पावसाळा सुरू झाला की काही ठरावीक बाजारांमध्ये पावसाळी स्पेशल रानभाज्या, मश्रूम (अळंबी), रानकंद याबरोबरच गोडय़ा पाण्यात आढळणारे (स्थानिक भाषेत त्यांना कुल्र्या म्हणतात) मुबलक प्रमाणात विकायला येतात. खेकडय़ांचे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात १) समुद्रात आढळणारे सागरी खेकडे २) गोडय़ा पाण्यात आढळणारे खेकडे या दोन्ही अधिवासात राहणाऱ्या खेकडय़ांच्या इतर जातीही आढळतात. महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर आतापर्यंत जवळजवळ ८० सागरी खेकडय़ांची नोंद झाली आहे. त्यापैकी दहा ते पंधरा जातींचे खेकडे मानवी आहारात खाण्यासाठी वापरले जातात. गोडय़ा पाण्यातील खेकडय़ांचाही खाण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. काळसर, तपकिरी रंग आणि सपाट पाठ असलेल्या खेकडय़ांची मागणी मुंबईत वाढू लागली आहे. हा खेकडा चवीला रुचकर आहे. त्याचप्रमाणे उभयचर वर्गातील खेकडय़ांपैकी भातशेतीत एक जात आढळते. पिवळसर रंगाचा हा खेकडा दाट गवतात आणि शेतातील बांधावर बीळ करून राहातो, पण या खेकडय़ामुळे भातशेतीचे काही प्रमाणात नुकसान होते. त्याचबरोबर एक नांगी मोठी आणि एक नांगी छोटी असलेले खेकडेही बाजारात विक्रीला येतात. पावसाळा सुरू झाला की खेकडय़ांच्या बिळात पाणी शिरायला लागते. मग खेकडे बिळातून बाहेर यायला सुरुवात होते. पाणथळ जागी, शेतात, नदीकाठी आपल्या नांग्या उगारून हे खेकडे चालताना दिसतात. अशावेळी रात्रीच्या अंधारात भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडणाऱ्या खेकडय़ांना आदिवासी, कातकरी पुरुष व स्त्रिया पकडतात आणि स्थानिक बाजारांमध्ये विकायला आणतात. असा खेकडय़ांचा बाजार आणि खेकडय़ांच्या चार, पाच जाती बघायच्या असतील तर कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथील रेल्वेस्टेशनच्या बाहेरील परिसराला अवश्य भेट द्या. नायलॉनच्या गोण्यांमध्ये भरलेले, जाळीच्या आवरणात बांधलेले, बांबूच्या टोपल्यांमध्ये एकमेकांचे पाय ओढत फिरणारे खेकडे बघायला मिळतील. तर काही खेकडे जाडसर वेलींच्या सहाय्याने बांधलेले असतात आणि असे खेकडय़ांचे जुडगेही विकायला असतात. छोटे खेकडे ५० ते २०० रुपये डझन आणि मोठे खेकडे ३०० ते ५००- अगदी हजार रुपये डझनापर्यंत असतात. येथील काही खेकडे आकाराने मोठे आणि एक ते दीड किलो वजनाचेदेखील असतात. अशा वजनदार खेकडय़ांची किंमतही वजनदार असते. कोकणसारख्या जास्त पावसाच्या प्रदेशात काळसर, तपकिरी रंगाचे खेकडे मुबलक आढळतात. नदी, ओढे, झरे, विहिरी, पाणथळ भागातील शेती अशा भागात हे खेकडे आढळतात. पावसाळ्यात नदीनाले, ओढय़ांना पूर आला की कोकणी माणूस खास बांबूच्या कामटय़ांपासून बनविलेल्या गडद्यांपासून हे खेकडे पकडतात. हे गडदे म्हणजे खेकडे पकडण्यासाठी बनविलेला एक प्रकारचा पिंजराच असतो. या गडद्यांमध्ये खेकडय़ांना आकर्षित करण्यासाठी कोंबडय़ांच्या पोटातील आतडी आणि जिवंत काडू (गांडुळाचा प्रकार) लावले जातात. मात्र गडदे दगडांच्या कपारीत व्यवस्थित अडकवले की नाही याची खबरदारी घ्यावी लागते. नाहीतर पुराच्या पाण्यात वाहून जाण्याचा धोका असतो. गडदे साधारणपणे संध्याकाळी लावले जातात आणि भल्या पहाटे काढले जातात. एका गडद्यात डझनभर खेकडे सहज अडकतात. पाऊस थोडा उघडल्यावर उथळ पाण्यातले दगड उलटले की दगडाखाली लपलेला खेकडा हाताने पकडायचा, नाहीतर गळाला काडू अडकवून खेकडे पकडायचे. पण खेकडे पकडताना सावधगिरी बाळगायची. नाहीतर आपली बोटं खेकडय़ाच्या नांगीच्या चिमटीत अडकली तर रक्त आलेच म्हणून समजा. मग या खेकडय़ांचे चविष्ट कालवण करायचे, नाहीतर चुलीतील निखाऱ्यांवर खरपूस भाजून त्यावर मीठमसाला पेरून तसेच खायचे. कोकणात काही भागात लाल आणि निळ्या रंगाचे खेकडे आढळतात, पण खाण्यासाठी त्यांचा वापर केला जात नाही. काही ठिकाणी लाल खेकडा पकडणे वज्र्य मानले जाते, कारण लाल खेकडा म्हणजे देवकुर्ली मानण्यात येते. तिला पकडण्यामुळे देवाची अवकृपा होते असे मानण्यात येते. आज गोडय़ा पाण्यातील खेकडय़ांना व्यावसायिक स्वरूप आले आहे. खेकडा प्रकल्प, खेकडय़ांच्या शेतीद्वारे आर्थिक विकासावर भर दिला जात आहे.
सुहास बसणकर – response.lokprabha@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2015 रोजी प्रकाशित
चिंबधारा : पावसाळा आणि खेकडे
खेकडय़ांचे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात १) सागरी खेकडे २) गोडय़ा पाण्यातील खेकडे.
Written by दीपक मराठे

First published on: 04-09-2015 at 01:25 IST
मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain and crabs