सुनिता कुलकर्णी

“पंछी नदिया पवन के झोंके
कोई सरहद ना इन्हें रोके”

जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या या ओळी पक्षी, नद्यांप्रमाणेच प्रेमीजनांनादेखील लागू पडतात. प्रेमात असलेलं भौगोलिक अंतर आजकाल निदान आभासी जगात तरी मिटलं जातं. पण फेसबुक, व्हॉट्सअॅपवर जन्मोजन्मी साथ दिल्या घेतल्या गेलेल्या आणाभाका त्या दोघांना फार काळ एकमेकांपासून दूर राहू देत नाहीत. साहजिकच आहे, आपल्या जीवलगाला कधी तरी प्रत्यक्ष भेटावं, डोळे भरून पहावं असं वाटत असणारच ना…

पण असं वाटणंच उस्मानाबादच्या त्या बिचाऱ्या प्रेमवीराच्या अंगाशी आलं आहे. त्याचं वय जेमतेम २० वर्षाचं. प्रेमातला सगळा वेडेपणा करण्याचं. पण वेडेपणा करायचा म्हणजे किती करायचा? एक तर या पठ्ठ्याने प्रेमप्रकरण केलं ते फेसबुकवरून. तेही कुणाशी तर पाकिस्तानी तरूणीशी. मग प्रेमातला दुरावा सहन होईना म्हणून तिला भेटायला निघाला थेट पाकिस्तानात.

त्यासाठी त्याने उस्मानाबादहून दुचाकीवरून थेट कच्छ गाठलं. आजच्या करोनाच्या, टाळेबंदीच्या काळात हे वेडं धाडसच. कच्छच्या सीमेवर जात असताना वाटेत दुचाकी सतत वाळूत रुतायला लागली म्हणून ती तिथेच सोडून तो चालत निघाला आणि अलगद पोलिसांच्या हातात सापडला. तो बेपत्ता असल्याची त्याच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. तेव्हा त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून पोलिसांना त्याचं प्रेमप्रकरण समजलं आणि मोबाइल टॉवरवरून त्याचा ठावठिकाणा समजला.

विशीपंचविशीच्या प्रेमात वेडं धाडस करणं हे अगदीच समजण्यासारखं आहे. पण फेसबुकवरून चॅट सुरू असलेल्या प्रेयसीसाठी सीमेवरून बेकायदा पाकिस्तानात जायचा प्रयत्न करणं हे किती धोक्याचं आहे हे या प्रेमवीराला माहित नसेल का?

मुळात फेसबुकवरून चॅट करणारी पाकिस्तानमधली कुणी प्रेयसी खरंच असेल असंही नाही. सुंदर मुलीच्या चेहऱ्याआडून भयंकर षडयंत्रं असू शकतात किंवा अगदी त्याच्या शेजारच्या बिल्डिंगमधूनही कुणी त्याची अशी गंमत करत असेल किंवा ती प्रेमाची चर्चा हीसुद्धा सांकेतिक असू शकेल. पोलीस यंत्रणा यथावकाश त्यावर काम करेलच.

पण खरोखरच हा मुलगा प्रेमासाठी अशी सीमा पार करायला निघाला असेल तर त्याच्यासाठी हा सगळा आयुष्यातला किती मोठा धडा आहे. उस्मानाबाद ते कच्छ असा दुचाकीवरून प्रवास करणं… मोटारसायकल वाळून रूतली म्हणून ती तिथेच सोडून चालत सीमेवर जायला निघणं आणि त्याचवेळी पोलिसांनी येऊन ताब्यात घेणं…

काहीतरी खटपटी लटपटी करून तो खरोखरच सीमापार गेला असता तर त्याचं काय काय झालं असतं? ही बातमी वाचणाऱ्या करण जोहरला मात्र गालातल्या गालात हसू येईल. भारत पाकिस्तानचे राजकीय संबंध कसेही असोत, पण भारत पाकिस्तान प्रेमाचे सिनेमे नेहमीच चालतात. करणच्या डोळ्यासमोर नटनट्यांची यादी येत असेल. त्यांचे उंची कपडे, त्यांची उंची घरं येत असतील आणि त्याला डोळ्यासमोर दिसत असेल सीमेपलीकडच्या वैराण वाळवंटात प्रेमगीत गात नायकाची वाट बघत उभी असलेली नायिका…

पण वास्तवात तरी या फेसबुकी प्रेमकहाणीचा द एण्ड पोलीस स्टेशनमध्येच झाला आहे.