लेखक का लिहितो, त्याला कुणालातरी काहीतरी सांगायचंय, व्यक्त व्हायचंय असं का वाटत असतं? ‘श्वास’च्या लेखिका माधवी घारपुरे यांनी केलेले आपल्या लेखन प्रक्रियेविषयीचे चिंतन-

वर्तमानपत्रामध्ये ‘असे शब्द.. असे अर्थ’ या सदराबद्दल वाचले आणि आतून एक लहर उसळून आली. तिने माझ्या अंतर्मनाला खोलवर साद घातली. कित्येक दिवसांपासून माझ्या मनाला इतरांना काही सांगायचं होतं. पण कुणाला आणि कसं ते कळत नव्हतं. कथासंग्रहात समाविष्ट न करता आलेले अनुभव म्हणत होते की आम्हाला लोकांसमोर यायचंय.

मी का लिहिलं? का लिहीत आहे? मध्यंतरी विश्रांती घेतली. पुन्हा सुरुवात झाली नव्या दमानं, का? मी काही सांगण्यापूर्वी अनेकांची मते ऐकायला मिळाली.

कुणी म्हटलं ‘वेळ जात नाही मग पांढऱ्यावर काळं करायचं.’ कुणी म्हटलं, ‘आज काल लिखाणात पैसा चांगला मिळतो.’ कुणी म्हणालं, ‘लेख, पुस्तकं छापणं! छापून येणं प्रसिद्धीचं उत्तम माध्यम आहे.’ पण एक मात्र शंभर टक्के निश्चित, की मी (आणि बहुधा सर्व) ‘स्वान्त: सुखाय’ लिहिते.

आजपर्यंत अनेक शैक्षणिक लेख प्रकाशित झाले. वर्तमानपत्रातून ललित सदरे, तीन कथासंग्रह प्रकाशित झाले. तीसेक नभोनाटय़े प्रसारित झाली आणि आता चौथा कथासंग्रह. ‘देव रोकडा सज्जनी.’ यातील सर्व कथा माणसाच्या मनातल्या सद्भावनेविषयीच आहेत. माझ्या लिखाणाचा कल माणसातील ‘माणूसपण’ शोधण्याकडे आहे.

डॉ. मूर यांनी कोपऱ्यात काळा ठिपका असलेला पांढरा शुभ्र पडदा लावला आणि यात काय दिसत असं विचारलं तेव्हा बहुतेकांनी ‘काळा’ ठिपका हे उत्तर दिलं, पण ज्यांना मोठ्ठा पांढरा शुभ्र पडदा दिसला त्यात मी एक होते. एखाद्या माणसाची वृत्ती भले छिद्रान्वेषी असेल पण त्याच्यातही ‘माणूसपण’ दडलेलं असतं तेच देव रोकडा सज्जनीमधील कथांमधून आढळेल. जगात मूठभर तरी चांगले लोक आहेतच म्हणून जग चाललंय ही माझी दृढ श्रद्धा आहे.

याच कथा संग्रहातील ‘पारख’ नावाची कथा दिवाळी अंकात जेव्हा छापून आली, तेव्हा ‘एका’ मैत्रीणीनं विचारलं ‘आजकाल किती असे पैसे मिळतात? इतकं १८,१८/२०,२० पानं लिहायचं, मान मोडायची. काय फायदा?’ मी फक्त हसले. पुढं बोलता बोलता रवींद्र पिंग्यांना ही गोष्ट सांगितली तेव्हा ते म्हणाले, ‘एक गोष्ट लक्षात ठेव. किती पैसे मिळतात अथवा मिळाले याकडे लक्ष देऊ नको. लोकांनी दिलेले पुरत नाही आणि देवाने दिलेले सरत नाही.’

या कथासंग्रहातल्या चारपाच कथा लिहून झाल्या आणि पुढं कित्येक दिवस ना सुचत होतं ना पेन हाती धरावंसं वाटत होतं. शेवटी पिंगेकाकांनाच मी मनातील खंत व्यक्त केली. तेव्हाही त्यांनी दिलासा दिला. म्हणाले, ‘माणसंच माणसावर रुसतात असं नाही, तर लेखणीसुद्धा माणसावर रुसते. सध्या तुझ्यावर रुसलीय समजू. रुसवा गेला की आपोआप लिहू शकशील’ आणि पुढं दोनेक महिन्यांनी खरंच माझ्याकडून ‘गाथा स्त्री शक्तीची’ लिहून पूर्ण झालं. तेही काकांना कळवल्यावर त्यांनी ‘ख्रिस्तोफर डेरिक’च मत सांगितलं. ‘मुळात लेखकाजवळ जबर चिकाटी हवी. माणसाच्या मनाचे खेळ त्यानं जवळून पाहायला हवेत. वादळी घटनांकडे कानाडोळा करून बारीकसारीक उद्रेकांकडे लक्ष केंद्रित करायला हवे.’ ही तिसरी गोष्ट लक्षात ठेवून ‘श्वास’ची कथा लिहिली गेली.

‘पाण्याला लागली तहान’ कथा लिहिताना व.पुं.चा संदेश फार उपयोगी ठरला. ‘घारीसारखं टिपत जा आणि मोराच्या पिसाऱ्यासारखं फुलवत जा’ असं सांगितलं, त्यामुळं मी टिपायला शिकले हे खरं. या सगळय़ा लोकांनी लिहायला बळ दिलं आणि वाचकांनी दाद दिली म्हणूनच लिहायची ऊर्मी अजून कमी होत नाहीये.

मनाला भिडलेला अनुभव सांगितल्याशिवाय राहावत नाही. ‘मनगंध’ संग्रहातील मनगंध कथा वाचून एक कानडी गृहस्थ रात्री साडेदहा वाजता घरी आला, परिचय नाही. दारातूनच म्हणाला, ‘ही कथा लिहिलेल्या बाईंची बोटं मला बघायची आहेत.’ (असाच अनुभव ‘श्वास’ नंतरही आला) यापेक्षा दाद काय असू शकते? प्रत्येक कथेमागचे अनेक अनुभव आहेत, पण शब्दमर्यादेमुळं मांडता येत नाही. एक नक्की की काळाच्या गतीचं भान ठेवून, पायाखालून काळाची वाळू सरकतेय याचं भान ठेवून, मुहूर्त न पाहता कागदाला पेन लावतच राहणार कारण दत्ता हलसगीकरांनी संदेश दिलाय..

जीवनात सारंच घडत नसतं
आपल्या मनासारखं.
नाही त्याचा नाद सोड,
आहे त्याचा हात धर.
जीवनावर प्रेम कर,
जगणं फार सुंदर आहे.
अमावास्येच्या रात्रीलाही,
नक्षत्रांचं झुंबर आहे.