवाटंच्या दोन्ही कडंनं फिरंगी चिंचंची मायंदळ झाडं. गावातल्या पोरासोरांनी रामपाऱ्यात या चिंचांना भंड आणला आहे. कुणी दगडं, धोंडे घालून कुणी वर चढून तर कुणी लक् लक् हलवून त्यांची दैना दैना केली आहे. आता या ध्या दुपारा या आडरानात कुणी, कुणीच नाही. ही फिरंगी झाडं अन् त्यावर कहर करणारी कैक पाखरं. पांढऱ्या कच्च्या चिंचा, कुठं अर्धवट फुटू आलेल्या गाभुळ्या चिंचा तर कुठं वेटोळा घालून आंबुसतांबुस झालेल्या चिंचा वाऱ्याच्या हेलकाव्यानं झोके घेत आहेत. पल्याडच्या किलबिलाटातून एक बुलबुल गिरकी घेऊन फिरंगी चिंचंच्या डिरीवर बसला आहे. त्यानं तांबडीजांभळी चिंच हेरली आहे. आपले इवले पंख पसारून चोचीनं त्या फिरंगी चिंचंशी तो झटय़ा घेत आहे. मस्ती करीत खात खात कधी चोचीत चिंच धरून झोंबकळ्या घेत आहे. पलीकडच्या झाडावर याहून आणखी वेगळं नाटय़ सुरू आहे.

हेळ्याचं ते थोटं बांड बघितलं का? कुऱ्हाडीच्या भयंकर घावांवरच ही लाल-तांबुस, कवळी-पिवळी पानं कशी उगवून आली आहेत. तेलामधून तळून काढल्यासारखी तजेलदार तेल् तेल् पानं मोठय़ा ऐटीत वाऱ्याच्या झुळकीसंगं डुलतात. काय हा नजारा आहे..या पालवीची  कवळिकता, हे सुकुमारपण, हे गोरं गोरं गोजिरवाणं रूपडं. खरंच रसिकाला येड लावतं. बघा ही चत्र पालवी. साऱ्या सृष्टीच्या सौंदर्याचा अस्सल खजाना असा भरभरून उधळीत आहे. या सृष्टीच्या तान्हेपणाचं बारसं म्हणजे हा चत्र प्रतिपदेचा पाडवा. इवल्या-चिमुकल्या बाळपानांनी फांदी-फांदीवर दिवे लावून साजरी केलेली दिवाळी म्हणजे पाडवा. झाडा-झाडांवर फुलांनी लावलेल्या गुढय़ा म्हणजे पाडवा. निसर्गाच्या सर्जनाचा महोत्सव म्हणजे पाडवा. अन् निसर्गाच्या सर्जनापासून विसर्जनापर्यंतचं एक आवर्तन म्हणजे साल. अशी ही सालगणना. अशी ही कालगणना.

मातीचे सेवक कुणबी. आपले शेतीचे सारे हिसाब-किताब पाडव्यापासूनच सुरू करतात अन् फाल्गुनाच्या आवसंला गुंडाळतात. वावरात राबण्यासाठी लावलेले सालगडी, पाडव्याच्या झुंजुरक्याच कामावर हजर होतात. गावखोरच्या मळ्यात मुहूर्ताचा नांगर धरतात. रोकड रकमेसह सालचंदी म्हणून पाच मण, सहा मण ज्वारी, दोन खमिस, धोतरजोडा, जोडा असं गडय़ांचं साल पाडव्याच्या आठ-पंधरा दिवस आधीच ठरतं. खाडे ठरतात. असा हा पाडवा कुणब्यांच्या कृषी संस्कृतीतल्या कैक कामांचा आरंभ दिवस असतो.

पासोडीतल्या वरलाकडच्या धुऱ्यावर सनाळ पसरलेल्या शिरीषाच्या झाडावर, उडणाऱ्या म्हातारीसारखी अगणित फुलं उमलून आली आहेत. सहसा शिरीषाची फुलं पिवळसर पोपटी रंगांची असतात. पण हा शिरीष मात्र तांबुस-जांभळ्या रंगाचा आहे. दिवसभर ऊन झेलून दमून गेलंय हे झाड. असल्या आगजाळ उन्हातही ही मऊ मुलायम फुलं तग धरून आहेत. रातीला जेवणं आटपून आपापली बिस्तरं घेऊन गल्लीतले सारे बांड बांड पोरं आमच्या गावखोरच्या मळ्यात अंथरुणं पसरतात. गप्पांवर गप्पा झडत राहतात. वर आभाळातलं खाटलं हळू हळू क्षितिजाकडं कलू लागतं. वरलाकडून थंडगार हवेच्या झुळका सुटतात अन् सोबत शिरीषाच्या फुलांचा हळुवार दरवळ घेऊन येतात. त्या सुगंधानं जिवाला मोठा आल्हाद वाटतो. रात्र जसजशी वाढत जाते तसे गप्पांचे उसासे झोपेच्या हवाली होतात.

कुहू ऽऽ कुहू ऽऽ अशा गोड आवाजानं जाग येते. साऱ्या अंगाला सुस्ती आणणारी हीच ती बसंती हवा झोपूही देत नाही अन् उठूही देत नाही. नुस्तं या आडंगावरून त्या न् त्या आडंगावरून या आडंगावर लोळी घ्यावी वाटते. रानात वाकळीवर झोपण्याचा परमानंद सुटूच नये असं वाटत राहतं. पण कोकीळ वारंवार जागे करते. ती आपल्या मंजुळ कुहू कुहूनं ‘चत्र आला ..वसंत आला. पाडवा आला.’ अशी गोड वर्दी देते.