विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

युद्धात रणभेरी किंवा रणदुदुंभीला जे महत्त्व तेच निवडणुकीच्या रणधुमाळी प्रचारगीतं आणि घोषवाक्यांना! पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या रंगात आला आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं असून दणदणीत प्रचारगीतं आणि खणखणीत घोषणा  माहौल अधिक गडद करत आहेत. तृणमूलच्या ‘खेला होबे’ या प्रचारगीताने आणि त्याच्याच रॅप व्हर्जनने धुमाकूळ घातला आहे, तर त्याला ‘बेला चाओ’ या इटालियन आंदोलनगीताच्या चालीवर रचलेल्या ‘पिशी जाओ’तून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. घोषणांतूनही शाब्दिक युद्ध रंगत आहेत. या साऱ्या शाब्दिक कसरतींचा प्रत्यक्ष निकालांवर काही परिणाम होईल की नाही, ही बाब अलाहिदा, पण त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र वीरश्री संचारल्याचं रॅली आणि सभांच्या दृश्यांतून स्पष्ट होत आहे.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते आणि युवा आघाडीचे महासचिव देबांग्शु भट्टाचार्य यांनी रचलेल्या ‘खेला होबे’ या गीताने पश्चिम बंगाल दणाणून टाकलं आहे. बंगाली बोलीतल्या या गीतांचं रॅप व्हर्जन तरुणांच्या गळ्यातला ताईत झालं आहे. पण खेला होबे ही घोषणा आली कुठून? बांगलादेशच्या आवामी लीगचे शमिम ओस्मान यांनी प्रथम ही घोषणा दिल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर तृणमूलच्याच नेत्या अनुब्रता मंडल यांनी एका कार्यक्रमात ‘खेला होबे, भोयोंकोर खेला होबे, ऐ माटी ते खेला होबे’ (सामना होईल, भयंकर सामना होईल आणि तो या मातीतच होईल.) असं म्हटलं होतं. त्यानंतर खेला होबे ही घोषणा सर्वच पक्षांनी उचलून धरली. परस्परांना आव्हान देण्यासाठी कार्यकर्ते ही घोषणा देऊ लागले आहेत. ममता बॅनर्जी तर आपल्या भाषणांमध्ये ही घोषणा देत आहेतच, शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यापर्यंत विविध राजकीय नेत्यांनीही आपल्या भाषणांत खेला होबेचा उल्लेख केला आहे.

बंगालमध्ये निवडणुकांसाठी पाश्र्वभूमी तयार करताना भाजपाने ‘जय श्री राम’ची घोषणा दिली होती. त्यावरून भाजपा धर्माधारित राजकारण करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका झाली. भाजपाच्या राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून तृणमूलने अस्सल बंगाली बोलीतील खेला होबे ही घोषणा दिली. तृणमूलचा युवा नेता देबांग्शु भट्टाचार्यने उत्तर बंगालमध्ये प्रचारफेऱ्यांच्या रणधुमाळीतून वेळ काढत या गीताचे बोल लिहिल्याचं सांगितलं जातं. २५ वर्षीय देबांग्शु पेशाने सिव्हिल इंजिनीअर आहे. हे गीत ६ जानेवारीला चित्रित केलं गेलं आणि ७ जानेवारीला अपलोड करण्यात आलं. त्यापाठोपाठ त्याचं रॅप व्हर्जनही आलं आणि युवकांनी त्याला डोक्यावर घेतलं. यूटय़ूबवर  ते एक कोटी ३० लाख वेळा पाहिलं गेलं (व्ह्य़ू) आहे.  या गाण्याने सुरुवातीपासूनच सभा आणि प्रचारफेऱ्यांत रंगत आणली आहे. तृणमूलच्या अनेक नेत्यांच्या प्रचारसभांच्या व्हिडीओत या गाण्याचा वापर पाश्र्वसंगीतासाठी करण्यात आला आहे. या गीताविषयी देबांग्शुने विविध प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीतं, म्हटलं आहे की, ‘भारतीय जनता पार्टी जेव्हा जय श्री रामची घोषणा देते तेव्हा त्यामागे भावभक्तीपेक्षा जास्त धर्माधारित फूट पाडण्याचा प्रयत्न असतो. आमचा विरोध या फूट पाडण्याच्या प्रयत्नांना आहे. आम्हाला अशी एखादी घोषणा हवी होती, जी तृणमूल काँग्रेसपुरती सीमित न राहता प्रत्येक बंगाली व्यक्तीला आपलीशी वाटेल. बंगाली लोक क्रीडाप्रेमी आहेत. फुटबॉल, क्रिकेट, बुद्धिबळापासून अगदी लुडोपर्यंत सर्व खेळांमध्ये त्यांना स्वारस्य आहे. खेळ सुरू असताना ते एखाद्या संघाचे कट्टर समर्थक असतात, पण हार-जीत खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याएवढं त्यांचं मन मोठं आहे. भाजपाची वृत्ती अशा निखळ स्पर्धेची नाही. त्यांचे नेते हिंसक भाषा बोलतात. आम्ही राजकारणाकडे एखाद्या खेळाप्रमाणे पाहतो आणि खिलाडू वृत्तीनेच निवडणुका लढवतो, हे मतदारांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न आम्ही गीतातून के ला आहे.’

खेला होबे गीतात भाजपाच्या कार्यकाळात वाढलेली महागाई, हाथरस प्रकरण, जनता कर्फ्यूच्या काळात पंतप्रधान मोदींनी केलेलं थाळीनादाचं आवाहन, रामाचं नाव घेऊन केलं जाणारं राजकारण इत्यादी मुद्दय़ांवरून भाजपाला लक्ष्य करण्यात आलं आहे. ‘आमार माटी शोएबे ना, यूपी बिहार होइबे ना, बांगला आमार बांगला राबे, बोंधु ये बार खेला होबे’ अशा शब्दांत आमचा बंगाल बंगालच राहील, यूपी बिहार होणार नाही, असा दावाही करण्यात आला आहे. भूमिपुत्र-परप्रांतीय वाद, ममता बॅनर्जी यांच्या काळात राबवण्यात आलेल्या विविध विकासयोजना,  इत्यादींचं वर्णनही या गीतातून करण्यात आलं आहे. मात्र त्यातल्या मुद्दय़ांएवढीच किंवा त्यापेक्षा थोडी अधिकच भुरळ घातली आहे ती त्यातल्या रागंडय़ा रॅपने. त्यामुळे हे गाणं आता राजकीय प्रचारफेऱ्या आणि प्रचारसभांच्या सीमा ओलांडून थेट लग्नांत आणि वाढदिवसाच्या पाटर्य़ामध्येही वाजू लागलं आहे. गीताचे बोल, त्यात मांडलेले मुद्दे हे सारं नंतर येतं, पण ऐकताक्षणी लक्ष वेधून घेते ती त्याची चाल. प्रचारगीताचं हे रॅपरूप तरुणांना ठेका धरायला भाग पाडत आहे. देबांग्शुने याआधी ‘दिल्ली जाबे हवाई चोटी’ (हवाई चप्पल वापरणाऱ्या ममतादीदी दिल्लीत जातील) आणि ‘ममतादीदी और एक बार’ ही गाणीदेखील लिहिली आहेत.

‘खेला होबे’ला शह देण्यासाठी भाजपानेही लगोलग ‘पिशी जाओ’ हे ममता बॅनर्जीना उद्देशून ‘आत्या जा..’ म्हणणारं गाणं रिलिज केलं. त्यात ममतांच्या कार्यकाळात जनतेचं किती नुकसान झालं याचं वर्णन करण्यात आलं आहे. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, नोकऱ्या नाहीत, रोजगाराच्या संधी नाहीत अशी टीका या गाण्यातून करण्यात आली आहे. इथेही बंगालींच्या फुटबॉल प्रेमाचा प्रतीकात्मक वापर केल्याचं दिसतं. बंगाली मतदार ममता बॅनर्जीच्या सत्तेला नाकारत असल्याचं फुटबॉलला किक मारणाऱ्या मुलाच्या स्वरूपात दाखवण्यात आलं आहे. हे गीत यूटय़ुबवर ८३ हजार वेळा पाहिलं गेलं (व्ह्य़ू) आहे.

घोषणांचं हे द्वंद्व इतकं प्रसिद्ध झालं आहे की बंगालमधल्या एका हलवायाने ‘खेला होबे’ आणि ‘जय श्रीराम’ अशी अक्षरं असलेली मिठाईसुद्धा तयार केली आहे. तृणमूलसाठीची मिठाई हिरव्या-पांढऱ्या रंगात तर भाजपासाठीची मिठाई भगव्या-पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. याव्यतिरिक्तही विविध घोषणांतून परस्परांवर वार-पलटवार करण्याची स्पर्धा पक्षांमध्ये लागल्याचं दिसतं. ‘एक छोब्बोल छोबी’ म्हणत आम्ही एकच घास घेऊ आणि तुम्ही भिंतीवरची तसबीर व्हाल किंवा ‘आमी एकता कोब्रा’ म्हणजे मी एक कोब्रा असं म्हणत भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘अशोल परिबोर्तन’ म्हणजे आपणच खरं परिवर्तन आणू शकतो आणि ‘डबल इंजिन की सरकार’ म्हणत केंद्राप्रमाणेच राज्यातही भाजपाची राजवट असेल तर दुप्पट वेगाने विकास होईल, असा दावा केला आहे. तृणमूलच्या ‘खेला होबे’ला भाजपाने ‘खेला शेष’ म्हणजे तुमचा खेळ संपला असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. बंगालला त्याची स्वत:ची मुलगीच हवी आहे हा तृणमूलचा दावा भाजपाने ‘पिशी जाव’ म्हणत खोडून काढला आहे.

थोडक्यात पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांच्या प्रतिभेला वाव मिळाला आहे. गाणी आणि घोषणांमुळे कार्यकर्त्यांमध्ये वीरश्री संचारली आहे. कर्कश भाषणांच्या पाश्र्वभूमीवर या गीतांमुळे मतदारांचंही थोडंसं मनोरंजन होत आहे. बाकी या पणाला लावलेल्या प्रतिभेचं फलित काय निकालांच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.