12 July 2020

News Flash

किशोरांचं वास्तव : संवाद साधताना टीका

पालकांनी मुलांशी बोलताना, त्यांच्या एखाद्या न पटलेल्या गोष्टीवर टीका करताना खूप संयम बाळगायला हवा. आपलं प्रेम, कळकळ मुलांना पटेल, समजेल अशा पद्धतीने त्यांची चूक त्यांनी

| November 14, 2014 01:21 am

lp41पालकांनी मुलांशी बोलताना, त्यांच्या एखाद्या न पटलेल्या गोष्टीवर टीका करताना खूप संयम बाळगायला हवा. आपलं प्रेम, कळकळ मुलांना पटेल, समजेल अशा पद्धतीने त्यांची चूक त्यांनी समजावून सांगायला हवी. या नाजूक वयात पालक जे काही वागतात, त्याचा मुलांवर खूप परिणाम होत असतो हे लक्षात घेतलं पाहिजे.

किशोरवयीन मुलं-मुली वरवर जरी बेदरकारपणे वागताना दिसली, तरी या वयात ती कमालीची हळवी असतात. आईबाबांनी किंवा इतर वडीलधाऱ्यांनी केलेली टीका त्यांना खूप दुखवते. सतत त्यांचे दोष दाखवणाऱ्या आईबाबांशी तर ती बोलणंच टाळतात. कधी कधी तर या आईबाबांना धडा शिकवायला जाताना ती उफराटं वागू जातात. कधी ती अभ्यास टाळतात, तर कधी वेगानं मोटरसायकल चालवतात, दारू पिऊ लागतात, ड्रग्ज घेऊन आत्मनाश करू पाहतात. आपल्या जवळच्या माणसांची सतत टीका ऐकता, ऐकता या मुलांचा आत्मविश्वास ढळतो, तशीच त्यांच्या मनातील स्वत:ची आत्मप्रतिमाही विसकटते. आपण काहीच कामाचे नाही, असं वाटून त्याच्या मनात न्यूनगंड तयार होतो.

तसं पाहिलं तर आपला टीकेचा सूर जरा कठोरच असतो आणि अनेकदा तर ती टीका अनावश्यकही असते. त्यांची नेमकी चूक समजून न देता आपण त्यांना नाही नाही ती दूषणं देत राहतो. ‘तुला हे कळत नाही’, ‘हे तुला जमणार नाही’ अशी नकारात्मक भाषा टाळून आपला टीकेचा सूर आपण होकारात्मक ठेवायला हवा.

रविवारी दिवाळीच्या साफसफाईची जबाबदारी यंदा राधानं घेतली होती. पण सकाळी तिला उठायलाच इतका उशीर झाला, की ती कामाला लागेस्तोवर केरवारा करणारी बाई हजर झाली. राधानं जेमतेम दिवाणखान्यातील जळमटं काढली, तोवर आईबाबा खरेदी आटोपून परतले. राधा आईला स्वयंपाकात मदत करू लागली. दुपारी बाबा कपाट उघडायला गेले तेव्हा त्यांना खोलीतली जळमटं दिसलीच. पण ते न रागावता म्हणाले, ‘राधा, उशिरा उठल्यानं गडबड झाली वाटतं तुझी! आता तुला पुन्हा एकदा वेळ काढावा लागणार गं या कामासाठी.’

राधा लगेच म्हणाली, ‘उद्या मला सुटीच आहे नं! दिवसभरात करतेच बघा मी घर चकाचक.’

याउलट बाबा रागावले असते तर संवाद कसा झाला असता पाहा.

‘राधा तू काय कबूल केलं होतंस?’

‘मग? मी केलंय नं काम?’

‘याला काम म्हणतात? सगळी जळमटं तशीच दिसताहेत. सकाळी आठ आठ वाजेपर्यंत लोळत पडायचं आणि मग दिवसभर मैत्रिणींसोबत मौजमजा!’ खायाला आधी, निजायला मधी आणि कामाला कधीमधी.’

या सुरातलं भांडण कितीही ताणलं जातं आणि ऐन दिवाळीत घरातलं वातावरण गढुळतं. खरं तर असं या मुलांवर हरघडी नाराज होणाऱ्या, त्यांच्यावर अकारण भडकणाऱ्या पालकांनी स्वत:च्या बालपणात, किशोरवयात जरा डोकावावं. तिथं त्यांना त्याच्यावर अकारण डाफरणारे, त्यांना सतत नावं ठेवणारे, त्यांना शब्दांच्या वारांनी घायाळ करणारे त्यांचे आई/बाबा दिसतील. आज या मुलांवर रागावताना आपले शब्द, आपली देहबोली, आपली वार करण्याची पद्धत सारं काही हुबेहूब आपल्या रागीट आई/बाबांची थेट प्रतिकृती असते, हे त्यांच्या सहजच ध्यानात येईल. बालपणी मोठय़ा माणसांकडून वारंवार झालेले आपले अपमान, अवहेलना, वंचना, त्यातून उद्भवलेलं दु:ख असं खूप सारं आपल्या मनात घर करून बसलेलं असतं. त्याचं एक भांडारच तिथं साठलेलं असतं. रागाच्या भरात आपण बेसावध होतो तेव्हा ते बाहेर पडतं. हे टाळण्यासाठी खूप मनोनिग्रह करावा लागतो. खरं तर या किशोरवयीन मुलांच्या संगोपनाच्या निमित्तानं पालकांना स्वत:च्या मनातली ही जळमटं, साचलेला कचरा साफ करायची एक छान संधी मिळालेली असते. आपलं मन असं दररोज धुऊन स्वच्छ करणं याला विनोबा भावे अध्यात्म म्हणतात.

त्या दिवशी विजय अगदी खुशीतच घरी आला. त्यानं कॉलेजची टेनिसची चॅम्पियनशिप जिंकली होती. बाबांना ते कधी एकदा सांगतो असं त्याला झालं होतं. पण बाबांचं ऑफिसात काही तरी बिनसलं होतं वाटतं. विजयनं चॅम्पियनशिपचं सांगताच ते डाफरले, ‘पुरे झाला आता खेळ! अभ्यासाला लागा जरा. कसल्या फुशारक्या मारतो आहेस! एवढंसं ते तुझं कसलं कॉलेज आणि कसली ती चॅम्पियनशिप! तुझ्या वयाची मुलं आज ग्रॅण्डस्लॅम मिळवताहेत आणि इथं तू एका फालतू चॅम्पियनशिपनं हुरळून गेला आहेस!’

विजय बिचारा हिरमुसला होऊन खोलीत निघून गेला. त्याला म्हणावंसं वाटत होतं, ‘फालतू कॉलेजची फालतू चॅम्पियनशिप काय? तर मग तुम्हीसुद्धा फालतूच.’ आपल्या अशा अकारण वेडय़ावाकडय़ा टीकेचा या मुलाच्या जडणघडणीवर फार मोठा परिणाम होत असतो. मी कोण? मी कसा आहे? याचा शोध ती घेत असतात. स्वत:ची प्रतिमा ती पाहू जात असताना आपल्या अशा उगीचच त्यांना नावं ठेवण्यापायी त्यांच्यापुढली ती प्रतिमा विस्कटते. मुलांना सतत वेंधळा, आळशी म्हणत राहिलं की नकळत त्यांच्या मनासमोर तीच प्रतिमा जोपासली जाते आणि तेच गुण जोपासले जाताता. आपण काही करू शकणार नाही, असं वाटून ती स्पर्धा टाळू लागतात. काही मुलं अधिकच वेडंवाकडं वागू पाहतात. आईबाबांना शिक्षा करून दु:ख द्यावंसं त्यांना वाटू लागतं. मग आईनं खास केलेला पदार्थ मुद्दाम न खाता टाकून देणं, बाबांनी आणलेले बूट, कपडे न घालणं अशा छोटय़ा गोष्टींपासून ते अगदी पैसे चोरणं, गाडय़ा चोरणं, ड्रग्ज घेणं अशा आत्मघातक गोष्टीही करायला ती प्रवृत्त होतात.

विपुल कार्पेटवर बसून शाई भरत होता. कॅलिग्राफीच्या नादात हल्ली तो गुरफटला होता. गडबडीत शाई सांडली. ते पाहून आई म्हणाली, ‘इथं बसून शाई भरायची असते का? आता गेले नं पैसे पाण्यात?’ बाबांनी अधिक रागीट शब्दात आईचीच ‘री’ ओढली. ते म्हणाले, ‘जन्मात सुधारायचा नाही तो. तो आता पुरता वेंधळा आणि बेजबाबदार झाला आहे.’ आईबाबांच्या हे लक्षात आलं नाही की कार्पेट खराब झालं तर नवं आणता येतं किंवा ते नसलं तरी इथं फार काही अडत नाही. पण असे सतत वार करत गेलं, तर विपुलचं व्यक्तिमत्त्व पुरतं विसकटून जाईल आणि ते फार मोठं नुकसान होईल.

आज नामांकित ड्रेस डिझायनर बनलेल्या गौरीच्या किशोरवयातल्या या आठवणीकडे पाहा. गौरीला शाळेत झबलं बेतून न्यायचं होतं. सारा सरंजाम घेऊन ती डायनिंग टेबलवरच कामाला बसली. वहीत दिल्याप्रमाणे तिनं अगोदर कागदाचं व्यवस्थित कटिंग तयार केलं आणि पिनांच्या साह्यनं ते कापडावर टाचवून तिनं कापायला सुरुवात केली. थोडंसं कापल्यावर तिच्या ध्यानात आलं, की चुकून कापडाबरोबरच नवा कोरा टेबलक्लॉथही टाचवला गेला होता.

आणि झबल्याच्या कापडाबरोबर तोही कापला गेला होता. घाबरून जाऊन गौरी रडायलाच लागली. आई बाजूलाच वाचत बसली होती. गौरीचा रडवा सूर ऐकून ती उठली. तिनं पाहिलं आणि सगळा प्रकार तिच्या लगेच ध्यानात आला. तिला जवळ घेत आई म्हणाली, ‘वेडाबाई! रडतेस कसली? सुरुवातीला अशा चुका होणारच. माझी मदत न घेता तू एकटीनं इथवर झबलं नीट कापलं आहेस हेच महत्त्वाचं. टेबलक्लॉथ काय? तो नवीन आणता येतो. ’ आज गौरी म्हणते की, आईच्या अशा स्नेहशील आणि क्षमाशील जवळिकीनं तिला आजचा आत्मविश्वास आणि धडाडी दिली.

अलीकडे अवतीभवती बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे या वयाच्या मुलांच्या मनात गोंधळ उडालेला आहे. भ्रष्ट माणसांना मानसन्मान, अधिकाराच्या जागा मिळताना आणि ते अमाप संपत्ती उपभोगताना ही मुलं पाहाताहेत. सर्वत्र अनीतीची सरशी होताना पाहत वाढलेल्या या मुलांना स्वत:च्या पालकांचा मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचा अट्टहास हा केवळ मूर्खपणा आणि दुबळेपणा वाटतो. त्यामुळे जमेल तिथं थोडाफार कायदा मोडून वागायला ती उत्सुक असतात. केदारलाही असंच वाटत असे.

केदारच्या आईबाबांनी सुट्टीत गोव्याला जायचा बेत आखला. त्यांना सर्वाना ताजच्या रिसॉर्टमध्ये राहायचं होतं. जाहिरातीत पाहिल्यावर यंदा सवलतीचे दर असूनही खर्च थोडा जास्तच होणार हे पाहूनही बाबांनी थोडी अधिक पदरमोड सोसून तिथं जायचं नक्की केलं. अधिक चौकशीसाठी म्हणून ऑफिसच्या कामानिमित्त lp42तिथं वारंवार जाणाऱ्या मित्राकडे ते सारे गेले. तेव्हा गप्पांच्या ओघात बाबांचा मित्र म्हणाला, ‘केदारचे पूर्ण पैसे भरावे लागणार हे खरं, पण आदित्यचे अर्धेच पैसे भर नं?’ त्यावर बाबा म्हणाले, ‘ती सूट फक्त दहा वर्षांखालील मुलांसाठी आहे आणि आदित्यचा तर वाढदिवस उद्याच आहे. त्याला दहा पूर्ण होताहेत.’ मित्र म्हणाला, ‘त्याचं खरं वय कोणाला समजतंय? इतना तो चलता है! त्या वाचलेल्या पैशात त्याचा विमानखर्च सुटेल.’ यावर बाबा नुसतेच हसले, पण अठरा वर्षांच्या केदारनं घरी येताच वाद घालायला सुरुवात केली. त्याला मित्राचं म्हणणं शहाणपणाचं वाटत होतं. बाबांचा खरं वय नोंदवण्याचा आग्रह त्याला मूर्खपणाचा वाटत होता. बाबांनी फार वाद न घालता त्याला सांगितलं, ‘गोव्याला गेलो की मी आणि आई खोलीवर जाऊ आणि नोंदणी फॉर्म भरावा लागतो तो तूच भर. मग सही करायला मी येतोच. मग तुला आदित्यचं वय हवं तेवढंच लिहिता येईल.’ यथावकाश ते गोव्याला गेले. केदारनं एकटय़ानं सर्व फॉर्म ऐटीत भरला आणि तो बाबांना बोलवायला खोलीवर गेला. खोलीत येताच आदित्य म्हणाला, ‘बाबा, दादानं शेवटी माझं खरं वयच लिहिलं. आता आपले खूप जास्त पैसे खर्च होणार.’ केदारचा अभिमान एव्हाना पार ओसरला होता. बाबा रागावतील की काय अशी थोडी भीतीही त्याला वाटत होती. पण बाबांनी शांतपणे त्याला म्हटलं, ‘असे पैसे वाचवण्यासाठी खोटी नोंद करणं तुझ्याकडून होणार नाही, हे आम्हाला ठाऊकच होतं, पण ते तुला आधी सांगून पटलं नसतं. तुझी स्वत:ची मूल्यं तुला समजली हे छानच झालं. वर्षां-दीड वर्षांनी आपण सुटी घेतोय तर थोडा जास्त खर्च सोसायला हरकत नसते.’ बाबांनी टीका करणं टाळल्यामुळे केदारला दिसणारी स्वप्रतिमा स्पष्ट व्हायला मदत झाली.

बुडणाऱ्या माणसाला पोहोण्याचे धडे त्या क्षणी कुणी देत नसतं. त्या क्षणी त्याला वाचवायचा प्रयत्न करणं आवश्यक असतं. त्या क्षणी ‘तू बुडतोयसच कसा? पोहायला का शिकला नाहीस?’ असे प्रश्न आपण कधी विचारत बसतो का? मुलांना नीतिमूल्यं पडताळून पाहायला केदारच्या बाबांप्रमाणे पालकांनी अवसर द्यायला हवा.

टीकेचा हेतू मुलांवर अधिकार गाजवण्याचा न होऊ देता त्यांना स्वत:कडे पाहत आपापलं व्यक्तिमत्त्व डोळसपणे जोपासायला मदत करण्याचा असला पाहिजे. व्यक्तिमत्त्व विकासात मुलांनी स्वत:तल्या सुप्त क्षमता जाग्या करून त्या शिस्तशीरपणे वाढवण्याचा एक पैलू असतो. निनादच्या बाबतीत त्याच्या आईनं हेच केलं.

अलीकडे निनादचं लक्ष अभ्यासातून पार उडालं होतं. घरात सतत चालू असणाऱ्या बाबांच्या आरडाओरडय़ानं तो अगदी बावरून जात होता. बाबांना आईनं खूप सांगितलं, पण काहीच फरक पडला नाही. निनादची आई खूपच शांत स्वभावाची आहे. दर चाचणी परीक्षेच्या निकालासोबत निनादच्या वर्गशिक्षिकेची चिठ्ठी येई. निनादच्या आळशीपणाबद्दल, अभ्यासातील कुचराईबद्दल चर्चा करण्यासाठी पालकांनी भेटावं अशी विनंती त्यात असे. पहिल्या दोन चिठ्ठय़ा निनादनं प्रामाणिकपणे बाबांना देताच ते शिक्षकांना भेटायला तर गेलेच नाहीत, उलट आरडाओरडा करत त्यांनी त्याची निर्भर्त्सना केली. आईनं मग यातून मार्ग काढायचं ठरवलं. तिनं ती चिठ्ठी घेतली आणि ती निनादला म्हणाली, ‘खरंच, दर वेळी अशी चिठ्ठी आणून देताना तुझ्या जिवाचं काय होत असेल कळतंय मला. तू शांत राहा, नेटानं प्रयत्न कर. मी बाईंना भेटून येते.’ आई भेटायला गेली तेव्हा त्याच्या बाई म्हणाल्या, ‘निनाद बुद्धीनं तल्लख आहे. तो फार साधा आणि सरळ मुलगा आहे. अलीकडे मात्र तो सदा अस्वस्थ आणि घाबरलेला वाटतो.’

आईनं फक्त बाईंची भेट घेतल्याचं निनादला सांगितलं तेव्हा निनाद उत्साहानं म्हणाला, ‘आई, खरं तर त्याची गरजच नव्हती. आज दुपारी घेतलेल्या चाचणीत माझं एकच गणित चुकलंय आणि बाईंनी मला शाबासकीही दिलीय.’

निनादचे मार्क्‍स पूर्वीप्रमाणे भरघोस मिळायला लागेस्तोवर थोडा वेळ लागेल, पण त्याच्या स्वभावात येऊ पाहणारी कसर आईनं वेळीच काढून टाकली.

टीकेच्या बाबतीत एक पथ्य पालकांनी पाळलं पाहिजे. त्यांनी शांतपणे आपलं प्रेम, कळकळ मुलांना जाणवेल अशा पद्धतीनं त्यांची चूक नेमकेपणानं दाखवली पाहिजे. त्यासाठी पालकांनी उतावळेपणा सोडून मुलांच्या वर्तनाकडे सतत पाहत राहिलं पाहिजे आणि त्याच काकदृष्टीने स्वत:कडे, स्वत:च्या जीवनशैलीकडेही त्यांनी पाहत राहिलं पाहिजे. समंजस, विचारी पालकांमध्ये खूपच संयम आणि संवेदनशीलता रुजलेली असते. ती या वयाची मुलं वाढवताना छान वृद्धिंगत होते. अशा घरात किशोरवयीन मुलांना शांती लाभते आणि ती छान वाढतात, यशाच्या वाटेवर चालू लागतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2014 1:21 am

Web Title: while having conversation with kids
Next Stories
1 स्वागत दिवाळी अंकांचे
2 चर्चा : आता तरी जागे व्हा!
3 मध्यांतर : जिवतीचा वसा
Just Now!
X