विजया जांगळे
‘सारी’? हा कोणता नवा आजार? तुम्हालाही असा प्रश्न पडलाय का? तर, हा नवा आजार नाही. डेंग्यू, बर्ड फ्लू जेवढे जुने तेवढाच जुना हा सिव्हिअर अक्युट रेस्पिरेटरी इलनेस (सारी)! पण या आजाराने आज वैद्यकीय क्षेत्राची झोप उडवली आहे. त्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे करोना आणि सारीची लक्षणं सारखीच आहेत; त्यामुळे आपण सारीचा रुग्ण म्हणून ज्याच्यावर उपचार करत आहोत, तो प्रत्यक्षात करोनाचा रुग्ण तर नाही ना, याची खातरजमा करून घेणं हे सध्या डॉक्टरांपुढे मोठं आव्हान आहे. आणि दुसरं म्हणजे देशातल्या एकू ण सारीग्रस्तांपैकी १.८ टक्के रुग्ण कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळले आहेत.
करोना आणि सारी हे दोन्ही आजार श्वसनाशी संबंधित. सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, ताप शरीरावर सूज ही सारीची लक्षणं! यातली बरीचशी लक्षणं करोनाच्या रुग्णांतही आढळतात. विदर्भ आणि मराठवाड्यात मिळून सारीच्या रुग्णांची संख्या काहीशेंच्या घरात गेली आहे आणि त्यापैकी काही रुग्णांना या आजारामुळे जीवही गमावावा लागला आहे. १५ फे ब्रुवारी ते २ एप्रिल दरम्यान, म्हणजे करोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच आयसीएमआर सारीच्या रुग्णांवर लक्ष ठेवून होती. या कालावधीत सारीच्या पाच हजार ९११ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०४ म्हणजेच १.८ टक्के रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं आढळलं.
सारीचे सर्वाधिक रुग्ण गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि के रळमध्ये आढळले. सारीग्रस्त करोना पॉझिटिव्ह आढळण्याचं प्रमाण गुजरातमध्ये १.६ टक्के , तामिळनाडूमध्ये ०.९ टक्के , के रळमध्ये ०.२ टक्के तर महाराष्ट्रात तब्बल ३.८ टक्के असल्याचं या अभ्यासातून निदर्शनास आलं. महाराष्ट्रातल्या आठ जिल्ह्यांमध्ये अशी प्रकरणं आढळली असून; या जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने कंटेनमेंट झोन तयार करण्यात यावेत, अशी सूचनाही या अभ्यासात करण्यात आली आहे. त्यामुळे जुन्याच ‘सारी’ नवं आव्हान होऊन उभा ठाकल्याचं दिसत आहे.