scorecardresearch

अनाहत नाद : सहस्रकात एकमेव!

लता मंगेशकर यांचे माझ्याशी, माझ्या कुटुंबीयांशी असलेले ऋणानुबंध शब्दांच्या पलीकडचे होते!

lata-mangeshkar-pyarelal-sharma
आम्ही लतादीदींकडे गेलो. त्यांनी माझं ट्रम्पेट ऐकून मला तब्बल ५०० रुपयांचं बक्षीस दिलं. ६० वर्षांपूर्वी ती खूप मोठी रक्कम होती.

प्यारेलाल शर्मा – response.lokprabha@expressindia.com
लता मंगेशकर यांचे माझ्याशी, माझ्या कुटुंबीयांशी असलेले ऋणानुबंध शब्दांच्या पलीकडचे होते! माझे वडील पंडित रामप्रसाद हे निष्णात ट्रम्पेट वादक होते. संगीताविषयी त्यांना सखोल ज्ञान होतं. त्यामुळे मोठा होत असताना माझ्या संगीतविषयक जाणिवा अधिक समृद्ध झाल्या. बाबूजींची इच्छा होती, की मी व्हायोलिन शिकावं, पण त्यासाठीचे पैसे आमच्याकडे नव्हते. मग वडिलांची ट्रम्पेट वादनाची कला मी हळूहळू अवगत केली. वडील मला ट्रम्पेट वाजवायला घेऊन जात आणि धनिक मंडळी मला एक-दोन रुपये बक्षिसी देत. एकदा माझ्या वडिलांना कोणी तरी लतादीदींना भेटण्याचा सल्ला दिला. आम्ही लतादीदींकडे गेलो. त्यांनी माझं ट्रम्पेट ऐकून मला तब्बल ५०० रुपयांचं बक्षीस दिलं. ६० वर्षांपूर्वी ती खूप मोठी रक्कम होती. लतादीदींची आर्थिक परिस्थिती चांगली होती, मात्र तरीही त्यांनी एका अनोळखी मुलाला इतकी मोठी रक्कम दिली, हे कोणालाही सांगून खरं वाटलं नसतं! लतादीदींचा हात असा देता होता.

मला त्यांनी शून्यातून उभं केलं, हे अगदी त्रिवार सत्य आहे. माझ्या आणि लक्ष्मीकांतच्या (कुडाळकर) यांच्या भेटीलादेखील दीदीच कारणीभूत होत्या. त्यांच्या सहवासातच आमची सांगीतिक जडणघडण झाली. दीदी मुंबईत कुलाबा विभागात, एका संगीत जलशात प्रमुख पाहुण्या म्हणून गेल्या होत्या. ते वर्ष कोणतं होतं, हे मला आता आठवत नाही. त्याच जलश्यात १२ वर्षांचा लक्ष्मीकांत मॅन्डोलीन वाजवण्यात देहभान हरपून गेल्याचं दीदींनी पाहिलं. इतक्या लहान वयात त्याचं वाद्य आणि सुरांवर असलेलं असामान्य प्रभुत्व त्यांनी ओळखलं. त्याची आर्थिक परिस्थिती बेतास बात असल्याने कमावणं गरजेचे होतं, हे दीदींना समजल्यावर त्यांनी त्याला संगीतकार सी. रामचंद्र, नौशाद, शंकर जयकिशन यांच्याकडे पाठवलं. लक्ष्मीकांत त्यांच्या ताफ्यात सहायक म्हणून काम करू लागला. इतर प्रौढ वादकांबरोबर जेव्हा तो रेकॉर्डिगला बसे, तेव्हा त्याची उंची माईकपर्यंत पुरत नसे. त्याला त्याच्या मॅण्डोलीनचे सूर माईकपर्यंत पोहचवण्यास त्रास होतोय, हे दीदींच्या लक्षात आलं आणि त्याच्यासाठी एका उंच खुर्चीची सोय दीदींनी करून दिली.

दीदी लक्ष्मीकांतला म्हणाल्या, अरे ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुझा जन्म झाला म्हणून तुझं नाव लक्ष्मीकांत ठेवलं. नावातच लक्ष्मी आणि बुद्धीत सरस्वतीचा वास. तुला आयुष्यात पुढे काहीही कमी पडणार नाही बघ! त्या म्हणाल्या तसंच झालं. दीदी रत्नपारखी होत्या.

आम्हा दोघांचीही (लक्ष्मीकांत- प्यारेलाल) आर्थिक स्थिती खूप हलाखीची होती. दीदी आणि मंगेशकर कुटुंबीयांनी ‘सुरीला बाल केंद्र’ स्थापन केलं होतं. लक्ष्मीकांत आणि त्याचे मोठे बंधू शशिकांत, मी, माझे धाकटे भाऊ गणेश, गोरख सगळे दीदींच्या या केंद्रात संगीत शिकत असू. त्या काळात हे केंद्र दीदींच्या घरी चाले. संगीताची शाळाच जणू! या शाळेनेदेखील माझ्यावर खूप चांगले संस्कार केले.

लक्ष्मीकांत आणि मला आमच्या परिश्रमांमुळे कामं मिळत गेली, पण आम्ही राखेत पडलो होतो तेव्हा आमच्यावर फुंकर घालून आमचं बोट पकडून मार्ग दाखवणाऱ्या दीदीच होत्या, हे मी विसरू शकत नाही.

आम्ही शालेय शिक्षण सोडू नये, असा दीदींचा आग्रह होता. त्यांना फार लवकर शाळा सोडावी लागली आणि कुटुंबाचा भार त्यांच्यावर आला. म्हणून होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्या कासावीस होत. मला आणि लक्ष्मीकांतला दीदीने शिकता शिकता कुटुंबाला हातभार लावण्याचा सल्ला दिला, तो यामुळेच!

जीवनाच्या एका टप्प्यावर आमच्या लक्षात आलं, की अतिशय प्रोफेशनल आणि निष्णात अरेंजर आणि व्हॉयलिनिस्ट अँथनी गोन्साल्विस हिंदूी चित्रपटांसाठी काम करतात. त्यांच्याकडून व्हायोलिनचे धडे गिरवणं आवश्यक होतं. अँथनी प्रभादेवीला अहमद मॅन्शनमध्ये राहात असे. मी माझ्या घरून सकाळी ६ला निघत असे. ठीक ७ वाजता अँथनीच्या घरी पोहोचत असे. सकाळी ७ ते ९ तो मला व्हायोलिन शिकवत असे. मग ९ वाजता मी त्याच्या घरून निघून साडेनऊ ते १० पर्यंत रेकॉर्डिग स्टुडिओत पोहोचत असे. तिथे संध्याकाळी ६ पर्यंत काम करत असे. संध्याकाळी ७ ते ९ मी रात्रशाळेत जात होतो. रात्री १०-१०.३० पर्यंत थकून भागून घरी पोहोचत असे.

दीदींनीच आम्हा दोघांच्या नावांची शिफारस नौशाद, सी. रामचंद्र यांच्याकडे केली. या नामवंत संगीतकारांकडे आम्ही सहायक संगीतकार म्हणून काही र्वष काम केलं. ‘पारसमणी’ या १९६३ मध्ये रीलीज झालेल्या फिल्मपासून आम्ही स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून काम करू लागलो. आमच्या प्रत्येक सिनेमात दीदींनी गाणं गायलं आहे. मला माझ्या बालपणापासून दीदींचा सहवास लाभला, तो असा! म्हणूनच मी सांगतो- दीदी वटवृक्ष होत्या. त्यांची छाया अनेकांना लाभली.

दीदींशी माझं नातं संगीतापुरतं मर्यादित नाही. मी त्यांना माझ्या कुटुंबाचा सदस्य मानतो. वडीलधाऱ्या म्हणून त्यांचा सल्लाही घेतो. आमच्या संगीत कारकीर्दीत त्यांचं योगदान फार मोठं आहे.

आमची अनेक गाणी त्यांनी गायली आणि आम्हाला मोठं केलं. अनेकांना कदाचित ठाऊक नसेल, की बहुतेक कॉन्सर्ट्समध्ये त्या स्वत: ऑर्केस्ट्रायजेशन करत. संगीतकाराचं कामदेखील त्या सहज करत. बर्लिनमध्ये आमचा दीदींसोबत शो होता. तिथले प्रेक्षक दीदींच्या प्रत्येक गाण्याला वन्स मोअर देऊ लागले. त्यासुद्धा उत्स्फूर्तपणे गात राहिल्या आणि श्रोते स्वरवर्षांवात चिंब झाले!

लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत ५० हजारांपेक्षा अधिक गीतं ध्वनिमुद्रित केली. हिंदूी चित्रपटांतील सर्वाधिक गाणी त्यांनी आमच्यासोबत रेकॉर्ड केली. लता मंगेशकर यांना आमच्यासोबत काम करणं अधिक आवडे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, त्यांना रागदारी असलेली गाणी अधिक आव्हानात्मक वाटत. आमच्या चित्रपटांतली बहुतेक गाणी विविध रागांवर बेतलेली असत. सध्या हा ट्रेण्ड फारसा राहिलेला नाही. संगीत- गाणी हा सिनेमाचा आत्मा असतो, पण हल्ली एक तर सिनेमातून गाणी नामशेष होऊ लागली आहेत शिवाय एका सिनेमासाठी तीन-चार संगीतकार नेमण्याचा नवा ट्रेण्ड सुरू झाला आहे. असो! आमच्या ‘सती सावित्री’ या चित्रपटाची गाणी भरत व्यास यांनी लिहिली होती. त्यातील ‘जीवन डोर तुम्ही संग बांधी’ हे गीत आम्ही राग यमन कल्याणमध्ये बसवलं होतं. ते गीत दीदीला खूप आवडे. आम्ही दीदीची आवड लक्षात घेऊन, राग शिवरंजनीमध्ये गीत स्वरबद्ध केलं. ‘लुटेरा’ या चित्रपटात एकूण सहा गाणी होती, पण प्रत्येक गाणं वेगळय़ा रागातलं होतं. एक गझल, एक अरेबियन फोक, एक कॅब्रे तर एक रोमँटिक. दीदीं अशी गाणी एका वेगळय़ा उंचीवर नेत  असत. गायिका म्हणून त्यांचा कस लागे त्यातील क्लासिकल फॉर्ममुळे! ‘सनम राह भूले यहां’ हे त्यांचं आवडतं गीत होतं. त्यात आम्ही गिटार, मेंडोलीन, व्हायोलिन अशा अनेक वाद्यांचा वापर केला होता. दीदींना वाद्यांची सखोल समज होती.

१९७० मध्ये रीलिज झालेल्या ‘अभिनेत्री’ या चित्रपटात हेमा मालिनी या तेव्हा नवोदित असलेल्या अभिनेत्रीवर चित्रित झालेलं ‘ओ घटा सांवरी, थोडी थोडी बावरी’ हेदेखील दीदींचं लाडकं गीत होतं! व्हायोलिन, बासरी, संतूर अशा वाद्यांचा मेळ घालत रेकॉर्ड केलेलं हे गाणं बहारदार आहे. दीदींनी त्यांच्या कारकीर्दीत कॅब्रे गाणी खूप कमी गायली, पण १९६७ मध्ये रीलिज झालेल्या ‘नाईट इन लंडन’मध्ये हेलनवर चित्रित झालेलं ‘मेरा नाम है जमीला’ हे कॅब्रे गीत आपण कसं गायलं आहे, याविषयी दीदी साशंक होत्या! ‘मैने ठीक गाया न,’ असा प्रश्न विचारणाऱ्या दीदींचा निरागस चेहरा आजही डोळय़ांसमोरून हलत नाही!

लता दीदींनी आम्हाला अनेक गुरुमंत्र दिले. जीवनविषयक अनेक उच्च मूल्यं त्यांनी आमच्यात रुजवली. त्या नेहमी म्हणत, आयुष्यात कितीही मोठे झालात, तरी विद्यार्थी दशा सोडू नका. शिकत राहिलात तर त्या संचिताचं गंगाजळ होईल. त्यांनी आमची आणि आमच्यासारख्या अनेकांची कारकीर्द घडवली. रसकिांच्या मनावर विनम्र अधिराज्य गाजवलं. अशी गायिका शतकातून नव्हे तर सहस्रकातून एकदा जन्माला येते!

(शब्दांकन- पूजा सामंत)

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा ( Vishesha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Only lata mangeshkar pyarelal sharma anahat nad dd

ताज्या बातम्या