सिनेफंडा : सिनेमातील जाहिरातबाजीचा धंदा

सिनेमातल्या पात्रांच्या माध्यमातून उत्पादनांच्या जाहिराती पाहण्याची आता प्रेक्षकांनाही सवय झाली आहे.

सिनेमातल्या पात्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती पाहण्याची आता प्रेक्षकांनाही चांगलीच सवय झाली आहे. पण त्या जाहिराती आहेत हे समजावे इतक्या बाळबोधपणे त्या यायची काय गरज आहे?

मराठी वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर संपूर्ण पानभर जाहिरात यात आता काही नावीन्य नाही. किंबहुना अशी काही जाहिरात नसेल तरच अनेकांना आश्चर्य वाटू शकते, पण गेल्या महिन्या-दोन महिन्यांतील शुक्रवार शनिवारच्या आसपासच्या जाहिराती जरा वेगळ्या होत्या.  नावीन्य होते ते उत्पादनांच्या सादरीकरणात. त्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातील कलाकारांच्या, त्याच चित्रपटातील पोशाखातील छायाचित्रांसहित या जाहिराती होत्या. दागिन्यांच्या किंवा एखाद्या बांधकाम व्यावसायिकाच्या जाहिरातीत कलाकारांचे चेहरे पाहायची सवय झाली आहे. या जाहिरातीदेखील तशाच होत्या, पण त्या प्रकाशित होण्यामागे त्या काळात आलेले चित्रपट कारणीभूत होते. ते ठरावीक चित्रपट जर नसते तर तीच जाहिरात वेगळ्या पद्धतीने आली असती. किंवा आलीदेखील नसती.

थोडक्यात काय तर चित्रपटाची आणि त्यातील कलाकारांची प्रासंगिक लोकप्रियता कॅश करण्याचा तो एक प्रकार होता. हॉलीवूडमध्ये हे सर्रास घडते. बॉलीवूडमध्ये हा प्रकार रुजला आहे. पण मराठीत गेल्या एक दोन वर्षांपासून ही पद्धत रुजू पाहतेय. इनफिल्म बॅ्रिण्डग, इनफिल्म प्रॉडक्ट प्लेसमेंट या दोहोंच्या पुढचा टप्पा असणारी म्हणजेच को-बॅ्रण्डिगची.

एकंदरीतच समाजात सेलेब्रिटीबद्दलचं जे आकर्षण, वलय आहे त्याचा वापर करून केलेले हे मार्केटिंग. मुद्रित किंवा दूरचित्रवाणीवरील नेहमीच्या जाहिरातींच्या पलीकडचा हा विषय. चित्रपट गाजला तर आपोआपच फायदा मिळवून देणारा, फॅन फॉलोअर्सना त्या उत्पादनापर्यंत नेणारा, थेट प्रभाव टाकणारा आणि रुपेरी पडद्याचा अगदी समर्पक व्यावहारिक वापर करून घेतलेल्या या माध्यमाची ही मराठी आवृत्ती आहे. हॉलीवूड आणि बॉलीवूडनंतर आता मराठी चित्रपटदेखील हे पर्याय आजमावून पाहत आहे. हॉलिवूडमध्ये  अनेकांनी याचा अभ्यास केला आहे. कारणमीमांसा केली आहे. आणि त्यातून हे एक मार्केटिंग शास्त्र तयार झाले आहे.

परदेशात मूकपटाच्या काळातच याची सुरुवात झाली. १९१९ सालच्या ‘द गॅरेज’ या चित्रपटातील एका प्रसंगात ‘रेड क्राऊन गॅसोलिन’चा फलक मागे दिसून येतो. तर पहिल्या अ‍ॅकॅडमी अ‍ॅवार्ड विजेत्या ‘विंग्ज’ या चित्रपटात हर्शे चॉकलेटचा थेट वापर केलेला होता. १९३२ च्या ‘हॉर्स फिदर्स’मध्ये लाइफ सेव्हर कॅण्डीचा एक मजेशीर किस्सादेखील प्रॉडक्ट प्लेसमेंटमध्ये दिसतो. पाण्यात डुंबणारी नायिका नावेत बसलेल्या नायकाकडून लाइफ सेव्हर कॅण्डी मागून घेते आणि तो नायक खिशातून या कॅण्डीचे पाकीट काढतो, त्याचे वेष्टन काढून तिला देतो. एखादय़ा मिनिटाचा हा प्रसंग काहीसा विनोदी छटेचा पण त्याचबरोबर उपहासाकडेदेखील झुकणारा वाटतो.

१९८० पर्यंत हा ट्रेण्ड चांगलाच रुळला तेव्हा हर्शे चॉकलेटने स्टिवन स्पिलबर्गच्या ‘ई.टी. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल’ या चित्रपटासाठी दशलक्ष डॉलर मोजल्याची चर्चा रंगली होती. नोरा इफ्रॉनचा ‘यू हॅव गॉट मेल’ या १९९८ च्या चित्रपटात एओएल या मेलिंग सॉफ्टवेअरवरचा वापर झाला आहे. थेट उत्पादनाचा वापर करणारे सॅडलरचे ‘हॅप्पी गिलमोअर’ (सबवे), ‘बिग डॅडी’ (हूटर्स), ‘लिटल निकी’ (पॉपी चिकन) अशी काही अन्य उदाहरणे सांगता येतील.

पण इनफिल्म ब्रॅिण्डग, प्रॉडक्ट प्लेसमेंटचा सर्वाधिक वापर केला तो मायकेल बे याने. ‘द आयलंड’ या २००५ सालच्या चित्रपटात कॅडिलॅक, एक्स बॉक्स ३६०, प्यूमा शूज, एमएसएन, पॅनासोनिक असे तब्बल ३५ ब्रॅण्ड यात दिसतात. २००९ मध्ये मायकेलने स्वत:चेच रेकॉर्ड मोडत ‘ट्रान्सफॉर्मर्स – द रिवेंज ऑफ द फॉलन’ या चित्रपटात जनरल मोटर्स, माऊंटन डय़ू, साऊथवेस्ट एअरलाइन्स, सिस्को वेबेक्स, शेवरेलो.. असे ४७ ब्रॅण्ड वापरले होते. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला ब्रॅण्ड चॅनलने ‘द व्होर अ‍ॅवार्ड’देखील दिले होते.

हॉलीवूडने हे शास्त्र पचवलं आहे. कधी ते आकर्षक, परिणामकारक सूचक असते, तर कधी चुका होतात, कधी हास्यास्पददेखील होते. पण अर्थातच आज इनफिल्म हा चित्रपट व्यवसायाचा एक अविभाज्य घटकच झाला आहे, हे मात्र निश्चित. चलती का नाम गाडी, बॉबी (राजदूत मोटरसायकल), इव्हिनिंग इन पॅरिस अशा अनेक ठिकाणी आपण हे प्रयोग केले आहेत.

म्हणजेच आमचे उत्पादन वापरा, पटकथेला आनुषंगिक असेल तर थेटच वापरा, नसेल तर काही तरी प्रसंग घडवून वापरा किंवा आमच्या लोगोचा वापर करा किंवा नाव येईल असे पाहा. एखाद्या प्रसंगात थेट आमच्या वास्तूचा सेटसारखा वापर करा. येनकेनप्रकारेण अनेक उत्पादकांचा चित्रपटांतून जाहिरात करण्याचा असा हा इनफिल्म ब्रॅण्डिंग, इनफिल्म प्रॉडक्ट प्लेसमेंटचा प्रकार, जेणेकरून लोकांना आपले उत्पादन आठवावे, ब्रॅण्ड रिकॉल व्हावा, हाच यामागचा उद्देश. पुढे जाऊन त्यातूनच को-ब्रॅण्डिंगचा प्रकार सुरू झाला. म्हणजे चित्रपटात थोडासा उल्लेख किंवा झलक किंवा तोदेखील नाही. मात्र नंतर त्यातील कलाकार त्याच संचात त्या उत्पादनाच्या जाहिरातीत दिसणे. कलाकारांभोवतीचे वलय हा त्यातला महत्त्वाचा घटक. आपला आवडता कलाकार काय वापरतो, काय खातो, कोठे राहतो याचा समाजातील अनेक घटकांवर वेगवेगळ्या प्रकारे असणारा प्रभाव कॅश करण्याचा हा जाहिरातींचा फंडा.

पूर्वी मराठी चित्रपटाच्या सुरुवातीला ‘आम्ही कृतज्ञ आहोत’ अशी एक पाटी यायची. त्यात चित्रपटासाठी लोकेशन, आर्थिक सल्लामसलत आदीसाठी मदत केलेल्यांची नावे असायची. आज हीच पाटी ‘फूड अ‍ॅण्ड बेव्हरेज पार्टनर’, मीडिया पार्टनर, लोकेशन पार्टनर वगैरे प्रायोजकत्वाच्या प्रकारातून दिसून येत आहे. आज केवळ कृतज्ञतेवर हा विषय पुढे जात नाही, तर थेट त्यामागचा व्यवहार सांभाळून एक व्यावसायिक गणित मांडत हे काम होताना दिसते.

पण हा प्रकार आपल्याकडे रुजला आहे का? हा प्रश्न त्यानिमित्ताने विचारावासा वाटतो. इनफिल्म प्रॉडक्ट प्लेसमेंट अथवा ब्रॅण्डिंगबद्दल काही जण नाक मुरडतात; पण चित्रपट हा व्यवसाय आहे आणि तो प्रचंड खर्चीक आहे. अशा वेळी वैध प्रकारे जे जे शक्य आहे त्या त्या आर्थिक स्रोताचा वापर केला जातो. अर्थातच यात गैर काहीच नाही; पण मुद्दा येतो तो त्याचा वापर तुम्ही कसा करता त्याबद्दल, कारण प्रेक्षक चित्रपट पाहायला आलेला असतो. त्या वेळी जर या इनफिल्म ब्रॅण्डिंग अथवा प्रॉडक्ट प्लेसमेंटची दृश्यं त्याला खटकायला लागली, तर निश्चितच त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. नजीकच्या काळातील काही चित्रपटांकडे पाहिले तर हे नेमके लक्षात येऊ शकेल. अर्थात समर्पकरीत्या वापर केलेली उदाहरणेदेखील अनेक आहेत. काही मोजक्या उदाहरणांवर नजर टाकले, तर आपण या सर्व क्षेत्रात कोठे आहोत हे सहज लक्षात येईल.

मेरी कोम या महिला मुष्टियोद्धाच्या संघर्षांवरील ‘मेरी कोम’ चित्रपटात २० च्या आसपास ब्रॅण्ड्सनी हजेरी लावली होती. एडलवाईज टोकियो लाइफ इन्शुअरन्स, मदर डेअरी, आयोडेक्स, हॅवमोअर आइस्क्रीम, टाटा सॉल्ट अशी काही महत्त्वाची उदाहरणे देता येतील; पण सर्वात ठसठशीतपणे उठून दिसणारा ब्रॅण्ड होता तो मेरी कोमच्या शिरस्त्राणावरील ‘उषा’. चित्रपटाच्या शेवटच्या निर्णायक लढतीत हे दृश्य काहीसं बोचणारं होतं. उषा कंपनीने चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान ‘एम्पॉवरिंग वुमेन ऑफ इंडिया’ असे मुद्रित जाहिरातींचे कॅम्पेनदेखील केले होते. मदर डेअरीचे प्रियंका चोप्राचे जाहिरात कॅम्पेन दूरचित्रवाणीवर सुरू होते.

‘टू स्टेट्स’ या चित्रपटातील अलिया भटने साकारलेलं अनन्य स्वामिनाथन हे पात्र तर जणू काही सनसिल्कने दत्तकच घेतले होते. कथानकात तिला सनसिल्कच्याच ऑफिसमध्ये नोकरी मिळते. त्यामुळे अगदी विनासायास उत्पादनाची जाहिरात करणे शक्य झाले आहे. चित्रपटातील अनेक प्रसंगात तिची केशभूषा बदलली आहे. इतकेच नाही तर अनेक प्रसंगात तिचे मानेला झटका देऊन केशसंभार विशिष्ट प्रकारे फिरवणे हादेखील ब्रॅिण्डगचाच भाग होता. यातल्या काही गोष्टी खटकणाऱ्या होत्या तर काही मात्र सहजपणे कधी येऊन गेल्या ते कळलेच नाही.

lp20
‘दबंग १’ आणि ‘दबंग २’मध्ये तर आणखीनच धम्माल झाली होती. थेट उत्पादनाचे नाव घेऊनच गाणे रचण्यात आले होते. ‘मैं झेंडू बाम हुई डार्लिग तेरे लिए..’ आणि ‘चिपकाए सैया फेविकॉल से..’ हे प्रकार भन्नाट होते. फेविकॉलने मात्र बॅ्रण्डींगसाठी पुढाकार घेतला नसल्याचे तेव्हा जाहीर केले होते. शाहरुख खानच्या हॅप्पी न्यू ईअरबाबतीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल २० उत्पादनांच्या वापरातून तीस कोटींचा फायदा झाल्याचे सांगण्यात आले होते. आमिरच्या धूम ३ मध्येदेखील अनेक उत्पादने होती. पण सर्वात लक्षात राहणारे उत्पादन होते ते म्हणजे त्याची बीएमडब्ल्यू मोटरसायकल.

मागील वर्षांत आलेल्या पिकूचे वर्णन अनेकांनी ‘ब्रॅण्ड व्ॉगन’ असेच केले होते. अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खानसारखी तगडी स्टारकास्ट असल्यामुळे अमुल, सीएट, पॅराशूट, स्नॅपडील, हिमालयन वॉटर, प्रिया गोल्ड स्नॅकर, सिस्का आणि सेन्को गोल्ड अशा १५ ब्रॅण्डचा समावेश होता. तर मिताशीने को-ब्रॅण्डिंग केले होते. तर मोशन से ही इमोशन ही टॅग लाइन एका लॅक्झेटिव्ह उत्पादनाने वापरली होती.

२०११ मध्ये आलेल्या ‘जिंदगी ना मिले दोबारा’ चित्रपटाला तर परदेशातील ब्रॅण्डची मदत मिळाली. हा ब्रॅण्ड होता स्पेन टुरिझम. स्पेनमधील सुट्टी हेच कथानकामुळे थेट स्पेन टुरिझमशी टायअप झाले होते. त्यामुळे चित्रपटाला तर फायदा झालाच, पण त्यातील तगडय़ा स्टार कास्टमुळे स्पेन टुरिझमला देखील अनेक लाभ झाले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या सहा महिन्यांत स्पेनमधील पर्यटकांच्या संख्येत ३२ टक्के वाढ झाली होती. सर्वसाधारणपणे कोणत्याही शासनाचा अशा प्रकारे व्यापारी सहभाग नसतो, पण येथे दिसून येतो. स्पेन पर्यटन मंडळाने चित्रपटाचा संदर्भ वापरून दूरचित्रवाणीवर अनेक जाहिरातीदेखील तेव्हा केल्या होत्या.

इंग्लिश-विंग्लिश हा तसा या पठडीतला चित्रपट नव्हता, पण टाटा स्कायने को ब्रॅण्डिंगच्या माध्यमातून खूप चांगला वापर केला होता. टाटा स्कायवरील ‘अ‍ॅक्टिव्ह इंग्लिश’ या विशेष सेवेच्या जाहिरातीसाठी इंग्लिश विंग्लिशमधील एक दोन प्रसंगांचा वापर करण्यात आला होता आणि हा वापर अगदी समर्पक होता. त्याही पुढे जाऊन अ‍ॅक्टिव्ह इंग्लिश सबस्क्रायबरसाठी एक स्पर्धा आयोजित करून भाग्यवान विजेत्यांना श्रीदेवीला प्रत्यक्ष भेटण्याची संधी देण्यात आली होती.

खटल्यांमध्ये अडकलेल्या सलमान खानने स्वत:चे ब्रॅण्डिंग बिइंग ह्यूमनच्या माध्यमातून सुरू केले होते. त्याचा वापर चित्रपटातदेखील होणार की काय, अशा मुद्दय़ांवर वाद-चर्चा गाजली होती. हे जाता जाता नमूद करावेसे वाटते.

एकंदरीतच या उदाहरणांवरून इनफिल्मचा ढोबळ अंदाज येऊ शकतो. मराठी चित्रपटसृष्टीत मात्र असे प्रयोग तुलनेने कमीच झाले आहेत. एकंदरीतच मर्यादित प्रेक्षकवर्ग, मर्यादित बजेट आणि मर्यादित ग्लॅमर ही त्याची महत्त्वाची कारणं म्हणता येतील. कारण कोणतेही उत्पादन योग्य आणि अधिकाधिक ग्राहकापर्यंत कसे जाईल हेच जाहिरातींवर पैसे खर्च करताना पाहिले जाते.

गेल्या वर्षभरात आपल्याकडे इनफिल्मचे प्रयोग बऱ्यापैकी दिसून येतात. पण त्याआधीच्या दोन चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. ‘चिंटू’ आणि ‘आयडियाची कल्पना.’ चिंटूला प्रसिद्ध कथानकाचा आधार होता, तर आयडियाची कल्पनामध्ये गाजलेले कलाकार होते, पण त्यातील जाहिरातींसाठी म्हणजे प्रॉडक्ट प्लेसमेंटसाठी खास मेहनत घेतलेली दिसत नाही. त्यामुळे चित्रपटातील ही दृश्ये प्रचंड खटकतात.

चिंटूमध्ये लाइफबॉय हॅण्डवॉशचा वापर दाखवला आहे तर, आयडियामध्ये ब्रुकबॉण्ड रेड लेबल, लागूबंधू मोतीवाले यांचा आधार आहे. लाइफबॉय हॅण्डवॉशचा वापर दाखवतानाचे संवाद कोरडे, कृत्रिम आहेत आणि ते पटकथेच्या ओघात येत नाहीत. आयडियामध्ये ‘ब्रुक बॉण्ड’ ज्या गाण्यात दाखवले आहे, ती म्हणजे पटकथेतील घुसखोरीच वाटते. बॅकड्रॉप म्हणून थेट वापर करताना कसलाही कलात्मक दृष्टिकोन दिसत नाही. दागिन्यांच्या दुकानासाठी वापरलेले लागूबंधूंचे दुकानातील संवाद असेच पटकथेचा हात सोडून येतात. या दोन्ही ठिकाणी दिग्दर्शकाने कसलीही मेहनत न घेतल्याचे दिसून येते. परिणामी हे प्रसंग आगंतुक वाटतात.

lp19
‘हॅप्पी जर्नी’ या चित्रपटात अनेक प्रसंगात असा वाव होता. आयपॅड, भरमसाट नवीन कपडे, अ‍ॅक्सेसरीजचा वापर पटकथेत होता. पण येथे प्रॉडक्ट प्लेसमेंटचा फायदा निर्मात्यांना मिळाला आहे का हे कळत नाही. हाच प्रकार ‘डबल सीट’ या नुकत्याच आलेल्या चित्रपटातदेखील दिसून येतो. डय़ूलक्स रंग आणि स्पीड ट्रॅक ही कुरिअर कंपनी यांची उपस्थिती जाणवते.

दोन महिन्यांपूर्वी आलेल्या ‘तू ही रे’ मध्ये तर अगदी थेटच पॉण्ड्सचा वापर केला होता. पण ते इतक्या वाईट पद्धतीने चित्रित झालंय की शेंबडय़ा पोरालादेखील ही जाहिरात आहे हे कळू शकेल. मुळात प्रसंग आणि कलाकार हे दोन्ही त्यासाठी पूरक नव्हते. नुकत्याच आलेल्या उर्फीमध्ये तर आणखी हास्यासपद प्रकार दिसून येतो. एका दृश्यात भिंतीवरील दिनदर्शिकेचा वापर केला आहे आणि त्या दिनदर्शिकेच्या नावावर ठसठशीत अशी लाल पट्टी लावण्यात आली आहे. त्यामुळे ती फ्रेम अत्यंत बेंगरूळ झाली आहे. कदाचित त्यासाठी प्रॉडक्ट प्लेसमेंटचा आधार घ्यायचा प्रयत्न झाला असावा, पण उत्पादकाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसावा असे दिसते.

गेल्या दोन महिन्यांत इनफिल्मचे सर्वच प्रकार गाजले ते ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’, ‘मुंबई पुणे मुंबई २’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांमुळे.

राजवाडे अ‍ॅण्ड सन्स हा एका पिढीजात सराफ कुटुंबातील पिढीतील बदलावर भाष्य करणारा चित्रपट होता. या चित्रपटात फॅशन, सोन्याचे दागिने, हॉटेल, बँक आणि बांधकाम व्यावसायिक अशी प्रोडक्ट प्लेसमेंट वेगवेगळ्या प्रकारे दिसून येते. पिढीजात सराफ असल्यामुळे दागिन्यांसाठी वामन हरी पेठे अ‍ॅण्ड सन्स यांचा आधार घेतला होता. अ‍ॅक्सिस बँकेच्या सहभागामुळे चेकवर सही करताना आणि कार्डचा वापर करताना ही दोन्ही उत्पादने फ्रेममध्ये दिसली होती. जुना वाडा पाडून नवीन बांधकाम सुरू असण्याच्या काळात राजवाडे कुटुंब ज्या तात्पुरत्या घरात स्थलांतरित झाले त्या बांधकाम कंपनीच्या प्रकल्पाची प्लेसमेंट चित्रपटात होती. नव्या पिढीच्या फॅशनचा विचार करून क्रॉसवर्डच्या माध्यमातून तब्बल पंधरा लाख रुपयांचे कपडे व अ‍ॅक्सेसरीज मिळवल्या होत्या आणि यातीलच काही उत्पादकांनी चित्रपट प्रदर्शनाच्या काळात त्यांच्या जाहिरातीत चित्रपटातील कलाकारांचा वापर केला होता. थोडक्यात दोघांचेही भले भले (विन विन) अशी परिस्थिती दिसून आली. पण यातील एक-दोन उदाहरणे सोडली तर इतर उत्पादनांचा वापर खटकत नाही.

मुंबई पुणे मुंबई १ या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वेल मुंबई पुणे मुंबई पुणे २ या वर्षीच्या दिवाळीत प्रदर्शित झाला. प्रीक्वेलच्या अफाट यशामुळे सीक्वेलला इनफिल्म ब्रॅण्डिंग, प्लेसमेंट मिळणे अपेक्षित होते, त्याप्रमाणे मिळालेदेखील. पण चित्रपटातील प्रोडक्ट प्लेसमेंटचे प्रसंग प्रचंड खटकणारे होते. ब्रुकबॉण्ड रेड लेबलचे प्लेसमेंट करताना चक्क कोरा करकरीत नवीन बॉक्स फोडून त्यातून चहा पावडर थेट गॅसवरील पातेल्यात टाकणारी गृहिणी फ्रेममध्ये दिसत होती. तोच प्रकार प्रभात तुपाबद्दल आणि पनवेलकर ग्रुपच्या घरांबद्दलदेखील. हे तीनही प्रसंग अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांनादेखील खटकले. त्यावर समाज माध्यमात चर्चा झाली. वर्तमानपत्रात वाचक पत्रातदेखील हा विषय आला.

खरे तर ब्रुकबॉण्ड चहाची खूप उत्तम प्लेसमेंट ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये झाली होती. हा चित्रपटदेखील सतीश राजवाडे यांनीच दिग्दर्शित केला आहे. पण पुणे मुंबई २ मध्ये हे भान कोठे तरी हरवले हे निश्चित.

हिंदीतल्या बिग बजेट प्रेम रतन धन पायोमध्ये हल्दीराम, पीएनजी ज्वेलर्सचा प्रभाव दिसून येतो. हल्दीरामची गरज कथेत अधोरेखित केलेली होती. पण काही दृश्यांमध्ये जाणीवपूर्वक केलेले उल्लेख आणि मध्येच येणारी उत्पादनाची सिंगल फ्रेम अडथळा वाटावी अशीच होती. पीएनजी ज्वेलर्स यांनी सर्व दागिने पुरविले होते. त्यांचा थेट उल्लेख नव्हता, पण शाही मिरवणुकीच्या वेळी स्वागत फलकांवर त्यांचे नाव दिसून आले. मात्र ही दृश्यात्मक रचना खटकणारी होती. अर्थात पीएनजीनी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच्या जाहिरातीतून नवीन कलेक्शन लाँच केल्याने त्यांना चित्रपटाचा लाभ घेता आला.

इनफिल्म ब्रॅण्डिंग, प्रोडक्ट प्लेसमेंट आणि को-बॅ्रण्डिंगचा हा सारा प्रवास. कधी प्रेक्षकांना जाणवणारा, कधी न जाणवणारा, कधी प्रभावित करणारा तर कधी नकारात्मकता निर्माण करणारा. कथानकाची गरज असो वा नसो जेथे शक्य आहे तेथे त्या त्या वेळी निर्मात्यांनी मार्केटिंग कौशल्य वापरून असे प्रयोग केले आहेत आणि आज ते रूढ होत आहेत.

इनफिल्म करावं / करू नये असे दोन मतप्रवाह सध्या आपल्याकडे आहेत. त्याबाबत दिग्दर्शक सतीश राजवाडे सांगतात की, हे ब्रॅण्ड चित्रपटासाठी प्रसिद्धी भागीदाराप्रमाणे काम करतात आणि त्याच वेळी चित्रपटाचा खर्च कमी करण्यास हातभार लावतात. कथानकाला धक्का लागत नसेल तर दिग्दर्शकाने हा बदल स्वीकारायला हरकत नाही. ते सांगतात की, मला आजवर यासाठी सक्ती झालेली नाही. मात्र जर यामुळे निर्मात्याला थोडीफार मदत होणार असेल तर आणि कथेला धक्का न लागता सहजरीत्या होणारे असेल तर ते जरूर करावे. आजच्या स्पर्धेच्या जगात मार्केटिंग आणि एकंदरीतच खर्चीक बजेटमुळे, आशयघनतेबरोबरच अशा घटकांकडेदेखील पाहावे लागते.

पण मग हे न खटकता चांगले कसे करता येऊ शकते. राजवाडे अ‍ॅण्ड सन्सचे मार्केटिंग सल्लागार निरंजन विद्यासागर सांगतात की, पटकथेला अंतिम रूप देतानाच या सर्व उत्पादनांची नोंद केली गेली तर आशयाला धक्का न लावता इनफिल्म होऊ शकते. अशा वेळी सर्व उत्पादकांशी योग्य ती चर्चा आधीच झालेली असते. त्यामुळे नेमके काय होणार, याची कल्पना सर्वाना असते. तसेच नंतरच्या जाहिरातींवरदेखील आमचे नियंत्रण असते. त्यामुळे चित्रपटाच्या आशयाला धक्का लागण्याचा संभव कमी असतो. हे सर्व राजवाडेमध्ये झाले होते. हल्ली हा ट्रेंड वाढत चालला असल्याचे ते नमूद करतात. पण नवे निर्माते चित्रीकरण पूर्ण झाल्यावर आमच्याकडे येतात. त्या वेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळेच जर नैसर्गिकरीत्या होत असेल तरच इनफिल्मच्या मागे जावे हे निश्चित.

ही प्रक्रिया दुहेरी आहे. सिनेमाकर्त्यांला उत्पादक आणि प्रेक्षक दोघांच्याही समाधानाचे संतुलन साधावे लागते. उत्पादनाची नोंद झाली पाहिजे, पण ती जाहिरात आहे असेदेखील वाटायला नको, अशी ही कसरत आहे. अर्थातच उत्पादकांसाठी मात्र ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा एक चांगला पर्याय तयार झाला आहे. उत्पादक या माध्यमाचा कसा वापर करतात त्यावरच त्याची पुढील दिशा राहणार आहे. सध्या तरी खाद्यपदार्थ, हॉटेल्स, कॉफी शॉप, इलेक्ट्रॉनिक साधने, गॅझेट्स, कॉस्मेटिक, कपडे, गाडय़ा, दागिने, बँका अशा उत्पादकांना चांगली संधी मिळत आहे. त्यात त्यांचे नुकसान कमी असते. कारण थेट उचलून पैसे देण्याऐवजी स्वत:च्या उत्पादनाचा वापर करण्यास दिल्याचेदेखील अनेक फायदे उत्पादकांना मिळतात.

पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ सांगतात की, ‘प्रेम रतन धन पायो’साठी आम्ही जवळपास प्रत्येकी एक ते दोन लाख किमतीचे १००-१२५ दागिने तयार केले होते. ते आमचे विशेष कलेक्शन होते. त्यामुळे आमचे नवीन कलेक्शन तयार झालेच. आणि हा चित्रपट दिवाळीत सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या मोसमात आल्यामुळे हे नवीन कलेक्शन चित्रपटाच्या नावानेच लाँच करता आले. वेळ, कलाकार, चित्रपटाचा विषय अशा सर्वाचा संयोग साधणे महत्त्वाचे असल्याचे ते नमूद करतात. आणि दागिन्यांबद्दलच सांगायचे तर मुळातच महिलांना दागिन्यांबद्दल बोलायला दाखवायला आवडते. आणि असा चित्रपटच जर स्वत: ब्रॅण्ड असेल तर दागिन्याच्या ब्रॅण्डचा फायदा नक्कीच होतो.

या सर्वातून काही मुद्दे प्रकर्षांने दिसून येतात. चित्रपटाचा विषय, कलाकार, ठिकाण, प्रदर्शित होण्याचा कालावधी यांची सांगड जर उत्पादनाशी जुळत असेल तरच त्यांचा प्रभाव पडतो. अन्यथा केवळ नावाचा डंका वाजण्यापुरतेच मर्यादित राहते. अनेक वेळा काही कलाकार हे आधीच अनेक ब्रॅण्डशी जोडलेले असतात. अशा वेळी चित्रपटातदेखील हेच ब्रॅण्ड वापरणे सोयीस्कर ठरते. मराठीत सध्या तरी या बाबतीत अनेक अडचणी आहेत. आपला सिनेमा हा बहुतांश वेळा आशयावर आधारित असतो. त्यामुळे काहीही घुसडणे अवघडच आहे. त्यातच इनफिल्म ब्रॅण्डिंगचा सारा भर हा कलाकार कोण आहे, दिग्दर्शक कोण आहे यावर असतो. आज मराठी इंडस्ट्रीत वलयांकित कलाकार तुलनेनं कमी आहेत. आणि मराठी चित्रपटसृष्टीचे वलय आणि प्रेक्षकवर्ग देखील मर्यादित आहे.

‘कॉफी आणि बरंच काही’ हा सिनेमा इनफिल्मला चांगलाच न्याय देणारा होता. चित्रपटाने चांगला व्यवसायदेखील केला. मात्र निर्मितीदरम्यान उत्पादकांकडून मर्यादितच प्रतिसाद मिळाल्याचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे नमूद करतात. ते सांगतात की, चित्रपटातील दोन्ही कलाकार नवीन होते. माझा स्वतंत्रपणे पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे प्रतिसाद कमी मिळाला. परांजपे स्किम्स, परसिसटंटचे ऑफिस आणि बिग बझारचा वापर आम्हाला करता आला. अर्थात त्यांच्या अटी फार काही जाचक नव्हत्या, त्यामुळे सहजपणे या सर्वाची प्रोडक्ट प्लेसमेंट करणे शक्य झाल्याचे ते सांगतात. आणि हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना हे घटक खटकलेदेखील नाहीत.

म्हणजेच काय, केवळ आहे चित्रपट म्हणून घुसवा जाहिराती असे होणार नाही. पण जेव्हा एखादा बिग बजेट सेलेब्रिटी चित्रपट येतो तेव्हा मात्र कधी कधी ब्रॅण्डची भली मोठी शेपूटच मागे जोडली जाण्याची शक्यता असते. खर्चाचा भार हलका करणे, प्रसिद्धीला मदत असे जरी त्यातील सूत्र असले तरी ‘चित्रपटात जाहिरात’ येथपर्यंतच हे ठीक आहे, ते पण जर का उद्या ‘जाहिरातीत चित्रपट’ अशी परिस्थिती आली तर मात्र एकंदरीतच या सर्वाची मज्जा निघून जाईल.

द ट्रमन शो

lp18जिम कॅरीची मुख्य भूमिका असलेला, मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यावरचा हा ‘द ट्रमन शो’ हा अनेक कारणांनी चर्चेत राहिला. लहानपणापासून ते तारुण्यापर्यंतचा प्रवास यात दाखवला होता, फार काही विशेष न घडणारा. प्रेक्षकांसाठी चित्रपट असला तरी कथानकात प्रत्यक्षात ती नायकाचे चोवीस तास आयुष्य दाखवणारी मालिका होती, फ्लोरिडात वसवलेल्या एका छोटय़ा उपनगरात घडणारी. चित्रपटातून मानसिकता, टीव्हीचा परिणाम अशा अनेक घटकांवर भाष्य केले होते. त्याचबरोबर इनफिल्मवरदेखील भाष्य होते. मालिका जेव्हा लोकप्रियतेच्या कळसावर असते तेव्हा दिग्दर्शकाला एका मुलाखतीत प्रश्न केला जातो की, हे सर्व जाहिरातीशिवाय विनाव्यत्यय कसे काय सुरू आहे. तेव्हा तो सांगतो की, जिम कॅरी वापरणाऱ्या सर्व वस्तू याही जाहिरातच आहे. त्याच्या रोजच्या वापरातील एकूण एक गोष्टी या प्रायोजित आहेत. त्याचा प्रवास रेखाटताना प्रत्येक वेळी हे जाणवतेच असे नाही. कथानक माहीत नसेल तर काहीच कळणार नाही, पण चित्रपटातील या मुलाखतीत दिग्दर्शक प्रत्येक उत्पादन कसे बेमालूमपणे कथानकात मिसळून गेले आहे ते उलगडून दाखवतो. इनफिल्मच्या वापरावरचे हे भाष्य खूप मार्मिक होते.

काही बरोबर – काही चुकलेले

चित्रपटात प्रॉडक्ट केवळ दिसून चालणार नाही, तर ते अशा पद्धतीने आले पाहिजे की, त्याचा अडथळा वाटता कामा नये. उत्पादनाची आणि चित्रपटाची दोहोंची प्रतिष्ठा जपली पाहिजे. काही मोजक्या चित्रपटांत ते होताना दिसते, तर काही निव्वळ गोंधळ घालणारे आहेत.

‘मेट्रिक्स’ चित्रपटात वापरलेला नोकियाचा फोनचा वापर अतिशय सुयोग्य पद्धतीने आला आहे. ट्रान्सफॉमर्समधील शेवरोले कॅमेरो ही गाडीदेखील अगदी समपर्क पद्धतीने प्लेस करण्यात आली होती, तर त्याच वेळी त्याच चित्रपटातील जनरल मोटर्स आणि माऊंटन डय़ूची प्लेसमेंट मात्र काहीशी नकारात्मकता निर्माण करणारी झाली होती. टॉम हँकची भूमिका असणारा ‘कास्ट अवे’ हा मुळातच एक उत्तम चित्रपट. या चित्रपटातील प्रॉडक्ट प्लेसमेंट अप्रतिम अशीच म्हणावी लागेल. वादळात विमान समुद्रात कोसळल्यानंतर त्यातून वाचलेला टॉम एका निसर्गसुंदर, पण मानवविरहित बेटावर येतो. वाहून आलेल्या सामानात एक फुटबॉल असतो, विल्सन बॅ्रण्डचा. हा फुटबॉल पुढे कथेचा भाग, पात्रच झाला आहे. टॉम त्या फुटबॉलशी अखेरच्या प्रसंगात त्यांची ताटातूट होईपर्यंत गप्पा मारतो, सुखदु:खाच्या गोष्टी करतो. हे फुटबॉलरूपी विल्सन पात्र कथेत टिकून राहिले आहे.

‘द इटालियन जॉब’मधील गाडय़ा, ‘टॉप गन’मध्ये पायलट्सनी वापरलेले रेबॅन गॉगल्स आणि याच चित्रपटात यूएस नेव्हीचादेखील ब्रॅण्डसारखा झालेला वापर ही आणखीन काही उदाहरणे. उत्पादनालाचा मध्यवर्ती ठेवून रचलेला ‘हेरॉल्ड अ‍ॅण्ड कुमार गो टू व्हाइट कॅसल’ हा चित्रपट मजेशीर आहे. थेट उत्पादनाचं नाव चित्रपटाला असल्यामुळे उत्पादनाच्या वापरावर संकेतांचा बडगा कमी होतो.

अर्थात काही वेळा अगदीच भंपकपणे, निर्बुद्धपणे प्रॉडक्ट प्लेसमेंट दिसून येते. महाप्रचंड अशा विचित्र प्राण्याचा नाश करण्यासाठी ‘इव्होल्यूशन’ चित्रपटात हेड अ‍ॅण्ड शोल्डर श्ॉम्पूचा वापर करण्यात आला होता. महाकाय प्राणी संपवणारा श्ॉम्पू माणसांनी का वापरावा, असा प्रश्नच येथे पडू शकतो. ‘द इंटर्नशिप’मध्ये गुगलची  विशिष्ट अशी सर्वेक्षण गाडी आणि ऑफिसची इमारत असा वापरदेखील प्रसंग सोडून आलेला दिसतो. सुष्ट आणि दुष्ट अशा शक्तींच्या लढण्याचे ठिकाण म्हणून आयहॉप मोटेलचा वापर ‘मॅन ऑफ स्टील’मध्ये केला होता; पण हे करताना त्या संपूर्ण इमारतीचा चुथडा करुन त्यातून नेमकं काय साधलं, हा प्रश्न उरतोच. ‘आय रोबो’मध्ये कनव्हर्स ऑल स्टार या शूज इतक्या वाईट पद्धतीने येतात की, शेवटी ‘ही पाहा मी जाहिरात करतोय असेच कलाकार म्हणेल की काय असे वाटते.

अर्थात कथानकानुसार कधी कधी मर्यादा येतात, पण तरीदेखील अनेक क्लृप्त्यांचा वापर होतो. ऐतिहासिक काळावर आधारित ‘ए नाइट टेल’ चित्रपटातदेखील इनफिल्म ब्रॅण्डिंग केलं आहे. छिन्नी-हातोडय़ाच्या आधारे चित्रपट नायिकेने एका टणक पृष्ठभागावर चक्क नाइकीचा लोगोच कोरला आहे. चित्रपट ज्या भूभागावर दाखवला जाणार आहे त्यानुसार प्रॉडक्ट प्लेसमेंटमध्ये बदल करण्याची ‘डिमॉलिश मॅन’सारखी उदाहरणेदेखील आहेत. या चित्रपटाच्या अमेरिकी व्हर्जनमध्ये टॅको बेल या रेस्टॉरंट चेनचा उल्लेख आहे, तर युरोपियन व्हर्जनमध्ये पिझ्झा हट.

बकवास बॉलीवूड प्लेसमेंट

इनफिल्मचा फॉम्र्युला उत्पादक आणि सिनेमाकर्ता दोघांनाही फायदेशीर ठरत असला तरी बॉलीवूडच्या काही चित्रपटांतून उत्पादनाची जाहिरात होण्यापेक्षा हास्यास्पद प्रसंग निर्माण झाल्याचे दिसून येते. ‘चुपके चुपके’ चित्रपटातील टाइडची प्लेसमेंट तर झाली आहे, पण त्या प्रसंगातील ‘सस्ता और अच्छा साबून है इसलिए इतनी मजदूरी.’ हा संवाद मात्र नेमकं  काय म्हणायचे यावर प्रश्नचिन्ह उभे करतो, तर ‘जानेमन’ चित्रपटातील बोर्नविटाच्या उल्लेखाने तर कहरच केला आहे. अनुपम खेरने दोन-चार वाक्यांत पाच-सहा वेळा बोर्नविटाचा उल्लेख केला आहे. हा प्रकार अत्यंत हास्यास्पद झाला आहे. बोर्नविटाची अशीच पुनरावर्ती ‘कोई मिल गया’मध्ये झालेली दिसून येते.

‘ताल’ या बिगबजेट आणि तगडी स्टार कास्ट असणाऱ्या चित्रपटात कोका कोलाची प्लेसमेंट झाली आहे. ऐश्वर्या आणि अक्षय खन्ना यांच्यातील प्रेम व्यक्त होणाऱ्या प्रसंगात कोका कोलाचा आधार घेतला आहे, पण हे करताना उत्पादनावर इतका थेट कॅमेरा नेला आहे की, कोका कोला हे प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम वाटू शकते. सर्वात विनोदी प्रकार आहे तो ‘यादे’मधला पास पास संवाद.

कोण किती आणि कसा खर्च करते ?

एकंदरीतच गेल्या दहा-वीस वर्षांत इनफिल्मचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. अर्थातच बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव असणाऱ्या अनेक उत्पादनांचा वाढता सहभाग यात आहे. एका निष्कर्षांनुसार अ‍ॅपलने २०१२ मध्ये आपल्या मार्केटिंगच्या निधीपैकी ४० टक्के निधी इनफिल्मसाठी वापरला होता, तर ‘मिशन इंपॉसिबल’ मध्ये आठ मिनिटे रुपेरी पडदा व्यापण्यासाठी अ‍ॅपलने २३ मिलिअन डॉलर्स खर्च केल्याची जोरदार चर्चा झाली होती. अ‍ॅपलच्या एकंदरीत या प्रभावामुळे हॉलीवूडच्या ३० टक्के चित्रपटांत अ‍ॅपलची उत्पादने आपणहून विनाखर्च दाखवत असल्याची आहे.

हल्ली आपल्याकडे अनेक कॉर्पोरेट हाऊसदेखील इनफिल्मचा वापर करताना दिसतात. त्यामध्ये थेट उत्पादनाचा सहभाग नसतो, पण नाव जोडले जाणे आणि प्रतिष्ठा मिळवण्याकडे कल दिसून येतो.

सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Product placement in movies

ताज्या बातम्या