अंजली मरार – response.lokprabha@expressindia.com
यंदाचा मान्सून केरळमध्ये त्याच्या ठरलेल्या वेळापत्रकाच्या दोन दिवस नंतर आला, पण उशिरा येऊनही एव्हाना त्याने दोनतृतीयांश देश पादाक्रांत केला आहे. मंगळवारी मान्सूनने दीव, सूरत, नंदुरबार, भोपाळ, नागाव, हमीरपूर, बाराबांकी, सहारनपूर, अंबाला आणि अमृतसर या उत्तरेकडील परिसरापर्यंत मजल मारली असं भारतीय हवामान विभागाच्या दैनंदिन हवामान अहवालात म्हटलं आहे.
दक्षिण द्वीपकल्प तसंच मध्य भारतातील काही भागांत मान्सून त्याच्या ठरलेल्या तारखेपेक्षा सात ते दहा दिवस आधीच येऊन दाखल झाला आहे. तर वायव्य भारतातील (उत्तर पश्चिम) गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशचा पश्चिमेकडील भाग, हरियाणा पंजाब आणि दिल्ली या भागात मात्र मान्सून अजून बरसलेला नाही.
मंगळवापर्यंत पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारत, जम्मू-काश्मीर आणि लडाख, केरळ आणि गुजरात वगळता संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त (२० ते ५९ टक्के) किंवा सरासरीपेक्षा खूप जास्त (६० टक्के किंवा त्याहून जास्त) पाऊस पडला आहे.
पाऊस लवकर का?
मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या ‘यास’ या चक्रीवादळामुळे पाऊस अंदमानच्या समुद्रात २१ मे रोजी वेळेवर दाखल झाला.
मात्र मान्सूनला केरळमध्ये यायला नेहमीपेक्षा दोन दिवस उशीर झाला. तिथे तो ३ जून रोजी येऊन पोहोचला. अरबी समुद्रातून पश्चिमेच्या रोखाने येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे या नैर्ऋत्य मोसमी पावसाने त्यानंतरच्या दिवसांमध्ये मात्र झपाटय़ाने प्रगती केली. तसंच ११ जून रोजी बंगालच्या खाडीत तयार झालेला आणि कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मान्सूनने बिहार उत्तर प्रदेशच्या पूर्व भाग पोहोचला.
ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड. बिहार आणि छत्तीसगढच्या काही भागांत मान्सून वेळेआधीच पोहोचला.
केरळमधून तो किनारी प्रदेशातून एका आठवडय़ाभरात महाराष्ट्रात पोहोचला. त्यामुळे कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसंच दक्षिण गुजरातमध्ये लवकर पोहोचायला त्याला मदत झाली.
हे अनपेक्षित आहे का?
गेल्या दशकभरात म्हणजे २०११ पासून आजतागायत मान्सूनने २०२० (जून १ ते २६), २०१८ (मे २८ ते जून २८), २०१५ (जून ५ ते २६) आणि २०१३ (जून १ ते १६) अशा फक्त चार वेळा जून महिन्यात सगळा देश पादाक्रांत केला आहे.
उर्वरित सात वर्षांत महत्त्वाच्या शहरांमध्ये तसंच महत्त्वाच्या परिसरात पोहोचायला मान्सूनला विलंब झाला. २०१९चं ‘वायू’ हे चक्रीवादळ आणि २०१७ चं ‘मोरा’ या चक्रीवादळामुळे मान्सूनची वाट काही दिवस रोखली गेली. पण तेवढं वगळता या सात वर्षांमध्ये मान्सूनची प्रगती नेहमीप्रमाणे होती. या सात वर्षांमध्ये मान्सूनने १५ जुलैपर्यंत सगळा देश व्यापला होता (२०१९ पर्यंतही मान्सूनने सगळा देश पादाक्रांत करण्याची ही सामान्य तारीख धरली गेली आहे.).
मान्सून ज्या वर्षांमध्ये नेहमीपेक्षा लवकर येऊन दाखल झाला आहे, त्या वर्षी त्याचा प्रवास शेवटपर्यंत तसाच राहिला आहे. त्यामुळे उत्तर तसंच ईशान्य भारतात देखील मान्सून लवकर येऊन दाखल झाला आहे.
त्याचा वेग तसाच राहील का?
मान्सूनने देशाच्या पश्चिम, पूर्व किनारपट्टीवर जोरदार मुसंडी मारली आहे, तर पूर्वेकडे, ईशान्य भारतात आणि मध्य भारताच्या काही भागांत त्याची पुढची वाटचाल संथ गतीने होण्याची शक्यता आहे. जून २५ पर्यंत तिथे कोणतेच बदल होणार नाहीत. पुन्हा नव्याने वेगवान वारे निर्माण होईपर्यंत तिथे बदल होणे अपेक्षित नाही.
अरबी समुद्र किंवा बंगालच्या खाडीतून येणारे मान्सूनचे वारे ईशान्य भारतात पोहोचतील तेव्हाच तिथे मान्सून सक्रिय होईल. ते इतक्यात होण्याची शक्यता नाही, त्यामुळे मान्सूनची प्रगतीदेखील संथच असेल असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा सांगतात.
अर्थात ईशान्य भारतात पश्चिमेकडून वेगाने वाहणारे येणारे वारे वाहात असल्यामुळे तिथे येत्या काही दिवसांतच मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे.
पावसाचं प्रमाण जास्त असेल का?
मान्सूनची प्रगती वेगाने होण्याचा त्याच्या प्रमाणाशी काहीही थेट संबंध नाही. उदाहरणार्थ २०१४ मध्ये मान्सूनने देशभर पोहोचण्यासाठी ४२ दिवस घेतले तर २०१५ मध्ये तो २२ दिवसातच देशभर पोहोचला. इतका फरक असूनही या दोन्ही वर्षी पाऊस अपुरा झाला.
या वर्षी जून अखेपर्यंतच मान्सून सगळ्या देशाला व्यापण्याची शक्यता आहे, पण या वर्षी त्याचं प्रमाण किती असेल ते आधीच सांगता येणं शक्य नाही. जूनमधला पाऊस सरासरीपेक्षा म्हणजे १७० मिलिमीटरपेक्षा जास्त असेल अशी शक्यता आहे. एव्हाना १५ जूनपर्यंत तो सरासरीपेक्षा ३१ टक्के जास्त पडला आहे.
भातपेरणीवर परिणाम होईल?
लवकर आलेल्या मान्सूनचा भात पेरणीवर थेट परिणाम होणार नाही, कारण बहुतेक शेतांमध्ये रोपधारणा अजूनही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे.
भात पिकवणाऱ्या बहुतेक राज्यांमध्ये अजूनही भातलावणीला वेळ आहे. पावसामुळे कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात तसंच कोकणात शेतकरी जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवडय़ात भातलावणी करतील, असं भारतीय हवामान खात्याच्या पुण्यातील कृषी हवामान विभागाचे आर. बालसुब्रह्मण्यम सांगतात. सध्या केरळमध्ये भातलावणी सुरू झाली आहे. मध्य महाराष्ट्रात (कोल्हापूर, सातारा, सांगली हे जिल्हे आणि घाटमाथ्याचा परिसर वगळता) आणि मराठवाडय़ात (विदर्भाच्या सीमेवरचे जिल्हे वगळता) अजून फारसा पाऊस पडलेला नाही. तिथे पुरेसा पाऊस पडल्यावरच तिथले शेतकरी पेरणी सुरू करू शकतात, असंही त्यांनी सांगितलं. ओदिशा तसंच पश्चिम बंगालमध्येही अजून भातलावणी सुरू झालेली नाही.
उन्हाळा कमी होतोय?
भारतीय हवामान विभाग १ जून हा संपूर्ण भारतभर मान्सून सुरू होण्याचा दिवस धरत असला तरी वायव्य भारतामधला उन्हाळा अजून संपलेला नाही. पश्चिम तसंच वायव्य भारतात सध्याच्या काळात दिवसाचं तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्या वर असतं. उदाहरणार्थ पूर्व उत्तर प्रदेशच्या फतेहगढमध्ये सोमवारी ४२.४ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे.
सध्या राजस्थान आणि वायव्य भारताच्या आसपासच्या परिसरात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती आहे. तिथे अजून मान्सून पोहोचायचा आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत तिथला कमी दाबाचा पट्टा आणखी कमी झाला की तिथलं तापमान आणखी वाढेल, असं भारतीय हवामान विभागाच्या पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख डी शिवानंद पै सांगतात.
तापमान बदलाशी संबंध?
एकदा मान्सून केरळमध्ये दाखल झाला की एक तर त्याचा वेग वाढतो, किंवा तो तेवढाच राहतो किंवा मंदावतो. समुद्रातील वातावरणावर ते अवलंबून असतं. दरवर्षी मान्सूनची देशाच्या विविध भागांत होणारी वाटचाल वेळेच्या आधी असू शकते, वेळेवर होऊ शकते किंवा विलंबानेही होऊ शकते. मान्सूनची एकूण गुंतागुंत पाहता या तिन्ही स्थिती सर्वसाधारण आहेत.
असं असलं तरी हवामान अभ्यासक, जाणकार यांनी एखाद्या भागात थोडय़ा वेळाच्या कालावधीत खूप पाऊस पडणं, मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत मोठा कालावधी कोरडा जाणं या गोष्टींचा तापमान बदलांशी संबंध जोडला आहे.
(‘इंडियन एक्स्प्रेस एक्स्प्लेण्ड’मधून)