– सुनीता कुलकर्णी

आपल्या देशाच्या भारत आणि इंडिया या ओळखीला करोनाने नवा आयाम दिला आहे, रेशनकार्डवाले आणि पासपोर्टवाले. परदेशात अडकलेल्या जवळजवळ १५ लाख भारतीयांना सरकारने विमानं पाठवून आणलं, त्यांच्या तपासण्या करून करोनाचा संस्रर्ग झाला असेल त्यांच्यावर उपचार केले. काहींचं  १४ दिवसांचं अलगीकरण केलं. या अलगीकरणाच्या काळात आपल्याला सरकारकडून किती चांगली सेवा मिळाली यावर या लोकांनी समाजमाध्यमांतून अगदी भरभरून लिहिलं.

हे सगळे होते पासपोर्टवाले.

आणि हे सगळं सुरू असताना देशात अचानक जाहीर झालेल्या लाॅकडाऊनमुळे काय चित्र होतं

तर काखाेटीला एक पोर, बोट धरून एखादं पोर, डोक्यावर सामान घेऊन कुटुंबांचे जथ्येच्या जथ्ये आपापल्या गावी निघाले होते. चालत. आणि तेही किती अंतर पार करण्यासाठी, १००, १५०, ४००, ७००, १०००, १३०० किलोमीटर…कुणी मुंबईहून राजस्थात, उत्तर प्रदेशात, बिहारला चालत गेलं तर कुणी दिल्लीहून राजस्थान, गुजरातला, बिहारला चालत गेलं.

हे सगळे रेशनकार्डवाले.

हातावर पोट घेऊन आपापल्या गावांमधून शहरांमध्ये आलेले हे सगळे लोक उन्हातान्हाची पर्वा न करता, हातात पैसे नसताना, खायला प्यायला मिळेलच याची खात्री नसताना असं शेकडो मैल चालत निघून गेले. त्यांच्यातले अनेक जण भेगाळलेली, रक्ताळलेली पावलं घेऊन आपापल्या गावी पोहोचले. काही मोजक्यांच्या ते नशिबात नव्हतं. त्यांनी वाटेतच जीव गमावला. तर शेकडो मैलांची पायपीट करून घरी पोहोचलेल्या काहींना घरच्यांनी, गाववाल्यांनी करोनाच्या भीतीने घरात घ्यायला नकार दिला.

आपापल्या गावी जायला निघालेले अनेक रेशनकार्डवाले ठिकठिकाणच्या सरकारने सुरू केलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये अडकले आहेत.

त्यांना घरी जाऊ द्यावं का, त्यासाठी सरकारने गाड्यांची व्यवस्था करावी का, यावर वृत्तवाहिन्यांवर चर्चा रंगताहेत.

तिकडे पासपोर्टवाल्यांच्या जगात लाॅक डाऊन, वर्क फ्रॉम होम यातून मिळालेला अवकाश, तो अधिकाधिक सुसह्य कसा करायचा, छंद कसे जोपासायचे याची प्रात्यक्षिकं सुरू आहेत. कीचनमध्ये केलेल्या प्रयोगांची छायाचित्रं समाजमाध्यमांमधून टाकली जाताहेत.

या दोन्ही वर्गांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ते एकाच शहरात जगत असले तरी त्यांची जगं पूर्ण वेगळी आहेत. भारत आणि इंडिया अशी वर्गवारी करावी इतकी.

फरक एवढाच की या वर्गवारीला आता पासपोर्टवाले आणि रेशनकार्डवाले असा नवा आयाम मिळाला आहे. पासपोर्टवाल्यांनी आणलेल्या करोनाने रेशनकार्डवाल्यांची दयनीय वाताहत झाली आहे.