आजकाल धर्माच्या आधारावर राजकारण केले जाते अशी चर्चा नेहमीच होते. म्हणूनच महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी राजांचे धार्मिक धोरण काय होते याचा विचार करायला हवा.

गेल्या काही वर्षांत काही हिंदुत्ववादी राजकीय पक्ष, संघटना शिवाजी राजांचे नाव घेऊन हिंदुत्वाचे राजकारण करीत आहेत. मराठी मनात युगपुरुष छत्रपती शिवाजी  महाराजांविषयी असलेल्या अभिमानाच्या, आदराच्या भावनेचा गैरउपयोग करत असून स्वत:चे जातीयवादी, धर्मवादी राजकारण पुढे रेटत आहेत. यामुळे समाजमनात गोंधळ निर्माण होत असून वातावरण कलुषित होत आहे. आरोग्यसंपन्न समाजाच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे. राज्यात आणि देशात नवीन भाजपप्रणीत शासन आल्यानंतर हिंदुत्ववादी विचाराने जोर पकडलेला आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटू लागले आहे. मागासलेल्या जातीमध्ये भय निर्माण होत आहे.

supriya sule on amit shah
“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही!”
मन में है विश्वास

उलट आता उदार धार्मिक धोरणाची गरज आहे. जाती-धर्माच्या भिंती ओलांडून आपण सर्वानी एकत्र येण्याची मोठी आवश्यकता आहे. धर्म ही मानवी समाजातील एक मोठी प्रेरक शक्ती आहे. या दृष्टीने आपण धर्माकडे पाहिले पाहिजे. सत्य हाच धर्म आहे. परोपकार, दया हा धर्म आहे. धर्मभावनाही माणसाच्या ठिकाणी समाजसेवेची उदात्त शक्ती निर्माण करते. धर्म हा दुसऱ्यावर प्रेम करायला शिकवितो आणि प्रेम मानवाला जगायला शक्ती देते. धर्माकडे या आधुनिक दृष्टीने पाहिले पाहिजे. म्हणून या विज्ञान युगात उदारमतवादी धोरणाची गरज आहे.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण काय होते हे नजरेआड करू नये. छत्रपती शिवाजी राजे हे हिंदू धर्मरक्षक होते. त्यांना आपल्या हिंदू धर्माचा सार्थ अभिमान होता. म्हणूनच ते दक्षिणेतील आदिलशाही, कुतुबशाही आणि उत्तरेतील मोंगल या अन्यायी, जुलमी आणि धार्मिक अत्याचार करणाऱ्या मुस्लिम राजवटीविरुद्ध लढले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आपल्या हिंदू धर्माचे रक्षण केले. मात्र शिवाजी राजांनी दुसऱ्या धर्माचा द्वेष कधी केला नाही. ते सर्व धर्माना समान मानत होते. सर्व धर्माचा आदर करीत होते. हे विद्यमान हिंदुत्ववादी राजकीय पक्षांनी, संघटनांनी विचरात घेतले पाहिजे.

स्वधर्म रक्षण : सतरावे शतक म्हणजे मध्ययुगीन कालखंड, शिवाजी राजांनी स्वधर्म रक्षण हे स्वराज्याचे ध्येय म्हणून निश्चित केले होते. प्राचीन काळात मनूनेदेखील विजेत्या राजाने राज्यातील लोकांच्या धर्माला संरक्षण दिले पाहिजे. त्या त्या लोकांच्या धर्मश्रद्धांना धक्का देऊ नये. हे राज्यसंस्थेचे एक कर्तव्य मानावे असे म्हटले आहे.

दक्षिणेतील बहामनी सुलतान, निजामशाही, आदिलशाही या मुस्लिम राजवटीत हिंदूंवर अत्यंत जुलूम- अन्याय होत होता. महंमद आदिलशहा याची कारकीर्द सन १६२७-१६५६ या काळात झाली. याने एक जाहीरनामा काढला होता. त्याच्या या जाहीरनाम्यात त्याचे अन्यायी धोरण कसे हेाते हे दिसून येते. तो आपल्या जाहीरनाम्यात म्हणतो,

  • राज्यकारभारातील सर्व वरच्या जागा मुसलमानांसाठी राखून ठेवाव्यात. हिंदूंना फक्त कारकुनाच्या जागा द्याव्यात.
  • हिंदू कितीही श्रीमंत असला तरी तो गरिबातील गरीब मुस्लिमाची बरोबरी करू शकणार नाही.
  • हिंदूवर मुस्लिमाने अन्याय- अत्याचार केला तर त्या मुस्लिमास काझीने शिक्षा करू नये.
  • हिंदूच्या सर्व जातीजमातीवर जिझीया कर बसवावा.
  • हिंदूची मंदिरे व मूर्ती फोडणे हे काझीचे कर्तव्य आहे.

याप्रमाणे मुस्लिम राज्यकर्त्यांकडून उघडपणे हिंदूंवर अन्याय होत होता. मोगल बादशहा औरंगजेब किती हिंदू धर्मद्वेष्टा, अन्यायी, अत्याचारी होता हे सर्वपरिचित आहे. छत्रपती शिवाजी राजांनी हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

महाराजांनी स्वराज्य स्थापण्यासाठी सर्व जाती-धर्माच्या मात्र एकनिष्ठ असणाऱ्या शूर, त्यागी मावळ्यांची साथ घेतली. जिवा महाला हा न्हावी होता. बहिर्जी नाईक रामोशी होता. दर्या सारंग, दौलतखान, मदारी मेहतर, सिद्दी इब्राहीम, इब्राहीम खान हे सर्व मुस्लिम होते आणि महाराजांच्या विश्वासातील होते. नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सोनोपंत डबीर, निराजी रावजी, शामराव पुंडे, पितांबर शेणवी, पिलाजी भिमजी, हंबीरराव मोहिते, निंबाळकर हे सर्व मराठा होते. अण्णाजी दत्तो, त्र्यंबक, भास्कर, पंताजी गोपीनाथ, मुरारजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, मोरो त्र्यंबक, नारो निळकंठ, रामचंद्र निळकंठ हे सर्व ब्राह्मण होते. या सर्वाना महाराज आपला ‘माणूस’ मानत होते. आणि या सर्वानी महाराजांना स्वराज्य स्थापण्यात प्रामाणिकपणे साथ केली.

महाराजांनी आपल्या लष्करात उच्चकुलीन मराठे, ब्राह्मण, प्रभू, हेटकरी, रामोशी, न्हावी, महार, मांग, कोळी, भंडारी आदी जातीजमातींतील शूरांना भरती केले होते. त्यामुळे या लष्कराला राष्ट्रीय लष्कराचे स्वरूप प्राप्त झाले होते.

मुस्लिमांना धार्मिक स्वातंत्र्य, मशिदींना देणग्या दिल्या. शिवाजी महाराजांना जिवंत पकडण्याच्या किंवा ठार मारण्याच्या इराद्याने स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाचा छत्रपती शिवाजी राजांनी नोव्हेंबर १६५९ रोजी वध केला. त्यानंतर त्यांनी आदिलशाहीच्या ताब्यातील वाई, सातारा, कोल्हापूर हा प्रदेश जिंकून स्वराज्यात आणला. या जिंकून घेतलेल्या प्रदेशाकरिता त्यांनी एक जाहीरनामा काढला. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, ‘‘आदिलशाहीत मुस्लिमांच्या धर्मस्थळांना जी इनामे चालू होती ती सर्व नव्या राज्यात चालू राहतील. तसेच या धर्मस्थळांना कोणताही उपद्रव पोहोचणार नाही, अशी त्यांनी हमी दिली होती. वयाच्या केवळ २९ व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजे धार्मिक धोरणासंबंधी किती उदारमतवादी होते हे आजच्या हिंदुत्ववादी पक्ष-संघटनांनी विचारात घेणे जरूर आहे. तत्कालीन प्रसिद्ध मुस्लीम लेखक काफीखान याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणांची प्रशंसा केली आहे. तो म्हणतो, मुसलमान राज्यकर्त्यांनी कबरी, मशिदी व पीर यांना दिलेल्या नेमणुकी व इनामे शिवाजी राजांनी कधीही बंद केली नाहीत.

बखरकार कृष्णाजी अनंत सभासद छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणासंबंधी म्हणतो, ‘‘मुलखात देव-देवस्थाने जागोजागी होती. त्यास दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक (स्थान पाहून) यथायोग्य चालविले. मुसलमानांचे पीर, मशिदी, त्यांची दिवाबत्ती स्थान पाहून चालविले. ज्या वेळी मुसलमान राज्यकर्ते हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करत होते, मूर्ती फोडत होते; तेव्हा या राजाने आपल्या राज्यातील मशिदींना व पीरांच्या स्थानांना अभय दिले. ही बाब हिंदुस्थानच्या इतिहासात उल्लेखनीय ठरावी. शिवाजी राजांनी मशिदी व कुराण या मुसलमानांच्या श्रद्धास्थानांना आपल्या सैनिकांनी कोणताही उपद्रव देऊ नये अशी सक्त ताकीद दिली होती.’’

मुस्लिम इतिहासकार काफीखान याने आपल्या इतिहास ग्रंथात म्हटले आहे की, शिवाजी राजांनी असा सक्त नियम केला होता की, लष्करी मोहिमांच्या वेळी सैनिकांनी मशिदीस अथवा कुराणास त्रास देऊ नये. जर एखादी कुराणाची प्रत त्याच्या हाती सापडली तर तो मोठय़ा पूज्य भावनेने ती आपल्या हाताखालच्या मुसलमान नोकराच्या स्वाधीन करत असे. शिवाजी महाराज हिंदू तसेच मुस्लिम धर्मातील गुरूंचा आदर करीत. केळशीचे बाबा याकुत खान यांच्यांसंबंधी त्यांना आदर होता. त्यांच्या राज्यात हिंदू व मुसलमान यांना समान वागणूक मिळत होती. इब्राहीम खान व दौलत खान हे महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. सिद्दी संबूळ, सिद्दी मिस्त्री हे महाराजांच्या आरमारात होते. मदारी मेहतर हा महाराजांचा खाजगी नोकर होता. आग्रा भेटीवेळी त्याला त्यांनी बरोबर नेले होते. महाराज आग्य््रााहून निसटल्यानंतर मदारी मेहतर व हिरोजी र्फजद यांना मोगलांनी पकडले. शिवाजी राजांचा ठावठिकाणा सांगण्यासाठी त्याला मोगलांनी जबर मारहाण केली. परंतु मदारी मेहतर सच्चा स्वामीनिष्ठ होता; त्याने महाराजांविषयी मोगलांना काहीही माहिती सांगितली नाही.

पुन्हा हिंदू धर्मप्रवेश

शिवाजी महाराजांचे धार्मिक विचार आणि आचार आजच्या काही हिंदुत्ववादी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी तटस्थ वृत्तीने आणि शांतचित्ताने समजून घेतले तर समाजात पसरत जाणारी धर्मद्वेषाची भावना निश्चित कमी व्हायला मदत होईल. मुस्लिम धर्माचा स्वीकार केलेल्या नेताजी पालकर, पिलाजी प्रभू यांना आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाल्यानंतर ते महाराजांकडे परत आल्यानंतर त्यांना महाराजांनी ब्रह्मसभेकडून शुद्ध करवून घेतले आणि त्यांना हिंदू धर्मात पूर्वीचे स्थान प्राप्त करून दिले. त्यांचे हे धोरण काळाचा विचार करता क्रांतिकारी होते. मानवतावादी होते. महाराजांचा धार्मिक व्यवहार हा शुद्ध मानवतावादी होता.

हिंदू धर्मीयांचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत कठोर भूमिका ते घेत असत. गोव्यात पोर्तुगीजांची सत्ता होती. ते व्यापारी होते. तसेच धर्मवेडे होते. त्यांनी हजारो हिंदू कुटुंबांना ख्रिस्ती केले होते. गोव्यातील बारदेश प्रदेशातील ७००० हिंदूंपैकी ४००० हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. राहिलेल्या ३००० हिंदूंनी दोन महिन्यांच्या आत ख्रिस्ती धर्म स्वीकारला पाहिजे असे फर्मान पोर्तुगीज व्हाइसरॉयने सन १६६७ मध्ये काढले. तेव्हा पोर्तुगीजांच्या या अन्यायाच्या विरोधात आणि त्यांना अद्दल घडविण्यासाठी शिवाजी राजांनी १६६७ मध्ये बारदेशवर जोरदार हल्ला केला.

सर्वधर्म समानता

१७ व्या शतकात शिवाजी राजांची सर्वधर्म समान आहेत, ही व्यापक भूमिका होती. खरं पाहता महाराज हे काही संत पुरुष नव्हते. ते महान मुत्सद्दी राजकारणी होते. मात्र ते राजकारणात द्वेषबुद्धीने – सूडवृत्तीने कधीही वागले नाहीत. ईश्वर हा सर्व धर्मात सारखाच आहे. सर्व धर्म समान आहेत. सर्व धर्मात मानवतावादाची शिकवण दिली आहे. हा उदात्त विचार राजांच्या ठायी होता. धर्मवेडाने राज्य मोठे होत नाही. सर्व धर्मासंबंधी सहिष्णू भाव असल्याने राज्य मोठे होते. ही राजांची ठाम धारणा होती. त्यांनी धर्मवेडाला कधीही जवळ केले नाही. हिंदू- मुस्लिम या दोन्ही धर्मातील संतांविषयी त्यांना आदर होता. सर्व माणसं देवाने निर्माण केली आहेत. आणि या सर्वाचेच कल्याण साधणे हे राज्यकर्त्यांचे आद्य कर्तव्य आहे, ही शिवाजी महाराजांची ठाम भूमिका होती.
प्रा. मो. नि. ठोके – response.lokprabha@expressindia.com